प्रेम, विध्वंस आणि कर्तव्य, युक्रेनच्या फोटोजर्नलिस्टने चितारलेल्या युद्धकाळातील विलक्षण कथा

    • Author, जॉर्ज बर्क
    • Role, बीबीसी न्यूज

रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणाला नुकतीच तीन वर्षे झाली आहेत. युद्धआघाडीवर आणि मानवी वस्त्यांमधील मानवी जीवनावर या युद्धाचा काय परिणाम झाला आहे याची नोंद शेकडो फोटोग्राफर्सनी केली आहे.

त्यातील काही फोटोग्राफर्सनी फेब्रुवारी 2022 पासून बीबीसीच्या वार्तांकनांमधून प्रकाशित झालेल्या त्यांच्या फोटोंमागील गोष्टी सांगितल्या आहेत.

व्लाडा आणि कोस्टिअँतिन लिबेरोव्ह

रशिया-युक्रेन युद्धाची व्याप्ती वाढण्यापूर्वी हे पती-पत्नी काळ्या समुद्राच्या किनाऱ्यावरील ओडेसा या बंदराच्या शहरात विवाह - पोट्रेट फोटोग्राफर म्हणून काम करत होते.

मात्र युद्ध सुरू होताच त्यांचं आयुष्य बदललं. "प्रेमकहाण्यांचे फोटो काढण्याऐवजी ते रशियाच्या युद्धकाळातील गुन्ह्यांची नोंद करू लागले", असं व्लाडा सांगतात.

व्लाडा यांना त्यांच्या कामाशी संबंधित थेट धोक्यांची जाणीवही आहे. 2023 मध्ये त्या दोनेस्क प्रदेशात गेल्या होत्या. त्यावेळेस तिथे झालेल्या एका स्फोटामुळे बॉम्बमधील छर्रे किंवा धातूचे कण त्यांच्या शरीरात खोलवर गेले. ते शरीरातून काढता येणार नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

2024 च्या उन्हाळ्यात कोस्तिअँतिन लिबरोव्ह यांनी घेतलेला एका जबरदस्त फोटो 'पॉल अॅडम्स' यांच्या कर्स्कमधील रशियन सीमेवरील युक्रेनच्या हल्ल्यावरील अहवालात प्रकाशित झाला होता.

त्यात एक सैनिक त्याच्या एका हताश झालेल्या सहकारी सैनिकाचं सांत्वन करताना दिसतो आहे. त्यांची तुकडी एक हल्ला करण्यासाठी गेली असता त्यात त्यांच्या एका सहकाऱ्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर या सैनिकाला प्रचंड दु:ख झालं होतं.

लिबेरोव्ह यांच्या मते, कारवाईसंदर्भात लष्करात असलेला काही गोंधळ किंवा संभ्रम याचं प्रतिबिंब त्या फोटोत दिसतं.

"युक्रेनमध्ये लढताना तुमच्या देशाचं रक्षण करण्याऐवजी रशियाच्या आत शिरून केलेल्या हल्ल्यात तुमचा मित्र गमावणं ही खूपच कठीण बाब आहे.

त्या प्रसंगाचा माझ्यावर जो भावनिक परिणाम झाला त्यामुळे मी हा फोटो घेतला. तो फोटो, त्या प्रसंगाबद्दल आणि त्या सैनिकांसाठी तो प्रसंग किती कठीण होता याबद्दल बरंच काही बोलतो," असं लिबेरोव्ह म्हणाले.

मनावर खोलवर परिणाम करणाऱ्या अशा घटनांचे फोटो काढण्याचा स्थानिक फोटोग्राफर्सवर प्रचंड मानसिक परिणाम झाला.

व्लाडा म्हणतात की, "एखादी गोष्ट खूपच वेदनादायी म्हणून आपण सहकाऱ्यांशी त्याबद्दल बोलतो, तसं हे नाही. तुम्ही एका अतिशय कठीण परिस्थितीत आहात आणि यावर काय उपाय असू शकतो? याची कोणालाही कल्पना नाही. "

2023 मध्ये व्लाडा यांनी काढलेल्या फोटोंमध्ये एक फोटो युक्रेनच्या व्हाईट एंजल्स पोलिसांच्या तुकडीतील एक पोलीस कर्मचाऱ्याचा आहे.

युक्रेनच्या पूर्वेला असणाऱ्या अविद्विका (Aviidvka) शहरात रशियन सैन्य शिरण्यापूर्वी त्या शहरात असलेल्या अखेरच्या काही नागरिकांपैकी एकाला शहर सोडण्यास राजी करण्यात त्या कर्मचाऱ्याला अपयश आल्यानंतर हा फोटो काढण्यात आला होता.

24 तास चाललेल्या विनाशकारी रशियन बॉम्बहल्ल्यावरील बीबीसीच्या लेखात या कथेचा समावेश होता.

तिथल्या युक्रेनच्या एका नागरिकानं रशियन बॉम्बहल्ल्यात उदध्वस्त झालेल्या आणि जळालेल्या एका इमारतीच्या तळघरातून त्याच्या भावाला बाहेर काढण्याची विनंती पोलिसांच्या तुकडीला केली होती. त्यानं स्वत: मात्र तिथून जाण्यास नकार दिला होता.

व्लाडा त्या प्रसंगाबद्दल सांगतात, "त्याच्या दुसऱ्या दिवशी सुरू असलेल्या तोफगोळ्यांच्या जोरदार माऱ्यामुळे आम्ही परतू शकलो नव्हतो. परिस्थिती आणखीच बिकट झाली होती. मला माहिती नाही की, तो माणूस त्यातून वाचू शकला असता की नाही. तुम्ही त्या ठिकाणी पुन्हा येऊ शकत नाही, हे माहिती असणं खूपच वेदनादायी आहे."

युद्धकाळातील इतक्या प्रचंड हानी आणि दु:खाचं दस्तऐवजीकरण करताना, या जोडप्याला आनंदाच्या क्षणांची खोलवर जाणीव झाली.

दिमित्रो युक्रेनमध्ये एक दशकाहून अधिक काळापासून लढत आहेत. मार्च 2024 मध्ये त्यांच्या पत्नीनं बाळाला जन्म दिल्यानंतर त्यांचा फोटो काढला होता.

"आम्ही त्यांचा फोटो खंदकांमध्ये काढत होतो, मग स्वत:च्या छोट्या मुलीला हातात घेतल्यानंतर तुम्हाला हा धिप्पाड, शूर सैनिक रडताना दिसतो.

तुमच्या लक्षात येतं की, त्यांच्यासारखे सैनिक या क्षणांसाठी लढत असतात. ते फक्त स्वत:साठीच नाही तर युक्रेनमधील प्रत्येक नागरिकासाठी लढत असतात," असं व्लाडा म्हणतात.

व्हॅलेरिया देमेन्को

2016 पासून व्हॅलेरिया देमेन्को यांनी युक्रेनच्या ईशान्य (उत्तर-पूर्व) भागातील सुमी प्रदेशातील युक्रेनच्या सरकारी आपत्कालीन सेवेच्या (DSNS)कामाची इतिवृत्तांत नोंदवला आहे.

आता त्या रशियन तोफांच्या माऱ्यानं प्रभावित झालेल्या भागात तैनात करण्यात आलेल्या बचाव पथकांमध्ये सामील झाल्या आहेत.

त्या म्हणतात, "हे नेहमीच खूप कठीण असतं...पुढे कोणता धोका वाढून ठेवलेला आहे हे तुम्हाला कधीच माहिती नसतं. त्यातही जेव्हा नागरी इमारतींवर हल्ला होतो, तेव्हा हे काम आणखी कठीण होतं."

एक घटना त्यांच्या मनावर कायमची कोरली गेली आहे. मार्च 2024 मधील एका लेखात प्रकाशित झालेल्या फोटोसंदर्भातील ती घटना आहे.

रशियन बॉम्बहल्ल्यात कोसळलेल्या एका पाच मजली इमारतीमध्ये रहिवासी अडकलेले होते. त्या घटनेच्या फोटोमध्ये आपत्कालीन पथकाचे कर्मचारी काम करताना दिसत आहेत.

व्हॅलेरिया यांना आठवतं की, सलग चार दिवस आपत्कालीन पथकाचे कर्मचारी त्या ठिकाणी कसे काम करत होते. त्यांना त्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली चार जण मृतावस्थेत सापडले. त्यांच्यासोबतच्या एका लहानग्या मुलीचा मृतदेह मात्र त्यांना कधीच सापडला नाही.

"त्या इमारतीच्या वरच्या मजल्यांपैकी एका मजल्यावर एक बाहुली होती. त्याचा अर्थ ती मुलगी तिथे राहत होती. तिथे अशी अनेक लहान मुलं राहत असतील."

व्हॅलेरिया यांच्या सहकाऱ्यांवर या कामाचा भावनिक ताण पडला होता. मात्र, तरीही त्यांचं काम जगानं पाहावं असं व्हॅलेरिया यांना वाटतं.

"युक्रेनच्या शांतताप्रिय नागरिकांविरोधात रशियानं युद्धकाळात केलेल्या गुन्ह्यांचं दस्तऐवजीकरण करण्यासाठी आम्ही आमची पूर्ण शक्ती पणाला लावतो, सर्वतोपरी प्रयत्न करतो," असं त्या म्हणतात.

अ‍ॅलेक्झांडर एर्मोचेन्को

अ‍ॅलेक्झांडर एर्मोचेन्को यांनी गेल्या 11 वर्षांपासून युक्रेनच्या पूर्वेकडील दोनेत्स्क प्रांतातील युद्धाचं एक फोटोजर्नलिस्ट किंवा छायाचित्र पत्रकार म्हणून दस्तऐवजीकरण केलं आहे.

त्यांनी अनेकदा रशियाच्या नियंत्रणाखालील प्रदेशात वार्तांकनही केलं आहे. "मी माझ्या घरात युद्धाची फोटोग्राफी करेन, असा विचार मी कधीही केला नव्हता," असं ते म्हणतात,

ते पुढं म्हणाले की, "उदध्वस्त झालेल्या घराच्या मालकावरील भीतीचे भाव, रशिया आणि युक्रेन दोन्ही देशांमध्ये सारखेच आहेत. रक्ताला एकच, सारखाच लाल रंग असतो, हे दाखवणं नेहमीच महत्त्वाचं असतं."

रशियातून वार्तांकन करणाऱ्या फोटोजर्नलिस्टशी बीबीसीचा फार कमी संपर्क आहे. कारण रशियन सरकारनं आंतरराष्ट्रीय पत्रकारांना रशियात बंदी घातली आहे. तर बहुतांश रशियन वृत्तसंस्था सरकारी आहेत.

या कथेत योगदान देण्यासाठी बीबीसीनं एका रशियन फोटोग्राफरला संपर्क केला. मात्र, बीबीसीला त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

वरील फोटो 21 फेब्रुवारी 2022 चा आहे. व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनचा पूर्वेकडील प्रांत स्वतंत्र झाल्याची घोषणा केल्यानंतर तिथल्या रशिया समर्थक कार्यकर्ते आनंद साजरा करत असताना हा फोटो घेण्यात आला होता. त्या दुर्दैवी क्षणाचं बीबीसीनं केलेल्या वार्तांकनातील एक भाग म्हणून तो प्रकाशित झाला होता.

तो फोटो "अपघातानं" कसा घेतला याबद्दल ते सांगतात. एका महत्त्वाच्या क्षणी फोटोग्राफरनं कॅमेरा सुरू करण्याच्या अगदी तत्काळ घेतलेल्या निर्णयाच्या परिणामाची ती एक जबरदस्त आठवण आहे.

रशियाच्या लढाऊ विमानांनी मार्च 2022 मध्ये मारियूपोल थिएटरवर केलेल्या बॉम्बहल्ल्यात 300 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती युक्रेननं दिली होती.

त्याच्या पुढील महिन्यात, अ‍ॅलेक्झांडर एर्मोचेन्को यांनी हा फोटो घेतला होता. तो 'ह्युगो बाचेगा' यांच्या अहवालात प्रकाशित झाला होता. या फोटोतून फोटोग्राफर युक्रेनमधील दैनंदिन आयुष्याबरोबरच एका मोठ्या हत्याकांड किंवा कत्तलीचे समाजावर झालेले परिणामदेखील समोर आणतो.

"तो एक पूर्ण विनाश होता. त्यात एक नऊ मजली इमारत उदध्वस्त झाली होती. ते हॉलीवूडच्या चित्रपटाच्या एखाद्या सेटसारखं दिसत होतं. मात्र तो चित्रपटाचा सेट नव्हे तर वास्तव आहे आणि अलीकडेच तिथे लोक राहू लागले आहेत," असं अ‍ॅलेक्झांडर एर्मोचेन्को म्हणतात.

ते पुढे म्हणाले, "या सर्वांमधील आश्चर्यकारक बाब म्हणजे शेजारच्या रस्त्यांवर लढाई सुरू असताना दैनंदिन जीवन मात्र सुरू राहिलं. लोक शांत असल्याचं दिसत होतं. प्रत्यक्षात जे काही घडत होतं, त्याचा त्यांना प्रचंड धक्का बसला होता."

नोव्हेंबर 2022 मध्ये झापोरिझ्झिया अणुऊर्जा प्रकल्पावर झालेल्या तोफगोळ्यांच्या हल्ल्याचं लाईव्ह वार्तांकन करताना हा फोटो घेण्यात आला होता. त्यातून युद्धाचं चित्रण करताना, फोटो काढताना येणाऱ्या अडचणी समोर येतात.

ते म्हणाले, "त्यावेळेस या अणुऊर्जा प्रकल्पाचे फोटो दुर्मिळ होते. तो प्रकल्प सातत्यानं सैनिकांच्या निगराणीखाली असतो. तिथे सैनिक तैनात असतात. तिथे असलेल्या सैनिकांवरून त्या परिस्थितीचं अगदी अचूक चित्र समोर येतं."

अ‍ॅलेक्झांडर एर्मोचेन्को आणि त्यांचे सहकारी यांना याप्रकारचे फोटो घेताना असंख्य आव्हानांना तोंड द्यावं लागलं.

मात्र, तरीही ते म्हणतात की, "हे युद्ध म्हणजे फक्त माझ्या व्यावसायिक कारकिर्दीचाच एक भाग नाही. तर माझ्या संपूर्ण आयुष्याचाच एक मोठा भाग आहे. युद्धजन्य परिस्थितीत काम करणं कितीही कठीण असलं, तरी मी ते पुढे सुरूच ठेवेन."

अलिना स्मुत्को

अलिना स्मुत्को कीवमध्ये राहतात. एक फोटोजर्नलिस्ट म्हणून केलेल्या कामातून आणि त्यांच्या वैयक्तिक अनुभवातून या युद्धाचा मानवी जीवनावर झालेला परिणाम अलिना जाणतात.

"कीव शहरावर सलग तीन वर्षे अखंडितपणे रशियन क्षेपणास्त्रांचा आणि ड्रोन हल्ल्याचा अनुभव मी घेतला आहे. त्या काळात, मला सतत माझ्या आईवडिलांची, बाळाची, मित्रांची आणि सहकाऱ्यांची चिंता वाटत होती."

अलिना यांनी त्यांच्या बेडरुमच्या खिडकीतून शेजारच्या परिसरात झालेला क्षेपणास्त्र हल्ला पाहिला होता. ते पाहिल्यानंतर या युद्धात त्यांचं घर उदध्वस्त झालेलं नाही आणि त्यांचे प्रियजन जिवंत आहेत, यासाठी त्या स्वत:ला सुदैवी मानतात.

रशियानं मोठ्या प्रमाणात आक्रमण केल्यानंतर सुरुवातीच्या काळात त्या आणि त्यांचे मित्र आणि कुटुंब दररोज एकमेकांची विचारपूस करायचे.

मात्र सततच्या हल्ल्यांमुळे युद्धजन्य परिस्थितीत कसं जगायचं हे तिथले रहिवासी शिकले आहेत. ते आता शक्य असेल तितकं दैनंदिन सामान्य जीवन जगण्याचा प्रयत्न करतात.

अलिना यांच्या व्यावसायिक क्षेत्रावर या युद्धाचा प्रचंड विपरित परिणाम झाला आहे.

"आम्ही पाहतो की आमचे सहकारी, विशेषत: फोटोजर्नलिस्ट या युद्धात मारले गेले आहेत किंवा जखमी झाले आहेत. आमच्या टीममधील एक सहकारी आम्ही गमावला आणि आमचा आणखी एक सहकारीदेखील गंभीररित्या जखमी झाला आहे," असं अलिना सांगतात.

अलिना स्मुत्को जे काम करतात, त्याबद्दल "जास्त विचार" न करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, त्यांना वाटतं की या युद्धाचे जे परिणाम झाले आहेत, ते जगासमोर आणणं महत्त्वाचं आहे.

अलिना म्हणतात, "मला वाटतं ते एकप्रकारे बरंच आहे. मात्र त्याचबरोबर मला असं अजिबात वाटत नाही की, एखादा फोटो एक युद्ध थांबवू शकतो. जर तसं असतं, तर इथे कित्येक लोकांनी त्यांचे जीव गमावले नसते."

युद्धाच्या परिस्थितीचे, परिणामांचे फोटो काढण्याबद्दल त्या पुढे म्हणतात, "मात्र तरीदेखील मला वाटतं की, युद्ध आणि युद्धजन्य परिस्थितीचं दस्तऐवजीकरण होणं महत्त्वाचं आहे. कारण जर एखाद्या गोष्टीचं चित्रण झालं नाही, फोटो काढले गेले नाहीत, तर ती गोष्ट एकप्रकारे घडलेली नसते."

"हे काम झालंच पाहिजे...मी फक्त माझं सर्वोत्तम काम करते," असं अलिना म्हणाल्या.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.