विमान हवेत असताना विषबाधा, नंतर तुरुंगात गूढ मृत्यू; नवालनींनी पुतिन यांच्या साम्राज्याला कसं आव्हान दिलं?

    • Author, रेहान फजल
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

अॅलेक्सी नवालनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना अखेरपर्यंत धाडसाने भिडणारा माणूस.

न्यायालयातला त्यांचा शेवटचा व्हिडीओ समोर आला, तेव्हा रशियन तुरुंगात त्यांच्यावर अमानुष अत्याचार केल्याचं दिसून येत होतं.

परंतु त्यावेळीही त्यांची वृत्ती निडर आणि बेधडक होती.

पत्रकारांशी चर्चा करत असताना ते प्रशासनाला खडेबोलही सुनावत होते. न्यायाधीशांशी बोलताना ते म्हणाले होते, "कृपया तुमच्या गलेलठ्ठ पगारातील काही भाग मला द्या. तुम्ही माझ्यावर इतके दंड ठोठावले आहेत की माझ्याकडचे सर्व पैसे संपले आहेत."

दुसऱ्या दिवशी रशियन सरकारनं एक निवेदन जारी केलं आणि अॅलेक्सी नवालनी रशियाच्या उत्तरेकडील तुरुंगात मृतावस्थेत सापडल्याचं जाहीर केलं.

रशियात त्यांचं महत्त्व वाढत गेल्यानं त्यांना त्रास देणं, धमकावणं आणि तुरुंगात पाठवण्याचे प्रकार वाढत गेले.

ब्रिटिश वृत्तपत्र 'द गार्डियन'मध्ये आलेल्या, 'केमिकल बर्न्स, पॉयझनिंग अँड प्रिझन: द पर्सेक्युशन ऑफ ॲलेक्सी नवालनी' या लेखात जॉर्ज साहा यांनी लिहिले, "2017 मध्ये एका हल्लेखोरानं त्यांच्या चेहऱ्यावर हिरवे द्रव्य फेकले होते. त्यानंतर त्यांच्या एका डोळ्यानं 80 टक्के दृष्टी गमावली होती."

"त्यानंतर 2020 मध्ये, रशियाची सुरक्षा एजन्सी फेडरल सिक्युरिटी सर्व्हिसनं सोव्हिएत काळात विकसित केलेल्या नर्व्ह एजंट 'नोविचोक'नं त्यांना मारण्याचा प्रयत्न केला होता."

भ्रष्टाचार उघड करण्याची मोहीम

'पॅट्रियट' हे नवालनींचं आत्मचरित्र गेल्या वर्षी प्रकाशित झालं. यामध्ये त्यांच्या विषबाधेच्या घटनेची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

नवालनी आपल्या पुस्तकात लिहितात, "मी सायबेरियन शहर टॉम्स्क येथून मॉस्कोला जात होतो. अनेक वर्षांपासून मला कोणत्याही पदावर निवडणूक लढवण्यास बंदी होती."

"रशियन सरकार माझ्या नेतृत्त्वाखाली राजकीय पक्षाला मान्यता देत नव्हतं आणि त्यांनी अलिकडच्या 8 वर्षांत नवव्यांदा पक्षाची नोंदणी करण्यास नकार दिला होता."

"मला माहीत नव्हतं की, कोणत्या कारणांमुळे आम्ही भरलेल्या अर्जात नेहमी चुका काढल्या जात. गेल्या काही वर्षांपासून मी आणि माझे सहकारी रशियातील भ्रष्टाचारावर सिनेमे बनवत होतो. आमचे प्रत्येक व्हिडीओ यूट्यूबवर 30 ते 50 लाख लोकांनी पाहिले होते."

भ्रष्टाचार उघड करण्याची नवालनी यांची एक पद्धत होती. उदाहरणार्थ, त्यांनी अध्यक्ष पुतिन यांच्या प्रेस सेक्रेटरीच्या लग्नाच्या फोटोंचा अभ्यास केला.

त्यांच्या शर्टच्या बाही खालून चमकणाऱ्या घड्याळावर लक्ष केंद्रित केले, मग ते घड्याळ बनवणाऱ्या स्विस कंपनीकडून त्या घड्याळाची किंमत 6 लाख 20 हजार अमेरिकन डॉलर असल्याचं प्रमाणपत्र घेतलं.

मग ते त्याचा व्हिडिओ करुन त्यांच्या यूट्यूब चॅनलवर दाखवायचे.

पुतिन यांना आव्हान

नवालनी यांच्याकडे चौकशी किंवा तपास करण्याचे कोणतेही कायदेशीर अधिकार नव्हते. परंतु यासाठी त्यांनी इंटरनेटची मदत घेतली आणि रशियन सरकारच्या कथित 'चुकीच्या कामांची' यादी तयार केली. विशेष म्हणजे यापासून पुतीन यांचीही सुटका झाली नाही.

स्टीव्हन ली मायर्स त्यांच्या 'द न्यू झार, द राइज अँड रीइन ऑफ व्लादिमीर पुतिन' या पुस्तकात लिहितात, "सेर्गेई मॅग्नीत्स्की प्रमाणेच नवालनी यांनी सार्वजनिक नोंदींमधून पुरावे गोळा करून ते लोकांसमोर आणण्यास सुरुवात केली."

"त्यांनी रॉसपिल डॉट आरयू नावाची एक वेबसाईट सुरू केली. यामध्ये सर्व टेंडर्सची तपासणी करून यातील घोटाळे जनतेसमोर ते आणत. अनेकवेळा बदनामीमुळं टेंडर रद्द करण्याची वेळ सरकारवर आली."

यामुळं नवालनी हे प्रसिद्ध झाले आणि त्यांनी रशियाला पुतिन यांच्या मार्गापासून दूर नेण्याची त्यांची राजकीय महत्त्वकांक्षा असल्याचं लपवलंही नाही.

लांब सोनेरी केस असलेले नवालनी एक नेता म्हणून उदयास येत होते. त्यांच्यात पुतिन यांना आव्हान देण्याची क्षमता लोकांना दिसू लागली होती.

मॉस्को शहर सोडण्यास बंदी

'रशिया टुडे' या सरकारी टीव्ही चॅनलनं 'वॉर-हीरो'ची बदनामी करण्याचा कट रचल्याचा आरोप करत नवालनी यांच्यावर फौजदारी खटला दाखल केला होता. न्यायालयानं त्यांच्या विरोधात आदेश देऊन मॉस्को सोडण्यास बंदी घातली होती.

नवालनी यांनी हा आदेश झुगारुन एका शोध मोहिमेसाठी सायबेरिया गाठले.

नवालनी यांनी लिहिले की, "कदाचित यामुळेच क्रेमलिन आणि पुतिन यांनी माझ्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी केजीबी आणि एफएसबीच्या वर्तुळात 'सक्रिय कारवाई' हा शब्द वापरला जात होता. त्याचा खरा अर्थ व्यक्तीपासून मुक्त होणं म्हणजे समस्या कायमची संपुष्टात येईल, असा होतो."

20 ऑगस्ट रोजी जेव्हा नवालनी मॉस्कोला जाणाऱ्या विमानात बसले, तेव्हा त्यांनी सीट बेल्ट बांधून आपल्या पायातील बूट उतरवले.

विमान रनवेवर धावू लागलं आणि नवालनी यांनी आपला लॅपटॉप सुरू केला.

या बातम्याही वाचा:

व्यवस्थेनं काम करणं बंद केलं

नवालनींनी पुढे लिहिले, "मला जाणवलं की मी लॅपटॉपच्या स्क्रीनकडं पाहत आहे, पण त्यावर लक्ष केंद्रित करू शकत नाही. माझ्या कपाळावर घाम जमा झाला आहे."

"मला वेदना होत नव्हत्या, पण जाणवत होतं की, माझं शरीर काम करणं बंद करत आहे. माझी सहकारी किराला मी माझ्याशी बोलण्यास सांगितलं. ती बोलत होती, पण मला काहीच समजत नव्हतं."

विमानात खाली पडले नवालनी

तेवढ्यात एक फ्लाइट अटेंडंट ट्रॉली घेऊन तिथे पोहोचला. किराच्या म्हणण्यानुसार, नवालनी काहीही न बोलता 10 सेकंद माझ्याकडं पाहत राहिले. यानंतर ते आपल्या जागेवरून उठून उभे राहिले.

नवालनी पुढे लिहितात, "मी टॉयलेटमध्ये जाऊन चेहऱ्यावर थंड पाणी शिंपडण्याचा निर्णय घेतला. पायात बूट घालण्या इतकी ताकदही माझ्याकडं उरली नव्हती."

"मी चेहऱ्यावर पाणी मारलं. मी एकट्यानं टॉयलेटच्या बाहेर निघू शकणार नाही, असं मला वाटलं. परंतु, कसातरी मी बाहेर निघालो."

"फ्लाइट अटेंडंटनं माझ्याकडं आश्चर्यानं पाहिलं. मला विषबाधा झाली आहे आणि मी मरणार आहे, हे मी त्याला कसंतरी सांगू शकलो. हे सांगून मी विमानात त्याच्या पायाजवळ कोसळलो."

"तुम्हाला हार्टअटॅक आला आहे का?" असं एका महिलेनं नवालनी यांच्या कानात विचारले. नवालनी यांनी त्यांचं डोकं हलवून इशाऱ्यानंच नाही म्हटलं.

नवालनी यांनी म्हटलं, "हळूहळू माझ्या आजूबाजूनं येणारे आवाज बंद झाले. 'जागे राहा', 'जागे राहा', हा एका महिलेचा शेवटचा शब्द माझ्या कानावर पडल्याचं माझ्या चांगलं लक्षात आहे. मग माझा मृत्यू झाला. पण खरं तर मी मेलो नव्हतो."

उपचारासाठी जर्मनीला नेलं

काही दिवसांनंतर जेव्हा त्यांनी डोळे उघडले तेव्हा ते एका हॉस्पिटलमध्ये असल्याचे त्यांना जाणवले. त्यांच्या बाजूला पत्नी आणि डॉक्टर्स उभे होते.

झाले असे होते की, जेव्हा नवालनी हे बेशुद्ध पडले. त्यावेळी पायलटने विमान मॉस्को ऐवजी जवळच्या विमानतळावर उतरवण्याचा निर्णय घेतला.

तिथे त्यांच्यावर तात्काळ उपचार करण्यात आले, त्यामुळे त्यांचा जीव वाचला. काही दिवसांनंतर त्यांना उपचारासाठी जर्मनीला नेण्यात आले.

नवालनी लिहितात, "मला आठवतंय की मी एका व्हील चेअरवर बसलो होतो. डॉक्टरांनी म्हटले की, 'अॅलेक्सी काही तर बोला.' मग मला हळूहळू जाणीव होऊ लागली की माझे नाव अॅलेक्सी आहे. मग मला इथे काय घडतंय हे समजू लागले."

मला एक पेन देण्यात आला आणि काहीतरी लिहिण्यास सांगितले.

"मला एक पेन दिला गेला आणि काहीतरी लिहायला सांगितले. मला कसे लिहायचे हे कळत नव्हते, मी लिहिणे विसरुन गेलो होतो. तेव्हा मला खूप वाईट वाटले."

विषबाधा झाल्याची पुष्टी

नवालनीच्या डॉक्टरांनी त्यांना काय झाले आहे, त्यांच्यावर कसे उपचार केले जात आहेत, त्यांना किती काळ या अवस्थेत राहावे लागेल हे सांगितले.

नवालनी यांनी आठवून सांगितले की, "माझी पत्नी युलिया आणि माझे सहकारी लिओनिद मला काय झाले ते सांगण्याचा वारंवार प्रयत्न करत होते. परंतु त्यांना यश येत नव्हते."

नवालनी लिहितात, "मला विष देण्यात आले आहे, याला प्रयोगशाळांमधून दुजोरा मिळाला होता. हे तेच विष होते, जे रशियन गुप्तचर विभागाने सर्गेई स्क्रिपालला सेल्सबरीमध्ये दिले होते."

जर्मन चॅन्सलर मर्केल यांनी घेतली भेट

नवालनी हळूहळू बरे होऊ लागले होते. परंतु, तेव्हाही जेव्हा त्यांना आपला हात धुण्याची इच्छा व्हायची. त्यावेळी त्यांचे हात त्यांचे ऐकायचे नाही म्हणजेच त्यांना अद्याप या गोष्टी करताच यायच्या नाहीत.

त्यांची अवस्था एखाद्या वृद्धासासारखी झाली होती. असा व्यक्ती जो तीन पावले ही चालू शकत नाही आणि नीट नळाची तोटीही चालू करु शकत नाही.

जेव्हा त्याची मुले दाशा आणि जाखर मॉस्कोहून त्यांना भेटायला आले. तेव्हाही ते त्यांना मिठी मारू शकले नाहीत. कारण त्यांचे शरीर विविध नळ्यांनी वेढले गेले होते.

नवालनी म्हणतात, "23 सप्टेंबर हा माझा जर्मनीतील शेवटचा दिवस होता. मी पहिल्यांदा सामान्य लोकांसारखे कपडे घातले होते. सहा वाजता माझे डॉक्टर मला भेटायला आले. तेव्हा मला एक महिला त्यांच्या मागे चालताना दिसली, त्यांचा चेहरा काहीसा ओळखीचा वाटत होता. त्या जर्मनीच्या चॅन्सलर अँजेला मर्केल होत्या. मला माहीत होते की, त्यांनीच पुतिन यांच्यावर दबाव आणला होता आणि मला उपचारासाठी बर्लिनला हलवले होते."

पुढचा तासभर दोघांनी रशियन राजकारणावर चर्चा केली.

"माझ्या केसची पूर्ण माहिती त्यांच्याकडे असल्याने मी खूप प्रभावित झालो. निघताना त्यांनी मला विचारले की, माझी भविष्यातील योजना काय आहे?".

"मी त्यांना म्हणालो की, मला लवकरात लवकर रशियाला परत जायचे आहे. त्यावर त्यांनी मला घाई करण्याची गरज नाही," असे म्हटले.

एफएसबी अधिकारी बनून गुपितं बाहेर काढली

नवालनी आणखी तीन महिने जर्मनीत राहिले.

त्यांचे रशियाला परतणे क्रेमलिनला आवडले नाही हे उघड होते.

दरम्यान, त्यांनी त्याच्या विरोधकांकडून टॉमस्कमध्ये त्याच्या अंडरविअरमध्ये नर्व्ह एजंट ठेवल्याचे कबूल करवून घेतले होते.

साहा यांनी 'द गार्डियन' वृत्तपत्रात लिहिले, "नवालनी, वरिष्ठ एफएसबी अधिकारी म्हणून, कुद्र्यवत्सेव्ह या दुसऱ्या एफएसबी अधिकाऱ्याशी बोलले. त्यांनी एक व्हिडिओ जारी केला. ज्यामध्ये ते एफएसबी अधिकाऱ्याला फोनवर विचारतात की, नवालनी पळून जाण्यात कसा यशस्वी झाला? "

"त्यावर त्या अधिकाऱ्याची प्रतिक्रिया अशी होती की, जर विमानाचे इमर्जन्सी लँडिंग झाले नसते. तर नवालनीसाठी जगणे कठीण झाले असते. मॉस्को अजून तीन तास दूर होते. जर त्यांचे विमान तिकडे उड्डाण केले असते, तर तो वाचला नसता."

एफएसबीने फोन कॉलचा हा व्हिडिओ बनावट असून तो विदेशी शक्तींच्या मदतीने बनवल्याचा आरोप केला होता.

रशियाला पोहोचताच अटक

जानेवारी 2021 मध्ये, नवालनी रशियाला निघाले. त्यांचे विमान रशियातील नुकोवो विमानतळावर उतरणार होते. परंतु ते शेरेमेत्येवो विमानतळाकडे वळवण्यात आले, तिथे उतरताच त्यांना अटक करण्यात आली.

पुढच्या तीन वर्षांत त्यांच्यावर अनेक खटले दाखल झाले. त्यांना नऊ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली.

ऑगस्ट 2023 मध्ये त्यांना आणखी 19 वर्षांची शिक्षा झाली. प्रत्येक शिक्षेनंतर त्याची रवानगी नव्या तुरुंगात करण्यात येत असत. तुरुंगात त्यांची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत गेली.

त्यांना तुरुंगात एकांतात ठेवण्यात आले. त्यांना व्यवस्थित झोपूही दिले जात नसत. दर तासाला त्यांना उठवले जात. त्यांना फोन कॉल करण्यास किंवा आलेला कॉल घेण्यासही मनाई होती.

त्यांना दिवसातील फक्त दीड तासच कागद आणि पेन दिले जात. नंतर ही सुविधा केवळ अर्धा तास करण्यात आली. अखेरीस ती पूर्णपणे बंद करण्यात आली.

तुरुंगात मृत्यू

त्यांना कोणतीही वैद्यकीय सुविधा देण्यात आली नाही. यामुळे ते मार्च 2021 मध्ये उपोषणाला बसले होते.

सैनिकी डॉक्टरांपेक्षा सिव्हिल डॉक्टरांकडून आपली तपासणी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.

24 दिवस चाललेल्या या उपोषणानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले.

आपला एक पाय बधीर झाला असून त्या पायावर वजन टाकू शकत नसल्याची तक्रार त्यांनी केली.

त्यानंतर त्यांनी तीव्र पोटदुखीचीही तक्रार केली होती.

त्यांच्या समर्थनात झालेल्या आंदोलनामुळे डॉक्टरांना त्यांची तपासणी करण्याची परवानगी देण्यात आली.

त्यांना पुन्हा एकदा दुसऱ्या तुरुंगात हलवण्यात आले.

डिसेंबर 2023 मध्ये ते आर्क्टिक येथील खार्प तुरुंगात असल्याचे समोर आले.

हे तुरुंग संपूर्ण रशियामध्ये डासांसाठी कुप्रसिद्ध होते. 16 फेब्रुवारी 2024 रोजी त्याच्या नवालनी या तुरुंगात मृतावस्थेत आढळून आले.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)