You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
खतांच्या किंमती खरंच वाढल्यात का? कोणतं खत किती रुपयांना मिळणार?
- Author, श्रीकांत बंगाळे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
रासायनिक खतांच्या किंमतीत वाढ झाल्याच्या बातम्या आल्या आहेत. व्हॉट्सअपवरही याविषयीच्या बातम्या फिरत आहेत.
त्यामुळे शेतकरी वर्गात संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे.पण खरंच खतांच्या किंमतीत वाढ झाली आहे का, जाणून घेऊया.
व्हायरल बातम्या आणि त्यामागचं सत्य
खतांच्या दरवाढीसंबंधीच्या बातम्यांमध्ये म्हटलंय की, 10:26:26 खताच्या 50 किलोची बॅग 1470 वरुन 1700 रुपये, 24:24:0:0 खताचे दर 1550 वरुन 1700 रुपये, 20:20:0:0 खताची किंमत 1250 वरुन 1450 रुपये, तर सिंगल सुपर फॉस्फेटच्या किमतीत 500 रुपयांवरून 600 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे.
पण मग खरंच भाववाढ झालीय का या मागील तथ्य जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला.
तर केंद्र सरकारकडून रासायनिक खतांवर NBS (Nutrient Based Subsidy) या योजनेअंतर्गत अनुदान दिलं जातं. म्हणजेच खतांमधील पोषकद्रव्यांच्या आधारावर म्हणजे त्या खतात किती किलो नायट्रोजन N, फॉस्फेट P, पोटॅश K आणि सल्फर S आहे, यानुसार ही सबसिडी दिली जाते.
2024 च्या खरिप हंगामासाठी (1 एप्रिल 2024 ते 30 सप्टेंबर 2024 पर्यंत) फॉस्फेट आणि पोटॅश खतांसाठी (P&K fertilizer) केंद्र सरकारनं 24 हजार 420 कोटी रुपयांचं अनुदान जाहीर केलं आहे.
याबाबतचा निर्णय केंद्र सरकारनं फेब्रुवारी महिन्यात घेतला. साधारणपणे एप्रिल-मे महिन्यात असा निर्णय होत असो, पण यंदा निवडणूक आचारसंहिता असल्यानं वर्षाच्या सुरुवातीला हा निर्णय घेण्यात आला.
याचवेळी देशांर्गत खतांच्या किंमतीबाबत बोलताना केंद्र सरकारनं स्पष्टपणे सांगितलं की, 2024 च्या खरिप हंगामात खतांच्या किंमतीत एका रुपयानेही वाढ होणार नाही.
केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यावेळी बोलताना म्हणाले की, “आंतरराष्ट्रीय बाजारात खतांच्या किंमती वाढल्या आहेत, पण त्याचा परिणाम देशातल्या शेतकऱ्यांवर होऊ नये यासाठी निर्णय घेण्यात आला आहे की, ज्या दरानं खतं गेल्या वर्षी मिळत होते, त्याच किंमतीत ते यंदा म्हणजेच 2024 मध्येही मिळतली. काहीच वाढ होणार नाही. एक रुपयासुद्धा भाव वाढवला जाणार नाही.”
खतांच्या किंमतीविषयी अधिक जाणून घेण्यासाठी आम्ही कृषी निविष्ठा व गुणनियंत्रण विभागाचे संचालक विकास पाटील यांच्याशी संपर्क साधला.
विकास पाटील यांनी सांगितलं की, “खतांचे भाव वाढले असा काही प्रकार घडलेला नाहीये. यासंबंधीच्या बातम्या आल्यानंतर आम्ही चौकशी केली तर, संबंधित पत्रकाराने अंदाजानं ती बातमी दिल्याचं आणि मग ती सगळीकडे पसरल्याचं लक्षात आलं. त्यानंतर आम्ही खत उत्पादक कंपन्या, व्यापारी यांच्याशीही बोललो, पण खतांच्या किंमतीत वाढ झालेली नाहीये.”
खत कोणत्या किंमतीला मिळणार?
फेब्रुवारी महिन्यातच केंद्र सरकारकडून देशांतर्गत खतांच्या किंमतीही जाहीर करण्यात आल्या.
याविषयी बोलताना अनुराग ठाकूर म्हणाले की, “DAP (डाय-अमोनियम फॉस्फेट) ची बॅग गेल्या वर्षी 1350 रुपयांत मिळत होती, ती यंदाही 1350 रुपयांना मिळेल. यासोबतच NPK 1470 रुपये प्रती बॅग, तर MOP 1670 रुपये प्रती बॅग या किंमतीला मिळत होतं. तेही जुन्या किंमतीत मिळत राहिलं. यात कोणतीही वाढ केली जाणार नाही.”
खतांच्या किंमतीबाबत जाणून घेण्यासाठी आम्ही राज्यातल्या काही खत पुरवठादारांशीही चर्चा केली.
त्यांनीही खतांच्या किंमतीत वाढ झाली नसल्याचं सांगितलं. तसंच शेतकऱ्यांनी पॅनिक होऊ नये असंही सांगितलं.
त्यांनी सांगितल्यानुसार, सध्या यूरियाची 45 किलोची बॅग 266 रुपये, तर डीएपीची 50 किलोची बॅग 1350 रुपये, 10:26:26 हा ग्रेड 1470 रुपयांना मिळत आहे. MOP ची बॅग 1670 रुपयांना मिळत आहे.