थायलंड: शाळेच्या सहलीसाठी जाणाऱ्या बसला अपघातामुळे लागली आग, 23 जणांचा मृत्यू

फोटो स्रोत, Getty Images
- Author, गॅब्रिएला पोमेरॉय आणि जोनाथन हेड
- Role, बीबीसी न्यूज, बँकॉक
थायलंडमध्ये बसला अपघात होऊन लागलेल्या आगीमध्ये 23 जणांचे प्राण गेले आहेत. ही घटना राजधानी बँकॉकजवळ घडली आहे.
या बसमध्ये शाळेची मुलं प्रवास करत होती. ही मुलं शाळेच्या सहलीसाठी थायलंडच्या उत्तर भागात चालली होती. या आगीमध्ये मृत पावलेल्यांमध्ये याच मुलांची संख्या जास्त असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या घटनेच्या व्हीडिओत उड्डाणपुलाखाली बसला आगीने वेढल्याचं आणि धुराचे लोट उठत असल्याचं दिसत आहे.
थायलंडचे परिवहन मंत्री सुरीयाहे युनांग्रुन्रुंकित म्हणाले, "ही बस अतिशय धोकादायक समजल्या जाणाऱ्या सीएनजीवर चालवली जात होती."
बँकॉक शहराच्या उत्तरेस या बसला अपघात झाला. बसच्या पुढच्या चाकाचा टायर फुटल्याने बस काँक्रिटच्या कठड्याला धडकली आणि हा अपघात झाला.
क्षणार्धातच बसला आग लागली आणि त्या ज्वाळांमुळे कोणीच बाहेर पडू शकलं नाही. तरीही आगीचं मूळ कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
या बसमधील 19 मुलं आणि तीन शिक्षक वाचले आहेत. त्यातील 16 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
याबद्दल बोलताना सुरियाहे म्हणाले, "ही अत्यंत दुःखद घटना आहे. आमचं मंत्रालय यावर उपाय शोधून काढेल. जर शक्य झालं तर अशाप्रकारच्या प्रवाशीवाहनाला असलं (सीएनजी) इंधन वापरण्यास बंदी घालता येईल, कारण ते वापरणं अत्यंत धोकादायक आहे."

फोटो स्रोत, Getty Images
या घटनेचा तपास करणारे प्रमुख अधिकारी पियालाक थिंकाएव म्हणाले, "आतील प्रवाशांची शरीरं जळल्यामुळे ओळखण्यापलीकडे गेली आहेत."
"काही मृतदेह आकाराने अगदीच लहान आहेत. ही आग बसच्या पुढच्या भागात लागली. मुलं जीव वाचवण्यासाठी मागे गेली असावीत. कारण बहुतांश प्रेतं बसच्या मागच्या बाजूला आढळली आहेत."

फोटो स्रोत, Getty Images
न्यायवैद्यक विभागाचे पोलीस म्हणाले, "त्यांना 23 मृतदेह मिळाले आहेत. त्यातील 11 पुरुष तर 7 स्त्री असून उर्वरित 5 देहांची अद्याप ओळख पटलेली नाही."
"अपघातानंतर बसचा चालक पळून गेला त्याला शोधलं जाईल", अशी माहिती थायलंडचे गृहमंत्री अनुतिन चर्णविराकुल म्हणाले.
या मुलांचं वय अद्याप समजलेलं नाही, या शाळेत 3 ते 15 पर्यंत वयाची मुलं शिकतात. थायलंड हा देश रस्ते सुरक्षा बाबतीत वाईट देशांपैकी एक देश समजला जातो. दरवर्षी रस्ते अपघातात या देशात 20 हजार लोकांचे प्राण जातात.
अनुतिन हे थायलंडचे उपपंतप्रधानही आहेत. ते म्हणाले, “याबाबतचा तपास सुरू आहे. टायरच्या खुणा, आगीच्या खुणा आणि सीसीटीव्ही चित्रण याच्या आधारे तपास करावा लागणार आहे.”
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











