You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दरांविरोधात जगभरात आंदोलनाचा वणवा
वाढत्या महागाई मुळे जगभरातल्या लोकांना फटका बसला आहे. अनेक देशात खाद्यपदार्थ, इंधन, आणि अत्यावश्यक गोष्टींच्या किमती वाढल्या आहे आणि त्याचा विरोध करण्यासाठी लोक रस्त्यावर उतरले आहेत.
इंधनाचे दर वाढले की दैनंदिन आयुष्यात मोठ्या प्रणाणात फरक पडतो. माल वाहून नेण्यापासून ते खासगी वाहतुकीपर्यंत इंधन दरवाढीचा परिणाम होतो. इंधन दरवाढीमुळे खाद्यपदार्थ, विजेचे बिल, आणि घर थंड ठेवणाऱ्या गोष्टींची किंमत वाढते.
जगभरात आंदोलक बदलाची मागणी करत आहेत. पेट्रोलच्या किमती कमी करण्याची लोक मागणी करत आहेत. अनेक देशात शांततापूर्ण आंदोलनं होत आहेत. त्यामुळे लोकांना बराच त्रास सहन करावा लागला आहे.
16 वर्षींय खादिजा बाह तिच्या घराच्या दरवाज्यावर उभ्या होत्या मात्र अचानक त्यांना एक गोळी लागली.
खदिजा तिच्या घरापासलून काही मीटर अंतरावर बरेच दिवसांपासून एक उग्र जमावाचं निरीक्षण करत होती. ते लोक इंधनवाढीचा विरोध करत होते.
गेल्या दहा ऑगस्टला सिएरा लियोन नावाच्या छोट्या आफ्रिकन देशात सुरू असलेली निदर्शनं अचानक हिंसक झाली. पोलीस आणि निदर्शकांमध्ये झालेल्या झटापटीत तिला एक गोळी लागली. ती खाली पडली आणि तिने प्राण सोडला.
खदिजाची आई मरिया सेसे म्हणतात की त्यांना अजूनही त्यांची मुलगी गेली यावर विश्वास बसत नाही. खदिजा मोठी होऊन नर्स होणार होती.
मरिया सांगतात, "मी खूप दु:खी आहे. मी खूप विपरित परिस्थितीत तिला मोठं केलं होतं. आता मी तिला गमावलं. माझ्यासाठी ही अतिशय विदारक परिस्थिती आहे."
इंधनासाठी युद्ध
सिएरा लिओनमध्ये अशी निदर्शनं आणि हिंसाचार नवीन नाही.
या वर्षी ऑगस्टमध्ये तिथे 25 लोकांचा मृत्यू झाला त्यात पाच पोलीस अधिकारी आहेत. या सगळ्यांचा मृत्यू देशाची राजधानी फ्रीटाऊन आणि पोलिसांच्या संघर्षादरम्यान झाला आहे.
पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतीचा परिणाम फक्त वाहतुकीवरच नाही तर मालवाहतुकीवर सुद्धा होतो आणि खाद्यपदार्थाच्या किमतीही वाढतात.
मार्च ते आता पर्यंत सिएरा लिओनमध्ये इंधनाचे गर दुप्पट झाले आहेत. त्यामुळे खाद्यपदार्थांच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे.
महागाईच्या कळा सोसणाऱ्या या देशात जुलै मध्ये केंद्रीय बँकेने नव्या नोटा छापून लोकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला होता.
हिंसाचार थांबवण्यासाठी सरकारला संपूर्ण शहरात कर्फ्यू लावावा लागला. इंटरनेट सेवा सीमित करण्यात आली.
सिएरा लियोन चे राष्ट्रपती ज्युलियस माडा बॉयो यांनी सांगितलं की खरंतर त्यांना सत्ता त्यांना हटवण्यासाठी ही निदर्शनं करण्यात आली होती. मात्र निदर्शकांनी सांगितलं होतं की असं अजिबात नाही आणि महागाईविरोधात ते रस्त्यावर उतरले होते.
मात्र महागाईचा फटका सिएरा लियोनच नाही तर जगाच्या इतर भागातही संघर्ष सुरू आहे.
पेट्रोलचं जागतिक संकट
जगभरात होणाऱ्या निदर्शनाची माहिती Data Armed Conflict and Event Data या संस्थेतर्फे एकत्रित करण्यात येते. त्या माहितीचं विश्लेषण बीबीसीने केलं. त्यात असं लक्षात आलं जानेवारी ते सप्टेंबर या दरम्यान 90 पेक्षा अधिक देशात खाद्यपदार्थ आणि इंधनाच्या किमतीवर निदर्शनं झाली आहेत.
त्यापैकी एक तृतीयांश देशात 2021 मध्ये इंधनांच्या मुद्दयावर कोणतेही निदर्शनं झाली नाहीत. उदाहरणादाखल स्पेन मध्ये 2021 या वर्षांत कोणतीही निदर्शनं झाली नाहीत. मात्र या वर्षी तिथे 335 निदर्शनं झाली आहेत.
गेल्या नऊ महिन्यात जगाच्या प्रत्येक भागात काही ना काही आंदोलनं झाली आहेत.
इंडोनेशियामध्ये दरवाढीविरोधात आतापर्यंत 400 निदर्शनं झाली आहेत. इटलीमध्येही 200 निदर्शनं झाली आहेत. त्याच्या तुलनेत गेल्या दोन वर्षांत दोनच निदर्शनं झाली आहेत. इक्वाडोर मध्ये या वर्षांत फक्त जून महिन्यातच हजाराहून जास्त निदर्शनं झाली आहेत.
हेनरी विलकिन्सन ड्रॅगनफ्लाय नावाच्या कंपनीत चीफ इंटेलिजिन्स ऑफिसर आहे. ही कंपनी सुरक्षा आणि गुप्तचर विभागाच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांच्या मते ज्या ठिकाणी निदर्शनं होत आहेत ते जास्त आश्चर्यकारक आहेत.
विलकिन्सन यांनी बीबीसी ला सांगितलं, "आम्ही पहिल्यांदा अशा ठिकाणी निदर्शनं होत आहे जिथे असं कधीच झालं नव्हतं. युक्रेनच्या युद्धाचे मोठे दुष्परिणाम झाले आहेत. जर ते संपलं तर हे संकट बरंच कमी होईल."
युक्रेनमुळेच पेट्रोलच्या किमती वाढल्या आहेत का?
नाही. जगात पेट्रोलच्या किमती वाढण्याचे तीन कारणं आहेत.
कच्चं तेल- कोव्हिडच्या काळात कच्चं तेल स्वस्त होतं. कारण अनेक व्यापार बंद झाले होते आणि उर्जेची मागणी बरीच मागणी कमी झाली होती. जनजीवन सुरळीत झाल्यावर पुन्हा इंधनाचे भाव वाढले.
अमेरिकन डॉलर- सध्या अमेरिकन डॉलर सगळ्या चलनांपेक्षा बळकट झाला आहे. कच्च्या तेलाचे सगळे व्यवहर अमेरिकन डॉलर मध्ये होतात. स्थानिक चलन डॉलरच्या तुलनेत घसरलं तर इंधनाचे दर स्वाभाविकपणे वाढतील.
युक्रेन- रशिया युद्ध- या युद्धामुळे तेलाच्या आयातीवर निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यामुळे अन्य उत्पादक देशात दरवाढ झाली आहे.
आर्थिक ते राजकीय अस्थिरतेपर्यंत
ज्या 91 देशांत अस्थिरता पसरली त्यात सगळ्यात चर्चेत राहिलं ते श्रीलंका. हजारोंच्या संख्येत निदर्शकांनी राष्ट्रपती निवासात प्रवेश केला. बराच विरोध झाल्यानंतर राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी पदाचा त्याग केला.
संपूर्ण आशिया खंडात सगळ्यात जास्त चलनवाढीमुळे श्रीलंकेत अन्न धान्याच्या आणि खाद्यपदार्थांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत.
कोलंबोच्या एका उपनगरात विमला दिसानायके भाजीचं दुकान चालवतात. त्या सांगतात की आता त्यांना घर चालवणं कठीण झालं आहे.
त्या म्हणतात, "प्रत्येक वस्तूच्या किंमती वाढल्या आहेत. मात्र उत्पन्न वाढलं नाही."
"मला तीन मुलं आहेत. महागाई इतकी वाढली आहे की माझ्या मुलांच्या शाळेला जायलासुद्धा शंभर रुपये लागतात. दिवसाचा खर्च 600 रुपये आहे.
विमला म्हणतात की त्यांच्या छोट्या गाडीत पेट्रोल टाकायलाही पैसे नाहीत.ते आता भाजी सुद्धा सार्वजनिक वाहतुकीने आणतात.
"भाववाढ इतकी झाली आहे की ग्राहकांना काहीही खर्च करावासा वाटत न नाही. जे लोक आधी भाजी घ्यायचे त्या 100 ग्रॅम किंवा 200 ग्रॅम घेतात. जे लोक गाडीने फिरायचे ते आता पायी चालतात."
जगभरातील सरकारं आर्थिक संकट यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यातच हे निदर्शनं होत आहे. अनेकांना त्यांचा जीव गमवावा लागत आहे.
बीबीसी ने केलेल्या संशोधनानुसार फक्त नऊ महिन्यात 80 पेक्षा अधिक या निदर्शनात त्यांचा जीव गमवावा लागत आहे. मरणाऱ्या लोकांमध्ये अर्जेंटिना, इक्वाडोर, गिनी, हेती, कझाकस्तान, पनामा, पेरू, दक्षिण अफ्रिका, आणि सिएरा लियोन या देशातल्या लोकांचा समावेश आहे.
तिथे सिएरा लियोनच्या फ्रीटाऊन मधल्या गल्ल्या शांत आहेत. बहुतांश दुकानं उघडली आहेत. परिस्थिती सामान्य झाली आहे.
खदिजा ची आई आणि वडिलांचं आयुष्य आधीसारखं राहणार नाही. त्या सांगतात, "माझी मुलगी अतिशय प्रतिभावान होती. आता ती नाही."
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)