'माझ्या खोलीत एक पुरुष आहे, पोलिसांना बोलवा', विसरण्याचा हा आजार कोणाला होऊ शकतो?

    • Author, नेहा कश्यप
    • Role, बीबीसी हिंदीसाठी

तुम्हाला हे ऐकून विचित्र वाटेल,पण शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की श्वासोच्छवास सावकाश आणि नियंत्रित पद्धतीनं घेतल्यानं त्याचे स्वत:चे फायदे आहेत, शिवाय त्यामुळे अल्झायमर रोगापासून संरक्षण मिळतं.

अल्झायमर हा एक आजार आहे, ज्यामध्ये व्यक्तीची स्मरण शक्ती कमी होऊ लागते. पण अल्झायमर होण्याचं कोणतही निश्चित कारण नाही. पण एक महत्वाचं कारण म्हणजे शरीरात एमिलॉयड बीटा प्रोटीनची उपस्थिती, ज्याला प्लेक्स देखील म्हणतात.

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार,या आजारामुळे रुग्णाला नीट बोलता येत नाही. कारण तो कोणत्या भाषेत बोलतो हे त्याला आठवत नाही, पण त्याची लक्षणं हळूहळू सुरु होतात.

असाच काहीसा प्रकार रोहनच्या ( नाव बदलले आहे) आईसोबत घडला.

रोहन सांगतो की,"माझी आई अनेकदा मध्यरात्री झोपेतून उठायची. ती थोडा वेळ चालायची आणि मग झोपी जायची. सुरुवातीला आम्हाला सर्व काही सामान्य वाटलं, पण एक दिवस एक विचित्र घटना घडली."

त्यानं सांगितलं, "त्यादिवशी माझी आई रात्री उठली आणि मला सांगितलं की, माझ्या खोलीत कोणीतरी माणूस झोपलेला आहे. तो कोण आहे? पोलिसांना बोलवा आणि त्याला घराबाहेर काढा. माझे वडील तिच्या बाजूला झोपले होते.आम्हाला त्याचं दिवशी कळले की काहीतरी गडबड आहे."

रोहनच्या कुटुंबीयांनी वैद्यकीय सल्ला घेतला आणि आईला पहिल्या टप्प्यातील अल्झायमर आजार असल्याचं लक्षात आलं.

'एम्स'चे डॉक्टर काय म्हणतात ?

ऋषिकेश येथील 'एम्स'चे न्यूरॉलॉजिस्ट डॉ.अरविंद माधव या आजाराबद्दल सांगतात की,"मेंदूमध्ये एक भाग असतो जो स्मृती साठवून ठेवतो,पण जेव्हा अल्झायमर होऊ लागतो तेव्हा या भागातील न्यूरॉन्स नष्ट होऊ लागतात आणि व्यक्ती गोष्टी विसरायला लागतो."

"काही रुग्णांमध्ये ही प्रक्रिया जलद होते, तर काहींमध्ये ती हळूहळू होते. अशा परिस्थितीत लोक अगदी लहान-लहान गोष्टी देखील विसरायला लागतात. उदाहरणार्थ- वस्तू ठेवायला विसरणं इत्यादी. डॉक्टर याला' फास्ट एजिंग' म्हणतात."

ते सांगतात,"अल्झायमरवर कोणताही इलाज नाही. दिलेल्या औषधांमुळं रोग बळावण्याचा वेग कमी होतो आणि पुढच्या स्टेजपर्यंत पोहचायला त्याला काही वेळ मिळतो एवढंच."

"परंतु कधी कधी रुग्णांमध्ये या औषधांचे 'साइडइफेक्ट'ही दिसून येतात. जसे भ्रम (hallucinations) किंवा गोंधळलेपणा (confuse) असणे.

श्वसन क्रियेचे फायदे

अलीकडच्या दशकात शास्त्रज्ञांना असं आढळून आलं की, जर तुम्ही हळूहळू श्वास घेत असाल तर ते आरोग्यासाठी फायदेशीर आहे. आशिया खंडातील अनेक देशांमध्ये प्रदीर्घ काळापासून हा अभ्यास प्रचलित आहे.

अनुलोम-विलोम प्राणायाम हा भारतातील प्राचीन योग साधनेचा प्रकार आहे.

पण संशोधनात वेगवेगळ्या श्वसन क्रियेची पद्धतशीर तुलना केलेली नाही त्यामुळं कोणत्या श्वसन क्रियेचा फायदा होईल याबद्दल ते बोलत नाहीत.

पण ते एक पद्धत सुचवता,त्यात ते सांगतात की,"हळूहळू श्वास घेण्याच्या प्रक्रियेत छाती फुलते आणि तुम्ही पाच पर्यंत अंक मोजता, नंतर पाच अंक मोजून हळू हळू श्वास सोडा.10 सेकंदाच्या या प्रक्रियेत तुम्हाला लगेच आराम मिळतो."

"जर तुम्ही हे दिवसातून 20 मिनिटे आणि आठवड्यातून किमान पाच दिवस केलं तर तुम्हाला आराम,शांतता आणि तणावापासून मुक्ती मिळते.अलीकडच्या संशोधनानुसार अनेक आजारांवर हा प्रभावी उपाय आहे.अगदी अल्झायमरवरही हा प्रभावी उपाय आहे."

संशोधनात असे दिसून आले आहे की, या प्रक्रियेचा अवलंब केल्याने उच्च रक्तदाब, तणाव आणि जुनाट दुखणी यांसारख्या आजारांमध्ये सुधारणा दिसून आली आहे.

संशोधनात काय आढळले?

एका नवीन संशोधनात, संशोधकांनी शोध लावलाय की,रक्ताच्या प्लाझ्मामध्ये बायोमार्कर टेस्टद्वारे अल्झायमर होण्याचा सर्वात मोठा धोका कळतो.

या संशोधनाच्या लेखिका मारा माथेर आहेत, दक्षिण कॅलिफोर्निया विद्यापीठात मानसशास्त्र आणि बायोमेडिकल अभियांत्रिकीच्या प्रोफेसर आहेत.

त्यांच्या म्हणण्यानुसार ज्या 108 लोकांवर हे संशोधन करण्यात आलं आहे त्यापैकी निम्म्या लोकांना अशा ठिकाणी जाण्यास सांगितलं होतं जिथं त्यांना शांतता मिळेल. उदाहरणार्थ- संगीत ऐकणे किंवा डोळे बंद करणे किंवा मेडिटेशन करणे.

याचा उद्देश त्यांची हृदय गती नियमित करणे होता.

दुसऱ्या गटातील लोकांना कॉम्प्युटर स्क्रीन समोर बसवण्यात आलं

पाच सेकंदाच्या अंतरानं त्यांच्या समोर पडद्यावर एक फूल दिसायचं. जेव्हा स्क्रीनवर पाच सेंकद फूल दिसायचं तेव्हा त्यांना श्वास घ्यावा लागत असे आणि स्क्रीनवरून फूल गायब झाल्यावर ते श्वास सोडत असत. अशा प्रकारे दीर्घ श्वास आणि हळूहळू श्वास घेतल्यानं त्याच्या हृदयाची गती वाढलेली दिसून आली.

दोन्ही गटांना पाच आठवडे 20 ते 40 मिनिटं ही प्रक्रिया करण्यास सांगण्यात आलं.

प्रोफेसर मारा सांगतात की, या दोन्ही गटातील लोकांच्या रक्ताचे नमुने पाच आठवड्यानंतर तपासले असता धक्कादायक निकाल समोर आले.

त्या सांगतात की, अल्झायमरचे कोणतेही कारण यात कळू शकले नाही,पण आजार होण्याचे एक मुख्य कारण एमिलॉयड बीट प्रोटीन गट किंवा फ्लेक्स सांगण्यात आलं. जेव्हा ही प्रथिनं मेंदूमध्ये फ्लेक्सच्या स्वरूपात तयार होतात तेव्हा ही प्रथिन विषारी बनतात आणि त्यामुळे सामान्य कार्यांवर परिणाम होतो.

प्रोफेसर मारा माथेर म्हणतात की, "हे प्रोटीन धोकादायक बनतं जेव्हा ते मेंदूच्या 'न्यूरॉन्स'मध्ये चिकटत. त्यामुळे पेशी खराब होतात आणि मेंदूच्या सामान्य कार्यावर परिणाम होतो. त्यामुळे व्यक्ती हळूहळू विसरायला लागते. हेदेखील तो ब्रेन डेड होण्याचं कारण बनू शकतं"

मारा माथेर आणि त्यांच्या टीमच्या मते, निरोगी तरुण व्यक्तीमध्ये एमिलॉयड बीटाची पातळी जितकी कमी असेल तितका अल्झायमर होण्याचा धोका कमी असतो.

गाढ झोपेचे फायदे

असं का घडते ते संशोधकांना निश्चित माहित नाही, परंतु एक गृहीतक असं आहे की हळूवार, स्थिर श्वास घेतल्यानं गाढ झोपेचे काही फायदे मिळू शकतात.

संशोधनात असं आढळून आलं आहे की, ते मेंदू आणि मज्जासंस्थेतील 'न्यूरोटॉक्सिक वेस्ट'ला वेगानं साफ करू शकत. ज्याची निर्मिती अल्झायमर आजार होण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतो.

सर्व प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक व्यायामाचा हृदयाच्या ठोक्यांवर परिणाम होतो.संशोधनाने सूचित केले आहे की, हृदयाच्या गतीतील बदल हे मज्जासंस्थेचे कार्य मोजण्यासाठी उत्तम मेट्रीक आहे. म्हणूनच 'डिप्रेशन' किंवा 'क्रोनिक स्ट्रेस' ते व्हायरल इन्फेक्शनपर्यंत सगळ्या हेल्थ कंडिशनचा एक इंडिकेटर आहे.

श्वसनाचे व्यायाम किती वेळ करावेत?

मारा मेथरच्या म्हणण्यानुसार,"अचूक 'बॉडी ब्रेन मॅकेनिझम' असेल, तरीही हळूहळू श्वास घेण्याचा नियमित सराव सर्व लोकांना फायदेशीर ठरू शकतो.

श्वसनाचे व्यायाम किती वेळ करावेत याचा आम्हाला अजून अंदाज नाही, परंतु ते आठवड्यातून 4 किंवा 5 दिवस 20 मिनिट केल्यास फायदा होतो.

दीर्घकाळासाठी श्वसनाचे व्यायाम किती उपयोगी आहेत हे जाणून घेण्यासाठी अल्झायमर असलेल्या अधिकाधिक लोकांनी याचा प्रभावी वापर करायला हवा.

अनेक शास्त्रज्ञांना वैद्यकीय उपचारांच्या तुलनेत या श्वसन क्रियेच्या तंत्राच्या फायद्यांबाबत शंका आहेत.

श्वसनाचे व्यायाम उपयुक्त आहेत का?

AIIMS ऋषिकेशचे न्यूरॉलॉजिस्ट डॉक्टर अरविंद माधव अल्झायमरच्या उपचारांच्या या नवीन सिद्धांतांबाबत सांगतात की,मायग्रेनसारख्या समस्या श्वासोच्छवासाच्या व्यायामानं हाताळले जाऊ शकतात. परंतु अल्झायमरसाठी उपयुक्त आहे असे म्हणता येणार नाही.

मेडिटेशन, व्यायाम और उत्तम जीवनशैली याचा शरीरावर सकारात्मक परिणाम होतो आणि आजारांना दूर ठेवता येतं.

ते म्हणतात की, विसरण्याच्या प्रत्येक समस्येचं कारण अल्झायमर किंवा स्मृतीभ्रंश आहेच असे नाही,अनेकदा स्मरणशक्ती कमी होण्याचं कारण म्हणजे नैराश्य, पक्षाघात,मायग्रेन,जीवनसत्वाची कमतरता,थायरॉईड,रक्तदाब या गोष्टीही आहेत.

अल्झायमर बरा होणं शक्य नसलं तरी त्याच्यासारख्या आजारांवर उपचार शक्य आहेत. जर एखाद्याला स्मरणशक्तीचा त्रास होत असेल तर त्यानं फार घाबरण्याची गरज नाही. पण न्यूरोफिजिशियनचा सल्ला घेणं चांगले आहे,ते महत्वाचं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)