38 दिवस समुद्रात अडकलेलं कुटुंब, व्हेल माशांचा हल्ला आणि कासवाचं मांस खाऊन काढलेले दिवस

डग्लस रॉबर्टस

फोटो स्रोत, DOUGLAS ROBERTSON

डग्लस रॉबर्टसन प्रचंड घाबरलेले होते. एकीकडे पाण्याची पातळी वाढत होती. त्याचवेळी ज्या जहाजावर त्यांचं जीवन सुरू होतं, ते बुडत असल्याचा विचार त्यांच्या मनात घोळत होता.

त्याशिवाय समुद्राच्या त्या भागात फिरणाऱ्या व्हेलची भीतीही मनात होतीच.

याच धोकादायक अशा किलर व्हेलनं काही वेळापूर्वी त्यांच्या बोटला धडक देत त्यांना या कठीण परिस्थितीत ढकललं होतं.

डग्लस यांनी 50 वर्षांनी या घटनेच्या नकोशा आठवणींना उजाळा दिला.

'मला आजही ते भयावह दृश्य डोळ्यासमोर आहे. आम्ही ते किलर व्हेल आमच्याकडं येताना पाहिले. त्यापैकी एकाचं डोकं आमच्या बोटला धडकलं आणि समुद्रात रक्त वाहू लागलं होतं,' असं ते म्हणाले.

1972 मध्ये त्यांची नाव पूर्णपणे उध्वस्त झाली. त्यामुळं डग्लस यांचं कुटुंब 38 दिवस खुल्या आकाशाखाली प्रशांत महासागरात अडकलं होतं. या दरम्यान ते कासवाचं मांस आणि शिल्लक असलेलं पाणी पिऊन जिवंत राहिले होते.

खरं म्हणजे डग्लस रॉबर्टसन यांनी त्यांच्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्याचा निश्चय केलेला होता. त्यांचे वडील एका जुन्या जहाजाचे कॅप्टन होते. त्यांना ब्रिटिश नाविक रॉबिन नॉक्स-जॉनस्टन यांच्या यशाप्रमाणे त्यांनाही काहीतरी करायचं होतं.

जॉनस्टन हे 1969 मध्ये संपूर्ण जगाला प्रदक्षिणा घालणारे पहिले व्यक्ती होती.

तीन वर्षांच्या प्रवासाचं नियोजन डग्लस यांच्या वडिलांनी केलं. त्यासाठी त्यांनी ल्यूसेट नावाची 13 मीटर लांबीची जहाज खरेदी केली. त्यासाठी मध्य लंडनमधील त्यांची शेतीही विकली. पण ही जहाजही शेवटी समुद्राच्या तळाशी बुडाली होती.

त्या जहाजाची आठवण करताना डग्लस म्हणाले की, 'ती जुनी होती, पण ती चांगल्या स्थितीत होती.'

ल्यूसेटचा अखेरचा प्रवास

मर्चंट मरीनमधून निवृत्त झालेले कॅप्टन डग्लस रॉबर्टसन हे पत्नी लिन, 16 वर्षीय मुलगा डग्लस, 17 वर्षीय मुलगी अॅना आणि नऊ वर्षांचे जुळे नील तसंच सँडी यांच्यासह लेकमधील एका डेअरी फार्मवर राहत होते.

शेती करतानाचं जीवन कधीही सोपं नसतं. त्यामुळं कुटुंबाबरोबर जगभ्रमंती करण्याचा विचार त्यांच्या मनात आला.

"आम्ही आयुष्याच्या मधल्या वळणावर होतो. एक वेगळ्याच प्रकारचं जीवन आम्ही जगत होतो. वडिलांनी करिअर पूर्ण केलं होतं, तर माझी आई पेशानं नर्स होती. त्या दोघांना वाटलं की, या प्रवासामुळं मुलांना जीवनाबाबतचा नवा अनुभव शिकण्यास मदत होईल," असं डग्लस म्हणाले.

बोट प्रवास

फोटो स्रोत, NATIONAL MARITIME MUSEUM

या प्रवासाचं नियोजन करण्यासाठी बराच वेळ लागला. आम्हाला त्याचा अंदाज होताच. नातेवाईकांनी बरंच काही ऐकवल्यानंतरही डग्लस यांनी शेत विकून बोट खरेदी केली. सागरी प्रवासासाठी ती गरजेची होती.

'आम्ही हा सागरी प्रवास करावा, याचा वडिलांनी आग्रह केला. कारण आम्ही जगत असलेल्या जीवनापेक्षा ते जीवन वेगळं असणार होतं,' असं ते म्हणाले.

या प्रवासाच्या पहिल्या टप्प्यात ते पोर्तुगालच्या लिस्बन आणि नंतर कॅनडी बेटाच्या टेनेरिफला गेले.

या प्रवासाच्या वेळी केवळ 18 वर्षांच्या असलेल्या माझ्या सारख्या तरुणासाठी कॅनडी बेटावरील त्या मावळत्या सूर्याने जाणीव करून दिली होती की, तो खरंच जगाच्या प्रवासावर निघाला आहे.

किलर व्हेलसोबत पहिला सामना

बहामासला पोहोचल्यानंतर तेव्हा 20 वर्षांची असलेली अॅना एका व्यक्तीला भेटली आणि त्याच्याबरोबर राहण्याचा निर्णय तिनं घेतला. तिच्या कुटुंबानं मात्र जमैकाहून जाणाऱ्या पनामा कालव्याच्या माध्यमातून त्यांचा प्रवास पुढे सुरू ठेवला.

डग्लस यांच्या मते, प्रवासादरम्यान याच ठिकाणी त्यांचा 15 फुटी व्हेलबरोबर सामना झाला. त्यावरून पुढं काय घडू शकतं याचा अंदाज त्यांना आला होता.

'त्यानं नावेवर प्रेमाचा वर्षाव करण्याचा प्रयत्न केला,' असं ते गमतीत म्हणाले. 'प्रेमाचा वर्षाव केला, असं म्हणताना मला हसू येत नाही. त्यामागं एक कारण आहे. कारण त्या माशाच्या मार्गावरून प्रचंड दुर्गंधी येत होती. संपूर्ण जहाजावरही तो दुर्गंध पसरला होता,' असं त्यांनी सांगितलं.

ही भयावह घटना सुमारे 15 मिनिटे सुरू होती. त्यानंतर तो महाकाय माशांचा कळप काहीही नुकसान न पोहोचवता तिथून निघून गेला होता. त्यांच्या प्रवासाचा पुढचा टप्पा होता गॅलापागोस. तिथून फ्रेंच पोलिनेशियामध्ये मार्केसास बेटांचा प्रवास 45 दिवसांचा होता.

व्हेल्सचा हल्ला

डग्लस यांनी त्या घटनेबद्दल सांगताना म्हटले की, "15 जून 1972 च्या त्या रात्री 10 वाजले होते. आम्हाला धडकल्याचा मोठा आवाज ऐकू येऊ लागला होता. आमच्यावर हल्ला झाल्याची माहितीच आम्हाला नव्हती."

ते भावाबरोबर जहाजाच्या डेकवर होते. त्यावेळी पाण्यातून किलर व्हेलचा कळप येताना त्यांना दिसला. त्यांच्यापैकी एकाचं डोकं जहाजाला धडक्यानं जखमी झालं होतं. त्याच्या जखमेतून रक्त वाहत होतं.

त्यांच्या धडकेनं जहाज प्रचंड हलले आणि काही प्रमाणात पाण्याच्या वरही उडाले होते.

डग्लस डेकच्या खाली असलेल्या वडिलांना शोधण्यासाठी धावले तर त्यांच्या गुडघ्याच्या वरपर्यंत पाणी भरलेले होते. वडिलांनी जहाज बुडत असल्याचं सांगितलं तेव्हा पाणी त्यांच्या कमरेपर्यंत आलं होतं, हे त्यांना अजूनही आठवतंय.

डग्लस रॉबर्टसन यांचं कुटुंब

फोटो स्रोत, THE LAST VOYAGE OF THE LUCETTE (BOOK BY DOUGLAS ROBERTSON

डग्लस म्हणाले की,'त्यावेळी वडील म्हणाले जहाजाच्या बाहेर पडा, जहाजातून उतरा. पण जहाजाच्या बाहेर जायचं कुठं? असा प्रश्न मला पडला होता.'

हळूहळू तरुण डग्लस यांच्या मनावर भीतीचं सावट निर्माण होऊ लागलं होतं.

'मी लगेच असा विचार करू लागलो की, हे एक वाईट स्वप्न आहे आणि झोप संपताच सर्वकाही पूर्वीप्रमाणं सुरळीत होईल.'

'पण सर्वकाही आलबेल नव्हतंच'

डग्लस म्हणाले की, लगेचच ते विचारचक्रातून बाहेर पडले. कॅनडी बेटांवरून खरेदी केलेल्या हवेच्या बोटमध्ये हवा भरण्यासाठी ते धावले. त्यांना शक्य ते सर्व त्यांनी त्या बोटमध्ये भरलं होतं.

त्यानंतर रॉबर्टसन यांच्या पायाखालून अगदी सहज त्यांचं ल्यूसेट जहाज नाहीसं झालं. पण त्यापूर्वीच लिन यांनी एक चाकू, 10 मॉल्ट, सहा लिंबू आणि पाण्याच्या काही बाटल्या अशा गरजेच्या वस्तू बोटमध्ये भरून घेण्यात यश मिळवलं होतं.

डग्लस म्हणाले की, त्या हवेच्या बोटवर मीही यशस्वीपणे आलो होतो. मी जुळ्या भावंडांना रडताना पाहिलं. पण ते घाबरल्यामुळं रडत नव्हते, तर आम्ही नुकतीच घेतलेलं जहाज गमावलं होतं, त्यामुळं ते रडत होते. कारण सर्वकाही गमावल्याची भावना त्यांच्या मनात निर्माण झाली होती.

डग्लस रॉबर्टसन

फोटो स्रोत, ROBERTSON FAMILY ARCHIVE

व्हेल माशांचा कळप नजरेआड गेला होता. पण त्यांनी कुटुंबाला विशालकाय प्रशांत महासागरात दोन लहान बोटींवर आणून सोडलं होतं.

एक कटू सत्य

डग्लस यांना त्यांच्या वडिलांबद्दल लक्षात असलेली बाब म्हणजे, ते अत्यंत जिद्दी आणि कडक स्वभावाचे होते.

ते म्हणाले की, समुद्रात सर्वकाही गमावल्यानंतर त्यांच्या आई लिन यांनी मुलांना एकत्र केलं आणि प्रार्थना सुरू केली. त्यांची आई धार्मिक महिला होती. वडील प्रार्थनेत सहभागी झालेले नसल्याचे पाहून डग्लस यांनी त्यांना बोलावले.

पण त्यांच्या प्रतिक्रियेनं डगलस आश्चर्यचकित झाले.

'मी नास्तिक आहे. मला देवावर विश्वास नाही,' असं ते म्हणाले.

प्रार्थनेनंतर त्यांच्या कुटुंबानं पाण्यावर तरंगणाऱ्या काही वस्तू जमा करण्याचा प्रयत्न केला. पुढे त्यापैकी अनेक त्यांना जिवंत राहण्यासाठी उपयोगी ठरल्या. त्यात त्यांच्या आईची शिलाईकामाची टोपली, गॅस सिलिंडर ठेवण्याचा बॉक्स या सगळ्या वस्तू शेवटी अत्यंत महत्त्वाच्या ठरल्या.

समुद्र

फोटो स्रोत, Getty Images

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

डग्लस म्हणाले, भावनिक तणाव निवळल्यानंतर आम्ही प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. 'आपण जिवंत वाचू शकू का?' असे प्रश्न आम्ही वडिलांना विचारले.

'वडिलांनी आमच्याकडे पाहिलं आणि म्हटलं की, अशा वेळी कुटुंबाशी खोटं बोलणं योग्य ठरणार नाही, त्यांना सत्य सांगावंच लागेल. पण ते आम्हाला हेही सांगण्याचा प्रयत्न करत होते की, आपण किती सुदैवी आहोत. आपण वाचलो आहोत, पण आपण अधिक काळ जीवंत राहू शकणार नाही.'

डग्लस यांना त्यांच्या वडिलांनी समजावलं होतं की, त्यांना जे काही शक्य होतं ते त्यांनी केलं होतं. त्यांच्या अंदाजानुसार त्यांच्याकडे असलेलं पाणी 10 दिवसच पुरणारं होतं.

'तरीही त्यांनी एक योजना तयार केली. त्यांनी मला एका बोटवर पाण्याच्या काही बाटल्या घेऊन गॅलापागोस बेटांकडे जाणून घडलेल्या सध्याच्या परिस्थितीतबाबत माहिती देण्यास सांगितलं', असं डग्लस म्हणाले.

पण डग्लस यांना माहिती होतं की, त्यांना या पर्यायावर विचार करायचा नव्हता. ते वडिलांना म्हणाले, 'मी तसं करणार नाही. तिथं एकटं मरण्याऐवजी, मी तुमच्याबरोबर इथं मरेन.'

"मला वाटलं की, ते मला आता चोपून काढतील. पण तसं झालं नाही. त्यांनी माझ्याकडं पाहिलं आणि म्हणाले, मला माफ कर. मी तुला असं म्हणायला नको होतं."

"त्यांनी स्वतःच्या मुलाची माफी मागण्याची ती पहिली आणि अखेरची वेळ होती," असं डग्लस म्हणाले.

जीवनासाठी संघर्ष

कुटुंबाला जगण्यासाठी पाण्याची गरज होती, पण त्यांच्याकडं केवळ 10 दिवस पुरेल एवढंच पाणी होतं. त्यांच्यापासून सर्वात जवळ असलेलं ठिकाण म्हणजे गॅलापागोस बेटं आणि ती 20 दिवसांच्या अंतरावर होती.

पण त्यानंतर पावसाच्या रुपानं त्यांना दिलासा मिळाला.

काही कासवंदेखील त्यांच्या बोटजवळ यायचे आणि त्यामुळं त्यांच्या कुटुंबाची भोजनाची व्यवस्था व्हायची. पण ही कासवं पकडणं एवढं सोपंही नव्हतं.

'मी त्याच्या जवळ गेलो आणि टिलरनं त्याच्या डोक्यावर वार केला. त्याच्या डोळ्यात रक्त जमा झालं आणि ते दूर निघून गेलं. दुसऱ्या एकाला मी पकडलं, पण त्यांच्या टोकदार नख्यांकडे माझं लक्ष नव्हतं, त्यामुळं तोही माझ्या हातून निसटला. आम्ही अखेर तिसऱ्या कासवाला पकडण्यात यशस्वी ठरलो आणि आम्हाला जाणीव झाली की, आम्ही त्याचं रक्त पिऊ शकतो. ते खारट नव्हतं, त्यामुळं ते पाण्याची जागा घेऊ शकणार होतं.'

या 38 दिवसांत त्यांनी मांस दीर्घकाळ टिकण्यासाठी ते उन्हात कसं वाळवायचं आणि पावसाच्या पाण्याचा वापर कसा करायचा हेही शिकलं होतं.

डग्लस म्हणाले की, पाण्याचा पुन्हा तुटवडा निर्माण झाला तेव्हा त्यांच्या आईला एक कल्पना सुचली. तिनं विचार केला की, पावसाचं पाणी जमा करता येईल आणि ते एनिमा(नळी किंवा सिरिंज) द्वारे वापरता येऊ शकते.

'म्हणजे आम्ही एनिमाद्वारे ते पाणी वापरू शकत होतो. कारण आपले आतडे पाणी शोषत असतात. ते पोटाच्या दुसऱ्या भागाकडून येत असल्यानं ते विषारी पदार्थ शोषत नाही. एखाद्या स्की फिल्टरसारखं काम ते करतं.'

ते आधीच गमतीत म्हटले होते की, परतल्यानंतर एक रेस्तराँ सुरू करून या प्रवासात जे काही शिकलं त्याचा तिथं वापर करतील. पण त्यांनी असंही ठरवलं होतं की, त्यांना एखादी बोट मिळाली तर ते ती मध्य अमेरिकेपर्यंत घेऊन जातील.

किलर व्हेल

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, किलर व्हेल

'आम्ही कोस्टा रिकाला जात होतो. आम्ही वाचायचं कसं किंवा संकट याबाबत सगळं विसरलो होतो. डग्लस रेस्तराँ उघडण्याबाबत बोलत होते. बोट दिसली तर त्यांनी तिथं बोट आहे असं सांगितलं आणि पुन्हा रेस्तराँ सुरू करण्याबाबत बोलू लागले.

हे सर्व असं होतं, जणू आम्ही विसरलो होतो की, ती नाव आम्हाला वाचवण्यासाठी आली होती. त्यामुळं आमचं संपूर्ण लक्ष जिवंत राहून कोस्टा रिकाला पोहोचण्याकडं लागलं होतं.

डग्लस उठले आणि फ्लेयर पेटवू लागले. पण त्यानंतरही ते जहाज त्याच्या मार्गावर जात राहिलं.

'त्यांनी दुसरी फ्लेयर पेटवली आणि जहाज दिशा बदलू लागल्याचं आम्ही पाहिलं. ते आमच्या दिशेनं जवळपास 20 डिग्री फिरलं, पण पूर्णपणे आमच्याकडे फिरलं नाही. नंतर आणखी 20 डिग्री फिरलं तेव्हा आम्ही विचार केला की, समुद्रामध्ये जहाज विनाकारण असा मार्ग बदलत नाही. त्यानंतर ते हॉर्न वाजू लागले,' असं त्यांनी सांगितलं.

'ते आम्हाला वाचवायला येत होते आणि आम्ही 38 दिवसांपासून या क्षणांची वाट पाहत होतो.'

सुरक्षित बचावलो

रॉबर्टसन यांच्या कुटुंबाला जपानच्या एका मछ्चिमार जहाजानं वाचवलं होतं. त्यांनी बोटवर जमा केलेलं कासवाचं आणि शार्कचं मांस फेकून द्यायला सुरुवात केली, तेव्हा डग्लस यांना वाईट वाटलं. ते अजूनही सेफ मोडमध्ये होते.

'आम्हाला ते अन्न हातचं जाऊ द्यायचं नव्हतं. कदाचित ते आमच्याशी खोटं बोलत असतील. कदाचित त्यांच्या जहाजावर अन्नच नसेल तर? असे विचार आमच्या मनात सुरू होते.'

ते विमानानं पनामा सिटीला पोहोचले. ते वाचल्याची कहाणी सगळीकडं पसरली आणि आंतरराष्ट्रीय माध्यमांचं लक्ष त्यांच्याकडं वेधलं गेलं.

त्यांना हॉटेलच्या रेस्तरॉमध्ये नेऊन पोटभर जेऊ घालण्यात आलं. त्यांना अॅनिमिया झाला होता आणि शरिरात पाण्याची कमतरचा होती. पण आश्चर्याची बाब म्हणजे ते सर्वांचं आरोग्य चांगलं होतं.

त्यापेक्षाही आश्चर्याची बाब म्हणजे ते काही दिवसांनी जहाजानं इंग्लंडला परतले.

डग्लस रॉबर्टसन

फोटो स्रोत, DOUGLAS ROBERTSON

डग्लस यांच्या मते, त्यांचे आई-वडील मुलांना अशा संकटात ढकलल्याच्या धक्क्यातून सावरू शकले नाही, त्यामुळं त्यांनी घटस्फोट घेतला. लिन पुन्हा शेतीकडे परतल्या आणि डग्लस यांनी प्रवासावर पुस्तक लिहिलं आणि उर्वरित जीवनही त्यांनी भूमध्य सागरामध्ये एका नावेवरच घालवलं.

मुलगा डग्लस नौदलात सहभागी झाले आणि नंतर त्यांनी जहाज विकली. या प्रवासाबाबत त्यांनीही वडिलांप्रमाणं 'द लास्ट वॉयज अँड द ल्यूसेट' नावाचं एक पुस्तकही लिहिलं.

समुद्रात ते जे काही शिकले, त्यातून त्यांना आयुष्यभर मार्गदर्शन मिळत राहिलं, असं त्यांचं मत आहे.

'मी अत्यंत वेगळं जीवन जगलो आहे. पण नियतीच्या महान निर्णयाच्या तुलनेत तुम्ही कायम मागे असता. माझ्या मुलाबरोबर अत्यंत वाईट घटना घडली होती. एका कार अपघातात, त्यांच्या मेंदूला आघात झाला होता. पण माझ्या अनुभवांमुळं मला त्याची काळजी घेण्यात मदत मिळाली.'

डग्लस रॉबर्टसन

फोटो स्रोत, DOUGLAS ROBERTSON

'मला सर्वकाही शेवटपर्यंत करायला आवडतं. ज्याप्रकारे डगलनं केलं होतं. जोपर्यंत सर्वकाही पूर्णपणे होत नाही, तोपर्यंत थांबायचं नाही, असं त्यांनी ठरवलं होतं. मी त्यांच्याकडून ते शिकलो आहे, आणि मला मुलांनाही ते शिकवायचं आहे. '

पण माझी मुलं मात्र आधीच म्हणतात की, 38 दिवस! नको रे बाबा.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)