You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
ट्रम्प-झेलेन्स्की खडाजंगीवर काय आहे तज्ज्ञांचं मत? त्यामागे काय आहे व्यूहरचना?
- Author, रजनीश कुमार
- Role, बीबीसी प्रतिनिधी
एकीकडे रशिया-युक्रेन युद्धाची व्याप्ती वाढल्यामुळे युक्रेनसमोरील आव्हान वाढत असतानाच आता झेलेन्स्की-ट्रम्प खडाजंगीमुळे युक्रेनसमोरील आव्हान अधिक कठीण झालं आहे.
ही खडाजंगी कशावरून झाली, त्यावर दोन्ही बाजूच्या काय भूमिका आहेत, युक्रेनसमोर आता कोणते पर्याय आहेत, अमेरिकेच्या रशियाबाबत बदललेल्या धोरणाचे जागतिक पातळीवर काय परिणाम होणार याचा आढावा घेणारा लेख.
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्याशी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची ओव्हल ऑफिसमध्ये प्रसारमाध्यमांसमोर ज्याप्रकारे वादावादी झाली, त्यामुळे रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्याच्या प्रयत्नांना धक्का बसला असल्याचं मानलं जातं आहे.
अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हेन्स यांच्याशी देखील झेलेन्स्की यांची खडाजंगी झाली.
या सर्व प्रकरणाबद्दल अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांनी सीएनएनला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे की 'झेलेन्स्की यांनी याबद्दल माफी मागितली पाहिजे. मार्को रुबियो म्हणाले, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी अनेक महत्त्वाचे करार पूर्णत्वास नेले आहेत.'
"तुम्ही (झेलेन्स्की) इतक्या आक्रमकतेनं बोलाल तर तुमच्याशी कोण चर्चा करेल? झेलेन्स्की शांततेसाठी वाटाघाटी करण्याबद्दल बोलतात, मात्र बहुधा त्यांना शांतता नको असावी."
ओव्हल ऑफिसमध्ये झालेल्या खडाजंगीबद्दल झेलेन्स्की यांनी मात्र माफी मागण्यास नकार दिला आहे.
फॉक्स न्यूजशी बोलताना झेलेन्स्की म्हणाले, "मला वाटत नाही की माफी मागण्याची आवश्यकता आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि अमेरिकेची जनता यांच्याबद्दल मला खूप आदर आहे. मला वाटतं की आपण प्रामाणिक असलं पाहिजे आणि आपले विचार खुले असले पाहिजेत."
"मला वाटत नाही की मी काही चुकीचं केलं आहे. लोकशाही आणि स्वतंत्र प्रसारमाध्यमांचा आदर राखत मला म्हणायचं आहे की काही गोष्टींची चर्चा प्रसारमाध्यमांसमोर करायला नको."
ट्रम्प आणि व्हेन्स, दोघेही झेलेन्स्की यांना म्हणाले की इतकी मदत करूनदेखील झेलेन्स्की आभार व्यक्त करण्यास तयार नाहीत.
नेमकी काय वादावादी झाली, कोण काय म्हणालं?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांना म्हणाले होते, "तुम्ही (युक्रेन) आता चांगल्या स्थितीत नाही. तुम्ही स्वत:ला खूप अडचणीत आणलं आहे. आता पणाला लावण्यासाठी तुमच्याकडे काहीही नाही. अशा परिस्थितीत तुम्ही वाद घालू शकत नाही."
याला उत्तर देताना झेलेन्स्की म्हणाले, "मी कोणतेही डावपेच लढवत नाहीये."
यावर ट्रम्प यांनी मोठ्या आवाजात म्हटलं की, "तुम्ही लाखो लोकांचा जीव पणाला लावत आहात. तुम्ही तिसऱ्या महायुद्धाचा धोका पत्करत आहात."
याच दरम्यान जे. डी. व्हेन्स म्हणाले, "तुमच्या देशात जो विध्वंस होतो आहे, तो थांबवण्यासाठी ज्याप्रकारच्या धोरणाची आवश्यकता आहे, मी त्याबद्दल बोलत आहे."
"राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की, मला वाटतं की तुम्ही ओव्हल ऑफिसमध्ये येऊन प्रसारमाध्यमांसमोर ज्याप्रकारे वाद घालत आहात, ते अपमानास्पद आहे. या युद्धात युक्रेनला मनुष्यबळाची कमतरता भेडसावते आहे."
यावर प्रत्युत्तर देत झेलेन्स्की म्हणाले की, "तुम्ही कधी युक्रेनला आला आहात का? एकदा तुम्ही तिथे या, मग तुमच्या लक्षात येईल की आम्ही कोणत्या समस्यांना तोंड देत आहोत."
यावर अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष व्हेन्स म्हणाले, "मी याबद्दल माहिती घेतली आहे, मला माहीत आहे की युद्धाच्या परिस्थितीबाबत तुम्ही लोक प्रोपगंडा चालवतात. तुमच्याकडे सैन्यात भरती होण्यासाठी लोक नाहीत."
"तुम्ही ओव्हल ऑफिसमध्ये येऊन, जे अमेरिकन सरकार युद्ध थांबवण्याचा प्रयत्न करतं आहे, त्या अमेरिकन सरकारवरच टीका करत आहात."
यावर झेलेन्स्की म्हणाले, "युद्धात प्रत्येकालाच अडचणींना तोंड द्यावं लागतं. इतकंच काय तुम्हाला देखील. मात्र अद्याप तुम्हाला याची जाणीव नाही. मात्र भविष्यात ती होईल."
यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प उसळून म्हणाले की, "आम्हाला कशाची जाणीव होईल की होणार नाही, हे तुम्ही आम्हाला सांगू नका."
यादरम्यान झेलेन्स्की उपराष्ट्राध्यक्ष व्हेन्स यांना म्हणाले की तुम्ही मोठ्या आवाजात बोलत आहात. त्यावर ट्रम्प यांनी त्यांना मध्येच थांबवलं आणि म्हणाले, "नाही! व्हेन्स मोठ्या आवाजात बोलत नाहीत."
व्हाईट हाऊसमधील एका अधिकाऱ्यानं सीएनएनला सांगितलं, "जोरदार वादविवाद झाल्यानंतर झेलेन्स्की आणि ट्रम्प वेगवेगळ्या खोल्यांमध्ये निघून गेले. त्यानंतर ट्रम्प यांनी युक्रेनच्या लोकांना तिथून जाण्यास सांगितलं."
"युक्रेनच्या शिष्टमंडळानं याला विरोध केला. त्यांनी सांगितलं की त्यांना चर्चा पुढे सुरू ठेवायची आहे. मात्र ट्रम्प यांनी त्यांना नकार दिला. त्याचबरोबर आधीच ठरवण्यात आलेली संयुक्त पत्रकार परिषददेखील रद्द करण्यात आली."
"त्यानंतर अमेरिकेबरोबर खनिज संपत्तीबाबतच्या करारावर स्वाक्षरी न करताच झेलेन्स्की त्यांच्या काळ्या एसयूव्हीमधून निघून गेले."
आता झेलेन्स्की यांच्यासमोर काय आहेत पर्याय?
अमेरिकन प्रसारमाध्यमांमध्ये म्हटलं जातं आहे की ट्रम्प ज्याप्रकारे झेलेन्स्कीवर चिडले किंवा ज्या आक्रमकपणे ते झेलेन्स्की यांच्याशी बोलले. त्याप्रकारे याआधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अमेरिकेत येणाऱ्या कोणत्याही पाहुण्यावर (राष्ट्रप्रमुख) इतके आक्रमक झाले नव्हते. ट्रम्प यांनी युक्रेनला आहे त्याच स्थितीत सोडून देण्याची धमकी देखील दिली.
आता विचारलं जातं आहे की यानंतर झेलेन्स्की कुठे जातील आणि काय करतील?
सीएनएन या अमेरिकन न्यूज नेटवर्कचे चीफ इंटरनॅशनल सिक्युरिटी करस्पॉन्डंट निक पॅटन वॉल्श यांनी लिहिलं, "झेलेन्स्की यांनी बहुधा त्यांच्या कार्यकाळातील सर्वात निर्णायक क्षणाला तोंड दिलं आहे. त्यांना आता एकतर हा वाद अतिशय कौशल्यानं संपवावा लागेल किंवा अमेरिकेशिवायच मार्ग काढावा लागेल."
"नाहीतर मग त्यांच्यासमोरचा सर्वात सोपा आणि शेवटचा पर्याय असेल, तो म्हणजे पदाचा राजीनामा देणं."
"त्यानंतर दुसऱ्या कोणाला तरी यातून मार्ग काढण्याची संधी देणं. अर्थात झेलेन्स्की यांना पदावरून दूर सारण्याची बाब रशियाच्या बाजूनं घडणारी गोष्ट असेल. युद्धकाळातच झेलेन्स्की यांनी पदाचा राजीनामा दिल्यास युद्धआघाडीवर देखील संकट निर्माण होईल."
"युद्धकाळात युक्रेनमध्ये राजकीय बदलाची प्रक्रिया सुरू होणं देखील गुंतागुंतीचं ठरेल. कारण अशा परिस्थितीत निवडणुकीत पारदर्शकता आणणं खूपच कठीण असेल."
या सर्व प्रकरणावर रशियातून देखील बरीच प्रतिक्रिया येताना दिसते आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचे विशेष राजदूत किरिल दिमित्रिव यांनी झेलेन्स्की आणि ट्रम्प यांच्या खडाजंगीच्या व्हिडिओ क्लिपबद्दल लिहिलं,"ऐतिहासिक."
तास या रशियाच्या सरकारी वृत्तसंस्थेनं हेडलाईन दिली की - झेलेन्स्की यांनी चर्चेत व्यत्यय आणला, वाद घातला आणि प्रसारमाध्यमांसमोर आक्रमक भूमिका घेतली.
तर रशियन सरकारी प्रसारमाध्यमं असलेल्या आरआयए नोवोस्तीची हेडलाईन आहे - व्हाईट हाऊसमध्ये झेलेन्स्की यांनी केलेल्या तऱ्हेवाईकपणामुळे युक्रेनची संसददेखील आश्चर्यचकीत.
डेलावेयर विद्यापीठात आंतरराष्ट्रीय संबंधांचे प्राध्यापक डॉक्टर मुक्तदर खान यांनी एक व्हिडिओ पोस्ट करून झेलेन्स्की यांच्या भूमिकेवर टीका केली आहे.
मुक्तदर खान म्हणाले, "मी आज डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत आहे. झेलेन्स्की इतक्या अहंकारानं कसं बोलू शकतात? अमेरिकेकडून मिळणारी मदत हा आपला अधिकार असल्याचं त्यांनी मानलं आहे."
"झेलेन्स्की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि उपराष्ट्राध्यक्ष यांना भाषण देत होते. मला वाटतं की झेलेन्स्की यांनी असं जाणूनबुजून केलं आहे. जेणेकरून अमेरिकेतील लोकांची सहानुभुती मिळवता यावी."
या बातम्याही वाचा:
- प्रेम, विध्वंस आणि कर्तव्य, युक्रेनच्या फोटोजर्नलिस्टने चितारलेल्या युद्धकाळातील विलक्षण कथा
- ट्रम्प यांनी झेलेन्स्कींना 'हुकूमशहा' म्हटलं, दोन्ही नेत्यांमध्ये वाढला तणाव; काय आहे वादाचं कारण?
- रशियाचा चेर्नोबिल अणूऊर्जा प्रकल्पावर हल्ला, झेलेन्स्की काय म्हणाले?
- एका सेकंदात रशियानं 'या' युक्रेनियन कुटुंबातल्या तीन पिढ्या संपवल्या
झेलेन्स्की आक्रमक होते का?
प्राध्यापक मुक्तदर खान म्हणाले, "झेलेन्स्की ज्याप्रकारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि उपराष्ट्राध्यक्ष यांच्याशी बोलत होते, त्याची मी कल्पनादेखील करू शकत नाही. ज्या देशावर तुमचं अस्तित्व टिकून आहे, त्या देशाशी तुम्ही अशाप्रकारे बोलत आहात."
"अमेरिकेच्या मदतीशिवाय युक्रेन, रशियाशी एक आठवडादेखील युद्ध करू शकत नाही. 2014 पासूनच अमेरिका युक्रेनबरोबर आहे. तेव्हापासून अमेरिका युक्रेनला सर्वप्रकारची मदत करते आहे. हा प्रसंग मला सर्वप्रकारे आश्चर्यचकित करणारा होता."
प्रश्न फक्त झेलेन्स्की यांचा नाही. डोनाल्ड ट्रम्प पुन्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू हे व्हाईट हाऊसमध्ये येणारे पहिले पाहुणे होते. त्यावेळेस नेत्यानाहू यांना हवं होतं, ते सर्व ट्रम्प यांनी केलं.
मात्र त्यानंतर अमेरिकेत येणारे मग ते जॉर्डनचे राजे असोत की भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असोत की फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन असोत की ब्रिटनचे पंतप्रधान किएर स्टार्मर असोत, सर्वांशीच डोनाल्ड ट्रम्प अतिशय आक्रमकपणे आणि कडक भाषेत बोलले आहेत. मात्र या सर्वांनीच परिस्थिती चिघळू दिली नाही. झेलेन्स्की मात्र तसं करू शकले नाहीत.
झेलेन्स्की यांच्याशी झालेल्या खडाजंगीनंतर ट्रम्प यांनी ट्रूथ या सोशल मीडिया व्यासपीठावर लिहिलं, "ज्या वाटाघाटीत अमेरिका असेल त्यात झेलेन्स्की यांना भाग घ्यायचा नाही. त्यांना वाटतं की अमेरिका त्यातून फायदा घेऊ पाहते आहे. मात्र आम्हाला फायदा नको, शांतता हवी आहे."
"झेलेन्स्की यांनी अमेरिकेचा अपमान केला आहे. त्यांना जेव्हा वाटेल की ते शांततेच्या वाटाघाटींसाठी तयार आहेत, तेव्हा ते येऊ शकतात."
स्टॅनली जॉनी 'द हिंदू' या इंग्रजी वृत्तपत्राचे आंतरराष्ट्रीय संपादक आहेत.
ट्रम्प यांच्या या टिप्पणीवर स्टॅनली यांनी लिहिलं आहे की, "यानंतर झेलेन्स्की यांच्याकडे काय पर्याय शिल्लक राहिला आहे? एकतर त्यांनी व्हाईट हाऊसमध्ये पुन्हा जावं आणि ट्रम्प यांची प्रत्येक गोष्ट मान्य करावी किंवा युक्रेनला जाऊन राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिला पाहिजे."
"अर्थात त्यांचा राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यकाळ गेल्या वर्षीच संपला होता. झेलेन्स्की यांच्याबद्दल मला खरोखरंच वाईट वाटतं आहे. मात्र झेलेन्स्की यांना युद्धकाळात या गोष्टीचा अंदाज यायला हवा होता की असं काही घडू शकतं."
"पाश्चिमात्य देशांबाहेरील आंतरराष्ट्रीय राजकारणाचे बहुतांश तज्ज्ञ या गोष्टीचा इशारा देत होते की असंच होईल. जर झेलेन्स्की यांनी पुतिन यांच्याशी तडजोड केली असती तर ते यापेक्षा कमी अपमानास्पद ठरलं असतं."
तन्वी मदान, ब्रुकिंग्स इन्स्टिट्यूट या थिंक टॅंकच्या सीनियर फेलो आहेत.
ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यातील चर्चेच्या बाबतीत त्यांनी 1962 च्या भारत-चीन युद्धाच्या वेळच्या परिस्थितीचा संदर्भ दिला आहे. त्यावेळेस तत्कालीन सोविएत युनियनचे नेते निकिता ख्रुश्चेव्ह पंडित नेहरूंना म्हणाले होते की भावनिकरीत्या विचार न करता चीनबरोबर युद्धबंदीचा प्रस्ताव स्वीकार करा.
तन्वी मदान यांनी लिहिलं आहे की, "नेहरू यांना माहीत होतं की त्यांच्या उत्तरामुळे सोव्हिएत युनियन नाराज होऊ शकतो. मात्र तरीदेखील त्यांनी चीनबरोबर तडजोड करण्याचा प्रस्ताव फेटाळला होता."
झेलेन्स्की यांच्याबाबतीत ट्रम्प इतके आक्रमक का झाले आहेत?
ऑगस्ट 1990 मध्ये इराकनं जेव्हा कुवेतवर हल्ला केला होता तेव्हा जॉर्ज हर्बर्ट वॉकर बुश हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. त्यावेळेस बुश म्हणाले होते की याप्रकारचं आक्रमण सहन केलं जाणार नाही. त्यानंतर त्यांनी अमेरिकन सैन्य कुवेतमध्ये पाठवलं होतं.
बुश यांच्या या निर्णयाचा दाखला देत ब्रिटिश इतिहासकार नायल फर्ग्युसन यांनी युक्रेनच्या बाबतीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रमक भूमिकेवर टीका केली आहे.
त्यांनी लिहिलं आहे की, भविष्यात इतिहासाचे विद्यार्थी विचारतील की एका सार्वभौम देशावर एका हुकुमशहानं केलेल्या हल्ल्याबाबत अमेरिकेच्या एका रिपब्लिकन राष्ट्राध्यक्षानं बुश यांच्यासारखी भूमिका का घेतली नाही?
नायल फर्ग्युसन यांना वाटतं की डोनाल्ड ट्रम्प यांना युक्रेनमध्ये अमेरिकेचं सैन्य पाठवायचं होतं. जेणेकरून युद्धात रशियाचा पराभव करता यावा.
नायल फर्ग्युसन यांना उत्तर देताना अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे डी व्हेन्स म्हणाले, "हा नैतिक स्वरूपाचा कचरा आहे. जागतिक पातळीवरील बुद्धिवंतांसाठी तो एखाद्या अलंकारिक चलनाप्रमाणे आहे. प्रत्यक्षात त्यांच्याकडे सांगण्यासाठी दुसरं काहीही नाही."
"गेल्या तीन वर्षांपासून मी आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प दोन सोपे मुद्दे मांडत आहोत. पहिला तर्क - जर ट्रम्प राष्ट्राध्यक्ष असते तर रशिया-युक्रेन युद्ध सुरू झालं नसतं. दुसरा तर्क - युरोप, बायडन सरकार आणि युक्रेन यातील कोणीही हे युद्ध जिंकू शकलं नसतं."
"हे दोन्ही मुद्दे तीन वर्षांपूर्वीही खरे होते, दोन वर्षांपूर्वीही खरे होते, गेल्या वर्षीदेखील खरे होते आणि आजदेखील खरे आहेत."
व्हेन्स म्हणाले की, "नायल यांच्याकडे युक्रेनसाठी काय योजना आहे? आणखी एक मदत पॅकेज देणं? रशिया या युद्धात कसा वरचढ झाला आहे, हे वास्तव तुम्हाला माहित आहे का? युरोप लढण्याच्या स्थितीत आहे का?"
"तुम्ही जॉर्ज एचडब्ल्यू बुश यांचं उदाहरण दिलं, ते वेगळ्या काळातील आणि वेगळ्या युद्धाबाबतचं आहे. असे लोक शेवटी अप्रासंगिक इतिहासाचे दाखले देतात. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प वास्तवाच्या आधारे गोष्टी पाहत आहेत. मी इथे तुम्हाला काही वास्तव सांगतो आहे."
युद्धातून युक्रेनला काय मिळालं?
व्हेन्स म्हणाले, "पहिली गोष्ट अशी आहे की युरोपमधील आमचे सहकारी अमेरिकेकडून उदारतेनं मिळणाऱ्या आर्थिक निधीवर अवलंबून राहिले आहेत."
"या देशांमधील देशांतर्गत धोरण, विशेषकरून स्थलांतराच्या बाबतीत, अमेरिकन नागरिकांच्या संवेदनशीलतेच्या विरोधात असतं. असं असूनही त्यांना वाटतं की संरक्षणाच्या बाबतीत त्यांनी अमेरिकेवर अवलंबून राहावं."
याच महिन्यात म्युनिक सुरक्षा परिषदेत जे डी व्हेन्स म्हणाले होते की, "युरोपला रशियाकडून नाहीतर तर स्वत:पासूनच धोका आहे."
रशिया आणि युक्रेन यांच्यात फेब्रुवारी 2022 मध्ये युद्ध सुरू झालं. या युद्धाला आता तीन वर्षे झाली आहेत. या तीन वर्षांत जग अनेक प्रकारे बदललं आहे. मात्र या युद्धावर तोडगा मिळाला नाही.
ज्यावेळेस या युद्धाची सुरुवात झाली होती, तेव्हा जो बायडन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. तर युद्धाला तीन वर्षे पूर्ण होत असताना डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले आहेत.
हे युद्ध थांबवण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी चर्चा करत आहेत. मात्र या सर्व चर्चेत युक्रेन आणि रशियाला सहभागी करून घेण्यात आलेलं नाही.
दरम्यान गुरुवारी (27 फेब्रुवारी) रशियानं स्पष्ट केलं की फेब्रुवारी 2022 नंतर युक्रेनच्या ज्या प्रदेशावर त्यांनी नियंत्रण मिळवलं आहे, तो प्रदेश रशिया सोडणार नाही.
युद्ध थांबवण्याच्या चर्चेसाठी इस्तंबूलमध्ये रशिया आणि अमेरिकेचे अधिकारी भेट घेणार आहेत. या चर्चेच्या आधीच रशियानं चर्चेसंदर्भात एक भूमिका घेतली आहे.
रशियन सरकारचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह पत्रकारांना म्हणाले, "जो प्रदेश रशियन फेडरेशनचा भाग झाले आहेत, ते आमच्या राज्यघटनेचा भाग झाले आहेत. हा प्रदेश आता रशियाचा अविभाज्य अंग झाला आहे. हा प्रदेश सोडण्यासंदर्भात आता कोणतीही चर्चा होऊ शकत नाही."
फेब्रुवारी 2022 मध्ये रशियानं जेव्हा युक्रेनवर आक्रमण केलं होतं, तेव्हा रशियानं दोनेत्सक, लुहांस्क, जापोरिज्जिया आणि खर्सोन या युक्रेनच्या चार प्रांताचा रशियात समावेश केल्याची घोषणा केली होती. 2014 मध्ये रशियानं युक्रेनच्या क्रीमिया प्रांतावर देखील कब्जा केला होता.
रशिया आणि अमेरिका जवळ येत असल्यामुळे चीन अस्वस्थ आहे का?
दिमित्री पेस्कोव्ह यांच्या वक्तत्वावर युक्रेनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी उत्तर देत म्हटलं आहे की युक्रेनच्या सीमा आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्य करण्यात आल्या आहेत. एखादा देश जर त्याबाबतीत त्यांच्या राज्यघटनेचा दाखला देत असेल तर त्यापेक्षा हास्यास्पद काय असू शकतं.
रशियानं युक्रेनच्या दोनेत्सक आणि लुहांस्क प्रांताचा बहुतांश भाग ताब्यात घेतला आहे. मात्र जापोरिज्जिया आणि खर्सोन प्रांताच्या काहीच भागावर रशियाचं नियंत्रण आहे.
त्याशिवाय रशियानं ईशान्य (उत्तर-पूर्व) युक्रेनमधील खारकिव्हच्या काही भागावर देखील कब्जा केला आहे.
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी आधीदेखील सांगितलं आहे की त्यांच्या सैन्याला संसाधनांचा तुटवडा जाणवतो आहे. त्यामुळेच ते त्यांचा भूभाग परतणं त्यांना शक्य होत नाहीये.
झेलेन्स्की म्हणाले होते की राजनयिक वाटाघाटीतून काही भूभाग परत मिळवला जाऊ शकतो.
12 फेब्रुवारीला ब्रुसेल्समध्ये आयोजित करण्यात आलेल्या संरक्षण परिषदेत अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसथ म्हणाले होते, "तुमच्याप्रमाणेच आम्हाला देखील एक सार्वभौम आणि संपन्न युक्रेन हवा आहे. मात्र मला हेदेखील सांगायचं आहे की 2014 च्या आधी युक्रेनची जी सीमा होती, ती सीमा पुन्हा मिळवणं शक्य नाही, ते वास्तवापलीकडचं आहे."
"या काल्पनिक लक्ष्याच्या मागे पळाल्यामुळे युद्ध आणखी लांबेल आणि त्यामुळे प्रचंड नुकसानदेखील होईल."
मार्च 2014 मध्ये रशियानं युक्रेनच्या क्रीमिया प्रांतावर कब्जा केला होता. त्यावेळेस क्रीमियातील रशिया समर्थक विभाजनवाद्यांनी युक्रेनविरोधात सशस्त्र बंड केलं होतं.
युक्रेनच्या 20 टक्के भूभागावर अजूनही रशियाचं नियंत्रण आहे. यात मुख्यत: युक्रेनच्या पूर्वेकडील आणि दक्षिणेकडील प्रदेशाचा समावेश आहे.
पीट हेगसथ म्हणाले होते की कायमस्वरुपी शांततेसाठी सुरक्षेची हमी असली पाहिजे आणि युद्धाची पुन्हा सुरुवात होता कामा नये.
पीट हेगसथ असंही म्हणाले होते की, "युक्रेनला नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन (नेटो)चं सदस्यत्व दिल्यामुळे कोणताही कायमस्वरुपी तोडगा निघणार नाही."
राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की व्हाईट हाऊसमध्ये जाण्याआधी बुधवारी (26 फेब्रुवारी) डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते की नेटो संघटनेत सहभागी होण्याची बाब युक्रेन बाजूला ठेवू शकतो.
ट्रम्प म्हणाले होते की नेटोमुळेच बहुधा या संघर्षाची सुरुवात झाली आहे. ट्रम्प असंही म्हणाले की ते रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची प्रत्यक्ष भेट घेणार आहेत. त्यातून रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी काहीतरी तडजोड होईल अशी शक्यता आहे.
युक्रेनबाबत ट्रम्प यांची अशी भूमिका का आहे? अनेकांना वाटतं की युक्रेनच्या बाबतीत रशियाविरोधात मवाळ धोरण घेत ट्रम्प चीन आणि रशियामधील मैत्री कमकुवत करू इच्छितात.
दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात रशिया आणि मध्य आशियाविषयक अभ्यास केंद्राचे प्राध्यापक संजय कुमार पांडे म्हणतात, "यासंदर्भातील एक विश्लेषण असंही आहे की ट्रम्प यांना रशिया आणि चीनमधील मैत्री कमकुवत करायची आहे. असं झाल्यास अमेरिकेला पूर्णपणे चीनवर लक्ष केंद्रीत करता येईल."
सेंटर फॉर युरोपियन पॉलिसी अॅनालिसिसच्या अलेना डॅव्हलिकनोवा यांनी मॉस्को टाइम्समध्ये लिहिलं आहे की, "युक्रेन युद्धाच्या बाबतीत रशियाबद्दल मवाळ धोरण घेतल्यामुळे चीन आणि रशियाला वेगळं केलं जाऊ शकतं, हा एक भ्रम आहे. मात्र रशियाचं उद्दिष्ट फक्त युक्रेनच्या सीमेपुरतंच मर्यादित नाही."
"रशिया युक्रेनच्या पुढे युरोपात देखील विस्तार करेल. ऊर्जेच्या बाबतीत ब्लॅकमेल करून आणि प्रोपंगांडाकरून रशियानं युरोपमध्ये पावलं टाकण्यास आधीच सुरूवात केली आहे."
यु जी, थिंक टॅंक असलेल्या चॅटम हाऊसमध्ये एशिया पॅसिफिक प्रोग्रॅममध्ये सीनियर रिसर्च फेलो आहेत.
त्यांनी 28 फेब्रुवारीला फायनान्शियल टाइम्स या ब्रिटिश वृत्तपत्रात लिहिलं होतं की, "रशिया-युक्रेन युद्धाच्या बाबतीत ट्रम्प यांनी अचानक यु-टर्न घेतल्यामुळे चीन अस्वस्थ आहे. चीनला वाटतं आहे की अमेरिका आणि रशिया यांच्यातील संबंध वेगानं सुधारत आहेत."
"रशिया आणि चीनची घनिष्ठ मैत्री लक्षात घेता, अमेरिका आणि रशियामध्ये थोडाजरी विश्वास निर्माण झाला तर चीन अस्वस्थ होईल."
"चीननं व्यापारी आणि राजनयिक पातळीवर रशियात प्रचंड गुंतवणूक केली आहे. रशिया चीनचा मोठा व्यापारी भागीदार आहे. तर चीनला रशियाकडून अनेक बाबतीत फायदा होतो आहे."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)