'आम्ही जिथे आहोत तिथून 400 किलोमीटरवर युद्धाचा आगडोंब आहे, आम्हाला परत आणा'

“मी ज्या ठिकाणी कामाला आहे, तिथून साडेचारशे किलोमीटर अंतरावर सुदान राजधानीच्या खार्टूममध्ये युद्धाचा आगडोंब उठला आहे. ते पाहून आमच्या मनातही भीती निर्माण झाली आहे. आम्हाला आता भारतात परतायचं आहे.”
सुदानमध्ये अडकलेले तानाजी पाटील बोलत होते. तानाजी हे सांगलीतील सुर्यगावचे रहिवासी आहे. सुदानच्या केनाना शुगर फॅक्टरी परिसरात राहणाऱ्या 450 भारतीयांपैकी ते एक आहेत.
सुदानमध्ये सध्या गृहयुद्ध सुरू आहे. त्यामुळे इथे अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी प्रशासनाने एके ठिकाणी जमण्यास सांगितलं आहे. मात्र, ते ठिकाण केनाना शुगर फॅक्टरीपासून हजार-बाराशे किलोमीटर अंतरावर आहे.
तानाजी पाटील म्हणतात, “तिथे पोहोचणं सध्याच्या स्थितीत शक्य वाटत नाही. ते अत्यंत धोकादायक आहे. इथली परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे.”
ते म्हणाले, “सध्या माझ्या कुटुंबातील तीन व्यक्तींसह सांगलीतील 80 जण इथे राहतात. एकूण 450 भारतीय नागरिक या परिसरात राहायला आहेत. येथील परिस्थिती कोणत्याही क्षणी बिघडेल, अशी चिन्हे आहेत. आम्हाला भारत सरकारने लवकर बाहेर काढावं.”
सुदानची राजधानी खार्टूम येथे काही दिवसांपूर्वी भीषण गृहयुद्ध सुरू झालं.

देशातील व्हाईट नाईल प्रांतातील केनाना शुगर फॅक्टरी हा कारखाना देशातीलच नव्हे तर जगातील सर्वात मोठ्या साखर कारखान्यांपैकी एक मानला जातो.
सध्या या परिसरात युद्धाचं वातावरण नसलं तरी आगामी काळात इथेही त्याची धग पोहोचेल, अशी शक्यता आहे.
या परिसरात स्थानिक नागरिकांपासून भारतीय तसेच इतर देशांतील नागरिकांमध्ये भीतीचं आणि तणावाचं वातावरण आहे.
बीबीसी मराठीने सुदान येथील केनाना शुगर फॅक्टरीत अडकलेल्या तानाजी पाटील यांच्याशी संवाद साधला.

यावेळी पाटील यांनी त्यांच्या मनातील भीती आणि तिथल्या सध्याच्या परिस्थितीविषयी माहिती दिली.
तानाजी हे गेल्या 10 वर्षांपासून पलूस तालुक्यातील सुर्यगाव येथील तानाजी पाटील हे सुदान मध्ये राहत आहेत.
याशिवाय, त्यांच्या कुटुंबातील इतर 5 चुलत भाऊही त्यांच्यासोबत राहतात. त्यांच्यापैकी तिघे भाऊ काही गेल्या महिन्यात सुटीला म्हणून गावी आले होते. आता त्यांच्यासोबत इतर दोन भाऊ आहेत.
बीबीसी मराठीशी बोलताना तानाजी पाटील म्हणाले, “मी 2012 पासून केनाना शुगर फॅक्टरीत बॉयलर इंजिनियर म्हणून काम करतो. माझे पाच भाऊही इथे माझ्यासोबत राहतात. आमच्या फॅक्टरीत एकूण 450 भारतीय आहेत. एकूण सुदानबाबत बोलायचं तर 8 हजारपेक्षाही जास्त भारतीय इथे कामाला आहेत.”
ते पुढे म्हणाले, “या ठिकाणी भारतासोबतच पाकिस्तान, फिलिपीन्स यांसह वेगवेगळ्या देशातले आणि स्थानिक नागरिक कामाला आहेत. जगातील सर्वात मोठ्या साखर कारखान्यांपैकी एक हा साखर कारखाना मानला जातो. याठिकाणी 10 हजारपेक्षा जास्त कामगार नोकरी करतात. सध्या गाळप नसल्याने कारखाना बंद आहे. पण मेंटेनन्सचं काम पाहिलं जात आहे.”
“सुदानच्या खारटूम परिसरात गेल्या 13 दिवसांपासून युद्ध सुरू झालं आहे. लष्कर आणि स्थानिकांमध्ये संघर्ष इरेला पेटला आहे. अनेक जण यामध्ये जखमी आणि मृत होत असल्याच्या बातम्या आमच्यापर्यंत येतात. खारटूम परिसरात तर आकाशातून बॉम्बफेकही सुरू आहे.”

केनाना शुगर फॅक्टरी खारटूमपासून 450 किलोमीटरव आहे. इथे मात्र युद्धाची झळ अद्याप पोहोचलेली नसून सर्व काही सुरळीत सुरू आहे.
केनानापासून 40 किलोमीटरवर असलेल्या रबक येथेही युद्धाचं वातावरण नाही. पण भीतीचं वातावरण या लोकांच्या मनात नक्कीच आहे.
पाटील म्हणतात, “अद्याप तरी आम्हाला कोणतीही अडचण आलेली नाही. आम्ही सेफ झोन मध्ये आहोत. रोजचे काम नेहमीप्रमाणेच चालू आहे. पण कोणत्याही क्षणी आगडोंब उठू शकतो, अशी भीती येथील नागरिकांच्या मनात आहे.”
“कारखाना प्रशासनाने आम्हाला न घाबरण्याची सूचना केली. आम्ही भारतीय नागरिकांनी मॅनेजमेंटसोबत चर्चाही केली. आम्ही एकूण 354 जणांनी भारतात परतण्याची इच्छा प्रकट केली आहे. मॅनेजमेंटकडून याला प्रतिसाद देण्यात आला. मुंबईपर्यंत सोडण्याची जबाबदारी ही कंपनीची आहे.”
प्रश्न आहे की या शुगर फॅक्टरीला लष्कराचं संरक्षण असतं. सध्या लष्कर आणि स्थानिकांध्येच संघर्ष सुरू असल्याने लष्कर उपलब्ध नाही. त्यामुळे भारतीय दूतावास जर मदत करणार असेल, तर तुम्ही जाऊ शकता, त्यासाठी आम्ही सर्वतोपरी मदत करू, असं प्रशासनाने म्हटलं आहे.
सुदानमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी भारत सरकारने भारतीय दूतावसाच्या माध्यमातून 'ऑपरेशन कावेरी' सुरू केलं आहे.

खारटूम शहरात भारतीय दूतावास आहे. तेथूनच आतापर्यंत आमचं येणं-जाणं सुरू होतं. पण, त्याठिकाणी आता मोठ्या प्रमाणात बॉम्बवर्षाव आणि फायरिंग सुरू आहे, म्हणून तेथील भारतीय दूतावास बंद करून पोर्ट सुदान येथे इव्हॅक्युएशन पॉइंट सुरू करण्यात आला आहे.
पाटील म्हणतात, “आम्ही भारतीय दूतावासाशी संपर्क साधला. पण ते खारटूममध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यास प्राधान्य देत आहेत. आम्ही रस्ते मार्गाने इव्हॅक्युएशन पॉईंटवर यावं, अशी सूचना त्यांनी आम्हाला केली. पण अशा प्रकारे जाणे अत्यंत धोकादायक आणि अशक्य आहे. कारण हे अंतर जवळपास बाराशे किलोमीटर इतकं आहे, सध्याच्या स्थितीत इतका मोठा प्रवास आम्ही करु शकणार की नाही, अशी भीती आम्हाला आहे.”
तानाजी पाटील यांच्या सूर्यगाव येथे राहणाऱ्या कुटुंबाशीही बीबीसीने चर्चा केली.
तानाजी पाटील यांच्या पत्नी प्रतिभा पाटील म्हणाल्या, “गेल्या दहा वर्षांत आजवर कधीच काही अडचण आली नव्हती. मात्र युद्ध सुरू झाल्यामुळे आमच्या चिंता वाढल्या आहेत.
ज्या ठिकाणी विमानतळ आहे, तिथेही आता युद्ध सुरू आहे. भारतीय सरकारकडून विमानसेवा सुरू करण्यात आली, लांब असल्याने तिथे पोहोचणं कठीण आहे. यामुळे भारत सरकारने यामध्ये लक्ष घालावे, अशी मागणी प्रतिभा तानाजी पाटील यांनी केली.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








