युक्रेनच्या गुप्त ड्रोन हल्ल्यानं रशिया हादरलं, काय होतं 'ऑपरेशन स्पायडर्स वेब'?

फोटो स्रोत, Reuters
- Author, पॉल ॲडम्स
- Role, बीबीसी प्रतिनिधी
रशियामध्ये घुसून ड्रोनद्वारे केलेल्या हल्ल्यात रशियाची 40 हून अधिक अत्याधुनिक लढाऊ विमानं उद्धवस्त केल्याचा दावा युक्रेनने केला आहे.
हा रशियन हवाई दलावर झालेला आतापर्यंतचा सर्वात आक्रमक हल्ला मानला जात आहे. मात्र, युक्रेनला रशियन हवाई दलावर इतक्या मोठ्या प्रमाणात असा हल्ला करणं कसं शक्य झालं, हे नेमकं सांगणं कठीण आहे.
या हल्ल्यांमध्ये 7 अब्ज डॉलर्सचं नुकसान झालं आहे, या युक्रेनच्या दाव्यांची बीबीसी पुष्टी करू शकत नाही. मात्र, इतकं नक्की आहे की 'ऑपरेशन स्पायडर्स वेब' ही किमान एक प्रभावी प्रचारमोहीम असू शकते.
रशियाने पाच प्रांतांमध्ये युक्रेनने केलेल्या हल्ल्यांची पुष्टी केली आहे आणि त्याचं त्यांनी 'दहशतवादी कृत्य' असं वर्णन केलं आहे.
रशियाने पूर्णपणे युद्ध सुरू केल्यानंतर युक्रेनियन नागरिक आता याला त्यांच्या दुसऱ्या उल्लेखनीय लष्करी यशांशी जोडून पाहत आहेत.
युक्रेनने आतापर्यंत काळ्या समुद्रात रशियाची प्रमुख युद्धनौका 'मोस्कवा'ला बुडवणं, 2022 मध्ये कर्च पूल उध्वस्त करणं आणि त्याच वर्षी सेवास्तोपोल बंदरावर क्षेपणास्त्र हल्ला करणं ही आपली उल्लेखनीय लष्करी यशस्वी कामगिरी मानली आहे.
काय आहे 'ऑपरेशन स्पाइडर्स वेब'?
युक्रेनच्या लष्करी गुप्तचर संस्था एसबीयूने प्रसार माध्यमांमध्ये जी माहिती लीक केली आहे, त्या अंदाजानुसार हे ताजं ऑपरेशन ही त्यांची आतापर्यंतची सर्वात मोठी कामगिरी मानली जात आहे.
या ऑपरेशनसाठी 18 महिने तयारी करण्यात आली होती, असं सांगितलं जात आहे. यामध्ये अनेक छोट्या ड्रोनची रशियामध्ये तस्करी करण्यात आली होती.
त्यांना मालवाहक ट्रकच्या खास डब्यांमध्ये (कंपार्टमेंट) ठेवले गेले होते. त्यानंतर हजारो मैल दूर चार वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन त्यांना जवळच्या लष्करी हवाई दलांवर दूरस्थपणे (रिमोटली) लाँच केले गेले.
"संपूर्ण जगात आजवर असं गुप्त ऑपरेशन कधीच केलं गेलं नव्हतं," असं संरक्षण विश्लेषक सरई कुझन यांनी युक्रेनी टीव्हीला सांगितलं.
ते म्हणाले, "हे रणनीतिक (स्ट्रॅटेजिक) बॉम्बर्स आपल्यावर लांब पल्ल्याचे हल्ले करण्यास सक्षम होते. ही फक्त 120 विमानं आहेत, त्यापैकी आपण 40 ला लक्ष्य केलं. हा एक अभूतपूर्व आकडा आहे."
या नुकसानीचा अंदाज बांधणं कठीण आहे. पण युक्रेनी सैन्य ब्लॉगर ओलेक्सांद्र कोवालेन्को म्हणतात की, जरी बॉम्बर्स आणि कमांड अँड कंट्रोल एअरक्राफ्ट नष्ट झाली नसली तरी, त्यांचा प्रभाव खूप मोठा आहे.
त्यांनी त्यांच्या टेलिग्राम चॅनेलवर लिहिलं की, "हे नुकसान इतकं मोठं आहे की, रशियाच्या मिलिट्री-इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्सला सध्याच्या स्थितीत भविष्यात यांना पुन्हा तयार करू शकेल, असं वाटत नाही."

फोटो स्रोत, X/@ZelenskyyUa
रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं रविवारी सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये देशातील पाच प्रांतांतील लष्करी विमानतळांना लक्ष्य केल्याची पुष्टी केली होती.
इव्हानोव्हो, रियाझान आणि अमीर प्रांतातील लष्करी हवाई तळांवरील 'सर्व हल्ले उधळून लावण्यात आले,' असा दावाही संरक्षण मंत्रालयानं त्याचवेळी केला होता.
मंत्रालयानं हेही सांगितलं की, मिरमान्स्क आणि इर्कुत्स्क प्रांतातील जवळपासच्या भागांमधून ड्रोन उडवल्यानंतर 'अनेक विमानांना आग लागली'.
आग विझविण्यात आली असून कोणतंही नुकसान झालेलं नाही, असं त्यांनी म्हटलं. तसेच या दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या काही लोकांना ताब्यात घेतल्याचा दावाही करण्यात आला आहे.
कोणत्या विमानांचं नुकसान झालं?
क्षेपणास्त्र (मिसाइल) घेऊन जाणाऱ्या ज्या रणनीतिक (सामरिक) बॉम्बर्सची चर्चा आहे, त्यात टू-95 (Tu-95), टू-22 (Tu-22) आणि टू-160 (Tu-160) समावेश आहेत.
कोव्हालेन्को म्हणतात की, आता त्यांची निर्मिती केली जात नाही, त्यांची दुरुस्ती करणंही कठीण होईल आणि बदलणं तर अशक्यच होईल.
सुपरसॉनिक टू-160 चं नुकसान तीव्रतेनं जाणवेल.
ते लिहितात, "आज रशियन एरोस्पेस फोर्सेसने फक्त आपली दोन दुर्मीळ विमानं गमावली नाहीत, तर प्रत्यक्षात त्यांच्या ताफ्यातील ते दोन युनिकॉर्न होते."
रशियाला जे नुकसान झालं आहे, कदाचित विश्लेषक त्याचं मूल्यांकन करत असतील किंवा नसतील. पण 'ऑपरेशन स्पायडर्स वेब'मधून एक महत्त्वाचा संदेश फक्त रशियाच नाही, तर युक्रेनच्या पाश्चात्य मित्र राष्ट्रांनाही दिला गेला आहे.

फोटो स्रोत, Reuters
माझे सहकारी स्वायातोस्लव खोमनको यांनी नुकतीच कीव्हमधील एका सरकारी अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. या भेटीबद्दल त्यांनी बीबीसी युक्रेनी सर्व्हिससाठीच्या वेबसाइटवर लिहिलं आहे.
ते अधिकारी रागात होते, चिडले होते.
त्या अधिकाऱ्याने खोमनको यांना सांगितलं की, "सर्वात मोठी समस्या ही आहे की, अमेरिकेतील लोक आपण युद्ध आधीच गमावलं आहे, असं मानून बसले आहेत. आणि बाकीचे सर्वजण यावर विश्वास ठेवतात."
युक्रेनच्या संरक्षण विषयक पत्रकार इलिया पोनोमरेन्को यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमिर झेलेन्स्की यांच्यात ओव्हल ऑफिसमध्ये झालेल्या वादाचा उल्लेख केला आहे.
त्या लिहितात, "जेव्हा एखाद्या गौरवशाली राष्ट्रावर हल्ला होतो आणि ते अशा प्रकारच्या गोष्टी ऐकण्यास नकार देतात, तेव्हा असं घडतं. 'यूक्रेनकडे फक्त सहा महिनेच उरले आहेत', 'तुमच्यासमोर आता कोणताही पर्याय नाही', 'शांततेसाठी आत्मसमर्पण करा, कारण रशिया हरू शकत नाही'," असंही म्हटलं गेलं होतं.
युक्रेन अजूनही स्वतःला रणांगणात असल्याचं मानतो
"यावरून लक्षात येतं की युक्रेनकडे अजूनही काही पत्ते शिल्लक आहेत. आज झेलेन्स्की यांनी 'किंग ऑफ ड्रोन्सचा' खेळ खेळला आहे," अशी पोस्ट बिझनेस युक्रेन नावाच्या जर्नलने एक्सवर लिहिली.

फोटो स्रोत, Reuters
युक्रेन अजूनही युद्धात आहे हा संदेश निश्चितच युक्रेनी प्रतिनिधीमंडळाकडे जाईल. हे शिष्टमंडळ युद्धविरामाच्या चर्चेसाठी इस्तंबूलमध्ये रशियन प्रतिनिधींशी बोलणी करणार आहे.
सरकारी अधिकाऱ्यांनी स्वायातोस्लव खोमनको यांच्याशी बोलताना अमेरिकेच्या धोरणाविषयी सांगितलं. ते म्हणाले की, "अमेरिकन लोक असं वागायला लागले आहेत की, जणू आमच्यासाठी त्यांची भूमिका म्हणजे आत्मसमर्पणाच्या सर्वात सौम्य अटींवर चर्चा करण्यासारखं आहे."
"आणि त्यानंतर ते आम्ही त्यांचे आभार मानले नाहीत म्हणून रागाला जातात. आम्ही हरलो आहोत, असं आम्ही अजूनही मानत नाही."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











