रिमझिम गिरे सावन व्हीडिओची गोष्टः 'आमच्या लग्नाला 26 वर्षं झाली असली तरी ती 26 दिवसच असल्यासारखी वाटतात'

    • Author, वंदना आणि मधू पाल
    • Role, बीबीसी न्यूज

मुंबईचा समुद्र आणि मान्सूनचा पाऊस.. हे दृश्यच खूप रोमँटिक आहे.

आता हे दृश्य समोर येताना तुमच्या मनात एखाद्या तरुण जोडप्याचाच विचार येईल. मग खऱ्या आयुष्यात असो वा एखाद्या चित्रपटाचा सीन..

पण आपल्या मनातल्या ज्या कल्पना आहेत त्या तोडण्याचं काम केलंय 51 वर्षीय शैलेश इनामदार आणि वंदना यांनी.

सध्या सोशल मीडियावर एक व्हीडिओ व्हायरल होताना दिसतोय. यातलं हे जोडपं मुंबईच्या समुद्र किनारी पावसात भिजतंय आणि मागे ‘रिमझिम गिरे सावन’ हे गाणं सुरू आहे.

अमिताभ बच्चन-मौसमी चॅटर्जी यांचं हे गाणं आठवून मनात एका अनामिक कवीचा शेर येऊ लागलाय. तो शेर असा आहे की - 'खुदा उम्र दराज रहे उसको और ताउम्र उसको मेरी हसरत रहे..'

"मी खूप दिवस तिच्या (बायकोच्या) मागे लागलो होतो की मला एकदा तरी पावसात भिजायचं आहे. त्यावेळी मला चित्रपटातील हे गाणं रिक्रिएट करण्याची कल्पना नव्हती. मला फक्त तिच्यासोबत पावसात भिजायचं होतं."

51 वर्षांचे शैलेश इनामदार यांची ही एक छोटीशी इच्छा आज व्हायरल व्हीडीओत रुपांतरित झाली आहे.

'26 वर्ष अशी गेली जसे काही 26 दिवसच असावेत'

शैलेश आणि वंदना मुंबईत राहतात. सोशल मीडिया आणि त्यांचा तसा फार काही संबंध नाही. पण त्यांच्या नव्या व्हीडिओने सोशल मीडियावर प्रेमाबाबत नवीन चर्चेला सुरुवात झाली आहे.

शैलेश सांगतात, "तरुण वयात प्रेम हे आकर्षणामुळे होतं. पण आमच्या वयात आल्यावर तुम्ही एकमेकांचा हात धरून बाहेर का जाऊ शकत नाही? यात कोणता सोशल टॅबू असता कामा नये. जर तुम्ही कोणावर अगदी मनापासून प्रेम करता तर ते प्रेम दाखवायला हवं."

"वयाचं काय आहे, तो फक्त एक आकडा असतो, जो कायम वाढतच राहील. आणि माझ्या बायकोचं सांगायचं तर ती ही माझ्यावर खूप प्रेम करते पण लाजरी बुजरी आहे. खूप काळजी घेणारा स्वभाव आहे. मी मात्र व्यक्त होणारा आहे. प्रेम तर ती ही खूप करते फक्त तिला व्यक्त होता येत नाही. आमच्या लग्नाला 26 वर्ष पूर्ण झाली पण जणू काही ते 26 दिवसच असावेत असं वाटतं."

"आमच्यामध्ये काहीच बदललेलं नाही. पूर्वी जसं होतं तसं आताही वाटतं. आता फक्त जबाबदाऱ्या वाढल्या आहेत."

वंदना काही ओळीतच त्यांच्या भावना स्पष्ट करतात तेच शैलेश मात्र मनमोकळेपणाने बोलतात.

2023 मध्ये 1979 ची आठवण

या व्हायरल व्हीडीओमुळे 1979 मध्ये आलेल्या 'मंझिल' चित्रपटाच्या आणि त्यातील गाण्यांच्या आठवणीही ताज्या केल्या.

'रिमझिम गिरे सावन' हे पावसावर आधारित गाणं कदाचित सर्वात सुंदर, भावनांना हात घालणारं आणि मनाला शांतता देणाऱ्या गाण्यांपैकी एक आहे.

हे गाणं स्त्री आणि पुरुष अशा दोन्ही आवाजात संगीतबद्ध केलंय.

पावसावर आधारित हे गाणं लता मंगेशकर यांनी गायलंय. सुटाबुटात असलेले अमिताभ बच्चन आणि साध्या साडीत असलेल्या मौसमी चॅटर्जी मुंबईच्या पावसात भिजताना दिसतात. ते गाण्याशी अशा प्रकारे एकरूप झालेत की जणू आजूबाजूचं जगच गायब झालंय.

1979 मध्ये आलेल्या बासू चटर्जींच्या या चित्रपटाला आर.डी. बर्मन यांनी संगीत दिलं असून या गाण्याचे बोल गीतकार योगेश यांनी लिहिले आहेत.

योगेश यांच्या गाण्यात एकप्रकारचा साधेपणा अनुभवायला मिळतो जो काळजाला भिडतो. तरीही इतर अनेक प्रसिद्ध गीतकारांपेक्षा योगेश यांची चर्चा कमीच होते.

जसं की, 'मंजिल' या चित्रपटात ते थेंबांबद्दल लिहितात, 'जब घुंघरुओं सी बजती हैं बूंदें, अरमाँ हमारे पलके न मूंदे.'

त्यांनी एकाच ओळीत थेंब, घुंगरू आणि इच्छा या गोष्टी एकमेकांत गुंफल्या आहेत.

आपल्या पत्नीसोबत पावसात भिजण्याच्या आनंदाचं वर्णन करताना योगेश म्हणतात, पहले भी यूँ तो बरसे थे बादल, पहले भी यूँ तो भीगा था आँचल, अबके बरस क्यूँ सजन सुलग सुलग जाए मन.'

पुरुषाच्या आवाजातील हे गाणं किशोर कुमार यांनी गायलं होतं. अमिताभ बच्चन एका लग्नात हे गाणं ऐकवतात. त्यांचं हे गाणं ऐकून मौसमी चॅटर्जी निव्वळ दाद न देता अमिताभकडे आकर्षितही होतात. आणि हेच गाणं पावसात गायलं जातं.

शैलेश आणि वंदना यांनी हे गाणं मुंबईच्या पावसात सीन बाय सीन चित्रित केलं आहे.

शूटिंग पूर्वीची तयारी

वंदना सांगतात, "मला भिजायला आवडत नाही कारण त्यानंतर कामं वाढतात. त्यामुळे जेव्हा गाणं शूट करायची कल्पना सुचली तेव्हा मी म्हटलं भिजायचंच असेल तर इकडे तिकडे कशाला जायचं, इथेच कुठेतरी भिजू. मुंबईच्या नरिमन पॉईंटला जाऊन, कोट वगैरे घालून कशाला भिजायचं."

"त्यामुळे मी नेहमीच नाही म्हणायचे. पण यांनी त्यांच्या मित्रासमोर सांगून टाकलं आणि प्लॅन तयार केला. त्यामुळे मी नाही म्हणण्याचा प्रश्नच आला नाही. मी ही तयार झाले."

शैलेश सांगतात, "हे गाणं आम्हाला मनापासून आवडतं. शिवाय अमिताभ आणि मौसमी यांचे चाहते असल्यामुळे मी तिच्या खूप दिवस मागे लागलो होतो."

"मी अमिताभ सारखा सूट बूट टाय घालीन आणि तू मौसमी चॅटर्जी सारखी साडी नेस, आपण नरिमन पॉईंटला जाऊ आणि भिजू. डोक्यात फक्त इतकंच होतं. हा विचार जेव्हा दुसऱ्या एका व्यक्तीला सांगितला तेव्हा त्याने सांगितलं तुम्ही त्यांच्यासारखेच दिसता."

मित्र अनूपला ही कल्पना सुचली

आम्हाला मुंबईतील हवामानाचा अंदाज वर्तविणाऱ्या सर्व संस्थांकडून डेटा मिळवला. सर्वांनी अंदाज वर्तवला होता की, 25 जून ते 1 जुलैपर्यंत भरपूर पाऊस पडेल. आम्ही त्यानुसार शूटिंग करायचं ठरवलं. पण माझ्या पत्नीने मला धमकी दिली होती की जोपर्यंत हा व्हिडिओ मी बघणार नाही तोपर्यंत तो सार्वजनिक करायचा नाही. शिवाय तो आमच्या आई वडिलांनाही आवडला पाहिजे.

शो मस्ट गो ऑन...'

मुलं काय म्हणतील याविषयी भीती होती का? आणि व्हीडिओ समोर आल्यानंतर लोकांचा दृष्टिकोन किती बदलला आहे?

शैलेश सांगतात, "आमच्या नांदेडच्या शाळेत एक शिक्षक होते, ते लहानपणी आम्हाला खूप मारायचे. त्यांनी व्हीडिओ बघून मला फोन केला आणि अभिमान असल्याचं सांगितलं. हे ऐकून माझ्या डोळ्यात अश्रू आले."

राजस्थान राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रेहाना रियाझ चिश्ती ट्विटरवर लिहितात की, "वय कधीच अडथळा ठरता कामा नये, शो मस्ट गो ऑन."

तर डॉक्टर आणि कवी दिनेश कुमार शर्मा यांनी ट्विटरवर या जोडप्यासाठी एक कविता लिहिली आहे. "उम्र सिर्फ इक संख्या है फिर से चेताया इक युगल ने, निकला मुंबई की सड़कों पर जीवन पर्व मनाने, सावन की रिमझिम बरखा में प्रेमगीत गाने."

80 वर्षांचे काका म्हणतात...'

'रिमझिम गिरे सावन' हे गाणं रिक्रिएट करण्याच्या बहाण्याने शैलेश आणि वंदना यांना त्यांचं आयुष्य, त्यांचं नातं, आपसातलं प्रेम या गोष्टी नव्या दृष्टिकोनातून मांडण्याची संधी मिळाली

शैलेश सांगतात, "पूर्वी माझं प्रेम दाखवण्याची पद्धत वर्चस्वपूर्ण होती. म्हणजे मी जर तुझ्यावर प्रेम करतोय तर तू पण माझ्याकडे लक्ष द्यावंस असं मला वाटायचं. पण हा माझा दुर्गुण होता. पण वर्षानुवर्षे विश्वास वाढला आणि त्यासोबत आदरही. त्यामुळे सॉरी म्हणणंही सोपं झालंय."

माझ्या लहानपणी मी 'कोरा कागज' हा चित्रपट पाहिला होता. दोघेही शिकलेले असतात, दोघांनाही वाटतं की समोरच्याने माफी मागावी. आणि याच अहंकारामुळे ते 15 वर्षं दूर राहतात."

शैलेश सांगतात, "तिला (पत्नीला) विनोद मेहरा खूप आवडतात. मला आठवतंय आम्ही पहिल्यांदा भेटलो तेव्हा मला हेवा वाटला होता. मी म्हणालो होतो की, मी विनोद मेहरापेक्षा चांगला दिसतो."

शैलेश आणि वंदना यांचा व्हिडिओ आनंद महिंद्रा सारख्या ख्यातनाम लोकांनी शेअर केलाय. पण शैलेश आणि वंदना सांगतात की, लोकांचा प्रेमाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलणं त्यांच्यासाठी महत्वाचं आहे.

आपलं बोलणं पूर्ण करताना शैलेश सांगतात, "या व्हिडिओवर एका 80 वर्षांच्या काकांची प्रतिक्रिया आली होती. ते म्हणाले की, इनामदार साहेब आता मी पण काकूला घेऊन पावसात भिजायला जाणार आहे."

आमच्या मराठी चित्रपटसृष्टीतील अनेकांनी वंदनाचं काम चांगलं असल्याचं सांगितलं. तिच्या चेहऱ्यावरील हावभाव इतके चांगले असतील हे आम्हालाही वाटलं नव्हतं. जर काही काम असेल तर आम्ही दोघेही त्यासाठी तयार आहोत."

थोडक्यात प्रेमाच्या या भावना किती सुंदर असतात याची केवळ कल्पनाच करता येऊ शकते.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)