गुगलविरूद्ध लढा देत या जोडप्याने वसूल केली तब्बल 20 अब्ज पाऊंड एवढी नुकसान भरपाई

शिवोन रॅफ आणि त्यांचे पती ॲडम

फोटो स्रोत, Shivaun and Adam Raff

फोटो कॅप्शन, शिवोन रॅफ आणि त्यांचे पती ॲडम गेल्या कित्येक वर्षांपासून गुगल विरोधात कायदेशीर लढाई लढत आहेत.
    • Author, सायमन टलेट
    • Role, बीबीसी न्यूज

एका दाम्पत्याने सगळं काही पणाला लावून एक वेबसाईट सुरू केली. पण गुगल सर्चचा फटका बसल्यानं त्यांचं प्रचंड नुकसान झालं. त्याविरोधात त्यांनी न्यायालयीन लढा लढला. न्यायालयानं गुगलला तब्बल 20 अब्ज पाऊंड (अंदाजे 2179 अब्ज रुपये) नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. जाणून घेऊ, या लढ्याची गोष्ट.

“गुगलने आम्हाला इंटरनेटवरूनच गायब केलं.”

कुठलाही उद्योग किंवा व्यवसाय सुरू होतो तेव्हा पहिल्या दिवसाची उत्सुकता प्रचंड असते. स्थापना दिवस हा कुठल्याही स्टार्ट-अपसाठी फार महत्वाचा असतो.

शिवोन रॅफ आणि त्यांचे पती ॲडमदेखील त्या दिवशी फार खूश होते. कारण बऱ्याच खस्ता खाल्यानंतर त्यांनी सरतेशेवटी जून 2006 ला स्वतःचं स्टार्ट अप सुरू केलं. त्यांच्या स्टार्ट-अप कंपनीचं नाव होतं 'फाऊंडेम'.

ग्राहकांना वस्तूंच्या किंमतीची तुलना करून देणारी ही स्वतःची वेबसाईट या जोडप्याने सुरू केली होती. हा व्यवसाय सुरू करणं हे या दोघांचं बऱ्याच वर्षांपासूनचं स्वप्न होतं. शेवटी बरीच तयारी करून दोघांनीही हातात असलेली चांगली नोकरी सोडत स्वत: व्यवसायात उतरण्याची हिंमत दाखवली‌.

मोठ्या उत्साहात 'फाऊंडेम' कंपनीची स्थापना झाली. इतक्या सगळ्या अडथळ्यांची शर्यत पार करून अखेर ही वेबसाईट सुरू झाल्यानंतर आता सगळं सुरळीत होईल, अशी त्यांना आशा होती. पण त्यांची खरी लढाई इथूनच सुरू झाली होती.

कुठलीही वस्तू खरेदी करताना ग्राहक आधी त्याची किंमत इंटरनेटवरून तपासून घेतो. ही किंमत तपासायला तो ग्राहक इंटरनेटवर आला तर आपसूक आपल्या वेबसाईटकडे वळेल. कारण तो खरेदी करत असलेली वस्तू सर्वात स्वस्त कुठे भेटेल, याची इत्यंभूत माहिती फाऊंडेम कंपनी पुरवणार होती.

ग्राहकाने या वेबसाईटला दिलेल्या भेटीवरच शिवोन आणि ॲडम लॅब यांचा व्यवसाय अवलंबून होता. पण लवकरच त्यांच्या लक्षात आलं की इंटरनेटवर गुगल सर्च केल्यानंतर गुगलचं सर्च इंजिन त्यांची वेबसाईट दाखवतंच नव्हतं.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

सर्च इंजिनवर वेबसाईट दिसणं अचानक बंद झालं?

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

वस्तूंच्या किंमतीची तुलना गुगलवरून शोधल्यानंतर सर्च रिझल्टच्या यादीत त्यांची वेबसाईट सगळ्यात शेवटी दिसत होती. त्यामुळे लोक या वेबसाईटवर येणं साहजिकच कमी झालं होतं.

फाऊंडेमचं आर्थिक गणितच किती लोक वेबसाईटला भेट देतात, यावर अवलंबून असल्यामुळे रॅफ दाम्पत्याचा व्यवसायच धोक्यात आला होता.

“सुरुवातीला सगळं चांगलं चाललं होतं‌. लोक आमच्या वेबसाईटवर गर्दी करत होते. अचानक वेबसाईटवर लोकांचं येणं कमी झालं. आम्ही पाहिलं तेव्हा गुगल सर्च इंजिननं आमची वेबसाईट दाखवणंच अचानक बंद केलं होतं,” ॲडम सांगत होते.

जे स्वप्न आणि योजना घेऊन रॅफ दाम्पत्यानं स्वतःची फाऊंडेम वेबसाईट सुरू केली ते तर काही प्रत्यक्षात आलं नाही. उलटपक्षी त्यांची एक वेगळीच लढाई सुरू झाली. ही लढाई होती जगातील सर्वात बलाढ्य अशा गुगल कंपनीविरोधात.

आपल्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध तब्बल 15 वर्ष कायदेशीर लढाई लढल्यानंतर रॅफ दांपत्याला अखेर न्याय मिळाला.

आपल्या प्रभाव आणि ताकदीचा गैरवापर करून सर्च इंजिनमध्ये आपल्या सोयीच्या ठराविक वेबसाईट्सना प्राधान्य तर उर्वरित वेबसाईट्सना डावलल्याबद्दल युरोपियन महासंघाच्या न्यायालयानं 2017 साली गुगलला तब्बल 200 कोटी पाऊंड्सचा दंड ठोठावला.

इंटरनेटवर एकहाती वर्चस्व मिळवलेल्या बिग टेक कंपन्यांच्या मनमानी कारभाराच्या पार्श्वभूमीवर या न्यायालयीन निकालाकडे एक ऐतिहासिक घटना म्हणून पाहिलं गेलं.

या आधी कुठल्याच तंत्रज्ञान कंपनीवर इतकी मोठी कारवाई कधी झाली नव्हती. या निकालानं बिग टेकच्या अनिर्बंध प्रभावाला धक्का दिला.

गुगल

फोटो स्रोत, Getty Images

जून 2017 सालच्या या निकालाविरोधात गुगल अजूनही दाद मागत आहे. पण मागच्याच सप्टेंबर महिन्यात युरोपियन कोर्ट ऑफ जस्टिस या युरोपच्या सर्वोच्च न्यायालयानं गुगलच्या सगळ्या याचिका फेटाळून लावत आधीचाच निकाल वैध ठरवला. त्यामुळे गुगलला आता ही नुकसानभरपाई भरणं भाग आहे.

न्यायालयाचा हा अंतिम निकाल लागल्यानंतर रॅफ दाम्पत्यानं पहिल्यांदाच बीबीसीशी बोलताना यावर प्रतिक्रिया दिली. बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत तब्बल एक दशकापेक्षा जास्त काळ लढलेला हा लढा शिवोन आणि ॲडम यांनी उलगडून सांगितला.

आपली वेबसाईट गुगलच्या सर्च इंजिनवर दाखवली जात नाहीये, हे लक्षात आल्यानंतर ही कदाचित नजरचुकीने झालेली चूक असेल, असं त्यांना वाटलं.

“कधी कधी काही वेबसाईट्स या स्पॅम असल्याचं वाटून गुगल त्या सर्च इंजिनवर दाखवायच्या बंद करतं. सुरूवातीला आम्हाला वाटलं की आमची वेबसाईट स्पॅम आहे, असा गुगलचा गैरसमज झाला असेल. त्यामुळे एकदा ही चूक निर्दशनास आणून गूगलचा गैरसमज दूर केला की सगळं काही ठीक होईल, असा आमचा समज होता. पण वेबसाईट न दाखवली जाण्यामागचं खरं कारण वेगळंच होतं,” शिवोन सांगत होती.

'अनेकांवर असाच अन्याय सुरू होता'

वेबसाईटवरील निर्बंध उठवण्यासाठी या जोडप्यानं गुगलला अनेक वेळा विनंती केली. पण दोन वर्ष प्रयत्न करूनदेखील गुगलकडून कुठलाच प्रतिसाद त्यांना मिळाला ‌नाही. वेबसाईटमध्ये काहीतरी गडबड आहे, अशातलीही काही गोष्ट नव्हती.

कारण दुसऱ्या सर्च इंजिनवरून शोधल्यानंतर तर वेबसाईट लगेच अग्रक्रमाने दिसत होती आणि व्यवस्थित चालतही होती. पण त्याचा काही उपयोग नव्हता. “कारण प्रत्येक जण गुगलच वापरतो. तुम्ही गुगलवर नाही म्हणजे तुमचं अस्तित्वच नाही इतकं ते सर्वव्यापी आहे,” शिवोन यांनी मूळ मुद्द्याला हात घातला.

आपल्यासोबत असं का होतंय? हे खोलात जाऊन शोधण्याचा प्रयत्न या जोडप्याने केला असता त्यांना असं लक्षात आलं की गुगलच्या या मनमानी कारभाराला बळी पडलेले ते एकटेच नाहीत.

गुगल त्यांच्या प्रतिस्पर्धी वेबसाईट्स आणि कंपन्यांसोबत असाच भेदभाव आणि अन्याय करत आलेला आहे. केलकू, ट्रिवागो आणि येल्पसारख्या वेबसाईट्स देखील याच गोष्टीला बळी पडल्या आहेत. 2017 साली अशा अनेक दुर्लक्षित वेबसाईट्नी गुगलविरूद्ध न्यायालयात दाद मागायला सुरुवात केली होती.

त्यापासून प्रेरणा घेत रॅफ दांपत्यानेही आपल्याविरुद्ध झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी न्यायालयीन लढा उभारण्याचं ठरवलं.

फाऊंडेम

फोटो स्रोत, foundem

ॲडम हा आधीपासूनच सुपर कॉम्प्युटिंगच्या क्षेत्रात काम करत होता. “माझ्या आधीच कंपनीत कर्मचारी म्हणून काम करत असतानाच मला अचानक एके दिवशी धूम्रपान करत असताना स्वतःची कंपनी सुरू करण्याची कल्पना मला सुचली."

विविध वस्तूंच्या किंमतींची वेगवेगळ्या ठिकाणी तुलना करून ग्राहकांना ती सगळ्यात स्वस्त कुठे मिळू शकेल, हे दाखवणारी वेबसाईट उभी करण्याची ही कल्पना होती. त्यावेळी अशा वेबसाईट इंटरनेटवर अस्तित्वात नव्हत्या.

काही मोजक्या वेबसाईट्स वस्तूंच्या किंमतींची तुलना करून देत असल्या तरी त्या ठराविक वस्तूंबद्दलच होत्या. फाऊंडेम मात्र वेगळी होती. या वेबसाईटवर ग्राहकांना अगदी कपडे आणि खेळण्यापासून विमानाची तिकीटे व हॉटेलमधील खोल्यांचे दरदेखील तुलना करून पाहता येणार होते. त्यामुळे फाऊंडेम ही तशी कल्पक आणि नवी योजना होती.

पतीला सुचलेल्या या कल्पनेला पत्नी शिवोन यांनीही तितकीच तगडी साथ दिली. शिवोन या सुद्धा मोठ्या सॉफ्टवेअर कंपनीत सल्लागार म्हणून कामाला होत्या. पतीनं पाहिलेलं स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांनीदेखील हातातली नोकरी सोडत फाऊंडेमची उभारणी केली.

पतीचं स्वप्न साकार करण्यासाठी शिवोन यादेखील त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभ्या राहिल्या. “कारण ग्राहकांना अशी सुविधा उपलब्ध करून देणारं असं दुसरं कोणतं माध्यमच त्यावेळी बाजारात नव्हतं. फाऊंडेम यशस्वी ठरेल याची मला पूर्ण खात्री होती,” शिवोन अभिमानानं सांगत होत्या.

गुगल सर्च इंजिनमधून वस्तूंची तुलना करणाऱ्या स्वतःच्या वेबसाईट्सच अग्रक्रमाने यूजर्सना दाखवतं आणि प्रतिस्पर्धी कंपन्यांच्या वेबसाईट्स संभाव्य ग्राहकांपासून लपवून ठेवतं, हा आरोप 2017 साली युरोपियन महासंघाच्या न्यायालयात सिद्ध झाला. तब्बल 10 वर्ष रॅफ दाम्पत्यानं लढलेल्या न्यायालयीन लढाईला अखेर 2017 ला यश मिळालं.

“पण 10 वर्षांपूर्वी आम्ही जेव्हा वेबसाईट सुरू केली तेव्हा गुगल असं काही आमच्यासोबत करेल, याची आम्हाला कल्पनाही नव्हती. कारण वस्तूंची तुलना करून देणाऱ्या वेबसाईटचं प्रस्थच तेव्हा आलं नव्हतं.

आम्ही एकमेव अशी वेबसाईट होतो.‌ हळूहळू अशा वेबसाईट्सचं प्रस्थ वाढलं. गुगलने वस्तूंच्या तुलना करून देणाऱ्या स्वत:च्या वेबसाईट्स सुरू केल्या‌. आपल्या सर्च इंजिनमधून मग याच वेबसाईट्स गुगल संभाव्य ग्राहकांना दाखवू लागलं व आमच्यासारखे छोटे व्यवसायिक मागे पडू लागले,” ॲडम सांगत होते.

तक्रार करणारे पहिलेच?

गुगल पद्धतशीरपणे आपल्याला डावलण्याचा प्रयत्न करत आहे, याची शंका पहिल्यांदा रॅफ दाम्पत्याला 2008 साली आली. 2008 साली ख्रिसमसच्या तीन आठवड्यांआधी त्यांना त्यांच्या वेबसाईटवर एक संदेश आला. अचानक त्यांची वेबसाईट फारच कमी गतीने चालत असल्याची ती सूचना होती.

पहिल्यांदा रॅफ दाम्पत्याला वाटलं की आपल्या वेबसाईटवर कोणी सायबर हल्ला केलेला असावा. “पण प्रत्यक्षात ही एक गोड बातमी होती. आमच्या वेबसाईट्ला भेट देणाऱ्या यूजर्सची संख्या अचानक इतकी वाढली होती की या गर्दीमुळे ताण पडून वेबसाईट हळू चालत होती,” ॲडम आनंदाने सांगत होते.

सुरू झाल्यानंतर काहीच काळात फाऊंडेम अतिशय लोकप्रिय बनली. ग्राहकांची पसंती तिला मिळू लागली.

एका वर्षातच चॅनेल 5 च्या द गॅजेट शोनं वस्तूंच्या किंमतींची तुलना करून देणारी फाऊंडेम ही ब्रिटनमधील सर्वात उत्कृष्ट वेबसाईट असल्याचा निर्वाळा दिला. एका छोट्या स्टार्ट-अपसाठी ही फार मोठी उपलब्धी होती.

“तरीही गुगलकडून सर्च इंजिनमध्ये डावललं जाण्याचा प्रकार सुरूच होता. तेव्हा आम्ही गूगलशी संपर्क साधून होत असलेल्या प्रकाराबद्दल सांगितलं. ब्रिटनमधील या प्रकारातील सर्वोत्कृष्ट वेबसाइट तुमचं सर्च इंजिन दाखवत नाही, हे गुगलसाठी देखील योग्य नसल्याचं त्यांच्या निर्दशनास आणून दिलं.

वस्तूंच्या किंमतींची तुलना दाखवणारी ब्रिटनमधील सर्वोत्कृष्ट वेबसाइट जर ग्राहकांपासूनच दूर ठेवली जात असेल, तर त्यात सगळ्यांचच नुकसान आहे, हेदेखील गुगलला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी आमच्या तक्रारीची दखल घेणं तर दूरच पण आमच्याकडे सरळसरळ दुर्लक्ष केलं. तेव्हा आम्ही ठरवलं की आता गुगलविरोधात लढावंच लागेल‌. कारण दुसरा कुठला पर्यायच त्यांनी आमच्यासमोर ठेवला नव्हता.

वेबसाईट कितीही चांगली बनवली तरी ती गुगल सर्च इंजिनवर उपलब्ध नसेल तर त्या वेबसाईटपर्यंत कोणी पोहचूच शकणार नाही. म्हणून आता आम्ही न्याय मिळवण्यासाठी दाद मागायला सुरुवात केली,” रॅफ दाम्पत्यानं गुगलविरोधात ही लढाई नेमकी सुरू कशी झाली याची गोष्ट आम्हाला सांगितली.

गुगल

फोटो स्रोत, Getty Images

पहिल्यांदा रॅफ दाम्पत्य ही तक्रार घेऊन माध्यमांकडे गेलं. पण तिथे फारसं यश मिळालं नाही. माध्यमांनी हा मुद्दा पाहिजे तेवढा उचलून धरला नाही. मग रॅफ दांपत्यांनी आपली समस्या घेऊन ब्रिटन, अमेरिका आणि ब्रुसेल्समधील नियत्रकांकडे दाद मागितली. आणि त्याचा फायदा झाला.

ब्रुसेल्समध्येच युरोपियन महासंघाचं मुख्यालय आहे. हा सर्व प्रकार घडत असताना ब्रिटन अजूनही युरोपियन महासंघाचा भाग होता. त्यामुळं ब्रिटनचे राहिवासी असलेल्या रॅफ दांपत्याच्या तक्रारीची नोंद युरोपियन महासंघानं घेतली.

युरोपियन महासंघांनं पहिल्यांदा रॅफ दाम्पत्याची तक्रार नोंदवून घेतली आणि नोव्हेंबर 2010 ला गुगलवर मुक्त बाजारपेठेत हस्तक्षेप केल्याचा खटला दाखल झाला. ब्रुसेल्समध्येच युरोपियन महासंघाच्या नियंत्रकांसोबत रॅफ दाम्पत्याची पहिली बैठक झाली होती.

“नियंत्रकांनी पहिल्यांदा आम्हाला विचारलं की, हे जर अनेकांसोबत होत असेल तर ही तक्रार घेऊन येणारे तुम्ही पहिलेच कसे? गुगलच्या मनमानी कारभाराला बळी पडलेले दुसरे लोक अथवा वेबसाइट्सनी आधी दाद मागितली नाही. कारण कदाचित गुगलविरोधात उभा राहण्याची त्यांची हिंमत झाली नसेल.

जगातील सर्वात बलाढ्य कंपन्यांपैकी एक असणाऱ्या गुगलविरोधात उभा ठाकणं तसं कठीणच आहे. आणि या वेबसाईट्स आपला व्यवसाय चालवण्यासाठी पूर्णपणे गुगलवरच अवलंबून आहेत. त्यामुळे गुगलची नाराजी ओढावून घेतली तर आहे तितके ग्राहकही गुगल हिरावून घेईल आणि आपला व्यवसाय बंद पडेल, अशी भीती त्यांना वाटत असावी.

ग्राहकांना या वेबसाईटपर्यंत पोहचवणारं गुगल हे एकमेव माध्यम आहे. आणि त्याचाच गैरफायदा गुगल घेत आहे,” शिवोननं युरोपियन महासंघाच्या नियंत्रकांसोबत झालेला हा संवाद उलगडून सांगितला.

‘दादागिरी खपवून घेतली जाणार नाही’

युरोपियन महासंघात हा खटला सुरू असताना रॅफ दाम्पत्य ब्रुसेल्समधील युरोपियन महासंघाच्या मुख्यालयाच्या बाजूलाच असलेल्या एका हॉटेलमध्ये राहायला थांबलं होतं. या ऐतिहासिक खटल्याचा निकाल न्यायाधीश मार्गारेट वेस्टगर यांनी जाहीर केला तेव्हा ते ब्रुसेल्स मध्येच होते. फाऊंडेम आणि तत्सम छोट्या वेबसाईट्सनी बलाढ्य गुगलचा पाडाव केला होता.

पण निकाल आपल्या बाजूने लागला म्हणजे सगळं काही लगेच सुरळीत झालं, असं नव्हतं. या निकालाची प्रत्यक्षात अंमलबजावणी केली जाणंही तितकंच महत्वाचं आणि आव्हानात्मक असणार आहे, याची जाणीव रॅफ दाम्पत्याला होती. म्हणूनच त्यांनी विजयी उन्माद न करता लढाई तितक्याच निकराने सुरू ठेवली.

“इतकी छोटी वेबसाईट आणि स्टार्टअप आपलं काय वाकडं करू शकणार आहे? अशा अविर्भावात कदाचित गुगल कंपनी होती. पण त्यांचं दुर्दैव हे की यावेळी त्यांची गाठ आमच्याशी पडली होती.

शत्रू बलाढ्य आहे म्हणून हार मानणारे आम्ही नव्हतो. कोणी कितीही मोठा आणि ताकदवान असला तरी त्याचा मुजोरपणा आणि दादागिरी सहन करणं आम्हाला मान्य नव्हतं. त्यामुळे आम्ही शेवटपर्यंत लढायचं सोडलं नाही,” शिवोन म्हणाली.

मागच्याच महिन्यात न्यायालयानं गुगलची याचिका पुन्हा एकदा फेटाळून लावत आणखी एक दणका दिला.

तरीही न्यायाची ही रॅफ दांपत्याची लढाई संपली असा याचा अर्थ होत नाही. गुगलची ताकद आणि प्रभाव पाहता ते इतक्यात हार मानणार नाहीत, हे स्पष्ट आहे.

न्यायालयाची ताकीद मिळाल्यानंतरही अजूनही गुगलचा मनमानी मुजोरपणा थांबलेला नाही, असं हे दाम्पत्य सांगतात. गुगलने अजूनही फाऊंडेमसारख्या छोट्या वेबसाईट्स सोबत भेदभाव सुरूच ठेवला आहे.

इंटरनेटवरील मुक्त बाजारपेठेत मोठ्या कंपन्यांना अजूनही गैरवाजवी प्राधान्य मिळेल अशीच धोरणं राबवली जात आहेत. याबाबतीत युरोपियन महासंघाची चौकशी अजूनही सुरूच आहे. इंटरनेटवरील मोठ्या कंपन्या छोट्या कंपन्यांची मुस्कटदाबी करत असल्याचे प्रकार अजूनही घडत आहेत.

त्यामुळे ही स्पर्धा समन्यायी होताना दिसत नाही. याच वर्षी मार्च महिन्यात युरोपियन महासंघानं गुगलची मूळ कंपनी असलेल्या अल्फाबेट विरोधात याच संबंधी एक नवीन खटला उघडला आहे. हे प्रकरण अजूनही न्यायप्रविष्ट आहे.

गुगल

फोटो स्रोत, Getty Images

या प्रकरणी स्पष्टीकरण देताना गुगलचे प्रवक्ते म्हणाले की, “2024 च्या खटल्याचा निकाल देताना युरोपियन महासंघाच्या न्यायालयानं 2017 - 18 सालचा डेटा अभ्यासला आहे. 2017 नंतर गुगलने सर्च इंजिनमध्ये अनेक सुधारणा केल्या आहेत.

ऑनलाईन बाजारपेठेतील स्पर्धा सगळ्यांना समान संधी देणारी असावी यासाठी मागच्या सात वर्षांपासून गुगल प्रयत्न करत आहे. त्यामुळे मोठ्या वेबसाईट्च्या तुलनेत छोट्या वेबसाईट्स सर्च इंजिनमधून मागे पडण्याचे प्रकार आता थांबले आहेत.

आजघडीला वस्तूंच्या किमतींचा तौलनिक अभ्यास करून सर्वात स्वस्त पर्याय ग्राहकांना सुचवणाऱ्या 800 पेक्षा जास्त वेबसाईट्स इंटरनेटवर कार्यरत आहेत. या सगळ्यांना गुगल समान संधी आपल्या सर्च इंजिनमधून उपलब्ध करून देत आहे.

त्यामुळं इतकी संख्या झाल्यानंतरही या सर्व वेबसाईट्सवर ऑनलाईन यूजर्स लाखोंच्या संख्येनं भेट देत आहेत. त्यामुळे फाऊंडेमनं केलेले आरोप आम्हाला मान्य नसून न्यायालयानं आमच्याविरोधात दिलेल्या निकालाला पुन्हा एकदा आव्हान देण्याचा आमचा मानस आहे.

गुगल ठराविक वेबसाईट्सना प्राधान्य आणि ठराविक वेबसाईट्कडे दुर्लक्ष करून भेदभाव करत आहे, हा आरोप आम्हाला मान्य नाही.”

गुगलविरुद्ध अब्रू नुकसानीचा आणखी एक खटला दाखल करण्याचा प्रयत्न रॅफ दाम्पत्य करत आहेत. या खटल्याची कारवाई 2026 साली सुरू होणं अपेक्षित आहे.

गुगलविरोधात जवळपास मागची 20 वर्ष चाललेली ही लढाई रॅफ दाम्पत्याने भविष्यात जरी जिंकली तरी तो विजय साजरा करण्याची त्यांची मनस्थिती उरलेली नाही. कारण लढाई जरी जिंकली तरी फाऊंडेम वाचवण्याचं युद्ध ते आधीच हरले आहेत.

गुगलने केलेल्या भेदभावामुळे व्यवसायात त्यांचं न भरून निघाणारं नुकसान झालं आणि 2016 साली त्यांना फाऊंडेम वेबसाईट बंद करावी लागली.

त्यामुळं या खटल्याचा निकाल आपल्या बाजूने लागलेला असला तरी न संपणाऱ्या या लढाईनं रॅफ दाम्पत्याला अक्षरशः हतबल करून सोडलं आहे.

या लढाईत त्यांची उमेदीची जवळपास 20 वर्ष वाया गेली. त्यांनी मोठं स्वप्न घेऊन उभारलेला व्यवसाय यात बंद पडला.

“न्याय मिळवण्यासाठी सुरू केलेली ही लढाई संपायला इतकी वर्ष लागणार आहेत हे आधीच माहिती असतं तर कदाचित आम्ही या लढाईत उतरलोच नसतो,” अशा शब्दात शेवटी ॲडम आपली हतबलता व्यक्त करतात.

बलाढ्य गुगलविरोधातील या सामन्यात मिळालेल्या विजयानं त्यांची उमेदीची वर्ष मात्र हिरावून घेतली‌. त्यामुळे हा विजय देखील आता त्यांना कटूच वाटणं सहाजिक आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.