प्रेमात इतका रानटीपणा असू शकतो का?

शाहबाद डेअरी प्रकरण
    • Author, नासिरुद्दीन
    • Role, बीबीसी हिंदीसाठी

मुंबईजवळच्या मीरा रोड परिसरात एक हादरवून टाकणारी घटना घडली आहे. एक 36 वर्षीय महिलेची तिच्या सोबत लिव्ह-इन रिलेशनशीपमध्ये राहणाऱ्या पार्टनरनं हत्या करुन तिच्या मृतदेहाचे तुकडे करुन त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला.

तसेच काही दिवसांपूर्वी दिल्लीतील शाहबाद डेअरी परिसरात एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीची चाकूने भोसकून आणि दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली.

एक समाज म्हणून आपल्यासाठी ही धक्कादायक बातमी तर आहेच पण आपण हिंसक, अमानुष आणि भ्याड असल्याचीही ही बातमी आहे.

दिल्लीत राहणाऱ्या या तरुणाने भररस्त्यात मुलीची हत्या केली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून हा तरुण बेधडकपणे हत्या करत असल्याचं दिसून येतंय.

एकाबाजूला हे घडत असताना लोकांनी मात्र बघ्याची भूमिका घेतली होती, काही लोक निवांत ये जा करत होते. यातल्या कोणीच पोलिसात कळवायची दखल घेतली नाही. बऱ्याच वेळाने ही बातमी पोलिसांना कळली पण तोपर्यंत मुलीचा जीव गेला होता.

माहितीनुसार, हा तरुण आणि अल्पवयीन मुलीमध्ये प्रेमाचं नातं होतं.

भाववेगातून त्याने ही हत्या केल्याचं म्हटलं जातंय. मग त्याच्या प्रेमात रानटीपणा होता असं म्हणायचं का? प्रेमाची भावना इतकी हिंसक असू शकते का?

पण या सगळ्यात चर्चा सुरू आहेत त्या रानटीपणा आणि आरोपीच्या धर्माच्या. पण या सगळ्यात एक गोष्ट दुर्लक्षिली जाते आहे, ती म्हणजे मुलांचं अशा पद्धतीने वागणं.

एखाद्या अमुक अमुक धर्माचा मुलगा असं वागणार नाही असं आपण छातीठोकपणे सांगू शकतो का? आणि याचं उत्तर मुलांकडून नाही तर महिला आणि स्त्रियांकडून मिळायला हवं.

त्यामुळे हिंसेच्या मुळापर्यंत पोचण्यास मदत होईल अशा विषयावर आपण बोलणं चांगलं.

प्रेम की पौरुषत्व

आपण दिवसरात्र ज्या व्यक्तीसोबत असतो, सोबत राहण्याच्या आणाभाका घेतो त्या व्यक्तीला मारण्याची हिंमत मुलांमध्ये किंवा पुरुषांमध्ये येते तरी कुठून ?

त्यांच्याकडे ही हिंमत येण्याचा स्रोत म्हणजे गुंडगिरी किंवा विखारी पौरुषत्व. या पौरुषत्वाला सर्व काही नियंत्रणात हवं असतं. त्याला माणसांवर आणि त्यांच्या आयुष्यावर नियंत्रण हवं असतं.

महिला अत्याचार

फोटो स्रोत, Getty Images

मुली म्हणजे आपली संपत्तीच असल्याप्रमाणे त्यांना ताब्यात ठेवायचं असतं. आपल्या इशाऱ्यावर त्यांना नाचवायचं असतं. अशा विखारी पौरुषत्वाला समोरच्या व्यक्तीची इच्छा किंवा तिचं स्वातंत्र्य अजिबात मान्य नसतं.

त्याच्यात भावना तर ओतप्रोत भरलेल्या असतात मात्र तो शिरीनचा फरहाद आणि लैलाचा मजनू बनण्याच्या लायक नसतो. त्याला तर कबीर सिंग बनायचं असतं.

त्यामुळे अशा रानटी लोकांना मजनू किंवा रोमिओ म्हणणं हा त्या दोघांचा अपमान ठरेल. यांचं काही नामकरण करायचंच असेल तर यांना कबीर सिंग म्हणता येईल.

शाहबाद डेअरी प्रकरणात नेमकं काय झालं?

दिल्लीतील शाहबाद डेअरी परिसरात एका 20 वर्षीय तरुणाने 16 वर्षीय अल्पवयीन मुलीची चाकूने भोसकून हत्या केली.

आरोपीने पीडितेला वाटेत अडवून चाकूने 16 वार केले. त्यानंतर तिच्या डोक्यात 5 वेळा दगड घातला.

दिल्ली पोलिसांनी सोमवारी उत्तरप्रदेशातील बुलंदशहर येथून आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

साहिल नावाचा हा आरोपी अल्पवयीन मुलीचा प्रियकर असल्याचं म्हटलं जातंय. पण पीडितेच्या कुटुंबीयांनी या वावड्या असल्याचं म्हटलंय.

या घटनेमागे धार्मिक अँगल असल्याच्या चर्चा दिल्ली पोलिसांनी फेटाळून लावल्या आहेत.

हिंसक मुलांचा भरणा असलेला समाज

पण मुलांनी किंवा पुरुषांनीही करायचं तरी काय? त्यांच्या अडचणीही समजून घेतल्या पाहिजेत. त्यांच्याकडे कोणतीही समस्या सोडवण्यासाठी अहिंसेचा मार्गच नाहीये. विखारी पौरुषत्वाने त्यांना अहिंसेचा संवाद शिकवलेलाच नाही.

यांच्याकडे संवादाचा फक्त एकच मार्ग आहे तो म्हणजे हिंसा. मग ती हिंसा शारीरिक असो वा मानसिक. थोडक्यात पौरुषत्वाच्या या साच्यात त्यांना एकच गोष्ट शिकवली गेलीय ती म्हणजे हिंसा. कोणाचंही ऐकून घ्यायचं नाही.

तुमच्या मनाविरुद्ध काही ऐकून घ्यायचं नाही. आणि उत्तर हिंसेने द्यायचं आहे. याचा परिणाम म्हणजे ते स्वतः हिंसक, अमानुष होऊ लागलेत. याचा परिणाम त्यांच्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांवर होतोय. पण एखाद्याला मारणं म्हणजे पौरुषत्व आहे का?

शाहबाद डेअरी प्रकरण

फोटो स्रोत, Getty Images

विखारी पुरुषांची ओळख

या अशा विखारी पुरुषांमध्ये काही लक्षणं आढळतात. ते सतत सतत प्रेमाच्या आणाभाका घेतात. पण त्यांचं हे प्रेम कोणाला स्वैर होऊ देत नाही तर एखाद्याचा गुलाम करतो. त्यांना 'नाही' ऐकायची सवय नसते.

ते मुलीचं एखाद्याशी बोलणं किंवा जवळ जाणं खपवून घेत नाहीत. प्रेमाच्या या दिखाव्यात त्यांना येणं-जाणं, बोलणं, फोन, सोशल मीडिया या सगळ्यावर नियंत्रण ठेवायचं असतं. ते आक्रमक असतात. त्यांना रागावर नियंत्रण ठेवता येत नाही. ते प्रेम करतात तशीच भीती दाखवतात.

आपल्या हट्टीपणामुळे ते कोणाचं ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात. दुसऱ्याच्या भावनांची त्याला पर्वा नसते. त्यांच्यासाठी स्त्रीचं शरीर जास्त महत्त्वाचं असतं. ते तिच्या शरीरावर 'प्रेम' करतात. त्याच्यावर त्यांना हक्क दाखवायचा असतो.

शाहबाद डेअरी प्रकरण

फोटो स्रोत, Getty Images

'नकार' ऐकून घ्यायला शिकलं पाहिजे

प्रेम म्हणजे दोन लोकांची संमती. प्रेम एकतर्फी असू शकतं. जसं आपल्याला एखादा व्यक्ती आवडू शकतो अगदी तसंच आपल्याला एखादा व्यक्ती आवडणारही नाही.

एकतर्फी प्रेमाला प्रेम म्हणता येत नाही. इतकी साधी गोष्ट आपल्याला का कळत नाही. कोणाच्या तरी 'नाही' चा आदर करणं ही तर प्रेमाची पहिली पायरी असते. प्रेमात समानता असते. एकतर्फी प्रेम किंवा आसक्तीमध्ये समानता नसते.

हिंसाचाराची वाढती व्याप्ती

आणि एवढंच नाही, तर मुलांमध्ये हिंसाचाराची कल्पना इतकी भयंकर आहे की ही कल्पना संपूर्ण समाजासाठी धोक्याची आहे आणि सोबतच मुलींसाठी देखील.

मुलं ज्या हिंमतीने मुलींसोबत हिंसाचार करतात, ती प्रकरणं समाजात वाढू लागली आहेत. आणि इतर हिंसाचारात सुद्धा मुलांचं-पुरुषांचं योगदान सारखंच आहे.

हिंसा हा त्यांच्या पुरुष असण्याचा पुरावा आहे. एखाद्याला मारहाण करून ते आरामात जगू शकतात. त्यांच्यासाठी हिंसा न्याय्य आहे. त्यांना कोणीच शिक्षा देऊ शकत नाही. म्हणूनच वैयक्तिक नात्यांमध्ये ते न घाबरता निर्लज्जपणे हिंसाचार करत असतात.

शाहबाद डेअरी प्रकरण

फोटो स्रोत, Getty Images

मग प्रेम म्हणजे काय?

तर प्रेम म्हणजे एखाद्यासाठी आपलं सर्वस्व त्यागणं. पण जर या त्यागाच्या बदल्यात कोणीतरी कशाची तरी अपेक्षा ठेवत असेल तर त्याला प्रेम नाही तर सौदा म्हणता येईल.

आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो त्या व्यक्तीला दुःख कसं काय देऊ शकतो? त्याची हत्या करणं कसं काय शक्य आहे? हत्येने क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत.

प्रेम म्हणजे खोटी आश्वासनं नाहीत. यात फसवणूक, कपटाला अजिबात स्थान नसतं. प्रेमात जात-धर्म-भाषा-लिंगाची भिंत नसते. म्हणूनच प्रेमात एकतर्फी धर्मांतराला जागा नसते.

प्रेमात रानटीपणा नसतो. स्त्रियांना संपत्ती, सूड आणि द्वेष मानण्याच्या भावनेतून जन्माला येतं ते विखारी पौरुषत्व.

शाहबाद डेअरी प्रकरण

जुनं पौरुषत्व सोडून नव्याची कास धरावी लागेल

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

प्रेमात हत्या करणं किंवा अॅसिडने चेहरा विद्रूप करणं ही सर्व कृत्य मुलांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीविषयी सांगतात.

समाजाने हिंसेकडे दुर्लक्ष करून जगण्याची सवय लावली आहे. हिंसेला आपल्या आयुष्यात स्थान दिलंय. यातून मुलांना किंवा पुरुषांना विशेष छळ करण्याची परवानगी मिळते.

म्हणूनच मुलांनी पौरुषत्वाच्या नावाखाली ज्या गोष्टी शिकल्या आहेत त्या आपल्या आयुष्यातून बाजूला काढल्या पाहिजेत. त्यांना पद्धतीचं पौरुषत्व स्वीकारावं लागेल. याला सकारात्मक पौरुषत्व म्हणता येईल. यात पहिली आणि आवश्यक अट म्हणजे अहिंसा आणि बंधुता.

हे पौरुषत्व प्रेम, सहजीवन, एकमेकांवरील विश्वास, एकमेकांबद्दलची तळमळ, संवेदनशीलता, सर्वांचा आदर, सहानुभूती, प्रामाणिकपणा, सत्यता यावर आधारित असेल.

आपल्या लोकशाही पद्धतीचं अनुसरण करायला हवं. म्हणजे काय? तर मनाविरुद्ध ऐकण्याची सवय लावावी लागेल, मतभेद ऐकून त्याचा आदर करण्याची सवय लावावी लागेल.

तुमचं म्हणणं मांडण्यासाठी हट्ट सोडावा लागेल. मुलींच्या म्हणण्याला, तिच्या मताला स्थान दिलं पाहिजे. असं झालं तरच आपल्याला प्रेमात हिंसाचार ऐकू येणार नाही.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)