एका सेकंदात रशियानं 'या' युक्रेनियन कुटुंबातल्या तीन पिढ्या संपवल्या

    • Author, ओरला गुईरीन
    • Role, वरिष्ठ आंतरराष्ट्रीय वार्ताहार

लहान-मोठ्या आकाराची अनेक टेडी बेअर्स ॲडम बुहायच्या थडग्याभोवती मांडली आहेत. जणू काही ती त्याला सोबतच करतायत.

या 17 महिन्यांन्यांच्या लहानग्यासोबत त्याची 27 वर्षांची आई सोफीया बुहायसुद्धा आहे.

झापोरिझ्झिया या दक्षिण युक्रेनमधल्या शहरातल्या एका स्मशानभूमीत त्या दोघांचेही मृतदेह एकाच थडग्यात पुरलेत.

ॲडमची 68 वर्षांची पणजी टेटियाना तारसेविच यांचा मृतदेह त्याशेजारीच उजवीकडच्या थडग्यात आहे.

मागच्या वर्षी 7 नोव्हेंबरला रशियानं केलेल्या हल्ल्यात तिघांचा मृत्यू झाला तेव्हाही ते असेच सोबत होते.

हा हल्ला म्हणजे रशिया-युक्रेनमध्ये 2022 पासून सुरू असलेल्या युद्धाचा एक भाग. युद्धाचा विषय आता आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वाचा मानला जात नाही.

हल्ल्याआधी टेटियाना ॲडमला त्यांच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत होत्या. ते तिघे फेरी मारण्यासाठी बाहेर पडले होते.

भुऱ्या केसांचा, निळ्या डोळ्यांच्या ॲडमनं अंग झाकून घेणारं एक लाल रंगाचं जॅकेट घातलं होतं. त्यावर मिकी माऊसचं चित्र असलेलं एक लोकरीची टोपी.

"अरे, टोपी काढू नको. थंडी लागेल बाळा तुला," " टेटियाना त्याला मायेनं सांगत होत्या. तरीही त्याने काढलीच.

एक तासानंतर त्रिकूट घरी परतलं. काहीतरी खाण्यासाठी ताटात वाढून घेणार तेवढ्यात रशियाकडून हवाई मार्गानं एक बॉम्ब त्यांच्या घरावर पडला. ॲडम, सोफिया आणि टेटियाना तिघांसोबत इतर सहा नागरिकांचाही त्यात मृत्यू झाला.

सोफीची आई युलीया तारसेविच (वय 46 वर्षे) यांनी एकाचवेळी त्यांच्या भूतकाळातलं आणि भविष्यकाळातलं माणूस गमावलं. या आठवणींनी त्यांना जगणंही मुश्किल झालंय.

त्यांच्या छोट्याश्या देहावर त्यांच्या मोठ्या काळ्या कोटासोबत दुःखाचं ओझंही त्या वाहत आहेत.

"कसं जगायचं तेच कळत नाही. जिवंतपणी नरकयातनांचा अनुभव येतो. मी माझ्या आईला, मुलीला आणि नातवाला एकाच क्षणात गमावलं." त्यांच्या जवळ जायचं असलं तरी त्यांना आता थडगं ओलांडता येत नाही.

"माझी प्रिय आई," त्यांना हुंदका आवरत नाही. टेटियाना यांच्या थडग्यावरच्या फोटोवरून त्यांची बोटं फिरतात. ती डॉक्टर असल्याचं त्या सांगतात.

दोन पावलं पुढे टाकताच त्या सोफिया आणि ॲडम यांच्या थडग्यासमोर येऊन थांबल्या. ॲडमच्या फोटोला हात पाहून म्हणाल्या, "माझी छोटीशी मनीमाऊ."

मग त्या थेट सोफिया यांच्या फोटोशी बोलू लागल्या. काळ्या-पांढऱ्या रंगात असलेल्या या फोटोतल्या तरुण मुलीच्या लांबलचक केसांकडे त्यांचं लक्ष गेलं. "माझी सुंदर मुलगी. मी तुला वाचवू शकले नाही, मला माफ करा," असं म्हणत त्या रडू लागल्या.

सोफीचे वडील (वय 60 वर्षे) सेर्ही लुश्चय शेजारी उभे होते. त्यांचंही दुःख तेच आहे.

"आम्ही सारखं स्मशानभूमीत या तिघांना पहायला येत असतो. आम्ही जिवंत आहोत तोपर्यंत येत राहणार. त्यानेच आमच्या जीवाला जरा बरं वाटतं," युलीया म्हणाल्या.

प्रत्येकवेळी ते येतात तेव्हा स्मशानभूमीतल्या थडग्यांची संख्या वाढलेलीच असते. "स्माशनभूमी झपाट्याने वाढत आहे," युलीया सांगतात. लांबवर पाहिलं तर करड्या आकाशात सैनिकांच्या थडग्यांवर लावलेले निळे आणि पिवळे झेंडे दिसतात.

हे कुटुंब राहत होतं ते झापोरिझ्झिया शहर रशियन लष्कराचं नेहमीचं लक्ष्य आहे. व्यावसायिकदृष्ट्या हे फार महत्त्वाचं शहर असल्यानं इथं सतत हल्ले होत असतात. युरोपातला सगळ्यात मोठा अण्विक ऊर्जा प्रकल्प या शहरापासून 55 किमी अंतरावर आहे. तोही आता रशियाच्या ताब्यात गेलाय.

सोफिया, टेटियाना आणि ॲडम ज्यात मारले गेले त्या हल्ल्याच्या दिवशी पश्चिम युक्रेनमधून युलीयाने त्यांना फोन केला होता. युलीया त्या दिवशी कामानिमित्त तिथं गेलेल्या.

"मी त्यांना काळजी घ्यायला सांगितलं. शहरावर सकाळपासूनच बॉम्ब हल्ले होत होते," युलीया सांगत होत्या. त्यावर सोफियानं त्यांना थँक्स म्हटलं. आम्ही एकदम व्यवस्थित राहू असं सांगितलं.

वाईट बातमी आली, तेव्हा सेर्हीसुद्धा कामावर होते. त्यांनीही आपल्या मुलीला, सोफियाला फोन केला. पण समोरून काहीच प्रत्युत्तर आलं नाही.

मग तिथल्या रहिवाश्यांनी बनवलेल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर त्यांना एक मेसेज दिसला, 'मित्रांनो, ढिगाऱ्याखाली अजून कोण अडकलं आहे का?'

"मी प्रार्थना करतच घराकडे धाव घेतली," सेर्ही सांगत होते. पण त्यांच्या सगळ्या प्रार्थना वाया गेल्या.

"मी पोहोचलो तेव्हा सगळं आधीच उद्ध्वस्त झालेलं होतं. मी माझ्या घराची बाल्कनी शोधत फिरत होतो. दोन, तीन नेमकं किती तास फिरलो मला माहीत नाही. मग मला समजलं. आता काहीच उरलेलं नाही आणि त्यांना बाहेर काढण्याची आशाही नाही," सेर्ही पुढे म्हणाले.

पुढच्या काही दिवसांत ढिगाऱ्यातून प्रत्येकाने आपापल्या वस्तू घेतल्या. त्यांना त्यांना सोफियाचा एक न तुटलेला चायना कप, ॲडम आंघोळ करताना खेळायचा ते माश्याचं खेळणं आणि तो शेवटचं घराबाहेर पडला होता तेव्हा अंगावर घातलेलं. त्याचं ते लाल जॅकेट सापडलं. त्यांच्याकडे असलेल्या मौल्यवान आठवणी आणि या वस्तू हाच त्यांचा खजिना आहे.

"दररोज संध्याकाळी कामावरून घरी परतलो की मी ॲडमला फिरायला घेऊन जात असे," सेर्ही सांगत होते.

"त्याला आकाशाचं फार आकर्षण होतं. त्याचं छोटंसं बोट तो वर आकाशाकडे दाखवत असे आणि मग आम्ही त्याला त्याबद्दल सांगत असू. त्याला पक्षीही खूप आवडायचे," ते पुढे आठवणीत रमून जातात.

त्यांच्याकडे असलेल्या आणखी एका व्हीडिओत सोफियानं ॲडमला कडेवर घेतलंय. त्याला हातात धरून ती इकडून तिकडे झुलवते. आणि मग जमिनीवर दाणे टिपणाऱ्या कबुतऱ्यांच्या थव्यातून त्याला पळवत नेते.

"तो नुकताच बोलू लागला होता. नेहमी हसरा असे. निरोगी, सुंदर आणि अतिशय हुशार होता. तो आणि माझ्या मुलीमुळेच आमच्या आयुष्यात आनंद होता," युलीया नातवाचं कौतुक सांगत होत्या.

रशियानं फेब्रुवारी 2022 मध्ये रशियात घुसखोरी केली तेव्हाच युलीयाने सोफीला इंग्लंडमध्ये सुरक्षित राहण्यासाठी पाठवलं होतं.

तिथं जाऊन ही तरूण मुलगी स्वतःच्या भाषा कौशल्यांचा पुरेपूर वापर करून घेत होती. ब्रिटिश लष्कराकडून प्रशिक्षण घेणाऱ्या युक्रेनच्या सैनिकांसाठी ती अनुवादकाचं काम करत होती. पण युक्रेनपासून तिला फार काळ लांब राहता आलं नाही.

"तिला तिच्या पालकांची, नातेवाईकांची आणि देशाची खूप आठवण यायची," युलीया सांगतात. सोफिया इकडे परत आली आणि जून 2023 ला तिने ॲडमला जन्म दिला. सोबतच, ती मानसिक आरोग्याचा अभ्यास करू लागली. युक्रेनमधल्या अनेकांना मानसिक आरोग्यासंदर्भात मदतीची गरज आहे हे तिने ओळखलं होतं.

एकीकडे मनात हे दुःख असताना दुसरीकडे युलीया यांना हेही माहीत आहे की दबावाखाली येऊन लवकरच युक्रेन त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्यांसोबतच वाटाघाटी करेल.

अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प परत आलेत. दोन देशांत शांतता करार व्हावा यासाठी ते प्रयत्न करतील. तसा दृढ निश्चयच त्यांनी केला आहे.

युलीया आणि सेर्ही दोघांनाही युक्रेनने लढत रहावं असं वाटतं.

एका दिवसांत युद्ध संपवून टाकू असं डोनाल्ड ट्रम्प म्हणतात तेव्हा ते किती हास्यास्पद वाटतं ते युलीया सांगत होत्या.

"रशिया हे आक्रमक वादळ होतं. ते आमच्या देशात आलं आणि आमची घरं आणि कुटुंब उद्ध्वस्त करून गेलं," युलीया म्हणतात. त्यामुळे युद्धबंदीसाठी किंवा शांततेसाठी काही चर्चा केलीच जाऊ शकत नाही.

"आम्ही या हारवटाला (रशियाचे राष्ट्राध्यक्ष वाल्देमीर पुतिन) असंच सोडलं आणि आमच्या माणसांच्या हत्येचा सूड घेतला नाही तर आम्ही कधीच जिंकणार नाही."

सेर्ही यांचं म्हणणं आहे की रशियाचा युक्रेनशी एकाच पद्धतीने संबंध आला पाहिजे आणि ते म्हणजे युद्ध.

युद्धबंदी झाली तरी रशिया पुढेमागे परत येणार असं अनेकांना वाटतं. क्रायमिया द्वीकल्प त्यांनी आठ वर्षांपुर्वी ताब्यात घेतला. तरीही 2022 ला ते परत आले. आता युक्रेनच्या एक पंचमांश भागावर मॉस्कोचं नियंत्रण आहे.

काल युक्रेनच्या बाजूने नाही. 2025 मध्ये देशाला अनेक समस्यांना तोंड द्यायचं आहे. अमेरिकेच्या लष्कराकडून मिळणाऱ्या मदतीत घट होण्याची शक्यता आहे. शिवाय, आंतरराष्ट्रीय स्तरावरही युद्धाचा विषय पुसट होताना दिसतोय.

इतर देशांत लोक नेहमीसारखं आयुष्य जगतात याची युलीया यांना कल्पना आहे.

"फक्त आमच्याबद्दल विचार करत लोक आयुष्यभर ताणात राहू शकत नाहीत, तरीही, त्यांच्या जवळपास एक युद्ध अजूनही सुरू आहे आणि त्यात फक्त सैनिकच नाही तर नागरिकही मरत आहेत हे त्यांनी लक्षात ठेवावं," त्या म्हणतात.

ॲडम बुहाय, सोफिया बुहाय आणि टिट टेटियाना तारसेविच - जगानं ही नावं लक्षात ठेवावीत अशी त्यांची इच्छा आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)