देशाच्या संसदीय इतिहासात मुस्लीम महिला खासदारांचं प्रमाण फक्त 0.6 टक्केच; आतापर्यंत कोण कोण झाल्या खासदार?

फोटो स्रोत, @IqraMunawwar_
- Author, रेहान फझल
- Role, बीबीसी प्रतिनिधी
युगोस्लाव्हियाचे राष्ट्राध्यक्ष मार्शल टीटो डिसेंबर, 1954 मध्ये भारताच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळेस मध्य प्रदेशातील कोटरी मतदारसंघातील आमदार मैमूना सुलतान यांनी ज्याप्रकारे टीटो यांचं स्वागत केलं, ते पाहून पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी त्याच वेळेस ठरवलं की मैमूना या आमदार नाहीत तर खासदार असल्या पाहिजेत.
1957 मध्ये मैमूना यांना भोपाळ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर त्या फक्त तिथून निवडूनच आल्या नाहीत, तर त्यांना काँग्रेस पक्षाच्या परराष्ट्र विषयक मुद्द्यांच्या समितीचं अध्यक्ष देखील करण्यात आलं.
इतकंच नाही, तर 1958 मध्ये त्यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत भाषणदेखील केलं.
मैमूना या दूरदर्शनवरील प्रसिद्ध वृत्त निवेदिका सलमा सुलतान यांच्या मोठ्या बहीण होत्या. मैमूना या दोन वेळा भोपाळमधून लोकसभेत निवडून गेल्या. त्यानंतर 12 वर्षे त्या राज्यसभेच्या खासदारदेखील होत्या.
अलीकडेच रशीद किडवई आणि अंबर कुमार घोष यांचं 'मिसिंग फ्रॉम द हाऊस, मुस्लीम वीमेन इन द लोकसभा' हे पुस्तक प्रकाशित झालं आहे.
या पुस्तकात त्यांनी मैमूना सुलतान यांच्याव्यतिरिक्त लोकसभेच्या खासदार झालेल्या 17 मुस्लीम महिला खासदारांच्या जीवनाचा आढावा घेतला.
लोकसभेतील मुस्लीम महिलांचं प्रतिनिधित्व
रशीद किडवई आणि अंबर कुमार घोष यांनी लिहिलं आहे, "1951 मध्ये लोकसभेची पहिली निवडणूक झाली होती. तेव्हापासून आतापर्यंत फक्त 18 मुस्लीम महिला लोकसभेत खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत."
"देशाच्या एकूण लोकसंख्येत मुस्लीम महिलांचं प्रमाण जवळपास 7 टक्के आहे. मात्र आतापर्यंत झालेल्या लोकसभेच्या 18 निवडणुकांमध्ये पाच वेळा असंदेखील घडलं आहे की लोकसभेत एकही मुस्लीम खासदार नव्हती."
1951 पासून आतापर्यंत निवडून गेलेल्या एकूण जवळपास साडे सात हजार खासदारांमध्ये मुस्लीम महिलांचं प्रमाण फक्त 0.6 टक्के आहे.
मोफीदा अहमद
लोकसभेतील सुरुवातीच्या मुस्लीम महिला खासदारांपैकी एक होत्या मोफीदा अहमद. त्या 1957 मध्ये आसाममधील जोरहाट मतदारसंघातून लोकसभेच्या खासदार झाल्या होत्या.
1962 मध्ये या मतदारसंघात त्यांचा पराभव झाला होता. प्रजा सोशलिस्ट पार्टीच्या राजेंद्रनाथ बरुआ यांनी मोफीदा यांचा फक्त 907 मतांनी पराभव केला होता.
1962 मध्ये भारत-चीन युद्धाच्या वेळेस मोफीदा अहमद यांनी त्यांचे सर्व दागिने राष्ट्रीय सुरक्षा निधीमध्ये दान केले होते. त्यावेळेस त्या चर्चेत आल्या होत्या.
1962 मध्ये गुजरातच्या बनासकांठा लोकसभा मतदारसंघातून जोहराबेन अकबरभाई चावडा यांनी लोकसभेची निवडणूक जिंकली होती.
जोहराबेन या महात्मा गांधीजींच्या शिष्या होत्या. त्यांनी गुजरात विद्यापीठात काम केलं होतं. हे विद्यापीठ महात्मा गांधींनी स्थापन केलं होतं.
जोहराबेन यांनी 1948 मध्ये त्यांच्या पतीसोबत भिल्ल आदिवासी समुदायाच्या सेवेसाठी सर्वोदय आश्रमाची स्थापना केली होती.
बेगम अकबर जहां
काश्मीरचे नेते शेख अब्दुल्लाह यांची पत्नी बेगम अकबर जहां या दोनवेळा खासदार झाल्या होत्या. पहिल्या वेळेस 1977 मध्ये श्रीनगरमधून तर दुसऱ्यांदा 1984 मध्ये अनंतनाग मतदारसंघातून त्या खासदार झाल्या होत्या.
अजूनही त्यांना काश्मीरमध्ये 'मादर-ए-मेहरबान' म्हणून ओळखलं जातं.
2000 मध्ये त्यांचं निधन झालं. त्यावेळेस त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि गृह मंत्री लालकृष्ण आडवाणी श्रीनगरला गेले होते.
केंद्रीय मंत्रिमंडळानं देखील त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला होता. शेख अब्दुल्लाह यांच्या अटकेच्या वेळेस त्या दोन वर्षे त्यांच्यासोबत कोडाईकॅनालमध्ये राहिल्या होत्या.
माजी मंत्री मोइन-उल-हक चौधरी यांची पत्नी रशीदा हक चौधरी 1977 मध्ये सिलचर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर खासदार झाल्या होत्या.
स्वातंत्र्यानंतरच्या त्या पहिल्या महिला मुस्लीम मंत्री ठरल्या होत्या. 1979 मध्ये चरण सिंह यांनी त्यांच्या मंत्रिमंडळात त्यांना समाज कल्याण राज्यमंत्री केलं होतं.
देवराज अर्स यांनी इंदिरा गांधींच्या विरोधात बंड केलं तेव्हा त्या अर्स काँग्रेसमध्ये गेल्या होत्या. मात्र 1980 मध्ये रशीदा यांनी पुन्हा सिलचर मतदारसंघातून निवडणूक लढवली. यावेळेस इंदिरा काँग्रेसच्या संतोष मोहन देव यांनी त्यांचा पराभव केला.
मोहसिना किडवई आणि आजमगडची पोट निवडणूक
1977 मध्ये इंदिरा गांधी यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. त्यानंतर त्यांच्या सत्तेत पुनरागमनाचं पहिलं चिन्हं दिसलं आजमगडमध्ये.
आजमगडमध्ये पोट निवडणूक झाली, त्यात इंदिरा काँग्रेसच्या उमेदवार होत्या काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष राहिलेल्या मोहसिना किडवई. सत्ता गमावलेल्या इंदिरा गांधी स्वत: त्यांचा प्रचार करण्यासाठी आजमगडला गेल्या होत्या.
मोहसिना किडवई यांनी बीबीसीशी बोलताना इंदिरा गांधींचा एक किस्सा सांगितला होता, त्या काळी आजमगड खूप मागासलेलं ठिकाण होतं. आजदेखील आहे. रेस्टॉरंट नव्हतं, मुक्काम करण्यायोग्य हॉटेलदेखील नव्हतं.
मोहसिना म्हणाल्या, मी इंदिराजींसाठी सरकारी गेस्ट हाऊसमध्ये एक खोली बुक केली होती. मात्र तिथल्या सहाय्यकानं खोली उघडण्यास नकार दिला.

फोटो स्रोत, Getty Images
तो म्हणाला होता, इथे मंत्रीसाहेबांचा मुक्काम आहे. खोली कोणालाही देण्यात येऊ नये असा त्यांचा आदेश आहे. जेव्हा खोली उपलब्ध करून देण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले , तेव्हा मी त्याला विचारलं की, 'तुला माहित आहे का, कोण आलंय ते?'
त्यावर तो म्हणाला, 'नाही.' मग मी त्याला सांगितलं की कारमध्ये इंदिरा गांधी बसलेल्या आहेत. त्यानं हे ऐकताच लगेचच खोलीचा दरवाजा उघडला. मग त्या मंत्र्याला एक शिवी घातली आणि म्हणाला, 'नोकरी गेली तर जाऊदेत...'
यानंतर मोहसिना किडवई, 1980 आणि 1984 मध्ये मेरठमधून निवडून आल्या होत्या.
त्या राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळात नगर विकास मंत्री होत्या. नंतर त्या छत्तीसगडमधून राज्यसभेच्या खासदार म्हणून निवडून गेल्या होत्या.
आबिदा बेगम बरेलीतून झाल्या खासदार
1981 मध्ये बरेलीचे खासदार मिसरयार खाँ यांचा मृत्यू झाला. तेव्हा इंदिरा गांधींनी दिवंगत राष्ट्राध्यक्ष फखरुद्दीन अहमद यांची पत्नी आबिदा बेगम यांना त्या मतदारसंघातून काँग्रेसचं तिकिट दिलं होतं.
आबिदा भाजपाचे संतोष गंगवार यांचा पराभव करत लोकसभेच्या खासदार झाल्या. 1984 च्या निवडणुकीत देखील आबिदा यांचा विजय झाला. मात्र 1989 मध्ये निवडणुकीत पराभव झाल्यानंतर आबिदा यांची राजकीय कारकीर्ददेखील संपुष्टात आली.
1990 च्या दशकात, नूर बानो या आणखी एका महिला खासदार लोकसभेत गेल्या.
रशीद किडवई आणि अंबर कुमार घोष लिहितात, नेहमी पांढरी शिफॉन साडी, पूर्ण बाह्यांचा ब्लाउज आणि पांढऱ्या मोत्यांचा हार घालणाऱ्या नूर बानो एका राजकीय कुटुंबातील होत्या.

फोटो स्रोत, Getty Images
त्यांचे पती नवाब सैयद झुल्फिकार अली खाँ उर्फ मिकी मियाँ 1967 ते 1989 पर्यंत रामपूरमधून निवडून येत होते. दरम्यान 1977 च्या निवडणुकीत मात्र त्यांचा पराभव झाला होता.
इंदिरा गांधी यांच्या प्रिव्ही पर्स कायदा हटवण्याच्या निर्णयाचं स्वागत करणाऱ्या मोजक्याच माजी नवाबांमध्ये मिकी मियाँ यांचा समावेश होता. या कायद्यामुळे संस्थानिकांना मिळणारं मानदान मिळत असे.
देशाचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना आझाद यांनी 1952 मध्ये रामपूर मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यानंतर हा मतदारसंघ चर्चेत आला होता.
मिकी मियाँ यांच्या मृत्यूनंतर 1996 च्या निवडणुकीत नूर बानो पहिल्यांदा रामपूरमधून काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभेच्या खासदार झाल्या होत्या.
मात्र 2004 मध्ये अभिनेत्री जयाप्रदा यांच्याकडून पराभव झाल्यानंतर त्यांची राजकीय कारकीर्द उतरणीला लागली होती.
काश्मीरमधून लोकसभेतील दुसऱ्या मुस्लीम महिला खासदार
2004 च्या निवडणुकीत रुबाब सईदा या उत्तर प्रदेशातून निवडून येणाऱ्या एकमेव महिला मुस्लीम खासदार होत्या.
त्या समाजवादी पार्टीच्या तिकिटावर बहराइच मतदारसंघातून निवडून आल्या होत्या.
मात्र 2009 च्या निवडणुकीत समाजवादी पार्टीनं त्यांना जुन्या मतदारसंघातून तिकिट न देता, श्रावस्तीमधून उभं केलं होतं. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता.
जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती देखील लोकसभेच्या खासदार राहिल्या आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
2014 मध्ये त्या अनंतनाग मतदारसंघातून लोकसभेच्या खासदार झाल्या होत्या. शिक्षण पूर्ण करून त्या थेट राजकारणात आल्या नाहीत.
रशीद किडवई आणि अंबर कुमार घोष लिहितात, "महबूबा यांनी काही काळ बॉम्बे मर्कंटाईल बँक आणि ईस्ट वेस्ट एअरलाईन्समध्ये काम केलं. 1984 मध्ये जावेद इकबाल शाह यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यांना इरतिका आणि इल्तिजा या दोन मुली झाल्या."
"मात्र त्यांचा संसार फार दिवस टिकला नाही. इंदिरा गांधींप्रमाणेच त्यांनी त्यांच्या दोन मुलींचं संगोपन करण्याबरोबरच त्यांचे वडील मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या राजकीय करियरमध्ये सहभाग घेतला. ऑक्टोबर, 2023 मध्ये त्यांना चौथ्यांदा पीडीपीचं अध्यक्ष म्हणून निवडण्यात आलं."
तबस्सुम हसन आणि मौसम बेनझीर नूर यांचा राजकीय वारसा
मे, 2018 मध्ये उत्तर प्रदेशातील कैरानामध्ये झालेल्या पोट-निवडणुकीत राष्ट्रीय लोक दलाच्या तबस्सुम हसन यांचा विजय झाला.
त्यांना समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टी आणि काँग्रेसचा पाठिंबा होता. याआधी त्या 2009 मध्ये बीएसपीच्या तिकिटावर याच मतदारसंघातून निवडणूक जिंकल्या होत्या
2019 मध्ये मोदी लाटेत त्यांचा भाजपाच्या उमेदवाराकडून पराभव झाला.
पश्चिम बंगालमधील मालदाच्या प्रसिद्ध राजकीय कुटुंबातील मौसम बेनझीर नूर दोन वेळा काँग्रेसच्या तिकिटावर उत्तर मालदा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेल्या होत्या.
2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या आधीच नूर तृणमूल काँग्रेसमध्ये गेल्या होत्या. त्या त्यांचे चुलत भाऊ इशा खाँ चौधरी यांच्याविरुद्ध निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या.
मत विभागणी झाल्यामुळे त्या दोघांचाही पराभव झाला आणि भाजपाचे खगेन मुर्मू लोकसभेचे खासदार झाले होते.

फोटो स्रोत, SAMIRATMAJ MISHRA
2009 च्या निवडणुकीत बीएसपीच्या प्रमुख आणि उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांना सीतापूर मतदारसंघासाठी एका चांगल्या उमेदवाराचा शोध होता.
त्यांनी त्यांचे एक आमदार मोहम्मद जसमीर अंसारी यांना लखनौला बोलावलं. जसमीर त्यांची पत्नी कैसर जहाँ यांच्याबरोबर मायावतींना भेटायला गेले.
रशीद किडवई आणि अंबर कुमार घोष लिहितात, "जसमीर यांना वाटत होतं की त्यांना मंत्रीपद दिलं जाईल. मात्र मायावती यांना त्यांना सीतापूर मतदारसंघातून निवडणूक लढवायला सांगितलं."
"ते ऐकून जसमीर थोडेसे संकोचले. त्यांनी त्यांच्या पत्नीकडे पाहिलं. त्यांची अडचण मायावतींच्या लक्षात आली. मग त्यांनी जसमीर यांच्या पत्नी कैसर यांनाच थेट प्रश्न विचारलं, 'तू लढशील का?'"
त्यावर पती-पत्नींनी एका सूरात उत्तर दिलं, 'हो.' कैसर जहाँ यांनी निवडणुकीत 35 दिवस प्रचार केला. माजी केंद्रीय मंत्री रामलाल राही आणि समाजवादी पार्टीचे महेंद्र सिंह वर्मा यांचा पराभव करत त्या लोकसभेच्या खासदार झाल्या.
कैसर यांनी 2014 ची निवडणूकदेखील लढवली. त्यांच्या मतांमध्ये वाढदेखील झाली. मात्र तरीदेखील निवडणुकीत भाजपाचे राजेश वर्मा यांचा विजय झाला.
क्रिकेटपटू आणि खासदारदेखील
2014 मध्ये तृणमूल काँग्रेसनं कलकत्ता हायकोर्टाचे मुख्य न्यायमुर्ती राहिलेल्या नूर आलम चौधरी यांच्या पत्नी मुमताज संघामित यांना तिकिट दिलं. बर्दवान-दुर्गापूर मतदारसंघातून त्या लोकसभेत निवडून गेल्या.
2018 मध्ये उलूबेरियामधील तृणमूल काँग्रेसचे खासदार सुलतान अहमद यांचा मृत्यू झाला. त्यानंतर झालेल्या पोट-निवडणुकीत त्यांच्या पक्षानं त्यांच्या पत्नी साजदा अहमद यांना उमेदवारी दिली.
त्यानंतरच्या 2019 आणि 2024 या दोन निवडणुकांमध्ये साजदा त्या मतदारसंघातून निवडून आल्या.
खेळांमध्ये नाव कमावून नंतर राजकारणात आलेल्या महिलांची संख्या भारतीय राजकारणात खूपच कमी आहे.

फोटो स्रोत, LSTV
रानी नारा या त्यातीलच एक आहेत. 2012 मध्ये मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात त्यांचा आदिवासी कार्य राज्य मंत्री म्हणून समावेश झाला होता.
रानी एक प्रसिद्ध अष्टपैलू क्रिकेटपटू होत्या. त्यांनी आसामच्या क्रिकेट संघाचं नेतृत्व केलं होतं.
रानी आसाममधील लखीमपूर मतदारसंघातून लोकसभेच्या खासदार झाल्या. नंतर त्या राज्यसभेच्या खासदारदेखील होत्या.
लंडनमध्ये शिकलेल्या इकरा हसन
तृणमूल काँग्रेसनं बंगाली चित्रपटातील सुपरस्टार नुसरत जहाँ रूही यांनादेखील तिकिट दिलं होतं. 2019 मध्ये त्या बशीरहाट लोकसभा मतदारसंघातून साडे तीन लाख मतांनी निवडून गेल्या होत्या.
लोकसभेतील त्यांच्या गैरहजेरीवर देखील खूप टीका झाली. त्यांची उपस्थिती फक्त 22 टक्के होती आणि त्यांनी फक्त 11 चर्चांमध्ये भाग घेतला.
18 व्या लोकसभेत कैरानामधून समाजवादी पार्टीच्या तिकिटावर निवडून गेलेल्या इकरा हसन या सर्वात तरुण खासदारांपैकी एक आहेत.
त्यांनी लंडनच्या प्रसिद्ध स्कूल ऑफ ओरिएंटल अँड आफ्रिकन स्टडीजमधून आंतरराष्ट्रीय राजकारण आणि कायद्याची पदवी घेतली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
त्याआधी त्यांनी दिल्लीतील प्रसिद्ध लेडी श्रीराम कॉलेममधून शिक्षण घेतलेलं आहे. त्यांची भाषणं आणि लोकसभेतील सक्रिय भूमिकेमुळे त्यांनी राजकीय विश्लेषकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
इकरा एका राजकीय कुटुंबातील आहेत. त्यांचे आजोबा चौधरी अख्तर हसन 1984 मध्ये कैराना मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडून गेले होते. त्यावेळेस पहिल्यांदाच निवडणूक लढवत असलेल्या मायावती यांचा पराभव केला होता.
इकरा हसन यांचे वडील मुनव्वर हसन 1996 मध्ये समाजवादी पार्टीच्या तिकिटावर लोकसभेत निवडून गेले होते. नंतर ते बहुजन समाज पार्टीत गेले होते.
त्यांची आई तबस्सुम हसन यादेखील कैराना मतदारसंघातून खासदार झाल्या होत्या. त्यांचे भाऊ नाहीद हसन समाजवादी पार्टीचे आमदार आहेत.
बहुतांश महिला खासदार राजकीय कुटुंबांमधील
या 18 महिला मुस्लीम खासदारांपैकी 13 खासदार राजकीय कुटुंबांमधील आहेत. म्हणजेच त्यांची राजकारणाची पार्श्वभूमी आहे. यातील बहुतांश महिला पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश आणि आसाममधील आहेत. देशाच्या इतर राज्यांमधून मुस्लीम महिलांचं प्रतिनिधित्व नगण्यच आहे.
भारतात किमान 101 मतदारसंघांमध्ये मुस्लीम मतदारांची संख्या 20 टक्क्यांहून अधिक असताना ही परिस्थिती आहे.
75 वर्षांमध्ये लोकसभेत फक्त 18 मुस्लीम महिला खासदार झाल्या. ही बाब महिला सबलीकरण आणि राजकारणातील महिलांच्या सहभागावर मोठे प्रश्न उपस्थित करते.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











