श्रीलंका : ‘भुकेली मुलं शाळेत सकाळच्या प्रार्थनेवेळीच बेशुद्ध पडतात’

    • Author, इशारा डानासेकरा आणि टॉम डाँकिन
    • Role, बीबीसी वर्ल्ड सर्विस

दहा वर्षांच्या मल्कीला शाळेत जाण्यासाठी जाग तर आलीय, पण तिला अजूनही अंथरूणातच पडून राहायची इच्छा आहे.

ती तिच्या दोन भाऊ आणि दोन बहिणींच्या आधीच उठली आहे. कराण तिला तिच्या नखांचं लाल रंगाचं नेलपॉलिश काढायचं आहे.

मल्कीचा शाळेचा पहिला दिवस आहे आणि कुणाचंही लक्ष तिच्यावर जाऊ नये अशी तिची इच्छा आहे. तिची इतर चार भावंड मात्र आज शाळेत जाऊ शकणार नाहीयेत. करण तिच्या कुटुंबाला फक्त एकाच मुलाला शाळेत पाठवणं परवडतंय.

सहा महिन्यांपूर्वी श्रीलंकेत आतापर्यंतच्या सर्वांत मोठ्या आर्थिक संकटामुळे गोंधळाची स्थिती होती. आता काही दिवसांनंतर परिस्थिती शांत झाल्याच दिसून येतंय खरं, पण अनेक कुटुंबांना सध्या प्रचंड महागाई आणि बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे.

मल्कीचं कुटुंब अशाच कुटुंबांपैकी एक आहे. मल्कीची आई प्रियांतिका यांना त्यांच्या इतर चार मुलांचं शिक्षण मध्येच थांबवावं लागलं आहे. जेणेकरून ते फटाक्यांची विक्री करून काही पैसे कमावू शकतील.

सध्या श्रीलंकेत प्रत्येक वस्तूची किंमत गगनाला भिडली आहे. अन्नधान्याच्या किंमती तर भयंकर वाढल्या आहेत. महागाईचा दर तब्बल 95 टक्क्यांवर गेला आहे.

मल्कीच्या कुटुंबियांना तर अनेकदा उपाशीच झोपावं लागलतंय.

श्रीलंकेत शालेय शिक्षण मोफत आहे. पण तिथं मध्यान्न भोजन मात्र दिलं जात नाही. तरीही प्रियांतिका यांना मुलांना शाळेत पाठवणं परवडत नाही. कारण त्यांच्याकडे शालेय बस आणि गणवेशासाठी पैसेच नाहीत. प्रियांतिका सांगतात, एका मुलाला शाळेत पाठवण्याचा दररोजचा खर्च 400 रुपये आहे.

एका खोलीच्या आपल्या घरात मुलांसोबत बसलेल्या प्रियांतिका यांना हे सांगताना रडू येतं. त्या सांगतात, “आमची सर्व मुलं शाळेत जात होती. पण आज माझ्याकडे एवढे पैसे नाहीत की मी सर्वांना शाळेत पाठवू शकेन.”

मल्कीची शाळा अजूनही सुरू आहे करण तिचा जुना गणवेश आणि बुट अजून तिला येतात. ते अजून तिच्यासाठी छोटे पडलेले नाहीत.

पण तिची छोटी बहीण दुलांजली मात्र शेजारी बसून रडतेय करण तिला आज शाळेत जाता येणार नाहीये. प्रियांतिका तिची समजूत काढत म्हणतात, “रडू नकोस माझ्या बाळा मी उद्या तुला शाळेत पाठवेन.”

कोलमडलेली शिक्षण व्यवस्था

खाचखळग्याच्या रस्त्यांमधून वाट काढत पायी चालले विद्यार्थी, एखाद्या रिक्षात कोंबून प्रवास करणारे विद्यार्थी, तर कधी आईवडिलांबरोबर बाईकवर बसलेल विद्यार्थी... श्रीलंकेत सकाळ झाली की शाळेत जाणाऱ्या मुलांचं हे चित्र दररोज दिसतं.

प्राक्रम वीरसिंघे हे चित्र पाहून आता थकलेत. ते कोलंबोच्या कोटाहिना सेंट्रल सेकंडरी कॉलेजमध्ये प्रिंसिपल आहेत. आर्थिक संकटात भरडल्या जाणाऱ्या लोकांना ते रोजच जवळून पाहत आहेत.

वीरसिंघे सांगतात, “काही उपाशी मुलं अनेकदा शाळेच्या सकाळच्या प्रार्थनेवेळीच बेशुद्ध पडतात.” सरकारला याची पूर्ण कल्पना आहे. त्यांनी आता शाळांमध्ये तांदूळ पुरवायला सुरुवात केलीय. पण बीबीसीनं ज्या शाळांना संपर्क केला त्याचं म्हणणं आहे की त्यांच्यापर्यंत तांदूळ आलेला नाही.

वीरसिंघे सांगतात, शाळेत आता मुलांची उपस्थिती 40 टक्क्यांपेक्षाही कमी झाली आहे. मुलांनी शाळेत यावं म्हणून आता आम्ही शिक्षकांना येतांना त्यांच्याबरोबर जास्तीचा डबा आणायला सांगत आहोत.

जोसेफ स्टालिन श्रीलंकेतल्या टिचर्स युनियनचे सरचिटणीस आहेत.

भूक आणि महागाईमुळे अनेक कुटुंबांनी त्यांच्या मुलांना शाळेत पाठवणं बंद केल्याचं सरकारपासून लपून राहिलेलं नसल्याचं ते मान्य करतात.

जोसेफ सांगतात, “आर्थिक संकटाचा सर्वांत गंभीर परिणाम लहान मुलांवर झाला आहे. शाळेत येणाऱ्या मुलांचे रिकामे डबे पाहून ते प्राकर्षानं जाणवतं. आमचे शिक्षक हे दररोज अनुभवत आहेत. युनिसेफ आणि इतर संस्थांच्यासुद्धा हे लक्षात आलं आहे. सरकारलासुद्धा यावर तोडगा काढायचा आहे.”

युनिसेफने आधीच या विषयावर चिंता व्यक्त केली आहे. त्यांचं म्हणणं आहे की येत्या काळात अन्नधान्याच्या वाढत्या किंमतीमुळे कुटुंबांचं जगणं कठीण होणार आहे.

भूक आणि गरिबीमुळे श्रीलंकेतली हजारो मुलं शाळेत येणं बंद करण्याची भीतीसुद्धा व्यक्त केली जात आहे.

शेवटची आशा काय आहे?

शेवटचा आशेचा एक किरण आहे तो म्हणजे खासगी मदत. लहान मुलांची ही स्थिती सुधारण्यात जिथं सरकारला अपयश येतंय तिथं काही खासगी संस्था आणि लोक पुढे येत आहेत. सामंत सरना हे त्या पैकीच एक आहेत.

सामंत सरना एक ख्रिश्चन चॅरिटी चालवतात. गेल्या तीन दशकांपासून ते राजधानी कोलंबोमध्ये गरिबांची मदत करत आहेत.

आज त्यांच्या फूड हॉलमध्ये राजधानी कोलंबोच्या वेगवेगळ्या कोपऱ्यातून आलेल्या मुलांची जेवणासाठी गर्दी झालीय. पण त्यांच्यासुद्धा काही मर्यादा आहेत.

ते एका दिवसाला फक्त 200 मुलांनाच जेवायला घालू शकतात. त्यामुळे जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचणं त्यांनासुद्धा शक्य नाही.

मनोज तिथं जेवायला आलेल्या मुलांपैकीच एक आहे. तो पाच वर्षांचा आहे. त्याच्या मित्रांबरोबर तो जोवण्यसाठी रांगेत उभा आहे. तो सांगतो, “हे लोक आम्हाला जेवायला देतात, शाळेत जाण्यासाठी बसची व्यवस्था करतात. आम्हाला शाळेत जाता यावं म्हणून ते सर्व काही करतात.”

शाळेचा पहिला दिवस पूर्ण होऊन मल्की घरी परत आल्यानंतर आनंदात आहे. मित्रमैत्रिणींना भेटून झालेल्या आनंदाबाबत ती तिच्या आईला सांगत आहे.

त्याचवेळी ती आईला सांगतो, टिचरांनी नव्या वर्कबूकसह काही पैसे मागितले आहे. ज्यातून प्रोजेक्ट आणि अभ्यासासाठीच्या इतर काही गोष्टींची खरेदी करायची आहे.

पण हे पैसेच तर तिच्या कुटुंबाकडे नाहीत.

प्रियांतिका सांगतात, “दिवसाचं एकवेळचं जेवणच आम्हाला कसंबसं मिळतंय. दुसऱ्या दिवशी काय करायचं हा यक्ष प्रश्न आमच्या समोर असतो. आमच्यासाठी आता हे रोजचं झालेलं आहे.”

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)