Google Maps कडून मार्ग दाखवताना चुका का होतात? अपघात कशामुळे होतात?

गुगल मॅप्स का चुकतं? अपघात का होतात? वाचा

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, अमृता दुर्वे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

एखाद्या अपघातासाठी आपण मोबाईलमधल्या दिशा दाखवणाऱ्या ॲपला जबाबदार ठरवू शकतो का? उत्तर प्रदेशात तीन व्यक्ती कारने जात होते. एका अर्धवट कोसळलेल्या पुलावरून नदीत कोसळून या तिघांचा मृत्यू झाला. त्यानंतर हा प्रश्न उपस्थित केला गेला.

हा अपघात रविवारी (24 नोव्हेंबर) झाला. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मात्र गुगल मॅप्सने त्यांना तो रस्ता दाखवला होता, असा त्यांना संशय आहे.

यावर्षी पुरामुळे या पुलाचा एक भाग कोसळल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे स्थानिक लोक या रस्त्याने जात नसत. मात्र, या याची काहीच कल्पना नव्हती आणि ते बाहेरून आले होते. पूल अर्धवट तुटला आहे अशा कोणत्याही प्रकारच्या सूचना किंवा बॅरिकेड घटनास्थळी लावले नव्हते.

राज्यातील रस्ते विभागाच्या चार अभियंत्यावर आणि गुगल मॅप्सच्या एका अज्ञात अधिकाऱ्यावर या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानिमित्तानं आपण गुगल मॅप्स हे अॅप कसं काम करतं हे पाहू.

फेब्रुवारी 2005 मध्ये गुगल मॅप्स अमेरिकेत पहिल्यांदा लाँच करण्यात आलं. या अॅप्ससाठीची टेक्नॉलॉजी गुगलने स्वतः विकसित करायला घेतली होती. पण यावरच काम करणाऱ्या काही कंपन्या टेकओव्हर केल्याने त्यांना पाठबळ मिळालं.

गुगलने ऑक्टोबर 2004 मध्ये Where 2 Tech ही कंपनी टेक ओव्हर केली. त्यानंतर real - time traffic monitoring करणारी Zipdash आणि उपग्रह छायाचित्रांद्वारे व्हर्च्युअल मॉडेल्स तयार करणारी Keyhole ही कंपनी गुगलने ताब्यात घेतली.

याच Keyhole वर आजचं गुगल अर्थ आधारित आहे. पण यातल्या काही गोष्टींचा वापर गुगल मॅप्ससाठीही केला जातो.

गुगल मॅप्स कसे तयार केले जातात?

Satellite and ariel imagery म्हणजे उपग्रह छायाचित्र आणि आकाशातून काढण्यात आलेल्या छायाचित्रांच्या मदतीने एक अचूक नकाशा तयार केला जातो.

यामध्ये अधिक भर घातली जाते ती Street View द्वारे. यासाठी सुरुवातीच्या काळात गुगलने काय केलं, तर जेव्हा 2007 मध्ये अमेरिकेत हे फीचर लाँच करण्यात आलं तेव्हा गुगलने कार्स, बोटी, स्नोमोबील आणि इतर वाहनांवर 360 डिग्री फोटो कॅमेरे लावले आणि या वाहनांनी सगळ्या रस्त्यांचे फोटो काढले. नंतर जगभरात हीच गोष्ट करण्यात आली. अगदी वाळवंटामध्ये गुगलने उंटावरही कॅमेरे लावले होते.

सुरुवातीच्या उपग्रह छायाचित्रांच्या पहिल्या लेयरवर ही स्ट्रीट व्ह्यूच्या माहितीची पुढची लेयर लावली जाते.

दरवर्षी गुगल मॅप्सच्या फीचर्समध्ये आणि क्षमतांमध्ये सुधारणा होत गेली. म्हणजे आधी फक्त नकाशा दाखवणारं अॅप, त्यावेळची ट्रॅफिकची स्थिती दाखवू लागलं. त्या परिसरातले उद्योग, महत्त्वाची ठिकाणं, स्मारकं, बागा यासगळ्याविषयीची माहितीही या अॅपमध्ये आली.

स्ट्रीट व्ह्यू

फोटो स्रोत, Getty Images

2011 मध्ये गुगलने केलेली एक अनोखी गोष्ट म्हणजे त्यांनी लोकांकडून माहिती घ्यायला सुरुवात केली. म्हणजे त्यांनी तयार केलेल्या नकाशांमध्ये लोकांना भर घालता येत होती.

यामुळे गुगलला जगभरातल्या अनेक जागांची - रस्त्यांची नावं मॅप्समध्ये अपडेट करता आली. आणि तिथूनच या अॅपची लोकप्रियता आणि वापर झपाट्याने वाढला.

GPS च्या मदतीने तुमच्या लोकेशननुसारचे रियल टाईम अपडेट्स हे अॅप्लिकेशन पुरवतं.

Photogrammatory या शब्दाचा अर्थ होतो फोटोचा वापर करून प्रत्यक्षातल्या वस्तू वा इमारती - पुतळे किंवा डोंगरांसारख्या नैसर्गिक गोष्टींचं मोजमाप करणं. या टेक्नॉलॉजीचा वापर गुगल मॅप्समध्ये केला जातो आणि आपल्यााल 3D गोष्टी दिसू शकतात.

म्हणजे वेगवेगळ्या प्रकाराने मिळवलेली माहिती जिगसॉ पझलसारखी एकत्र जुळवली जाते.

गुगल मॅप्स का चुकतं? अपघात का होतात? वाचा

फोटो स्रोत, Getty Images

सध्याच्या घडीला जेव्हा तुम्ही एका ठिकाणाहून दुसरीकडे जायला किती वेळ लागेल हे तपासता, तेव्हा आधीपासून असणाऱ्या या सगळ्या माहितीसोबतच इतरही काही गोष्टींचा आधार घेतला जातो.

म्हणजे या वेळेत यापूर्वी प्रवास करणाऱ्या व्यक्तींनी याविषयी काही माहिती लिहीली आहे का, यापूर्वीच्या नोंदीनुसार आठवड्यातल्या या ठराविक दिवशी, या वेळेत किती ट्रॅफिकची नोंद झाली होती, ही माहिती गुगलकडे असते. शिवाय गुगलने अनेक देशांतल्या ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम्ससोबतही real time updates साठी हातमिळवणी केलीय.

बीबीसी मराठीच्या बातम्यांसाठी व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा.
बीबीसी मराठीच्या बातम्यांसाठी व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा.

यासोबतच तुमच्यासारख्याच त्या भागातल्या इतर युजर्सकडून गोळा झालेला anonymous data गुगलकडे असतो. Crowdsourcing हा ट्रॅफिकची माहिती मिळवण्यासाठी गुगलचा मोठा स्त्रोत आहे.

तुम्ही अँड्रॉईड फोन वापरत असाल तर तुम्ही गुगल मॅप्स वापरताना GPS Location ऑन केल्यावर दरवेळी काही डेटा anonymously तुमच्या नावाशिवाय पाठवला जातो. वाहनं किती भरभर हलतायत वा किती काळ थांबून राहतायत, हे गुगलला त्यावरून कळतं.

एखादा रस्ता बंद असेल, अॅक्सिडंटमुळे वा धुक्यामुळे ट्रॅफिक हलत नसेल तर यूझर्सही ही माहिती मॅप्सवर अपडेट करू शकतात.

या सगळ्या माहितीच्या आधारे, AI - मशीन लर्निंगच्या मदतीने गुगल मॅप्स तुमच्या आजच्या प्रवासाला किती वेळ लागेल, याचा अंदाज मांडतं. आणि तुम्ही प्रवासात जसजसे पुढे जाता, त्यानुसार हा अंदाज सुधारला जातो.

पॉइंट A पासून पॉइंट B ला जाण्यासाठीचा सगळ्यात लहान मार्ग मोजण्यासाठी गुगल डायकस्ट्राज अल्गोरिदम (Dijkstra's algorithm) चा वापर करत असल्याचंही म्हटलं जातं.

गुगल मॅप्सच्या मर्यादा काय आहेत?

असं अनेकदा होतं, की आपण गुगल मॅप्सने सांगितलं म्हणून एका गल्लीत शिरतो, पण तो रस्ता बंद असतो. असं का होतं?

तर स्थानिक - बारीकबारीक अपडेट्ससाठी गुगल युजर्सवर अवलंबून असतं. त्यामुळे जोपर्यंत एखादा यूझर रस्त्याच्या या बदलाविषयी, सुरू झालेल्या कामाविषयी मॅप्सवर नोंद करत नाही, गुगलला हे समजत नाही.

अनेकदा सॅटलाईट इमेजच्या आधारे काही गोष्टींचं आरेखन केलं जातं. म्हणजे दोन जागांना जोडणारा एखादा ब्रिज आहे, पण या ब्रिजवर फक्त कार्सना परवानगी आहे, दुचाकी किंवा रिक्षांना परवानगी नाही - याची माहिती गुगलकडे नसते. त्यामुळे तो तपशील तुम्हाला मिळत नाही.

गुगल मॅप्स

फोटो स्रोत, Getty Images

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

भारतासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुरक्षेच्या कारणास्तव भारतात गुगलच्या स्ट्रीट व्ह्यू कार्सवर बंदी घालण्यात आली होती. 2022 मध्ये अशा प्रकारे स्ट्रीट व्ह्यू कारचा वापर करून रस्त्यांचे तपशीलवार नकाशे - Mapping करण्याची परवानगी गुगलला देण्यात आली.

म्हणूनच भारतातल्या सगळ्या जागांचं अजून गुगलकडून तपशीलवार मॅपिंग झालेलं नाही.

प्रायव्हसीच्या मुद्द्यावरून गुगलवर अनेक आक्षेप घेण्यात आले. तुम्ही कधी, कुठे गेला होतात, हे गुगल लक्षात ठेवतं. अनेकदा तुम्हाला या जागांबद्दलची अधिकची माहितीही गुगल विचारतं.

सोबत इतरही काही डेटा गोळा होत असतो. पण हा सगळा डेटा गुगलकडे जाऊ नये, म्हणून हे ऑप्शन्स बंद करण्याचा पर्याय युजर्सकडे असतो. गुगलकडे येणाऱ्या माहितीवर याचाही परिणाम होत असतो.

तुमच्या लोकेशननुसार तुम्हाला दाखवल्या जाणाऱ्या Targeted Ads द्वारे गुगल मॅप्सला पैसे मिळतात.

गुगलने आजवर 220 देश आणि प्रदेशांचं मॅपिंग केलेलं असलं तरी उल्लेखनीय बाब म्हणजे चीन, क्रायमिया, क्युबा, दोनेत्स्क पीपल्स रिपब्लिक, इराण, लुहान्स्क पीपल्स रिपब्लिक, उत्तर कोरिया, सीरिया आणि व्हिएतनाम या देशांमध्ये गुगल मॅप्सवर बंदी आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)