You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
खलासी : इन्स्टाग्रामवर व्हायरल झालेल्या या गाण्याचा अर्थ काय? गाण्याची रंजक गोष्ट
'कोक स्टुडियो इंडिया'साठी आदित्य गढवी यांनी गायलेलं आणि अंचित ठक्करनं संगीत दिलेलं 'खलासी' गाणं गुजराती भाषेच्या सीमा ओलांडून आता सर्वांच्या ओठांवर रुळलंय. पाकिस्तानच्या 'पसुरी' गाण्यानंतर 'खलासी' हे गुजराती गाणं एका रात्रीत सुपरहिट झालं. सगळीकडं याच गाण्याचा आवाज घुमताना दिसतोय.
गाण्यातील आदित्य गढवी यांचा आवाज आणि अंचित ठक्कर यांचं संगीत ऐकणाऱ्याला नक्कीच एक वेगळा अनुभव देतं. पण खरी कमाल केली आहे ती गाण्यातील शब्दांनी. हे गाणं शब्दबद्ध करणारे कवी आहेत सौम्य जोशी.
या गाण्यात एका नाविकाला शोधण्याचं वर्णन करण्यात आलंय. असा नाविक जो शांत सागराच्या किनाऱ्यावर बसून समाधानी न राहता समुद्र पार करून विदेशात जाण्यासाठी सज्ज आहे. विशेष म्हणजे तो किनाऱ्यापासून समुद्रात जाण्यास आणि समुद्रात सूर मारून खाली तळापर्यंत पोहोचून मौल्यमान मोती शोधून आणण्यासही सक्षम आहे.
गुजराती समाज आणि गुजराती लोकांबद्दल जो एक समज किंवा गैरसमज तयार झाला आहे तो दूर करण्यासाठी हे गाणं लिहिण्यात आलं आहे. पण त्याचबरोबर त्यात धाडसीपणा आणि स्वतःचा शोध घेण्याच्या प्रवासातलं तत्वज्ञानही मांडण्यात आलं आहे.
सौम्य जोशी गुजराती भाषेतील एक प्रसिद्ध नाटककार, कवी, गीतकार, अभिनेते आणि दिग्दर्शक आहेत. 'ग्रीन रुममा' हा त्यांचा काव्य संग्रह आहे. त्याशिवाय 'दोस्त, चोक्कस अहीं एक नगर वसतुं हतुं', 'आठमा तारानुं आकाश' 'वेलकम जिंदगी' ही त्यांची प्रसिद्ध नाटकं आहेत. त्यांच्या '102 नोट आउट' नाटकावर चित्रपटही बनवण्यात आला आहे. त्यात अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर यांनी काम केलं होतं. त्यांनी 'फाडु' वेबसिरीजही लिहिली आहे.
सौम्य जोशींनी राष्ट्रीय पुरस्कार विजेता गुजराती चित्रपट 'हेल्लारो' ची गाणी आणि संवादही लिहिले आहेत.
आता पुन्हा एकदा खलासी या गाण्यासाठी सौम्य जोशी यांच्या नावाची चर्चा होत आहे. त्यामुळं बीबीसी गुजरातीनं या गाण्याचा नेमका अर्थ समजून घेण्यासाठी गीतकार सौम्य जोशी यांच्याशी बातचित केली. त्यांनी सांगितलेला या गाण्याचा अर्थ त्यांच्याच शब्दांत याठिकाणी देत आहोत.
नथी जे मजामां
खाली वावटा धजामां
एवो हाडनो प्रवासी गोती लो
एवो खारवो खलासी गोती लो
मानवाच्या उन्नतीसाठी प्रवासी असणं ही अनिवार्य अशी अट आहे. आपण आज जे काही आहोत, त्याचं एकमेव कारण प्रवास हेच राहिलं आहे. पण हे झालं विदेश यात्रेबाबतचं. पण मानवाचा स्वतःच्या अंतर्मनाचा, स्वतःच्या शोधाचाही एक प्रवास असतो, जो करण्यात आपण बहुतांश वेळा अपयशी ठरतो.
जो धाडसी हा स्वतःच्या शोधाचा प्रवास करू शकतो, तोच हा खरवा, खलासी (नाविक) आहे. त्यामुळं या गाण्यात हा अंतर्मनाचा प्रवास करू शकणाऱ्या धाडसी प्रवाशाला खरवा, खलासी म्हटलं गेलं आहे.
कांठेथी जा तुं जा... दरिये
दरियेथी जा तुं जा...तळिये
आपल्याकडे गुजरातचा 1600 किमी लांबीचा सागरी किनारा आहे. त्या किनाऱ्यावर धाडसी लोक राहतात. पण तसं असलं तरी मुख्य प्रवाहात दिसणारं गुजरातचं प्रतिनिधित्व हे अगदी ठरलेलं असं जुन्या प्रकारचं आहे.
त्यामुळं हे गाणं लिहिताना स्पष्ट होतं की, मला गुजरातचं अशा प्रकारचं जुन्या काळापासून चालत आलेलं वर्णन करायचं नाही. मी आतून एका नव्या, खऱ्या आणि धाडसी गुजरातीबद्दल बोलू इच्छित होतो.
गोती लो....
तमे गोती लो, गोती लो, गोती लो
अंचित ठक्कर यांनी जेव्हा मला स्क्रॅच पाठवलं तेव्हा त्यांनी त्यात 'ढोलिडो...' गायलं होतं. त्यामुळं मी म्हटलं चला आधी हा ड्रम बदलूया. मग त्याच तीन अक्षरांच्या मीटरमध्ये मला 'गोती लो...' शब्द सापडला. त्या शब्दानं स्वतःची मुळं घट्ट करताच मला त्या माध्यमातून शोधाची संपूर्ण कहाणी सांगण्याचा मार्ग सापडत गेला.
तर या गाण्याचा अर्थ किंवा त्यातील तत्वज्ञान म्हणजे एक मोठा प्रवास करणं, आतील आणि बाह्य अशा दोन्ही जगांमध्ये.
वहेवा दो vs रहेवा दो
समाजामध्ये आपल्याला 'स्टेटस को' (आहे त्या स्थितीत) हे मूल्य मोठ्या प्रमाणात वापरलं जात असल्याचं आढळतं. त्याचा अर्थ म्हणजे मानवी समाज एवढ्या घाईत आहे की, त्याला वाटतं, तो जसा धावत असतो तसं त्याला काहीतरी मिळत असतं. पण त्याला जे मिळतं ते, 'जला दो इसे, फूंक डालो ये दुनिया, ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है?' अशा प्रकारचं काहीतरी मिळत असतं.
या शर्यतीमध्येच 90 टक्के लोक सहभागी झालेले आहे. ते कायम म्हणत असतात, 'हे सर्व काही सोडा, आम्हाला सुरक्षित ठिकाणी राहायचं आहे.'
त्यामुळं या गाण्यात दोन आवाज आहेत. एक आवाज मानवाला सुरक्षित राहण्यासाठी आग्रह करत असतो आणि दुसरा आवाज त्याला बाहेर जाण्याचा, नवनवीन गोष्टी शोधण्याचा, विदेशात जाण्याचा आग्रह करत असतो.
या गाण्यातील पहिला आवाज म्हणजे कोरसचा आहे. तर आदित्य दुसऱ्या आवाजात गातात. यात असं म्हटलं आहे की, अशा खास खलाशाला म्हणजे नाविकाला शोधायला पाहिजे जो एक अद्भूत प्रवास करत असेल आणि कोरस विचारतात, असा खलासी कुठे आहे? त्याचा नेमका ठाव ठिकाणा तरी सांगा!
जडेलुं ना शोधे
शोधेलू ना गोते
एवो खारवो खलासी गोती लो
मला वाटतं हे गाणं स्वतःच तुम्हाला त्याकडं खेचतं. कवी गीत लिहित नसतात, ते केवळ लिहायची सुरुवात करतात. नंतर ते गीतच कवीला स्वतःकडे खेचतं. या शब्दांचा अर्थ अशा व्यक्तीला शोधणे आहे, जो अंत नाही. तो अशा गोष्टीच्या शोधात आहे, जिचा शोध आतापर्यंत लावता आलेला नाही.
तुमच्यातील स्वत्व आधी यायला हवं. हीच स्वतःला शोधण्याची पद्धत आहे.
किनारा तो खाली पडे नानी नानी पगली ने
नानां एवां सपनांनी रेतवाळी ढगली ने
तोफानो तराप मारे
हलेसांओ हांफी जाय
तोय जेनी हिंमत
अने हाम नहीं हांफे
एवो खारवो खलासी गोती लो
जर किनाऱ्यावर खूप काही असेल तर काय होईल? स्वप्नं तर खूप आहेत, त्या स्वप्नांची वाळू एवढीच आहे की, लहान लहान ढिगारे बनवता येतील. पण म्हणूनचं सगळं महत्त्वाचं, मोठं आणि खरं काम हे समुद्रातच करावं लागतं.
समुद्रातील कामांसाठी समुद्राचा प्रवास करावा लागतो. मानवाला विकासाच्या मार्गावर घेऊन जाणारे नेहमी म्हणत असतात... गोती लो.. हाडनो प्रवासी गोती लो.. म्हणजे त्या कट्टर प्रवाशाचा शोध घ्या.
मग हा कट्टर प्रवासी कुठे आहे? तो तर आपल्या आतच आहे, तुम्हाला त्याचा शोध घ्यावा लागेल आणि हेच उत्तर या गाण्यात दिलं आहे.
पोताना जे दरियामां,
पोतानी जे डूबकीथी
जातनुं अमूल मोती लो.
जेव्हा 'ढोलिडो' बनले 'गोती लो'
'ढोलिडो' च्या जगी मला गोती लो मिळाले आणि नंतर गाणंच मला शोधत शोधत आलं.
गाणं तुमच्या आत असलेल्या सगळ्या गोष्टी शोधत असतं. तुमच्यामध्ये एक सृजनशीलता असते. एक स्मृती असते. त्या सर्व गोष्टी गाणं शोधत असतं. त्यातही सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ध्वनी.
हा जो नाद आहे त्यामुळंच गुजरातीशिवाय इतरही भाषांमध्ये आज हे गाणं गायलं जात आहे. भाषा ही एक गोष्ट आहे आणि ध्वनी ही वेगळी गोष्ट आहे. जेव्हा गीतकार एखादं गाणं लिहित असतो तेव्हा त्याच्या आतही एक आवाज घुमत असतो. तोच ध्वनी असतो. अनेकदा असं होतं की, गाण्याचा शब्दशः अर्थ लोकांना कळत नाही, पण त्यातून जे सांगायचं ते लोकांपर्यंत पोहोचतं. मला वाटतं या गाण्याच्या बाबतीतही तसंच झालं आहे.
(बीबीसी प्रतिनिधी जय मकवाना यांनी सौम्य जोशी यांच्याशी केलेल्या चर्चेवर आधारित...)
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा..
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)