अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीबाबत सर्व प्रश्नांची उत्तरं

यंदाच्या नोव्हेंबरमध्ये नवीन अमेरिकन राष्ट्राध्यक्षाची निवड होणार आहे. या निवडीबाबत जगभरात उत्सुकता आहे.

राष्ट्राध्यक्षासोबतच काँग्रेसचे नवीन सदस्य निवडण्यासाठीही अमेरिकन नागरिक मतदान करणार आहेत. अमेरिकेतील नवीन विधेयक किंवा कायदा पास करण्यात हे सदस्य मोठी भूमिका बजावतात.

1. कधी आहे राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक?

मंगळवार दिनांक 5 नोव्हेंबर 2024 रोजी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक होणार आहे.

या निवडणुकीत जिंकून आलेला उमेदवार राष्ट्राध्यक्ष म्हणून ‘व्हाईट हाऊस’मधून राष्ट्राचा कारभार चालवेल. 2025च्या जानेवारीपासून नवीन राष्ट्राध्यक्षाचा कार्यकाळ सुरू होईल.

अमेरिकेन राष्ट्राध्यक्षांना काही कायदे स्वत: मंजूर करण्याचा अधिकार असतो. परंतु अधिकाधिक कायदे त्यांना संसदेच्या मदतीनेच पास करावे लागतात.

देशाचे जागतिक पातळीवर प्रतिनिधित्त्व करणाऱ्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना परराष्ट्र धोरण ठरविण्याचे मोठे स्वातंत्र्य असते.

2. यावेळच्या निवडणुकीत कोणते उमेदवार आहेत आणि त्यांची निवड कशी होईल?

अमेरिकेतली दोन प्रमुख राजकीय पक्ष राष्ट्राध्यक्ष पदासाठी आपापल्या उमेदवाराचे नामांकन करतात. त्यासाठीच्या प्राथमिक निवडणुकीत पक्षाचे सदस्य त्यांना मतदान करतात. मग ते उमेदवार निवडणुकीत पक्षाचे नेतृत्त्व करतात.

यावेळी माजी राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प प्रतिस्पर्ध्यापेक्षा मोठी आघाडी घेत पक्षाचे अधिकृत उमेदवार बनले.

दुसरीकडे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांच्या माघारीनंतर डेमोक्रॅटिक पक्षाच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांना राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली. त्यांच्या निवडीला पक्षातून कोणीही आव्हान दिले नाही.

याशिवाय काही अपक्ष उमेदवारही राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत सहभागी झाले होते. त्यात प्रामुख्याने माजी राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनडी यांचे भाचे रॉबर्ट एफ केनडी ज्युनियर यांचा समावेश होता. मात्र ऑगस्टअखेरीस आपला प्रचार बंद करत त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना पाठिंबा दिला.

3. डेमोक्रेट्स आणि रिपब्लिकन पक्षाची काय भूमिका आहे?

अमेरिकीतील डेमोक्रेटिक पक्ष एक पुरोगामी विचारांचा राजकीय पक्ष आहे. त्यांचा अजेंडा मुख्यत्वे नागरिकांचे अधिकार, सामाजिक सुरक्षितता आणि पर्यावरणीय बदलांवर उपाययोजना करणे हा आहे.

रिपब्लिकन पक्ष हा पारंपरिक विचारसरणीचा आहे. करामध्ये कपात, सरकारचा आकार मर्यादीत ठेवणे, बंदुकीचा परवाना देणे, इमिग्रेशन आणि गर्भपातावर कडक निर्बंध घालणे या मुद्द्यांचा हा पक्ष समर्थक आहे.

4. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक प्रक्रिया कशी आहे?

देशात सर्वाधिक मते मिळवणारा उमेदवार अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत विजयी होत नाही. त्याऐवजी दोन्ही पक्षाच्या उमेदवारांना 50 राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये जिंकण्यासाठी लढावे लागते.

अमेरिकेतली प्रत्येक प्रांतात लोकसंख्येवर आधारित ‘इलेक्टोरल कॉलेज’ची संख्या निश्चित केली जाते. अशा 538 ‘इलेक्टोरल कॉलेज’मधून 270 किंवा त्यापेक्षा अधिकांमध्ये जिंकणाऱ्याला विजयी घोषित केले जाते.

केवळ दोन राज्ये वगळता इतर सर्व राज्यांमध्ये जो उमेदवार सर्वाधिक मते मिळवतो त्यालाच ‘इलेक्टोरल कॉलेज’ची सगळी मते दिली जातात.

बहुतेक राज्ये एक किंवा दुसऱ्या पक्षाकडे अधिक झुकलेली असतात. त्यामुळे उमेदवार त्यांची जिंकण्याची शक्यता असलेल्या 12 राज्यांवर लक्ष केंद्रित करतात. त्यामुळे या राज्यांना ‘बॅटल ग्राउंड’ किंवा ‘स्विंग स्टेट’ असे संबोधतात.

राष्ट्रीय पातळीवर कोणीही उमेदवार सर्वाधिक मते मिळवू शकतो. जसे हिलरी क्लिंटन यांनी 2016 मध्ये देशात सर्वाधिक मते मिळविली होती. परंतु ‘इलेक्टोरल कॉलेज’ निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला होता.

अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत या बातम्याही वाचा :

5. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत कोण मत देऊ शकतो?

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत 18 वर्षांपेक्षा जास्त वयाचे नागरिक मतदान करू शकतात.

फक्त नॉर्थ डेकोटा वगळता सर्व राज्यांमध्ये मतदानाआधी मतदारांना नोंदणी करावी लागते. प्रत्येक राज्यात मतदार नोंदणीची स्वतंत्र प्रक्रिया आणि त्यासाठी अंतिम मुदत असते. परदेशात राहणारे अमेरिकन नागरिकही या निवडणुकीच्या मतदानासाठी नोंदणी करू शकतात. त्यांना पत्राद्वारेही तशी सुविधा आहे.

6. राष्ट्राध्यक्षांच्या व्यतिरिक्त अजून कोणाची निवड होणार?

या निवडणुकीत राष्ट्राध्यक्षांसोबतच कायदे पास करण्यात ज्यांची महत्त्वाची भूमिका असते, त्या अमेरिकन काँग्रेस सदस्यांचीही निवड होणार आहे.

अमेरिकन संसदेची दोन सभागृहे आहेत. त्यापैकी ‘हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह’च्या सर्व म्हणजे 435 जागांसाठी निवडणूक होते. तर, ‘सिनेट’च्या 34 जागांसाठीही मतदान होते.

सध्या ‘हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह’मध्ये रिपब्लिकन पक्षाचे बहुमत आहे. हे सभागृहच आर्थिक तरतुदींना मंजुरी देते. सिनेटवर डेमोक्रेट्सचे प्राबल्य आहे. महत्त्वाच्या सरकारी नियुक्त्यांवर ‘सिनेट’मध्ये मतदान होते.

7. कोण जिंकले हे कधी कळते?

शक्यतो मतदान झाले त्या दिवशीच रात्री विजेत्याची घोषणा केली जाते. पण 2020मध्ये मतमोजणीसाठी काही दिवस लागले होते.

नवा राष्ट्राध्यक्ष निवडला गेला, तर निवडणुकीनंतरचा काही काळ संक्रमण कालावधी संबोधला जातो. यादरम्यान प्रशासनाला कॅबिनेट मंत्र्‍यांची नियुक्ती आणि नव्या सरकारच्या योजना आखण्यासाठी वेळ दिला जातो.

राष्ट्राध्यक्षांना जानेवारीत पदाची शपथ दिली जाते. हा शपथविधी समारंभ वॉशिंग्टन डीसी येथील कॅपिटल बिल्डिंगच्या पायऱ्यांवर पार पडतो.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.