एकाकी हत्तीला बांधून ठेवणं दिल्ली प्राणी संग्रहालयाला भोवलं, 'साथीविना हाथी' का आला चर्चेत?

    • Author, सुमेधा पाल
    • Role, बीबीसी हिंदी प्रतिनिधी

झिम्बाव्वेकडून तत्कालीन राष्ट्रपतींना भेट म्हणून देण्यात आलेल्या हत्तीला खराब वागणूक दिली म्हणून दिल्लीच्या राष्ट्रीय प्राणी संग्रहालयाचे सदस्यत्व आंतरराष्ट्रीय प्राणीसंग्रहालय संघटनेनी सहा महिन्यांसाठी रद्द केले आहे. यानंतर हत्तीला प्राणी संग्रहालयात मिळणाऱ्या वागणुकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

प्राणी संग्रहालयाने यावर स्पष्टीकरण दिले आहे की जेव्हा हत्ती आक्रमकपणे वागतात तेव्हा आम्ही त्यांना असे बांधून ठेवतो.

देशाच्या राजधानी दिल्ली येथील राष्ट्रीय प्राणी संग्रहालयात 29 वर्षांचा शंकर नावाचा हत्ती आहे. त्याला साखळदंडाने बांधून ठेवल्यामुळे जागतिक प्राणीसंग्रहालय आणि मत्स्यालय (World Association of Zoo and Aquarium) संघटनेनी दिल्लीच्या राष्ट्रीय प्राणी उद्यान (प्राणीसंग्रहालय) चे सदस्यत्व सहा महिन्यांसाठी रद्द केले आहे.

तत्कालीन राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांना 1996 मध्ये झिम्बाब्वेकडून भेट म्हणून देण्यात आलेल्या या हत्तीला योग्य वागणूक दिली जात नसल्याचा आरोप ठेवण्यात आला.

या संघटनेतून निलंबित करण्यात आल्याने या संस्थेचे सदस्य त्यांच्याशी संबंधित परिषदांना उपस्थित राहू शकत नाहीत. या संघटनेचे सदस्यत्व असणे ही प्रतिष्ठेची बाब मानली जाते आणि त्यांनी कारवाई करुन सदस्यत्व रद्द करणे ही गंभीर बाब समजली जाते.

शंकर वगळता आणखी एक आफ्रिकन हत्ती भारतात आहे. या हत्तीचे नाव 'रिची' आहे आणि तो म्हैसूरच्या प्राणीसंग्रहालयात आहे.

2017 सालच्या गणनेनुसार भारतात एकूण 30 हजार हत्ती आहेत. यातील अनेक हत्तींचा वापर पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी किंवा जंगल सफारीसाठी केला जातो.

अलीकडेच एका वृत्तपत्रात एका अप्रकाशित अहवालाचा दाखला देऊन दावा करण्यात आला होता की, गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत हत्तींचे प्रमाण 20 टक्क्यांनी कमी झाले आहे. 2017 ची तुलना केल्यास अनेक भागात त्यांचे प्रमाण 41 टक्क्यांपर्यंत होते.

"आमच्या नियमांचा भंग केल्याबद्दल नवी दिल्लीतील राष्ट्रीय प्राणीसंग्रहालय सहा महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले आहे, परंतु यापेक्षा अधिक तपशील आम्ही तुम्हाला आत्ता देऊ शकत नाही," असे WAZA ने बीबीसीला सांगितले.

या वर्षी जुलैमध्ये 29 वर्षीय आफ्रिकन हत्ती 'मस्थ'मध्ये असताना साखळीमुळे जखमी झाला होता. ( मस्थ म्हणजे प्रौढ हत्तीची अशी अवस्था ज्यात हार्मोनल बदलांमुळे हत्तींची वागणूक बदलते. या काळात ते लैंगिकदृष्ट्या आक्रमक होतात त्यातून त्यांची चिडचिड देखील होऊ शकते.)

केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरण (CZA) आणि दिल्ली प्राणी संग्रहालयाच्या संचालकांना लिहिलेल्या पत्रात, प्राणी संग्रहालयातील आफ्रिकन हत्तीला अनेक महिन्यांपासून बेड्या ठोकल्या होत्या का, असा प्रश्न WAZA ने केला आहे. परंतु प्राणी संग्रहालयाच्या अधिकाऱ्यांनी याला नकार दिला आहे.

WAZA संस्थेनी असे सदस्यत्व याआधी नेमके किती वेळा रद्द केले आहे याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. पण 2015 मध्ये या संस्थेनी एका जपानी प्राणी संग्रहालयाचे सदस्यत्व 6 महिन्यांसाठी रद्द केले होते.

'साखळदंडापासून शंकर मुक्त होणार आहे'

पर्यावरण, वन आणि हवामान बदल राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंह म्हणाले, "साखळदंडापासून शंकर मुक्त होणार आहे."

प्राणी संग्रहालयाला भेट दिल्यानंतर त्यांनी पशुवैद्य आणि हत्तीची काळजी घेणाऱ्यांशी संवाद साधला.

ते म्हणाले, "शंकरच्या तब्येतीत आणखी सुधारणा करण्याच्या उपायांवर सविस्तर चर्चा झाली. त्यासाठी आराखडाही तयार करण्यात आला आहे."

सरकारने तज्ज्ञांना हत्तीची देखभाल करणाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचा आणि हत्तीसाठी आहार योजना तयार करण्याचा सल्ला देखील दिला.

बीबीसीसोबत बोलताना कीर्तीवर्धन सिंह म्हणाले, "मस्थमुळे शंकर रागावला आणि त्याने भिंत तोडण्यास सुरुवात केली, त्यामुळे त्याला साखळदंडाने बांधावे लागले."

"या काळात अशी वागणूक ही सामान्य बाब आहे. शंकरला साथीदार मिळवून देण्यासाठी, त्याच्या पिंजऱ्याचे नूतनीकरण करण्यासाठी आणि त्याच्या साखळ्या काढण्यासाठी मंत्रालय प्रयत्न करत आहे."

शंकरच्या तपासणीसाठी वनताराची टीमही बोलवण्यात आली होती. वनतारा हे गुजरातमधील जामनगरमधील रिलायन्सद्वारे चालवण्यात येणारे अत्याधुनिक प्राणी संग्रहालय आहे. उद्योजक मुकेश अंबानींचे पुत्र अनंत अंबानी हे वनताराचे संस्थापक आहेत.

या बैठकीत शंकरच्या डाएटिशिएन आणि केअर टेकर यांच्याशी वनताराच्या टीमने चर्चा केली. शंकरची काळजी कशी घ्यायची याबाबत ही चर्चा झाली.

शंकरसाठी हत्तीण शोधणे आव्हान का आहे?

आशियाई हत्तींपेक्षा वेगळा दिसणारा, मोठे आकाराचे कान असलेला शंकर हा एक दुर्मिळ आफ्रिकन हत्ती आहे. तो आधी एकटा नव्हता, बॉम्बाई नावाची शंकरची एक साथीदार सुद्धा होती, ती 2005 मध्ये मरण पावली.

प्राणी संग्रहालयाचे अधिकारी म्हणतात की, त्याच्या सोबतच्या हत्तिणीच्या मृत्यूनंतर शंकरला भारतीय हत्तींच्या कळपात ठेवण्यात आले होते. तिथे एक मादी हत्तीण त्याची आईप्रमाणे काळजी घेत होती.

जेव्हा तो प्रौढ बनला तेव्हा त्याला प्राणी संग्रहालयातील आशिआई हत्तिणींच्या संपर्कात येऊ दिले नाही. कारण आंतरराष्ट्रीय कायदे भिन्न-प्रजातींच्या विणीवर बंदी घालतात.

मंत्रालयाने बोट्सवाना सरकारशी संपर्क साधून शंकरसाठी हत्तीण द्यावी अशी विनंती करण्यात आली आहे. दिल्ली प्राणी संग्रहालयाचे संचालक डॉ. संजीत कुमार सांगतात की, शंकरला साथीदार मिळावी यासाठी ते इतर देशांच्याही संपर्कात आहेत.

ते म्हणाले, "आम्ही सध्या त्यांच्याशी बोलत आहोत आणि माहिती शेअर करत आहोत. आम्हाला बोट्सवाना आणि झिम्बाब्वे सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे."

शंकरसाठी आंदोलन

अहवालानुसार, जागतिक प्राणी संग्रहालय आणि मत्स्यालय संघटनेनी (WAZA)ने भारताच्या केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाला (CZA) इशारा दिला होता की, CZA ने 3 नोव्हेंबरपर्यंत 'ॲनिमल वेलफेअर गोल्स 2023' ची पूर्तता न केल्यास त्यांचे सदस्यत्व रद्द केले जाऊ शकते.

'ॲनिमल वेल्फेअर गोल्स 2023' मध्ये प्राण्यांच्या कल्याणासाठी ठरवलेल्या मानकांना लागू करणे आणि त्यांची अंमलबजावणी करणे यांचा समावेश आहे.

दिल्ली प्राणी संग्रहालय भारताच्या पर्यावरण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या CZA अंतर्गत येते. हे भारतातील प्राणी संग्रहालयातील प्राण्यांच्या कल्याणासाठी आणि आरोग्यासाठी मानके आणि नियमांची अंमलबजावणी करते.

प्राणी संग्रहालयांच्या मर्यादा आणि त्यांच्या व्यवस्थापनासंबंधी गोष्टींवर देखील CZA कडून देखरेख ठेवली जाते. देशातील प्रत्येक प्राणी संग्रहालयाला CZA कडून मंजुरी घेणे आवश्यक आहे.

तर जागतिक प्राणी संग्रहालय आणि मत्स्यालय (WAZA) 1935 पासून सक्रिय आहे. ही जागतिक स्तरावरील संघटना आहे. विविध देशांच्या प्राणी संग्रहालयात समन्वयाचे आणि प्राणी संग्रहालयाचा दर्जा संबंधित नियमनांचे काम WAZA कडून केले जाते.

CZA ने जर WAZA चे सदस्यत्व गमावल्यास, भारतातील सर्व WAZA संलग्न संस्था देखील त्यांचे सदस्यत्व गमावतील. ते पुन्हा मिळवण्यासाठी संस्थांना पुन्हा अर्ज करावा लागेल आणि नवीन सदस्याप्रमाणे संपूर्ण प्रक्रिया पार पाडावी लागेल.

शंकरसाठी अनेक स्वयंसेवी संस्था आणि प्राणी प्रेमी सरसावले आहेत.

शंकरसाठी आंदोलनाची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी, 'युथ फॉर ॲनिमल्स' या स्वयंसेवी संस्थेच्या संस्थापक निकिता धवन यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, ज्यामध्ये शंकर वर्षानुवर्षे एकाकी जीवन जगत असल्याचा आरोप केला होता. शंकरला प्राणी संग्रहालयातून काढून वन्यजीव अभयारण्यात ठेवावे, असे या याचिकेत म्हटले होते.

'परंतु शंकर भारताचा आहे आणि इथेच त्याची काळजी घेतली जाईल', असे सांगत न्यायालयाने याला परवानगी दिली नाही.

वनताराचे डॉ. एड्रियन म्हणतात की आफ्रिकन हत्ती प्रौढ झाल्यानंतर त्यांच्या आयुष्यातील अधिकतर काळ एकटं राहणं पसंत करतात, त्यामुळे शंकरचे एकटे राहणे ही त्याची समस्या नाही.

2023 मध्ये, श्रीलंकेत असलेल्या 29 वर्षीय हत्ती मुथूला कथित गैरवर्तनामुळे त्याच्या घरी परत पाठवण्यात आले होते. हा हत्ती 2001 मध्ये थायलंडच्या राजघराण्याने श्रीलंकेला भेट म्हणून दिला होता.

दरम्यान, 11 ऑक्टोबर रोजी सायंकाळी केंद्रीय राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंह यांनी शंकर याची साखळीतून सुटका करण्यात आल्याची माहिती दिली.

एक्सवरील पोस्टद्वारे त्यांनी ही माहिती दिली होती.

त्यांनी लिहिले, "गेल्या 48 तासांपासून प्राणीसंग्रहालय, टीम वनतारा जामनगर गुजरात, विशेषत: त्यांच्या टीमचे नीरज, यदुराज, दक्षिण आफ्रिकेतील हत्ती तज्ज्ञ डॉ. एड्रियन आणि फिलीपिन्सचे माहूत मायकेल पेनी यांनी त्याचे आरोग्य, आहार आणि वर्तन यांचे बारकाईने निरीक्षण केले.'

शंकरच्या वागण्यात आधीपेक्षा खूप सुधारणा झाल्याचं त्यांनी सांगितलं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)