You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
भाजप नेते सतत काठमांडूला का जातात?
- Author, फणींद्र दाहाल
- Role, बीबीसी प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षाचे परराष्ट्र व्यवहार प्रमुख विजय चौथाईवाले यांनी नुकताच नेपाळचा दौरा केला. यावेळी त्यांनी नेपाळच्या पश्चिम भागातील एका परिषदेला हजेरी लावली. शिवाय काठमांडूमध्ये उच्चस्तरीय बैठका घेऊन ते दिल्लीला परतले.
काठमांडूमध्ये आयोजित मानसखंड परिषदेत विशेष पाहुणे म्हणून त्यांनी हजेरी लावली.
यावेळी त्यांनी नेपाळच्या पंतप्रधानांसह सत्ताधारी आणि प्रमुख विरोधी पक्षनेत्यांच्या भेटी घेतल्याचं सांगितलं.
त्यांनी ट्वीट करत म्हटलंय की, सर्व नेपाळी नेत्यांनी नेपाळ-भारत संबंध मजबूत करण्यावर आणि पक्ष पातळीवर अधिक संपर्क करण्यावर भर दिला आहे.
नेपाळमध्ये कोणाकोणाची भेट घेतली
विजय चौथाईवाले यांनी ट्वीट करत पुष्प कमल दहल उर्फ प्रचंड पंतप्रधान झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं.
मुख्य विरोधी पक्षनेते केपी ओली यांच्या भेटीवर त्यांनी लिहिलंय की, "त्यांनी मला नेपाळच्या राजकारणाबद्दल आणि इतर अनेक मुद्द्यांबद्दल महत्वाच्या गोष्टी सांगितल्या."
विजय यांच्याशी चर्चा करताना केपी ओली गेरू रंगाच्या शर्टमध्ये दिसले. त्यांच्या सोबत यूएमएलचे नेते बिष्णू रिमालही होते. या भेटीविषयी आणखीन माहिती जाणून घेण्यासाठी बीबीसीने रिमाल यांच्याशी संपर्क केला, मात्र त्यांनी माहिती देण्यास नकार दिला.
विजय यांनी माजी पंतप्रधान शेर बहादूर देउबा आणि माधव कुमार नेपाळ तसेच उपपंतप्रधान आणि गृहमंत्री यांचीही भेट घेतली.
शिवाय विजय यांना राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांचीही भेट घ्यायची होती. मात्र पौडेल यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आला.
नेपाळचे पंतप्रधान प्रचंड पुढील महिन्यात भारताचा दौरा करण्याच्या तयारीत आहेत भारतीय सत्ताधारी पक्षाच्या परराष्ट्र खात्याचे प्रमुख नेपाळमध्ये पोहोचले तेव्हा अशीच तयारी सुरू होती.
यापूर्वी नेपाळ-भारताच्या संयुक्त बैठकीत सहभागी झालेले भारताचे परराष्ट्र सचिव विनय मोहन क्वात्रा यांनी निवडणुकीनंतर तुटलेल्या युतीचा विषय जाणून घेण्यात रस दाखवला होता.
नेपाळमधील सर्वात मोठा पक्ष नेपाळी काँग्रेस हा निवडणुकीनंतर विरोधात बसला. तर दुसरा मोठा पक्ष यूएमएलच्या पाठिंब्यावर प्रचंड पंतप्रधान झाले.
क्वात्रा परतल्यानंतर नेपाळमध्ये जुळून आलेल्या नव्या समीकरणांची घडी विस्कटली. आता काँग्रेस-माओवादी हे नवं समीकरण सत्तेत असून हे समीकरण भारतासाठी चांगलं असल्याचं अनेक विश्लेषकांचं मत आहे.
नेपाळी नेत्यांशी बोलणी...
अलीकडच्या काळात भाजपचे नेते वारंवार काठमांडूला भेट देऊ लागलेत. विजय चौथाईवाले देखील याच भाजप नेत्यांपैकी एक आहेत.
नेपाळ आणि भारतातील राजकीय पक्षांच्या नेत्यांमधील वैयक्तिक पातळीवरील संबंध आणि भेटीगाठी या गोष्टी काही नव्या नाहीत.
नेपाळी नेत्यांनी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीला पाठिंबा दिला होता. 1951 नंतर नेपाळच्या राजकीय घडामोडींमध्ये भारताने या ना त्या स्वरूपात आपली उत्सुकता दाखवून दिली आहे.
त्यावेळी नेपाळमध्ये माओवादी बंडखोर आणि सात पक्षांमध्ये 12 कलमी करार करून देशात लोकशाही प्रस्थापित करण्याचं काम भारताने केलं होतं.
नेपाळ-भारत संबंधांवर बारीक नजर ठेऊन असणारे 'देशसंचार डॉट कॉम'चे संपादक युवराज घिमिरे सांगतात की, नेपाळ आणि भारताच्या नेत्यांमधील चर्चा सामान्य असल्या तरी परराष्ट्र प्रकरणांची चर्चा वैयक्तिक पातळीवर होता कामा नये.
ते पुढे म्हणाले की, "परराष्ट्र व्यवहारात परराष्ट्र मुत्सद्दी असोत वा पाहुणे, त्यांच्याशी स्पष्टच बोललं पाहिजे. यातून सरकारी धोरण आणि देशाबद्दलचा आदर दिसून येतो. याचसोबत कोणता अजेंडा पुढे न्यायचा याचीही जाणीव सरकारने ठेवली पाहिजे."
घिमिरे सांगतात की, भाजप आणि नेपाळच्या राजकीय पक्षांमधील संबंध विस्तारल्याने अनेक सैद्धांतिक प्रश्न अनुत्तरीत राहिलेत.
ते म्हणाले, "जेव्हा चीनची कम्युनिस्ट पार्टी त्यांच्याशी बोलणी करते तेव्हा नेपाळच्या कम्युनिस्ट पार्टीला ते जवळचे वाटतात. भारतात भाजप सत्तेवर आहे, तर नेपाळमध्ये नेपाळी काँग्रेस सत्तेवर आहे. पण या गोष्टी टिकाऊ नाहीयेत, कारण सिद्धांत काय आहे आणि त्यांच्यात किती साम्य आहे ते त्यांना समजत नाहीये."
नेपाळचे तत्कालीन पंतप्रधान शेर बहादूर देउबा आणि प्रचंड यांनी त्यांच्या मागील भारत दौऱ्यांमध्ये प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या भेटी घेतल्या नसल्याची आठवण देखील घिमिरे यांनी करून दिली.
ते म्हणतात, "इतरांनी ठरवून दिलेल्या बैठका आणि राजनैतिक संबंध नेपाळसाठी अस्वस्थ करणारे आहेत."
नेपाळ आणि भारतामधील संबंध कोण ठरवतं?
घिमिरे यांच्या मते, भाजपचे परराष्ट्र प्रभारी असलेले विजय चौथाईवाले यांचे पंतप्रधान मोदींशी चांगले संबंध आहेत.
शिवाय ते मोदींच्या गुजरात राज्याचे रहिवासी आहेत. विजय चौथाईवाले मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे विश्वासू मानले जातात.
मोदींच्या अमेरिका दौऱ्यात लोकप्रिय झालेला 'हाऊडी मोदी' कार्यक्रम आयोजित करण्याचं श्रेयही विजय यांना दिलं जातं.
परराष्ट्र धोरण हे परराष्ट्र व्यवहार मंत्रालय ठरवतं. पण इतर काही महत्त्वाची धोरणं आखण्यात देशाच्या राजकीय आणि सुरक्षा यंत्रणांचीही मोठी भूमिका असते.
घिमिरे सांगतात, "परराष्ट्रमंत्र्यांची भूमिका आता केवळ प्रतिकात्मक झाली आहे. खरे निर्णय तर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कार्यालयाकडून घेतले जातात."
नकाशाच्या मुद्द्यावरून भारत- नेपाळ संबंध चिघळल्यानंतर भारताने आपल्या गुप्तचर संस्थेच्या प्रमुखाला काठमांडूला पाठवलं होतं.
यानंतर नेपाळ आणि भारत यांच्यातील संबंध हळूहळू सामान्य पातळीवर येऊ लागले.
भारताच्या गुप्तचर संस्थेचे प्रमुख भारतात परतल्यानंतर विजय यांनी नेपाळला भेट दिली. त्यावेळी नेपाळ मध्ये ओली सरकार सत्तेवर होतं आणि विजय यांचा हा दौरा वादात सापडला होता.
दोन वर्षांपूर्वी सीपीएनचे तत्कालीन महासचिव बिष्णू पौडेल यांच्या निमंत्रणावरून ही भेट झाली होती.
त्यावेळी त्यांनी इतर पक्षनेत्यांची भेटी घेतल्या. मात्र या दौऱ्यात त्यांनी प्रचंड आणि माधवकुमार यांची भेट घेतली नाही.
त्यावेळी पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं होतं की, या भेटीची माहिती सीपीएनच्या तत्कालीन परराष्ट्र खात्यालाही नव्हती.
घिमिरे सांगतात की, भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराने थेट नेपाळमध्ये येऊन राजकीय बैठका घेणं सोपी गोष्ट नसते. त्यामुळे राजकीय चेहरे पाठवले जातील, पण अशा बैठकांना खोल अर्थ असतो.
अलीकडच्या काही महिन्यांत भाजपने विविध देशांशी पक्षीय स्तरावर संवाद वाढवला आहे.
'द हिंदू' वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, भाजपने 'भाजपला जाणून घ्या' नावाचा एक कार्यक्रम सुरू केला आहे. या कार्यक्रमाअंतर्गत विविध देशांचे नेते आणि राजनैतिक मिशनच्या प्रमुखांना आमंत्रित करण्यात येतं आणि त्यांच्या भेटी घेतल्या जातात.
मागच्या वर्षी, माओवादी केंद्राचे अध्यक्ष प्रचंड हे अशाच एका कार्यक्रमात सहभागी झाले होते.
भारतीय प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, नेते आणि राजनैतिक मिशनच्या प्रमुखांमध्ये होणाऱ्या चर्चेत भाजपच्या स्थापनेपासूनचा इतिहास ते मोदी सरकारची कामगिरी आदी विषय असणार आहेत.
याशिवाय सार्वजनिक आणि पक्षीय पातळीवर दोन्ही देशांमधील संबंध दृढ करण्यावर भर दिला जाणार असल्याचंही बोललं जातंय.
नेपाळशी घनिष्ठ संबंध
विजय यांनी अलीकडच्या काळात नेपाळच्या राजकीय पक्षांशी घनिष्ठ संबंध निर्माण केले आहेत.
विजय यांनी हजेरी लावलेल्या परिषदेत प्रमुख पाहुण्या म्हणून नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नी आणि काँग्रेस नेत्या आरजू देउबा सहभागी झाल्या होत्या. त्यांनी विशेष अतिथी म्हणून धनगढी येथील कार्यक्रमात देखील उपस्थिती लावली होती.
देउबा पंतप्रधान असताना आरजू यांनी विजय यांना राखी बांधली होती. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
राज्य सरकारच्या पाठिंब्यावर, पश्चिम विद्यापीठात परिषद आयोजित करण्यात विश्व हिंदू महासंघाच्या उपाध्यक्षा ज्योत्स्ना सौद यांचा देखील समावेश होता.
ज्योत्स्ना या काँग्रेस नेते एनपी सौद यांच्या पत्नी आहेत. ज्योत्स्ना यांची नुकतीच परराष्ट्र मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
त्यांनी ट्विटरवर लिहिलंय की, या परिषदेमुळे भारत आणि नेपाळमधील आध्यात्मिक आणि सांस्कृतिक संबंध आणखी मजबूत होतील. यातून धार्मिक पर्यटनाला चालना मिळेल.
कार्यक्रमाचे व्यवस्थापन समन्वयक संदीप राणा म्हणाले की, विजय यांनी दिलेली भेट वेगळ्या कारणासाठी होती. धनगढी मध्ये आयोजित कार्यक्रमत सांस्कृतिक व धार्मिक पर्यटनाला चालना देणे हा उद्देश होता.
बीबीसीशी बोलताना त्यांनी सांगितलं की, "नेपाळचा पश्चिम भाग ते कुमाऊंपर्यंतचा प्रदेश पौराणिक काळापासून मानसखंड या नावाने ओळखला जातो. या परिषदेत पश्चिम आणि उत्तराखंडमधील संस्कृतीत असलेले साम्य आणि देव-देवतांची मिळती जुळती नावं यावर चर्चा करण्यात आली."
ते पुढे म्हणाले की, उत्तराखंड सरकारने कुमाऊँचा मानसखंड कॉरिडॉरच्या रूपात विकास केला आहे. आणि हा कॉरिडॉर नेपाळशी जोडला तर पर्यटनाचा विस्तार करण्यास मोठा वाव आहे.
काही विश्लेषकांनी या प्रयत्नांना 'सॉफ्ट डिप्लोमसी' असं नाव दिलंय.
मात्र भारत आणि नेपाळचा पश्चिमेकडील प्रदेश, महाकाली नदीच्या सभोवतालचा प्रदेश यातील सीमा विवाद अद्यापही सुटलेला नाही.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)