You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
इस्रायलचा इराणवर हल्ला, मात्र इराणी स्पेस एजन्सीने फेटाळला दावा; नेमकं काय घडलं?
इस्रायलने इराणवर हवाई हल्ला केल्याची माहिती अमेरिकेच्या दोन अधिकाऱ्यांनी दिली आहे. बीबीसीची अमेरिकेतील सहकारी संस्था सीबीएस न्यूजला ही माहिती मिळाली आहे. मात्र अमेरिकेतील व्हाईट हाऊस आणि पेंटागॉन किंवा स्वतः इस्रायलनं यावर भाष्य केलेेलं नाही.
पण इराणी स्पेस एजन्सीने क्षेपणास्त्र हल्ला झाल्याच्या वृत्ताला नकार दिला आहे. इराणने काही ड्रोन्स पाडल्याच्या वृत्ताला मात्र त्यांनी दुजोरा दिला आहे.
ही ड्रोन्स कुठून डागली होती याची माहिती मिळालेली नाही.
इराणवर कोणताही क्षेपणास्त्र हल्ला झाला नसल्याचं इराण स्पेस एजन्सीच्या एका अधिकाऱ्याने X (ट्विटर) वर लिहिलंय.
हुसेन दलिरियन यांनी लिहिलंय, "सीमेच्या बाहेरून इस्फहान किंवा देशाच्या इतर कोण्यात भागावरही हवाई हल्ला झालेला नाही. काही क्वाडकॉप्टर्स (ड्रोन्स) उडवण्याचा अपयशी प्रयत्न करण्यात आला, पण ती पाडण्यात आली."
14 एप्रिलला इराणने इस्रायलवर सुमारे 300 क्षेपणास्त्रे आणि ड्रोन डागले होते.
इराणने डागलेली सर्व ड्रोन आणि क्षेपणास्त्रे पाडल्याचा दावा इस्रायलने केला होता आणि वेळ आल्यावर प्रत्युत्तर देऊ, असा इशाराही दिला होता. त्यानंतर आता हा हल्ला झाला आहे.
इराणच्या एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी 19 एप्रिलला सकाळी इराणच्या वायव्य भागातील इस्फहान शहरामध्ये स्फोटाचा आवाज ऐकू आला. इराणी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा आवाज त्यांनी संशयित ड्रोन पाडल्यामुळे आला होता.
इस्फहानमध्ये इराणी सैन्याचा मोठा हवाई तळ आहे आणि या भागात अण्वस्त्रांशी संबंधित महत्त्वाचे तळही आहेत. अण्वस्त्रांशी संबंधित ठिकाणं सुरक्षित असल्याचं इराणच्या सरकारी माध्यमाने विश्वसनीय सूत्रांच्या हवाल्याने सांगितलंय.
इराणच्या हवाई संरक्षण प्रणालीला देशभर सतर्कतेचा इशारा दिला आहे. या यंत्रणेने अज्ञात मिनी ड्रोन पाडल्यामुळे हेे स्फोटांचे आवाज आल्याची माहिती मिळते आहे.
स्फोटांची माहिती मिळाल्यावर इराणची राजधानी तेहरान तसंच शिराज आणि इस्फहान या शहरांमध्ये विमानांची उड्डाणं काही काळासाठी रद्द करण्यात आली.
इराणची सरकारी वृत्तसंस्था IRNA ने दिलेल्या वृत्तानुसार तेहरानच्या इमाम खोमेनी आंतरराष्ट्रीय विमानतळ तसंच मेहराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर आता विमानसेवा पुन्हा सुुरू झाल्या आहेेत.
यापूर्वी, इराणचे परराष्ट्र मंत्री हुसेन अमीर-अब्दुल्लायान म्हणाले होते की, इस्रायलकडून कोणत्याही प्रत्युत्तराच्या कारवाईला तत्काळ आणि मोठ्या प्रमाणावर प्रत्युत्तर दिलं जाईल.
इस्रायलमधील दूतावासातील कर्मचाऱ्यांना प्रवास करण्यास अमेरिकेची मनाई
अमेरिकेने इस्रायलमधील आपल्या दूतावासातील कर्मचाऱ्यांना प्रवास करण्यास मनाई केली आहे.
इस्रायलमधील अमेरिकन दूतावासातील कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबिय यांच्या सुरक्षेची बाब लक्षात घेऊन अमेरिकन सरकारनं हे पाऊल उचललं आहे.
शुक्रवारी अमेरिकेच्या दोन अधिकाऱ्यांनी इस्रायलने इराणवर हल्ला केला असल्याची दावा केला आहे.
इस्रायलमधील अमेरिकन दूतावासानं सांगितलं की, ''पुढील आदेश येईपर्यत दूतावासातील कर्मचाऱ्यांना प्रवास न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सुरक्षेसंदर्भात परिस्थिती गंभीर झाली आहे. राजकीय आणि सध्या होत असलेल्या घडामोडींमुळं परिस्थिती वेगानं बदलू शकते.''
इराणने शनिवारी रात्री उशीरा इस्रायलवर जवळपास 300 ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा मारा केला होता.
इराणने सोडलेले जवळपास सर्व ड्रोन आणि क्षेपणास्त्र हवेतच नष्ट केल्याचा दावा इस्त्रायलनं केला होता. त्याचबरोबर इस्रायलने चेतावनी दिली होती की योग्य वेळी ते या हल्ल्याला उत्तर नक्की देतील.
या आधी इराणने इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला केला होता
गेल्या रविवारी (14 एप्रिल) इराणने इस्रायलवर सुमारे 300 क्षेपणास्त्रे आणि ड्रोन डागले होते.
इराणने डागलेली सर्व ड्रोन आणि क्षेपणास्त्रे पाडल्याचा दावा इस्रायलने केला होता.
मात्र, त्यानंतर योग्य वेळ आल्यावर इराणच्या कृतीला नक्कीच प्रत्युत्तर देऊ, असा इशारा इस्रायलकडून देण्यात आला होता.
1 एप्रिल रोजी सीरियाची राजधानी दमास्कसमध्ये इराणच्या दूतावासावर हल्ला झाला होता. या हल्ल्यात एका वरिष्ठ जनरलसह एकूण 13 जणांचा मृत्यू झाला होता.
या हल्ल्यासाठी इराणने इस्रायलला जबाबदार धरले आहे. मात्र, इस्रायलने या हल्ल्याची थेट जबाबदारी स्वीकारलेली नाही.
इराणच्या दूतावासावर झालेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने इस्रायलवर क्षेपणास्त्र आणि ड्रोनचा वापर करून हल्ला केला.