'जन्मानंतर ती वाचेल का अशी शंका होती, अनेकांनी तिला दयामरण देण्याचा सल्ला दिला, पण...'

भार्गवी लड्डूसोबत
फोटो कॅप्शन, भार्गवी लड्डूसोबत
    • Author, हेमा राकेश
    • Role, बीबीसी तमीळसाठी

“मी दोन वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. लोक मला सतत सांगायचे की, मी माझ्या मुलीला दयामरण द्यावं. रडून रडूनच माझं आयुष्य संपेल अशी भीती मला वाटायची. घटस्फोटाचं दुःख आणि माझ्या मुलीबद्दलची इतर लोकांची मतं यामुळं मला नैराश्यच आलं होतं. एकाच गोष्टीचा मला आधार होता-माझी श्रद्धा.”

“माझ्या आयुष्यात केवळ ही श्रद्धाच होती. तिच्यामुळेच मला थोडीफार ऊर्जा मिळत होती, जगण्याचं बळ मिळत होतं. आजही ती आशा, श्रद्धा हाच माझा आधार आहे.”

भार्गवी जेव्हा हे सांगत असतात, तेव्हा त्यांच्या डोळ्यांमध्ये आत्मविश्वास असतो.

भार्गवी या मूळ चेन्नईच्या आहेत. त्यांचा ऑनलाईन ज्वेलरी विक्रीचा व्यवसाय आहे. भार्गवी यांना 14 वर्षांची एक मुलगी आहे. तिचं नाव लामिया, पण प्रेमाने तिला ‘लड्डू’ म्हणतात. लड्डू ‘स्पेशल चाइल्ड’ आहे.

जन्मतःच तिने ऐकण्याची आणि बोलण्याची क्षमता गमावली होती. गर्भावस्थेतील काही गुंतागुंतीमुळे तिचं डोकंही खूप मोठं आहे.

मुलीमध्ये जन्मतःच अनेक शारीरिक समस्या असल्यामुळे तिला दयामरण द्यावं असं भार्गवी यांना सर्वांनी सांगितलं, पण त्यांनी या गोष्टीला साफ नकार दिला.

देवानेच मला या मुलीची काळजी घेण्याची जबाबदारी दिली असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. मुलीची काळजी घेणं हे आपलं कर्तव्य आहे आणि मुलीसोबतच्या या छोट्याशा जगात आपण खूश आहोत, असं भार्गवी म्हणतात.

“मी कलिनरी (culinary) प्रोफेशनल म्हणून काम करत होते. 2007 मध्ये माझं लग्न झालं. त्यावेळी मी 28 वर्षांची होते. 2009 साली लड्डूचा जन्म झाला. गरोदरपणात मी 5 व्या महिन्यात सोनोग्राफी केलीच नव्हती. तसं कोणी सांगितलंही नाही. त्यामुळे गर्भावस्थेत तिच्या डोक्यात पाणी झाल्याचं कळलंच नाही. तिचं डोकं खूप मोठं होतं. त्यामुळे सी-सेक्शन करावं लागलं.

जन्मल्यानंतरच कळलं की, तिच्यात काय दोष निर्माण झाले आहेत. जन्माला आल्यानंतर 15 मिनिटं ती रडलीच नव्हती. कोणताही आवाज केला नाही. डॉक्टरांनी तिला तपासलं आणि तिच्यात इतरही शारीरिक समस्या असल्याचं सांगितलं.”

नवरा माझ्यापासून विभक्त झाला

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

“हे बाळ फार जगू शकणार नाही, असं डॉक्टरांनी सांगितलं. त्यांच्या त्या शब्दांमुळे मला प्रसूती वेदनांपेक्षाही अधिक वेदना झाल्या,” हे सांगताना भार्गवी यांचे डोळे भरून आले होते.

आयुष्यात एखादी समस्या निर्माण झाली, तर आपला नवरा आणि त्याचे घरचे आपल्यासोबत असतील अशी अपेक्षा असते. पण जेव्हा भार्गवीने शारीरिक समस्या असलेल्या बाळाला, त्यातूनही मुलीला जन्म दिला आहे, हे कळल्यानंतर घरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली.

भार्गवीचे नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींनी तिला या मुलीला दयामरण देण्याचा सल्ला दिला. पण भार्गवी त्याला कधीच तयार नव्हती. शेवटी अनेक कटू अनुभवांनंतर तिचा घटस्फोट झाला.

“लामियाच्या जन्मानंतर माझा घटस्फोट झाला. जगात मला प्रचंड अडचणींसोबत जगावं लागणार आहे, यावर मी सतत विचार करत राहायचो. अगदी कॉलेजच्या दिवसांपासून मला साधंसरळ आनंदी आयुष्य जगायचं होतं. पण तसं काही घडलं नाही आणि मला आयुष्यात केवळ अडचणींनाच तोंड द्यावं लागलं. आपण कशासाठी जगायचं असा विचार करून मी दोनवेळा आत्महत्येचाही प्रयत्न केला. पण बचावले.

आता जेव्हा मी या गोष्टींचा विचार करते, तेव्हा हसू येतं. आपण असं करायला नको होतं, असं वाटतं. पण आता मला स्पष्टता आलीये. मी माझ्या मुलीला आधार देऊ शकते,” भार्गवी प्रचंड आत्मविश्वासाने सांगते.

लामियाचं वय जरी 14 वर्षांचं असलं तरी ती मानसिकदृष्ट्या ती दीड वर्षाच्या बाळासारखीच आहे.

आपल्या मुलीची काळजी घेण्यासाठी तिने पूर्ण वेळ नोकरीही स्वीकारली नाही. सध्या ऑनलाइन ज्वेलरी विक्रीचा व्यवसाय करते.

लड्डूला सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कोणाची तरी मदत लागते. ती दिवसातले तीन तास विशेष शाळेतल्या वर्गांना जाते. त्याबरोबरच फिजिओथेरपी आणि इतर थेरपीचेही सेशन असतात.

“लड्डूचं शारीरिक वय 14 वर्षांचं आहे, पण तिची मानसिक वाढ दीड वर्षाच्या बाळाएवढीच आहे. गेल्यावर्षी तिची पाळी सुरू झाली. मी तिला वेळेवर खाऊ-पिऊ घालणं, आंघोळ घालणं, गोष्टी सांगणं या सगळ्या गोष्टींची काळजी घेते.”

भार्गवी लड्डूसोबत

“तीन दिवसांतून एकदा ती खूप जास्त झोपते. कधीकधी ती दोन तासांपेक्षाही कमी झोपते. अशावेळी मी पण तिच्यासोबत जागी राहते,” भार्गवी सांगतात.

या सगळ्या प्रवासात आपल्या पालकांची जी मदत झाली त्याबद्दल बोलताना म्हटलं की, पहिल्या दिवसापासून आतापर्यंत ते माझ्या पाठीशी उभे आहेत. जेव्हा कधी मला खूप हरल्यासारखं, निराश वाटतं, तेव्हा ते मला बळ देतात.

भार्गवी यांनी त्यांची मैत्रीण संगीता सुंदरमचाही उल्लेख केला. समस्यांवर मात करत आयुष्य नव्याने जगायला सुरूवात करताना संगीताची मदत झाल्याचं त्या सांगतात.

“माझे आई-वडील आणि संगीता नसती, तर मी एवढ्या विश्वासाने इथपर्यंत पोहोचलेच नसते," भार्गवी सांगते.

आयुष्यातल्या समस्यांवर मात

भार्गवी लड्डूसोबत

भार्गवी आपल्या मुलीची अगदी डोळ्यांत तेल घालून काळजी घेतात. कारण? लड्डूला कधीकधी दिवसातून चार वेळा आकडी येते. अशावेळी ती भिंतीजवळ जाऊन डोकं आपटते किंवा स्वतःचेच केस ओढते.

वेदना जर असह्य असेल तर जमिनीवर गडाबडा लोळत, केस ओढते. यामुळे बऱ्याचदा भार्गवीला दिवसातून चार तासांपेक्षाही कमी झोप मिळते. या समस्येवर पूर्ण इलाज नसल्यामुळे काळजी घेण्याशिवाय पर्याय नसतो.

“गेल्या काही वर्षांत मी अक्षरशः आयुष्यभराचं रडून घेतलंय...पण आता माझे अश्रू गोठल्यासारखे झालेत. मी माझ्या आयुष्यातला सर्वांत अवघड टप्पा पार करून गेलीये, असं वाटतंय.

माझ्या मुलीकडे स्मरणशक्ती नाहीये, पण गेली काही वर्षं मी जे शिकवतीये त्यामुळे काही शब्दांचे अर्थ तिला समजतात. मी तिला जे काही प्रश्न विचारते, त्याचे अर्थ समजून घेऊन ती आता आवाज आणि कृती करून उत्तर द्यायचा प्रयत्न करते. तिच्याकडे पाहून मला खूप आनंद वाटतो.”

“लड्डू ही स्पेशल चाइल्ड असली तरी ती मला काही त्रास देत नाही. तिला वेगवेगळे रंग, आवाज आणि खेळणी आवडतात. मी तिला व्हीलचेअरवर बसवून फिरायला घेऊन जाते आणि आजूबाजूच्या लोकांच्या, पर्यावरणाच्या गोष्टी सांगते. या गोष्टींचा तिला आणि मलासुद्धा कधीही कंटाळा येत नाही,” भार्गवी हसून सांगतात.

प्रत्येकाच्या आयुष्याची गोष्ट वेगळी... त्यात येणारे चढ-उतार वेगळे. पण आपल्याकडे काय नाही, याचा विचार न करत राहता आयुष्य आनंदाने जगायला कसं शिकायचं हे भार्गवीच्या गोष्टीतून लक्षात येतं.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)