पावसामुळे अडलेलं हिंदू लग्न मुस्लीम मांडवात कसं पार पडलं? माणुसकीच्या छताखालील लग्नांची गोष्ट

हिंदू आणि मुस्लीम विवाह
    • Author, रेणुका कल्पना
    • Role, बीबीसी मराठीसाठी

पुण्यातल्या वानवडी भागात सुरू असलेल्या एका हिंदू कुटुंबाचं लग्न अचानक आलेल्या पावसानं थांबवावं लागलं. तेव्हा शेजारी सुरू असलेल्या मुस्लीम स्वागत समारंभात त्यांना आसरा मिळाला.

डोक्यावर अक्षता पडून त्यांचं लग्न संपन्न होणारच होतं, तितक्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली.

पुण्यातल्या वानवडी भागातल्या ज्या लग्नमंडपात संस्कृती आणि नरेंद्र यांचं लग्न सुरू होतं, तिथं काही मिनिटातच गुडघाभर पाणी साचलं.

"आमच्या लग्नाचे सगळे विधी झाले होते. अगदी सप्तपदीचा मुख्य विधीही पूर्ण झाला होता. फक्त अक्षता टाकायच्या बाकी होत्या. जेवणही तयार होतं," असं नरेंद्र गलांडे बीबीसी मराठीशी बोलताना सांगत होते.

पुण्यातल्याच वडगावशेरी भागात ते रिअल इस्टेटचा व्यवसाय करतात.

साधारण एप्रिल महिन्यात वानवडीत राहणाऱ्या संस्कृती कवडे यांचं स्थळ त्यांना सांगून आलं. एम.कॉम झालेल्या संस्कृती घरच्या घरीच बेकींगचा व्यवसाय करायच्या.

आई वडील, कुटुंबाच्या म्हणण्याप्रमाणे त्यांचं लग्न ठरलं.

हिंदू आणि मुस्लीम विवाह

"दहा दिवसातच आमचा साखरपुडा झाला. लग्नासाठी लगेचच महिन्याभराचा मुहूर्त निघाल्यानं हॉलही लवकर सापडत नव्हता," नरेंद्र पुढे सांगत होते.

लग्नासाठी 20 मे 2025 च्या संध्याकाळी 6 वाजून 56 मिनिटांचा मुहूर्त निघाला होता. भर मे महिन्यात असल्यानं त्या दिवशी इतका पाऊस येईल, असं कोणालाच वाटलं नव्हतं.

त्यामुळे वानवडीतलाच राज्य राखीव पोलीस दलाचा अलंकारन लॉन कुटुंबीयांनी बुक केला. लॉन असल्यानं वर आकाशाचंच छत होतं. म्हणून सजावटही त्याला साजेशी करून घेतली होती.

हिंदू आणि मुस्लीम विवाह

फोटो स्रोत, Getty Images

पण पुण्यात यंदा साधारणपणे 17 मेपासूनच पावसाला सुरुवात झाली.

"लग्नाच्या आदल्या दिवशी संगीत, हळद असे कार्यक्रम होते. त्यावेळीही पाऊस आलेला. पण ती हलकी सर आली आणि लगेच गेली," नरेंद्र गलांडे पुढे म्हणाले.

अगदी ऐन लग्नाच्या दिवशीही पाऊस पडेल, अशी कुणालाच अपेक्षा नव्हती.

"आला तरी थोडासा येईल आणि लगेच जाईल असंच वाटत होतं," संस्कृती कवडे यांनी पुढे जोड दिली.

साधारण 6 वाजता दोन्ही कुटुंब जोडप्याला घेऊन विधीसाठी मंडपात आले होते. पुढच्या काही मिनिटांतच मुसळधार पावसाला सुरूवात झाली.

"सगळ्यांची पळापळ झाली. काही लोकं दुपारच्या सप्तपदीच्या स्टेजखाली जाऊन थांबले, तर काही जण ताडपत्री घेऊन उभे राहलेले," नरेंद्र आणि संस्कृती सांगत होते.

ते दोघं स्वतःही त्यांच्याच लग्नात साऊंड सिस्टिमच्या बाजूला ताडपत्री घेऊन उभे राहिले होते.

हिंदू आणि मुस्लीम विवाह

फोटो स्रोत, Getty Images

पावसाचा जोर पाहता तो इतक्यात थांबेल, अशी काही लक्षणं दिसत नव्हती. म्हणून शेवटी दोघेही त्यांच्या त्यांच्या रूममध्ये जाऊन पाऊस थांबण्याची वाट पाहत बसले. मुहूर्त केव्हाच टळून गेला होता.

थोड्या वेळानं शेजारच्या हॉलमध्ये सुरू असलेल्या मुस्लीस कुटुंबीयांच्या समारंभात थोड्या वेळासाठी जागा मिळाली असल्याची माहिती नरेंद्र आणि संस्कृती यांच्यापर्यंत येऊन पोहोचली.

"पाऊस आणि त्यामुळे निर्माण झालेला गोंधळ एवढा होता की, दुसरा कोणताही विचार करायला वेळही नव्हता," नरेंद्र पुढे म्हणाले.

पावसात कवडे-लवांडे लग्नाचं सगळं डेकोरेशन खराब झालं होतं. लग्न लागणार होतं ते स्टेजही पाण्यानं चिंब भिजलं होतं. पाहुण्यांना बसायला आणलेल्या खुर्च्या पार भिजून गेल्या होत्या.

"आम्हाला एकदम गलबलून आलं. दुसरा काही पर्यायही उपलब्ध नव्हता," संस्कृती कवडे यांचे वडील चेतन कवडे सांगत होते. मग कुटुंबीयांपैकीच एकाला युक्ती सुचली.

शेजारच्या हॉलमध्ये निवृत्त पोलीस अधिकारी फारूक काझी यांचा मुलगा मोहसीन आणि माहीन दिलगी या दाम्पत्याच्या वलिमा म्हणजे स्वागत समारंभ सुरू होता.

हिंदू आणि मुस्लीम विवाह

फोटो स्रोत, Getty Images

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

सगळ्यांच्या सल्ल्यानं आपल्या मुलीच्या लग्नात या काझी कुटुंबाची मदत घ्यायचं ठरलं.

"तेही आमची पळापळ पाहत होते. सगळी परिस्थिती त्यांच्या डोळ्यांसमोरच होती. म्हणूनच आम्ही काही वेगळं म्हटलं नसतानाही त्यांनी लगेचच होकार दिला," असं संस्कृतीचे काका संजय कवडे बीबीसीशी बोलताना म्हणाले.

काझी कुटुंबानं स्वतःचा समारंभ थांबवून त्यांनी पुढच्या दीड तासासाठी हॉल उपलब्ध करून दिल्याचं ते सांगत होते. शिवाय, कवडे-गलांडे कुटुंबियांच्या लग्नासाठी आलेल्या पाहुण्यांनाही जागा उपलब्ध करून दिली गेली.

तशा वातावरणात रात्री 9 वाजता संस्कृती आणि नरेंद्र यांचं लग्न लागलं. हिंदू आणि मुस्लीम कुटुंबीय, आप्तेष्ट आणि मित्रमैत्रिणींच्या उपस्थितीत दोघांनी एकमेकांना वरमाला घातल्या.

त्यानंतर एकीकडे मोहसीन आणि माहीन यांचा वलिमा पुढे सुरू राहिला आणि दुसरीकडे, हिंदू मुस्लीम पाहुण्यांच्या पंगती एकत्र जेवून गेल्या.

"माझ्याही मुली आहेत. त्यांच्या लग्नात असं काही घडलं असतं, तर मीही कुणाकडून तरी मदतीची अपेक्षा केलीच असती," असं फारूक काझी म्हणाले.

काझी पुढे म्हणाले की, "आम्ही काही विशेष केलं नाही. ही तर माणुसकी आहे. आपण सगळे माणूस आहोत आणि तसं वागणं हीच खरी आपली ओळख आहे."

काझी कुटुंब त्यांच्या कृतीबद्दल स्वतः फारसा गाजावाजा करत नाहीत. पण त्यांच्या त्या एका क्षणिक निर्णयाने दोन कुटुंबं आणि दोन धर्म एका आश्रयाखाली एकत्र आले. पावसाच्या थेंबाखाली माणुसकीचं छत उभारणारे त्यांचे शब्द होते.

"मुस्लीम लोकांशी बोलू नये, त्यांच्यासोबत व्यवहार करू नये, असं मला माझ्या आई-वडिलांनी कधी शिकवलंच नाही," असं संस्कृती म्हणाली. शाळेतल्या मुस्लीम मैत्रिणींची तिला आठवणही येत होती.

"त्यांच्याशी बोलतानाही कधी वेगळं वाटलं नाही. माझ्यासारख्याच त्या मला वाटायच्या," संस्कृती पुढे सांगत होती.

हिंदू आणि मुस्लीम विवाह

फोटो स्रोत, Getty Images

"माझे, माझ्या वडिलांचेही अनेक मुस्लीम मित्र आहेत. त्यांचं आमच्या घरी नेहमी येणं जाणं असतंच," असं नरेंद्र यांचंही म्हणणं होतं. त्यांच्या लग्नाला आलेल्यांपैकीही कुणी त्यांच्या या अनोख्या लग्नाला नावं ठेवली नाहीत. सगळ्यांनी त्याचं कौतुकच केलं असंही ते सांगत होते.

"आमच्या घोरपडी गावातल्या मंदिर आणि मशिदीमध्ये भिंतच नाहीय," असं संजय कवडे सांगतात.

तिथली मशीद 200 वर्ष जुनी आहे. पण 1992 च्या दंगलीनंतर गावकऱ्यांनी मिळून मशिदीशेजारीच मंदिर बांधल्याची गोष्ट फार प्रसिद्ध आहे.

"या भाईचाऱ्याचा वारसा आमच्यासोबत आहे," असं कवडे पुढे सांगत होते.

मंदिर-मशिदीत नसलेली ही भिंत माणसा-माणसाच्या नात्यातही नसावी, असंच त्यांना वाटतं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)