बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीनांना मृत्युदंडाची शिक्षा झाल्यानंतर त्यांच्या पक्षाने काय म्हटले?

फोटो स्रोत, Getty Images
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. यानंतर त्यांचा पक्ष अवामी लीगने या शिक्षेला विरोध दर्शवला. अवामी लीगने एक निवेदन जारी करत न्यायालयाच्या निर्णयाचे वर्णन 'सूडबुद्धीने प्रेरित' निर्णय असे केले.
अवामी लीगने म्हटले, "बांगलादेशचे लोक, अवामी लीग आणि सर्व मुक्तिवादी शक्ती या निर्णयाविरुद्ध आंदोलन करतील, असा आम्हाला विश्वास आहे."
अवामी लीगने 18 नोव्हेंबरला देशव्यापी बंदची घोषणादेखील केली आहे. तसेच 19 ते 21 नोव्हेंबर दरम्यान देशव्यापी आंदोलनाचे आवाहनही केले आहे.
अवामी लीगने बांगलादेशचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस आणि शेख हसीना यांना शिक्षा देणाऱ्या न्यायाधिकरणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
अवामी लीगने निवेदनात म्हटले, "लोकनियुक्त सरकारऐवजी बेकायदेशीर, घटनाबाह्य, लोकनियुक्त नसलेल्या फासिस्ट युनूस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी देशात बेकायदेशीरपणे सत्ता काबीज केली आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय तत्त्वांचे उल्लंघन करून, त्यांनी बेकायदेशीर न्यायाधिकरण स्थापन केले."
"हे न्यायाधिकरण पूर्णपणे बेकायदेशीर, द्वेषपूर्ण, वाईट हेतूने आणि सूडबुद्धीने प्रेरित आहे. युनूस यांनी बेकायदेशीरपणे बळकावलेल्या सत्तेचे रक्षण करण्यासाठी शेख हसीना यांच्याविरुद्ध हे हिंसक पाऊल उचलले आहे," असा आरोप अवामी लीगने केला आहे.
शेख हसीना यांच्याविरुद्धचा खटला म्हणजे "फसवणुकीपेक्षा अधिक काही नाही", अशीही टीका अवामी लीगने केली.
बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणानं माजी पंतप्रधान शेख हसीना आणि माजी गृहमंत्री असदुज्जमान खान कमाल या दोघांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे.
हे दोघेही सध्या भारतात राहत आहेत. मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये दोषी आढळल्यानंतर त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आली.
दरम्यान, या निर्णयानंतर बांगलादेशने भारताकडून शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणाची मागणी केली.
याला उत्तर देताना, भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं एक निवेदन प्रसिद्ध केलं. "बांगलादेशच्या न्यायाधिकरणानं शेख हसीना यांच्याबाबत दिलेल्या निकालाची जाणीव आहे," असं भारतानं म्हटलं आहे.
"जवळचा शेजारी म्हणून, भारत बांगलादेशच्या लोकांच्या हितासाठी वचनबद्ध आहे. त्यात शांतता, लोकशाही, समावेशकता आणि स्थिरता यांचा समावेश आहे. या दिशेनं भारत नेहमीच सर्व भागधारकांशी संवाद साधेल," असं मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटले आहे.
त्यापूर्वी सोमवारी बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयानं एक निवेदन जाहीर केलं होतं.
त्यात लिहिलं होतं की, "आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायाधिकरणानं निकालात फरार शेख हसीना आणि असदुज्जमान खान कमाल यांना दोषी ठरवलं आहे. मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये दोषी ठरलेल्या या व्यक्तींना आश्रय दिल्याच त्या देशाचं वर्तन मैत्रीपूर्ण नसून तो प्रकार न्यायाच्या अवमानाचं गंभीर कृत्य मानलं जाईल," असं त्यात म्हटलं होतं.
भारत सरकारनं दोन्ही दोषींना ताबडतोब बांगलादेशी अधिकाऱ्यांच्या स्वाधीन करावं अशी इच्छा असून दोन्ही देशांमधील प्रत्यार्पण करारानुसार ही भारताची जबाबदारी आहे, असंही म्हटलं आहे.
गेल्या वर्षी जुलै-ऑगस्टमध्ये झालेल्या आंदोलनात झालेल्या हिंसाचार प्रकरणी शेख हसीना यांच्यावर मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांचा आरोप ठेवण्यात आला होता.
शेख हसीना भारतात निर्वासित म्हणून राहत आहेत, त्यामुळं त्यांच्या अनुपस्थितीत त्यांच्याविरुद्ध खटला चालवण्यात आला.
न्यायमूर्ती मोहम्मद गुलाम मुर्तझा मजुमदार यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरण-1 ने हा निर्णय दिला आहे.
न्यायाझीकरणानं शेख हसीनासह तिन्ही आरोपींना दोषी ठरवले आहे.
शेख हसीना यांना त्यांच्याविरुद्धच्या पाचपैकी दोन प्रकरणांमध्ये मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर इतर प्रकरणांत त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
माजी गृहमंत्री असदुज्जमान खान कमाल यांनाही मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली.
माजी पोलीस महानिरीक्षक अब्दुल्ला अल मानून साक्षीदार बनल्यानंतर त्यांना पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली.
शिक्षेवर काय म्हणाल्या शेख हसीना?
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी ढाका न्यायालयाच्या या निर्णयाचा निषेध केला आहे. हा निर्णय 'पक्षपाती आणि राजकीयदृष्ट्या प्रेरित' असल्याची टीका त्यांनी केली.
न्यायालयाच्या निर्णयानंतर शेख हसीना यांच्या वतीनं पाच पानांचं एक निवेदन जारी करण्यात आलं आहे.
"मृत्युदंडाची शिक्षा ही अंतरिम सरकारचा अवामी लीगला राजकीय शक्ती म्हणून अवैध ठरवण्याचा एक मार्ग आहे," असं शेख हसीना यांनी म्हटलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
अवामी लीग हा शेख हसीनांचा पक्ष आहे. यापूर्वी, शेख हसीना यांनी हा प्रकार 'तमाशा' असल्याचं म्हटलं होतं. तसंच त्यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले होते.
"माझ्यावर लावलेल्या आरोपांचं पुराव्यांचे वस्तुनिष्ठपणे मूल्यांकन आणि चाचणी केली जाईल अशा योग्य न्यायाधिकरणासमोर सामना करण्यास मला काहीही भीती वाटत नाही," असं त्यांनी म्हटलं होतं.
अंतरिम सरकारने हे आरोप हेगमधील आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयासमोर आणावेत, असं आव्हान त्यांनी दिलं आहे.
कोर्टात वातावरण कसे होते?
शेख हसीना यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावताच न्यायालयाच्या आत आणि बाहेर मोठ्या संख्येने लोकांनी जल्लोष केला, असं ढाका येथे उपस्थित असलेले बीबीसी प्रतिनिधी अरुणोदय मुखर्जी यांनी सांगितलं.
लोक "त्यांना फाशी द्या" अशा घोषणा देत असल्याचंही बीबीसीच्या एका प्रतिनिधीनं पाहिलं. कोर्टात काही सेकंद जल्लोष झाला पण त्यानंतर कोर्टाने गर्दीला शिष्टाचार राखण्यास सांगितलं.

फोटो स्रोत, Screen grab
या प्रकरणी निकाल सहा भागात दिला जाईल, असं न्यायमूर्ती मोहम्मद गुलाम मुर्तझा मुझुमदार यांनी 453 पानांचा निकाल वाचून दाखवण्यापूर्वी सांगितलं.
या सुनावणीत देण्यात आलेला निर्णय बांगलादेश टेलिव्हिजनवर थेट प्रक्षेपित करण्यात आला.
बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणात जूनमध्ये शेख हसीना यांच्यासह तीन जणांविरुद्ध पाच आरोप दाखल करण्यात आले होते.

या आधारावर, न्यायाधिकरणानं शेख हसीना आणि माजी गृहमंत्री असदुज्जमान खान कमाल यांच्याविरुद्ध अटक वॉरंटही देखील जारी केलं होतं.
बांगलादेशमध्ये गेल्यावर्षी सरकारविरोधी आंदोलनांमध्ये हिंसक निदर्शनं झाली. तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांच्यावर मानवतेविरुद्धच्या या गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचा आरोप करण्यात आला होता.
या आंदोलनामुळं शेख हसीना यांना ऑगस्ट 2024 मध्ये सत्ता गमवावी लागली आणि त्या देशाबाहेर पळून गेल्या. तेव्हापासून त्या भारतात राहत आहेत.
जूनमध्ये निश्चित करण्यात आले होते आरोप
गेल्या वर्षी जून महिन्यात जेव्हा आरोप निश्चित करण्यात आले होते, तेव्हा मुख्य फिर्यादी ताजुल इस्लामनं युक्तिवाद केला होता की गेल्या वर्षी जुले ते ऑगस्ट दरम्यान 1,400 जणांची हत्या करण्यात आली आहे आणि जवळपास 25 हजार लोक जखमी झाले होते.
फिर्यादी पक्षानं न्यायालयासमोर मृत व्यक्तींची यादीदेखील सादर केली होती.
माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्यासह तीन आरोपींच्याविरोधात करण्यात आलेल्या आरोपांच्या समर्थनार्थ न्यायालयात 747 पानांचा दस्तावेजदेखील सादर करण्यात आला होता.
या तीन आरोपींच्या विरोधात हत्या, हत्येचा प्रयत्न, कट, मदत करणं आणि प्रोत्साहन देणं, चिथावणी देणं आणि त्यात सहभागी असण्यासारखे पाच आरोप ठेवण्यात आले आहेत.
ताजुल इस्लाम यांनी न्यायालयाला माहिती दिली आहे की या पाच आरोपांमध्ये 13 जणांच्या हत्येचा आरोपदेखील समाविष्ट आहे.
त्यांचं म्हणणं होतं की, "शेख हसीना यांनी गेल्या वर्षी 14 जुलैला पंतप्रधान असताना एका पत्रकार परिषदेत विद्यार्थ्यांना 'रझाकारां'ची मुलं आणि नातू म्हणत चिथावणी देणारं वक्तव्यं केलं होतं."

बांगलादेशात रझाकार या शब्दाचा वापर देशद्रोही किंवा गद्दार या अर्थानं एका अपमानास्पद शब्दाच्या रूपात केला जातो. या शब्दाचा वापर अशा लोकांसाठी केला जातो, ज्यांनी 1971 मध्ये बांगलादेश मुक्तीयुद्धाच्या काळात पाकिस्तानी सैन्यासोबत काम केलं होतं आणि ज्यांचा अत्यंत घृणास्पद गुन्ह्यांमध्ये समावेश होता.
आरोपपत्रात म्हटलं आहे, "आरोपी असदुज्जमां खान कमाल आणि चौधरी अब्दुल्ला अल मामूल यांच्यासह सरकारमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या चिथावणीतून आणि त्यांच्या मदतीनं, कायदा-सुव्यवस्था सांभाळणाऱ्या यंत्रणा आणि अवामी लीगच्या सशस्त्र लोकांनी मोठ्या प्रमाणात सुनियोजित पद्धतीनं असहाय आणि नि:शस्त्र विद्यार्थी आणि सर्वसामान्य लोकांवर हल्ला करण्याबरोबरच त्यांची हत्या करणं, हत्येचा प्रयत्न आणि छळ करण्यामध्ये मदत केली होती."
यात कटाचा आरोप करताना म्हटलं आहे की, हे सर्व गुन्हे घडत असताना त्याची माहिती आरोपींना होती.
शेख हसीना यांच्यासह तीन जणांवर रंगपूरमध्ये बेगम रोकैया विद्यापीठातील, अबू सईद या विद्यार्थ्याची कोणत्याही कारणाशिवाय हत्या केल्याचा आणि राजधानीतील चंखर पुलमध्ये सहा जणांची हत्या केल्याचा आरोप करण्यात आला होता.
याव्यतिरिक्त, गेल्या वर्षी 5 ऑगस्टला, ज्या दिवशी शेख हसीना बांगलादेशातून पलायन करावं लागलं होतं, त्या दिवशीदेखील अशुलियामध्ये पाच जणांची गोळ्या घालून हत्या करून त्यांचे मृतदेह जाळून टाकल्याचा आणि एका व्यक्तीला जिवंत जाळल्याचा आरोप त्यांच्याविरोधात करण्यात आला होता.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











