गाझाबद्दल अमेरिकेतल्या विद्यार्थ्यांचं काय म्हणणं आहे? 9 फोटोंमधून समजून घ्या

गाझातील युद्धाच्या मुद्द्यावरून अमेरिकेच्या विद्यापीठांमध्ये गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थ्यांची आंदोलनं सुरू आहेत. ही आंदोलनं थांबवण्यासाठी आणि आंदोलकांवर नियंत्रण मिळवण्याचा पोलीस आणि स्थानिक प्रशासन प्रयत्न करत आहे.

सोशल मीडयावर सध्या या आंदोलनाशी संबंधित पोस्ट दिसत आहेत. त्यात 'इंतेफादा' असा शब्द वापरला जात आहे. या शब्दाचा वापर अरबी भाषेत क्रांती किंवा बंड या अर्थानं केला जातो.

आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या एका गटाकडून गाझामधील युद्धानंतर ज्यूविरोधी भावना वाढली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तर, दुसरा गट मुस्लीमविरोधी भावना वाढल्याचं म्हणत आहे.

पॅलिस्टिनींच्या समर्थनार्थ सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर न्यूयॉर्क विद्यापीठात विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये संघर्षही पाहायला मिळाला. त्यात शेकडो विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली.

अमेरिकेत प्रामुख्यानं न्यूयॉर्क युनिव्हर्सिटी, कोलंबिया युनिव्हर्सिटी, बर्कलेमधील युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया आणि युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगन याठिकाणी आंदोलन सुरू आहे. तसंच बॉस्टनच्या एमरसन कॉलेज और टफ्ट्स युनिव्हर्सिटी आणि कॅम्ब्रिजमध्ये मॅसॅच्युसेट्स इन्स्टिस्टूट ऑफ टेक्नोलॉजीमध्येही आंदोलन होत आहे.

या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये अनेक विद्यार्थ्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. त्यानंतर त्यांच्या विरोधातील ही कारवाई रद्द करण्याची मागणीही समोर येत आहे.

ही आंदोलनं सुरू असतानाच अमेरिकेच्या विद्यापीठांमध्ये शिक्षण घेणाऱ्या ज्यू विद्यार्थ्यांनी विद्यापीठ परिसरातील बदललेल्या वातावरणामुळं भीती वाढली असल्याचं म्हटलं आहे. आंदोलक विद्यार्थ्यांनी मात्र ज्यू विद्यार्थ्यांना त्रास देण्याचे प्रकार अगदी नगण्य असल्याचं म्हटलं आहे.

आंदोलक विद्यार्थ्यांकडून इस्रायल-गाझा युद्धाला पाठिंबा असलेल्या किंवा शस्त्रनिर्मितीशी संबंध असलेल्या कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांची नियुक्ती करणं थांबवावं अशी मागणीही केली जात आहे.

ज्यू विद्यार्थ्यांना त्रास देण्यासंदर्भात ज्या गोष्टी समोर येत आहेत, त्यात अतिशयोक्ती असल्याचं आंदोलकांचं म्हणणं आहे. आंदोलनाला विरोध असल्यानं अशा गोष्टी पसरवल्या जात असल्याचं ते म्हणत आहेत.

गाझामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळं आणखी एका नव्या 'इंतेफादा' चा जन्म होऊ शकतो का? असा प्रश्नदेखिल सध्या सोशल मीडिया यूझर्सकडून उपस्थित केला जात आहे.