सिंहाला ओपन टॉप गाडीतून फिरवणं पडलं महागात, महिलेला घडू शकते तुरुंगवारी

फोटो स्रोत, ANN ISAANRUSSIA
थायलंडमध्ये पोलिसांनी गाडीतून फिरणाऱ्या महिलेला अटक केली. गाडीतून फिरणं हा तिचा अपराध नव्हता, तर या गाडीत तिच्यासोबत जो पाळीव प्राणी होता, त्यामुळे पोलिसांना तिला अटक करावी लागली.
आपल्या ओपन टॉप बेन्टले गाडीतून ती चक्क पाळीव सिंहाच्या छाव्यासोबत पट्टायाच्या रस्त्यावरून मस्तपैकी फिरत होती. मागच्या सीटवर पट्ट्याने बांधलेल्या या सिंहाच्या छाव्याबरोबरचा या महिलेचा गाडी चालवतानाचा व्हीडिओ व्हायरल झाला होता.
हा सिंहाचा छावा एका श्रीलंकन माणसाने आणला असल्याचं सांगितलं जात आहे. तो व्यक्ती स्वान्गित कोसून्गनर्म नावाच्या या महिलेचा मित्र असावा असा अंदाज आहे.
थायलंडमध्ये सिंह पाळणं हे बेकायदेशीर नसून त्यांची अधिकृतपणे नोंदणी करणं हे आवश्यक आहे.
अधिकाऱ्यांनी म्हटलं की स्वान्गितने हा सिंह नाखोन पाथोम प्रांतातील एका माणसाकडून घेतला होता. तोच या सिंहाला पट्टायापर्यंत घेऊनही आला होता. मात्र, पट्टायात येताना या गोष्टीची नोंद त्याने केली नाही. त्यामुळेच या सिंहाचं हस्तांतरण आणि मालकी या दोन्ही गोष्टी बेकायदेशीर ठरत असल्याचं इथल्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.
त्यामुळेच परवानगीशिवाय वन्य पशू बाळगल्याप्रकरणी या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याची शिक्षा एक वर्ष तुरुंगवास आणि 2,800 डॉलर्स एवढा दंड आहे.
भाड्याने घेतलेल्या आपल्या व्हिलामध्ये या सिंहाला ठेवणाऱ्या श्रीलंकन माणसाचा शोधही पोलीस घेत आहेत. मात्र, तो आता थायलंडमध्ये नसल्याने हे शक्य दिसत नाहीये. त्याच्यावर वन्य पशूला सार्वजनिक ठिकाणी घेऊन येण्याचा गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. या गुन्ह्यासाठी किमान सहा महिन्यांचा तुरुंगवास आणि 1400 डॉलर्स एवढा दंड आहे.
ज्याने या महिलेला सिंह विकला, त्याच्याविरोधातही परवानगीशिवाय प्राण्याची वाहतूक करण्याचा गुन्हा दाखल केला जाऊ शकतो.
सध्या थायलंडमध्ये कायदेशीररित्या पाळण्यात आलेले 224 सिंह आहेत.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








