2 वर 36 शून्यं, रशियानं ठोठावला गुगलला महाप्रचंड दंड

गुगल

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, ग्राहम फ्रासर
    • Role, टेक्नोलॉजी रिपोर्टर

रशियातल्या एका कोर्टाने गुगल कंपनीला दोन 'अनडेसेलियन' (Undecillion) रकमेचा दंड ठोठावला आहे. 'अनडेसेलियन' म्हणजे नक्की किती? असाच प्रश्न तुम्हालाही पडला असेल.

तर जसं दोन 'मिलीयन' म्हणजे 2 वर सहा शून्य, अगदी तसंच दोन 'अनडेसेलियन' म्हणजे 2 वर तब्बल छत्तीस शून्य इतका मोठा आकडा होय.

थोडक्यात, रशियाने गुगलला ठोठावलेला हा दंड एक प्रकारे 'अमर्याद' स्वरुपाचा आहे. शिवाय, हा दंड 'रूबल्स' अर्थात रशियन चलनात आहे.

रशियाच्या सरकारी वृत्तवाहिनीच्या युट्यूब चॅनेलवर बंधनं घातल्यामुळे हा महाप्रचंड असा दंड गुगलला ठोठावण्यात आला आहे.

म्हणजे नक्की किती दंड?

गुगलसारख्या टेक्नॉलॉजी क्षेत्रातल्या सगळ्यात मोठ्या कंपनीला दोन वर 36 शून्यं इतक्या रुबल्सचा हा दंड ठोठवण्यात आला आहे. डॉलरमध्ये सांगायचं झालं तर$20,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000 इतके पैसे भरायचे आहेत.

हा आकडा वाचून गरगरल्यासारखं झालं ना? होणारच, कारण गुगल ही जगातल्या सगळ्यात श्रीमंत कंपन्यांपैकी एक असूनही हा दंड त्यांच्यासाठीही फारच मोठा आहे.

कारण खुद्द गुगलचे एकूण बाजारमूल्य हे 2 ट्रिलियन डॉलर आहे. त्यांचं एकूण बाजारमूल्यही या दंडाची रक्कम पूर्णत्वास नेऊ शकत नाही.

इतकंच काय, तर 'इंटरनॅशनल मॉनेटरी फंड' या संस्थेनं जगाच्या एकूण जीडीपीची जी रक्कम जाहीर केली आहे, ती 110 ट्रिलियन डॉलर इतकी आहे. तीदेखील या दंडापेक्षा कमी आहे.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

इतका महाप्रचंड दंड कसा होऊ शकतो?

गुगल कंपनी मोठी आहे, यात शंका नाहीच. मात्र, तिलादेखील झेपू नये, इतका महाप्रचंड दंड कसा काय होऊ शकतो, असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे.

मात्र, दंडाची रक्कम सतत वाढत गेलेली असल्याने ती एवढी मोठी झाली आहे, असं रशियातल्या टास वृत्तसंस्थेनं सांगितलं आहे.

गुगल

फोटो स्रोत, Getty Images

“दंडाच्या या आकड्याचा उच्चारही करू शकत नाही,” असं म्हणत रशियन सरकारचे प्रवक्ते डिमिट्री पेस्कोव्ह यांनी “गुगलच्या व्यवस्थापकांना याकडे लक्ष द्यायची विनंती” केली आहे.

गुगलने याबाबत कोणताही जाहीर खुलासा केलेला नाही. बीबीसीने यासंदर्भात 'गुगल'कडे खुलासा करण्याची विनंतीही केली. मात्र, त्यांच्याकडून काहीही उत्तर आलं नाही.

युरोपच्या कारवाईचा रशियाकडून बदला?

रशियातल्या 17 सरकारी युट्यूब चॅनेल्सच्या काही मजकूरांवर बंधन घातल्यामुळे हा दंड ठोठावण्यात आल्याचं रशियन वृत्त संस्था आरबीसीने सांगितलं.

युट्यूब चॅनेल्सवर बंधनं घालण्याचा हा प्रकार 2020 पासून सुरू झाला असून त्यानंतर दोन वर्षांनी रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर ही बंधनं अधिकच वाढत गेली.

शिवाय, रशियन-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियावर अनेक 'सॅक्शन्स' लादण्यात आलेत. सामान्यत: आंतरराष्ट्रीय कायदे तोडण्यापासून किंवा आक्रमक होण्यापासून थांबवण्यासाठी एका देशाने दुसऱ्या देशाला दिलेली शिक्षा म्हणजे हे 'सॅक्शन्स' असतात. अशा 'सॅक्शन्स' मुळे निर्यातीवर बंधनं आल्याने अनेक युरोपियन कंपन्यांना रशियात आपला व्यवसाय करणं अवघड बनत चाललं आहे. त्यामुळे, बऱ्याच पाश्चात्त्य कंपन्या तिथून बाहेर पडताना दिसतायत.

याआधी, युरोपमध्येही रशियाच्या माध्यम संस्थांवरही बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे, त्या कृतीला प्रत्युत्तर म्हणून रशियानं हे पाऊल उचलल्याचं स्पष्ट आहे.

गुगल

फोटो स्रोत, Getty Images

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

गुगलची रशियातल्या शाखा 2022 मध्ये दिवाळखोर घोषित करण्यात आली होती. त्यानंतर कंपनीने जाहिरातींसारख्या व्यावसायिक सेवा रशियामध्ये बंद केल्या असल्याचं सांगितलं होतं.

मात्र, कंपनीच्या सगळ्याच सेवा आणि उत्पादनं रशियात पूर्णपणे बंद झालेली नव्हती.

मे 2021 मध्ये, रशियाच्या सरकारी वृत्तसंस्थेचं नियमन करणाऱ्या रोस्कोम्नाड्झोर यांनी गुगल कंपनीवर आरोप केले होते. गुगलकडून 'आरटी' आणि 'स्पुटनिक'सहित रशियन माध्यम संस्थांवर बंधनं घालण्यात आल्याचे तसेच बेकायदेशीर गोष्टींना पाठिंबा दिल्याचे आरोप त्यांनी केले होते.

त्यानंतर जुलै 2022 मध्ये रशियाने गुगलला 21.1 बिलियन रुबल म्हणजे 301 मिलियन पाऊंड इतका दंड लावला होता.

रशियाने प्रतिबंधित केलेल्या विशिष्ट मजकुरावर बंधनं घालण्यास गुगलने असमर्थता दर्शवली होती. हा विशिष्ट मजकूर रशियाच्या युक्रेनविरुद्ध सुरु असलेल्या युद्धासंदर्भातील होता. त्यामुळे, रशियाने गुगलवर हा दंड लावलेला होता.

रशियामध्ये माध्यम स्वातंत्र्य अजिबात दिसत नाही. स्वतंत्र माध्यम संस्था तसेच नागरिकांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य यांची तीव्र गळचेपी होताना दिसतं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)