इकरा हसन यांचा व्हीडिओ का झाला आहे व्हायरल? शिवीगाळ केल्याचा आरोप कोणावर केला?

इकरा हसन यांचा व्हीडिओ का झाला आहे व्हायरल? शिवीगाळ केल्याचा आरोप कोणावर केला?

उत्तर प्रदेशातील कैराना लोकसभा मतदारसंघातील समाजवादी पार्टीच्या खासदार इकरा हसन यांचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हीडिओमध्ये इकरा हसन भावूक झालेल्या दिसत आहेत.

इकरा हसन म्हणाल्या, "मला सन्माननीय माजी खासदारांना विचारायचं आहे की, ते त्यांच्या समर्थकांचा निषेध करतील का? ज्यांच्याकडून ते मला शिवीगाळ करवत आहेत? त्यांच्या घरात बहीण-मुली नाहीत का?"

या व्हीडिओमध्ये इकरा हसन त्यांना शिवीगाळ केली जात असल्याचा आरोप करताना दिसत आहेत. त्यांना 'दहशतवादी' म्हटलं जातं आहे. त्यांच्या वडिलांनादेखील शिवीगाळ केली जाते आहे.

या व्हायरल व्हीडिओमध्ये इकरा हसन यांनी कोणाचंही नाव घेतलेलं नाही. फक्त इतकंच म्हटलं आहे की माजी खासदार त्यांना 'शिवीगाळ घडवून आणत आहेत.'

भाजपाचे नेते प्रदीप चौधरी, कैरानाचे माजी खासदार आहेत. ते 2019 मध्ये पश्चिम उत्तर प्रदेशातील कैराना मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून दिले होते.

इकरा यांनी आरोप केल्यानंतर प्रदीप चौधरी यांनी एक पत्रकार परिषद घेतली. त्यात ते म्हणाले, "आमचा एक प्रदीर्घ राजकीय इतिहास आहे. कोणाशीही गैरवर्तन करण्याची गोष्ट आम्ही कधीही बोललेलो नाही."

इकरा हसन आणखी काय म्हणाल्या?

काँग्रेसचे नेते पवन खेडा यांनी 16 ऑक्टोबरला इकरा हसन यांचा हा व्हीडिओ एक्स या सोशल मीडियावर शेअर केला.

प्रसारमाध्यमांमधील वृत्तांमध्ये दावा केला जातो आहे की, 12 ऑक्टोबरला इकरा हसन सहारनपूरमधील छापूर गावातील एका पंचायतमध्ये सहभागी होण्यासाठी आल्या होत्या तेव्हाचा हा व्हीडिओ आहे.

इकरा हसन

फोटो स्रोत, Facebook

पवन खेडा यांनी या पोस्टमध्ये लिहिलं आहे, "एक सुशिक्षित, स्वतंत्र महिला- विशेषकरून एक मुस्लीम महिला - उजव्या विचारसरणीच्या गुंडांना सर्वाधिक अस्वस्थ करते. मग तिचं काम कितीही चांगलं का असेना. हे लोक तिला बदनाम करतात."

त्यांनी लिहिलं आहे, "त्यांच्या असुरक्षित मनाला द्वेष किंवा धार्मिक ध्रुवीकरणापलीकडच्या राजकारणाचं आकलन होतंच नाही."

या व्हीडिओत इकरा हसन यांनी आरोप केला आहे की, त्यांच्या बाबतीत घडलेली ही काही पहिलीच घटना नाही.

"जे लोक प्रश्न विचारतात की, मेवातवाल्यांना माफ करण्यात आलं, तर त्यांना का माफ करण्यात आलं नाही. त्यांना मला सांगायचं आहे की ही काही पहिलीच घटना नाही," असं इकरा हसन म्हणाल्या.

भाजपाचे माजी खासदार काय म्हणाले?

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

इकरा हसन यांचा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर माजी खासदार प्रदीप चौधरी म्हणाले, "मी तीनवेळा आमदार होतो. माझे वडील तीन वेळा आमदार होते. मी एकदा खासदार होतो. आम्ही दोघांनी मिळून जवळपास 12 निवडणुका लढवल्या आहेत."

"माझ्यावर असा आरोप करण्याचा प्रयत्न केला जातो आहे की, माझे समर्थक याप्रकारच्या भाषेचा वापर करत आहेत. मी कधीही अशाप्रकारच्या भाषेचा वापर करणाऱ्या व्यक्तींना सहकार्य केलेलं नाही."

ते म्हणाले, "मला फक्त इतकंच म्हणायचं आहे की, ज्याप्रकारे माझ्यासंदर्भात अशी भाषा वापरण्यात आली की माजी खासदाराच्या घरात देखील आई-बहीणी असतील. माझ्या घरातदेखील आई-बहीणी आहेत."

चौधरी म्हणाले, "हे राजकारणाचं क्षेत्र आहे. मलादेखील लोकांनी शिवीगाळ केली आहे. माझ्या कुटुंबालादेखील शिवीगाळ केली आहे. मात्र आम्ही कधीही निराशा दाखवली नाही. सार्वजनिक जीवनात याप्रकारच्या गोष्टी होत असतात. मात्र, अशाप्रकारे भावनिक बोलून पटकन लोकप्रियता मिळवण्याचा प्रयत्न केला जातो आहे."

चंद्रशेखर आझाद, उत्तर प्रदेशातील नगीना लोकसभा मतदारसंघातील खासदार आहेत. त्यांनी या प्रकरणाबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

ते म्हणाले, "आम्ही या प्रकारच्या भाषेला पाठिंबा देत नाहीत. इकरा आमची छोटी बहीण आहे. त्यांच्याविरोधात ज्या कोणी असं बोललं असेल, त्याच्यावर सरकार, पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली पाहिजे. फक्त इकराच नाही तर कोणाच्याही बहीण-मुलीबद्दल अशाप्रकारच्या भाषेचा वापर होता कामा नये."

"धार्मिकदृष्ट्या जे शब्द वापरण्यात आले आहेत, ते चिंताजनक आहे."

इकरा हसन कोण आहेत?

18 व्या लोकसभेत कैराना मतदारसंघातून समाजवादी पार्टीच्या तिकिटावर निवडून गेलेल्या इकरा हसन सर्वात तरुण खासदारांपैकी एक आहेत.

त्यांनी लंडनच्या प्रसिद्ध स्कूल ऑफ ओरिएंटल अँड आफ्रिकन स्टडीजमधून आंतरराष्ट्रीय राजकारण आणि कायद्याची पदवी घेतली आहे.

त्याआधी त्यांनी दिल्लीतील प्रसिद्ध लेडी श्रीराम कॉलेजमधून शिक्षण घेतलं होतं. त्यांनी भाषणं आणि लोकसभेतील सक्रिय भूमिकेद्वारे राजकीय विश्लेषकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

इकरा हसन यांचा व्हीडिओ का झाला आहे व्हायरल? शिवीगाळ केल्याचा आरोप कोणावर केला?

इकरा एका राजकीय कुटुंबातील आहेत. त्यांचे आजोबा चौधरी अख्तर हसन 1984 मध्ये कैराना मतदारसंघातूनच काँग्रेसच्या तिकिटावर निवडून गेले होते. त्यावेळेस त्यांनी पहिल्याच निवडणूक लढवत असलेल्या मायावती यांचा पराभव केला होता.

इकरा यांचे वडील मुनव्वर हसन 1996 मध्ये समाजवादी पार्टीच्या तिकिटावर खासदार झाले होते. त्यानंतर ते बहुजन समाज पार्टीमध्ये गेले होते.

त्यांच्या आई तबस्सूम हसनदेखील कैराना मतदारसंघातून खासदार होत्या. इकरा हसन यांचे भाऊ नाहीद हसन समाजवादी पार्टीचे आमदार आहेत.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)