'फ्रेंड्स'मधील 'चँडलर' हरपला, अभिनेते मॅथ्यू पेरींचं निधन

'फ्रेंड्स' या लोकप्रिय सिरीजमधलं 'चँडलर' हे पात्र साकारणारे अभिनेते मॅथ्यू पेरी यांचं निधन झालं आहे. ते 54 वर्षांचे होते. अमेरिकन प्रसारमाध्यमांनी ही बातमी दिली आहे.

मॅथ्यू पेरी त्यांच्या लॉस एंजलिसच्या घरी मृतावस्थेत आढळले, असं प्रशासनाने अमेरिकन प्रसारमाध्यमांना सांगितलं.

'फ्रेंडस' ही न्यूयॉर्क शहरात राहणाऱ्या सहा मित्र-मैत्रिणींभोवती कथानक गुंफलेली मालिका 1994 ते 2004 या काळात टीव्हीवर आली होती. या सीरिजचा अंतिम भाग एकट्या अमेरिकेत पाच कोटी लोकांनी पाहिला होता.

2000 च्या दशकातली ती सगळ्यात जास्त पाहिली जाणारी सीरिज होती.

वॉर्नर ब्रदर्सने या सीरिजची निर्मिती केली होती. पेरी यांच्या निधनानंतर वॉर्नर ब्रदर्सनं म्हटलं की, “आम्ही आमचा मॅथ्यू पेरीच्या निधनाच्या बातमीने हादरलो आहे. तो अतिशय प्रतिभाशाली अभिनेता होता आणि वॉर्नर ब्रदर्स परिवाराचा अविभाज्य भाग होता.

“त्याने आपल्या अभिनयाने पूर्ण जगावर छाप पाडली होती. त्याचं प्रेक्षकांच्या हृदयातलं स्थान अढळ आहे. आम्ही या कठीण प्रसंगात त्याच्या कुटुंबियांबरोबर आणि चाहत्यांबरोबर आहोत."

मॅथ्यू पेरी यांचा जन्म 1969 मध्ये मॅसेच्युसेट्स इथे झाला. ते कॅनडामधील ओटावा शहरात मोठे झाले. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो हे त्यांचे वर्गमित्र होते.

तरुण असतानाच ते लॉस एंजिलिसला गेले.

'Boys will be boys' या सीरिजमध्ये त्यांनी चॅझ रसेलची भूमिका केली. तसंच, 'Growing pains' या सीरिजमध्येही त्याने अभिनय केला.

मात्र, फ्रेंड्स या सीरिजने त्यांना प्रसिद्धीच्या परमोच्च शिखरावर नेलं. जेनिफर अ‍ॅनिस्टन, कोर्टनी कॉक्स, डेविड श्विमर, मॅट लब्लांक आणि लिसा कुड्रो हे त्यांचे सहकलाकार होते. या सीरिजमध्ये त्यांच्या चँडलर बिंगचं विनोदी पात्र रंगवलं होतकं.

ते अनेक वर्षे पेनकिलर्स आणि दारूच्या व्यसनाशी लढा देत होते. अनेकदा ते त्यासाठी व्यसनमुक्ती केंद्रातही गेले होते.

2016 मध्ये बीबीसीला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं होतं की, ड्रग्स आणि दारू यांच्यामुळे फ्रेंड्सचे मधले तीन वर्षं मला आठवत नाहीत.

मॅथ्यू पेरी यांनी 'Fools Rush in', 'Almost heroes' आणि 'Whole nine yeards' या चित्रपटातही काम केलं होतं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)