प्रेम प्रकरणातून मुलीच्या वडिलांची मुलाच्या वडिलांना खांबाला बांधून जीवघेणी मारहाण

 चौगुले
    • Author, सरफराज सनदी,
    • Role, बीबीसी मराठीसाठी

मुलीला पळवून नेल्याच्या रागातून मुलीच्या नातेवाईकांना मुलाच्या वडिलांना बेदम मारहाण केली आणि त्यात त्यांचा मृत्यू झाल्याची घटना सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील मांगले गावात बुधवारी (17 जानेवारी) घडली.

'आमच्या मुलीला तुमच्या मुलाने पळवून नेले, आमची मुलगी कुठे आहे,' असं म्हणत मुलीच्या नातेवाईकांना मुलाच्या आई-वडिलांना खांबाला बांधून मारहाण केली.

शिराळा पोलीस ठाण्याअंतर्गत मांगले गावात झालेल्या या घटनेत 55 वर्षीय दादासाहेब चौगुले यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पत्नीची म्हणजेच मुलाची आई राजश्री चौगुलेंना देखील बेदम मारहाण करण्यात आली आहे. त्या सध्या गंभीर जखमी आहेत.

या प्रकरणात 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून आतापर्यंत 7 जणांना अटक करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले. इतर आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याचे शिराळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम यांनी सांगितले आहे.

या घटनेनंतर चौगुले यांच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार नोंदवली. त्यानंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

संशयितांवर कारवाई होईपर्यंत दादासाहेब यांचा मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही असा पवित्रा त्यांच्या नातेवाईकांनी घेतला होता. पण पोलिसांनी अटकसत्र सुरू केल्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

नेमकं काय घडलं?

मांगले गावामध्ये दादासाहेब चौगुले यांच्या घर आहे आणि घरापासून काही अंतरावर धनटके परिसरात शेतामध्ये त्यांचा दुभत्या जनावरांचा गोठा आहे. त्या गोठ्या शेजारी सुरेश पाटील यांचे घर आहे.

या गोठ्यात दूध काढण्यासाठी दादासाहेब चौगुले यांचा मुलगा गणेश रोज जात असे. यातून गणेश आणि संशयित सुरेश पाटील यांच्या मुलीचे ओळख झाली. गेल्या दोन वर्षांपासून त्यांचे प्रेम होते. त्यातूनच दोन दिवसांपूर्वी घरातून दोघे पळून गेले, असं मांगले गावकऱ्यांनी सांगितले.

वीजेच्या खांबाला बांधून मारहाण करण्यात आली

बुधवारी पहाटेच्या सुमारास मृत दादासाहेब चौगुले व त्यांच्या पत्नी राजश्री चौगुले जनावरांच्या गोठ्यात दूध काढण्यासाठी गेले होते. गोठ्या शेजारीच संशयित सुरेश पाटील यांचे घर आहे.

चौगुले हे गोठ्यात आल्याचे समजताच, गोठयाशेजारी राहणाऱ्या सुरेश पाटील व यांच्या नातेवाईकांनी चौगुले यांना गाठत तुमच्या मुलाने, आमची मुलगी पळवून नेली आहे,आमची मुलगी कोठे आहे? अशी विचारणा सुरू केली.

आई-वडिलांना नव्हती कल्पना

ते दोघे पळून गेल्याची आपल्याला कोणतीच कल्पना नसल्याचे चौगुले दाम्पत्यांनी सांगितले. त्यानंतर संतप्त झालेल्या संशयित पाटील यांच्या नातेवाईकांनी दादासाहेब चौगुले यांना धरून तिथेच रोडवर असणाऱ्या एका विजेच्या खांबाला दोरीने बांधून लाथा बुक्क्यांनी मारहाण सुरू केली.

या ठिकाणी राजश्री चौगुले यांनी सर्वांना अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना देखील यावेळी संतप्त पाटील कुटुंबीयांकडून बेदम मारहाण करण्यात आली.

चौगुले यांचे घर

वडिलांच्या मृत्यूच्या घटनेची माहिती मिळाल्यावर पळून गेलेल्या चौगुले यांच्या मुलाने त्याच्यासोबत असणाऱ्या संशयित पाटील यांच्या मुलगी सोबत थेट शिराळा पोलीस ठाण्यामध्ये हजेरी लावली होती.

तर या सर्व घटनेच्या पार्श्वभूमीवर संशयित पाटील यांच्या घरासमोर शिराळा पोलिसांकडून पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असून गावामध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे.

शिराळा गाव
फोटो कॅप्शन, शिराळा गाव

हेही नक्की वाचा

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)