You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
ट्रम्प यांनी झेलेन्स्कींना 'हुकूमशहा' म्हटलं, दोन्ही नेत्यांमध्ये वाढला तणाव; काय आहे वादाचं कारण?
- Author, गॅब्रिएला पोमेरॉय आणि जॉर्ज राइट
- Role, बीबीसी न्यूज
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवड झाल्यापासून डोनाल्ड ट्रम्प हे जागतिक माध्यमांच्या दृष्टीने चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहेत.
टॅरिफ, अमेरिकेतील निर्वासित लोक त्याचबरोबर जगाच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या विषयांवरही ते आपली मतं आक्रमकपणे मांडताना दिसत आहेत.
युक्रेनमध्ये गेल्या दोन वर्षांपासून मार्शल लॉ असल्यामुळे निवडणुका झाल्या नाहीत आणि कधी होतील याची स्पष्टता नाहीये. त्यावरुन झेलेन्स्की हे निवडणुकीसाठी टाळाटाळ करत असल्याचा आरोप त्यांचे विरोधक करत आहेत.
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्यावर आता शाब्दिक हल्ला केला आहे.
ट्रम्प यांनी झेलेन्स्की यांना पुन्हा एकदा हुकूमशहा म्हटलं आहे. या टीकेमुळं दोन्ही नेत्यांमधील मतभेद आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सौदी अरेबियातील अमेरिका-रशिया चर्चेवरील झेलेन्स्की यांच्या प्रतिक्रियेनंतर ट्रम्प यांनी ही टीका केली आहे.
यूएस-रशिया चर्चेतून कीव्हला वगळण्यात आलं होतं. त्यामुळं निराश झालेल्या झेलेन्स्की यांनी या बैठकीवर टीका केली होती.
अमेरिकेचे अध्यक्ष मॉस्कोकडून पुरवण्यात आलेल्या चुकीच्या आणि खोट्या माहितीच्या जगात वावरतात, असा टोला त्यांनी लगावला होता.
युरोपियन राष्ट्रातील नेत्यांनीही झेलेन्स्की यांच्यावर टीका केली. राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी लोकशाहीची मान्यता नाकारणं चुकीचं आणि धोकादायक असल्याचं जर्मन चान्सलर ओलाफ स्कोल्झ यांनी म्हटलं.
'जागतिक नेते म्हणतात, निवडणुका न घेणं योग्यच'
दुसरीकडे युकेचे पंतप्रधान सर किएर स्टार्मर यांनी झेलेन्स्की यांना फोन करून त्यांना त्यांचा पूर्ण पाठिंबा असल्याचं स्पष्ट केलं.
सर किएर स्टार्मर यांनी युक्रेनच्या लोकशाहीतून निवडलेले नेते म्हणून राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींना पाठिंबा देण्याची इच्छा व्यक्त केली," असं डाऊनिंग स्ट्रीटच्या प्रवक्त्यानं सांगितलं.
"युद्धकाळात निवडणुका स्थगित करणं हे अगदी योग्य आहे. दुसऱ्या महायुद्धात युनायटेड किंगडमनेही हेच केलं होतं," असंही या प्रवक्त्यानं पुढं सांगितलं.
झेलेन्स्की हे रशिया आणि युक्रेन विषयी अमेरिकेचे राजदूत कीथ केलॉग यांची भेट घेणार आहेत. ही चर्चा आणि अमेरिकेचं सहकार्य हे रचनात्मक असणं महत्त्वाचं आहे, असं ते म्हणाले.
झेलेन्स्की यांचा पाच वर्षांचा अध्यक्षीय कार्यकाळाचा शेवट मे 2024 मध्ये होणार होता.
परंतु, रशियानं फेब्रुवारी 2022 मध्ये युक्रेनवर हल्ला केल्यापासून तिथं मार्शल लॉ लागू करण्यात आला आहे. त्यामुळं तेथील निवडणुकांनाही स्थगिती देण्यात आली आहे.
'ट्रम्प यांच्या टीकेला अनेकांचा विरोध'
स्वीडनचे पंतप्रधान उल्फ क्रिस्टरसन यांनी ट्रम्प यांच्या 'हुकूमशहा' या शब्दाच्या वापरावर टीका केली.
तर जर्मनीच्या परराष्ट्र मंत्री ॲनालेना बेरबॉक यांनी हे अविचारी वक्तव्य असल्याचा टोला लगावला.
"तुम्ही फक्त ट्विट करण्याऐवजी वास्तविक जगाकडे पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल की युरोपमध्ये कोणाला हुकूमशाहीच्या परिस्थितीत जगावं लागतंय. रशियामधील नागरिक, बेलारूसमधील लोक हुकूमशाही अनुभवत आहेत," असं त्यांनी झेडडीएफ या माध्यमसंस्थेला सांगितलं.
फ्लोरिडामध्ये बोलताना ट्रम्प यांनी झेलेन्स्की यांना 'हुकूमशहा' असं म्हटलं होतं. त्यानंतर काही तासांनी त्यांनी युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांबद्दल तोच शब्द ट्रुथ सोशल मीडियावरील पोस्टमध्ये वापरला.
"ते निवडणुका घेण्यास नकार देतात. ते युक्रेनियन निवडणुकांच्या सर्वेक्षणांमध्ये मागे आहेत. देशातील शहरं उद्धवस्त होत असताना तुम्ही आघाडीही कशी घेऊ शकता?", असा सवाल ट्रम्प यांनी केला.
ट्रम्प यांनी युक्रेनमधून दुर्मीळ खनिजं मिळवण्याच्या आपल्या प्रयत्नांचा संदर्भ यावेळी दिला. केवळ झेलेन्स्की सरकारमुळं हा करार मोडल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.
'झेलेन्स्की यांच्यामुळे युक्रेनला फटका'
ट्रम्प म्हणाले होते की, "झेलेन्स्की यांनी भयंकर काम केलं आहे. त्यांच्या कारभाराचा देशाला फटका बसला आहे. लाखो लोकांचा विनाकारण मृत्यू झाला."
दरम्यान, रशियासोबतचे युद्ध संपवण्यासाठी अमेरिका यशस्वीपणे वाटाघाटी करत असल्याचेही ते म्हणाले.
व्हाईट हाऊसच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की, ट्रम्प यांची पोस्ट झेलेन्स्की यांच्या "चुकीची माहिती"च्या आरोपाला दिलेलं उत्तर होतं.
मंगळवारी युएस आणि रशियाच्या अधिकाऱ्यांनी रशियाच्या आक्रमणानंतरची पहिलीच उच्चस्तरीय अशी थेट बैठक आयोजित केली होती.
"ट्रम्प यांनी झेलेन्स्की यांच्यावर केलेल्या टीकेला प्रतिसाद म्हणून रशिया सध्या शॅम्पेन उचलत आहे," अशा शब्दांचा वापर युक्रेनचे माजी पंतप्रधान आर्सेनी यात्सेन्युक यांनी बीबीसीबरोबर बोलताना केला.
"वोलोदिमीर झेलेन्स्की हे पूर्णपणे कायदेशीर राष्ट्राध्यक्ष आहेत. युद्धामुळं निवडणुका घेणं शक्य नसल्यामुळं देशात मार्शल लॉ आहे," असं त्यांनी स्पष्ट केलं.
फ्लोरिडातील मार-ए-लागो येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ट्रम्प यांनी केलेल्या टीकेमुळे दोन्ही राष्ट्र प्रमुखांमध्ये शाब्दिक युद्धाला सुरुवात झाली. ट्रम्प यांनी पत्रकार परिषदेत युद्धासाठी युक्रेनला जबाबदार धरलं होतं.
"विश्वासघात झाला आहे, असं वाटणाऱ्या युक्रेनियन जनतेसाठी तुमचा संदेश काय आहे?" असं बीबीसी न्यूजनं ट्रम्प यांना प्रश्न विचारला.
त्यावर ते म्हणाले, "माझ्या कानी हे आलं आहे की त्यांना जागा न मिळाल्याने ते नाराज आहेत. त्यांना तीन वर्षं आणि त्यापूर्वीपासूनही बराच काळ संधी मिळाली होती. ते सहज सेटल होऊ शकले असते."
राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी फेब्रुवारी 2022 मध्ये युक्रेनवर आक्रमण करण्याचा निर्णय घेतल्याचा उल्लेख ट्रम्प यांनी एकदाही केला केला नाही.
'ट्रम्प यांच्याबद्दल आदर पण...'
बुधवारी झेलेन्स्की यांनी कीव्हमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, "आपण खूप चुकीची माहिती पाहत आहोत. ही सर्व चुकीची आणि खोटी माहिती रशियातून येत आहे.
"एक नेता म्हणून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल मला आदर आहे...पण ते खोट्या आणि चुकीच्या माहितीच्या युगात राहत आहेत."
ते पुढं म्हणाले की, "माझ्या मते, अमेरिकेनं पुतिन यांना अनेक वर्षांच्या एकटेपणातून बाहेर काढण्यासाठी मदत केली आहे."
युक्रेनच्या नेत्यांनी म्हटलं की, जगासमोर ते "पुतिन यांच्यासोबत आहेत की शांततेसोबत" असा निवडीचा प्रश्न पडला आहे.
पूर्वी, झेलेन्स्कींनी ट्रम्प यांचा युक्रेनचे दुर्मीळ खनिजं मिळवण्याचा प्रयत्न हाणून पाडला होता. कारण इतकं करुनही ट्रम्प हे त्या बदल्यात सुरक्षेची कोणतीही हमी देण्यास तयार नव्हते.
ट्रम्प यांनी झेलेन्स्की यांच्या लोकप्रियतेचा मुद्दा उठवण्याचा प्रयत्न केला आहे. युक्रेनच्या अध्यक्षांना केवळ 4 टक्के पसंती मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे.
परंतु, बीबीसीने अहवालाची सत्यता पडताळून पाहिली असता, या महिन्यात झालेल्या जनमत सर्वेक्षणानुसार 57% युक्रेनी नागरिकांनी झेलेन्सकी यांच्यावर विश्वास दर्शवला आहे.
'रशियावर आणखी निर्बंध '
बुधवारच्या धक्कादायक ट्रुथ सोशल पोस्टमध्ये, ट्रम्प यांनी युरोपवरही निशाणा साधला. युक्रेनमधील युद्ध आमच्यापेक्षा युरोपसाठी अधिक महत्त्वाचे असल्याचे त्यांनी म्हटले.
"आपल्याकडे एक मोठा, सुंदर असा विभक्त झालेला महासागर आहे," असं त्यांनी सांगितलं.
या भागात शांतता प्रस्थापित करण्यात युरोप "अयशस्वी" ठरला आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
दरम्यान, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांना "आनंदाने" भेटणार असल्याचं म्हटलं.
दरम्यान, युरोपीय संघानं रशियावर आणखी निर्बंध लावण्याची घोषणा केली आहे.
नवीन निर्बंधांमध्ये रशियन ॲल्युमिनियम आणि तेलाची अवैध वाहतूक केल्याचा संशय असलेल्या डझनभर जहाजांना लक्ष्य करण्यात आलं आहे.
जागतिक स्विफ्ट पेमेंट सिस्टिममधून रशियन बँकांना बाहेर काढलं जाईल. त्याचबरोबर युरोपमध्ये प्रसारण करण्यापासून रशियन मीडिया आउटलेटवर बंदी घालण्यात येईल.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)