डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गुन्हा दाखल, पॉर्नस्टारला पैसे दिल्या प्रकरण

फोटो स्रोत, Getty Images
- Author, ज्यूड शिरीन
- Role, बीबीसी न्यूज, वॉशिंग्टन
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर एका पोर्न स्टारला पैसे दिल्याच्या प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार संदर्भात गुन्हा दाखल (इनडिक्टमेंट) करण्यात आला आहे.
हे प्रकरण 2016 च्या अध्यक्षीय निवडणुकांपूर्वीचं असून ट्रम्प यांच्यावरील आरोपांचा सविस्तर तपशील अद्याप जाहीर झालेला नाही.
डोनाल्ड ट्रम्प यांचं अमेरिकेतील पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनिएल्ससोबत कथितरित्या अफेअर होतं. पण निवडणुकीच्या काळात तिचं तोंड बंद ठेवण्यासाठी तिला 1 लाख 30 हजार डॉलर्स इतकी भलीमोठी रक्कम देण्यात आली, असा ट्रम्प यांच्यावर आरोप आहे.
यासंदर्भात केलेल्या तपासानंतर अमेरिकेतील ज्युरींनी ट्रम्प यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या बाजूने मतदान केलं.
दुसरीकडे, 76 वर्षीय ट्रम्प यांनी कोणतंही चुकीचं कृत्य केल्याचे सर्व आरोप सुरुवातीपासून फेटाळून लावले आहेत.
मात्र, या निमित्ताने अशा प्रकारे गुन्हा दाखल झालेले ट्रम्प हे पहिले राष्ट्राध्यक्ष (विद्यमान अथवा माजी) ठरले आहेत.
मॅनहॅटनचे डिस्ट्रिक्ट अॅटर्नी अॅल्विन ब्रॅग यांच्याकडून या प्रकरणात तपास करण्यात येत आहे. त्यांनी हा गुन्हा दाखल झाल्याच्या माहितीला दुजोरा दिला.
ब्रॅग यांच्या कार्यालयाने दिलेल्या निवेदनानुसार, यासंदर्भात त्यांनी ट्रम्प यांच्या वकिलांशी संपर्क साधला. सदर प्रकरणात ट्रम्प यांनी आत्मसमर्पण करावं, यासाठी समन्वय साधला जात आहे. सध्या तरी याची प्रक्रिया सुरू आहे, असं त्यांनी म्हटलं.

फोटो स्रोत, Getty Images
माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेतील फ्लोरिडा येथे राहतात.
त्यांची औपचारिक अटक आणि न्यायालयातील प्रथम सुनावणीसाठी त्यांना न्यूयॉर्कला जावं लागण्याची शक्यता आहे.
या घटनाक्रमादरम्यान, ट्रम्प हे या प्रकरणात पुढील आठवड्यात आत्मसमर्पण करतील, असं त्यांच्या संरक्षण पथकाने कळवलं आहे.
संरक्षण पथक म्हणजे युनायटेड स्टेट्स सिक्रेट सर्व्हीस होय. हे पथक अमेरिकेच्या आजी-माजी राष्ट्राध्यक्षांना संरक्षण पुरवण्याचं काम करत असतं.
गुन्ह्यानंतरच्या प्रक्रियेसाठी ट्रम्प पुढील आठवड्यात बोटांचे ठसे देतील, तसंच ओळख पटवण्यासाठीची 'मग शॉट' (पोलीस रेकॉर्डमधील फोटो काढण्याची प्रक्रिया) ही प्रक्रिया पूर्ण करतील.
दरम्यान, या प्रकरणानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी मॅनहॅटनच्या जिल्हा सरकारी वकिलांवर टीका केली. जिल्हा सरकारी वकील हे जो बायडनच्या आदेशांनुसार काम करत असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांना शांत बसवण्यासाठी डेमोक्रॅटिक पक्षाचे लोक प्रयत्न करत आहेत. त्यांनी आजवर खोटं बोललं, फसवणूक-दिशाभूल केली, आता आपलं ध्येय साध्य करण्यासाठी त्यांनी हे अनपेक्षित कृत्य केलं आहे. मी निर्दोष असून केवळ मला निवडणुकीच्या राजकारणातून दूर करण्यासाठी हे सगळे प्रयत्न करण्यात येत आहेत, असा आरोप ट्रम्प यांनी केला.
डिस्ट्रिक्ट अॅटर्नी अल्विन ब्रॅग हे डेमोक्रेटिक पक्षाचे नोंदणीकृत सदस्य आहेत. मात्र, ट्रम्प यांच्यावरील कारवाई राजकीय सूडबुद्धीने होत असल्याचे सर्व आरोप त्यांनी फेटाळून लावले.
यासंदर्भात ट्विट करून प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, "आम्ही तथ्ये, कायदा आणि पुराव्याच्या आधारे आमच्या अधिकारक्षेत्रातील प्रकरणांचं मूल्यांकन करतो."
या प्रकरणात ट्रम्प यांचे वकील सुसान नेचेल्स यांनीही एक निवेदन दिलं आहे. ट्रम्प यांनी कोणताही गुन्हा केलेला नाही. आम्ही या राजकीय खटल्याविरुद्धची न्यायालयीन लढाई आक्रमकपणे लढणार आहोत, असं त्यांनी म्हटलं आहे.
काय आहे प्रकरण?
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केल्या आठवड्यात आपल्याला अटक होण्याची शक्यता असल्याचं बोलून दाखवलं होतं.
2016 मध्ये त्यांनी एका पॉर्न स्टारला 1 लाख 30 हजार डॉलर देण्याच्या प्रकरणात ही अटक होणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. या खटल्याबदद्ल अधिक माहिती जाणून घेऊ या.
स्ट्रॉमी डॅनिअल्स कोण आहेत?
डॅनिअल्स (त्यांचं खरं नाव स्टिफनी क्लिफर्ड आहे) यांचा जन्म 1979 मध्ये लुईझियाना येथे झाला.

फोटो स्रोत, Reuters
पुढे त्या प्रौढांसाठीच्या चित्रपट सृष्टीत गेल्या. 2004 मध्ये त्यांनी दिग्दर्शनाची वाट धरली आणि लेखिकाही झाल्या.
त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. त्यांनी 2010 मध्ये निवडणूक लढवण्याचा विचारही केला होता. मात्र त्यांची उमेदवारी फारशी गांभीर्याने घेतली जात नसल्याचं लक्षात आल्यावर त्यांनी माघार घेतली.
ट्रम्प यांच्यावरील आरोप काय?
ही 2006 ची गोष्ट आहे. तेव्हा ट्रम्प व्हाईट हाऊस पासून कोसो दूर होते.
डॅनिअल्स यांच्या मते त्या ट्रम्प यांना कॅलिफोर्निया आणि नेवाडाच्या मध्ये असलेल्या एका रिसॉर्टवर भेटल्या होत्या.
2011 मध्ये त्यांनी Touch weekly या मासिकाला एका मुलाखत दिली होती. ती संपूर्ण मुलाखत 2018 मध्ये प्रकाशित झाली. त्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं की ट्रम्प यांनी त्यांना एकदा जेवायला बोलावलं आणि त्या ट्रम्प यांना भेटायला त्यांच्या खोलीत गेल्या होत्या.

फोटो स्रोत, Getty Images
"ट्रम्प त्यांच्या खोलीत सोफ्यावर रेलून बसले होते. त्यांनी पायजमा घातला होता," असं त्यांनी मुलाखतील सांगितलंय.
डॅनियल यांनी आरोप लावला की त्यादिवशी त्यांनी सेक्स केला. ट्रम्प यांच्या वकिलांनी हे धादांत खोटं असल्याचं सांगितलं.
डॅनियल यांचं म्हणणं खरं असेल तर हे ट्रम्प यांच्या सगळ्यांत लहान मुलाच्या जन्माच्या चार महिन्यानंतर झालं असेल.
एका टीव्ही मुलाखतीत त्यांनी आरोप लावला होता की ट्रम्प यांनी या अफेअरबद्दल बोलण्यास मनाई केली होती. ही मुलाखत 2018 मध्ये झाली होती.
2011 मध्ये एक व्यक्ती तिला लास वेगासच्या एका कार पार्किंगमध्ये भेटला होता. त्या व्यक्तीने 'ट्रंप यांना एकटं सोड" अशा शब्दात डॅनिअल यांना धमकी दिली होती, असासुद्धा त्यांचा दावा आहे.
हे प्रकरण आताच का बाहेर आलं?
2018 मध्ये वॉल स्ट्रीट जर्नलने एक लेख प्रकाशित केला होता. त्यात असा दावा करण्यात आला होता की ट्रंप यांचे वकील मायकेल कोहेन यांनी ऑक्टोबर 2016 मध्ये 1,30,000 डॉलर डॅनिअल्स यांना दिले.

फोटो स्रोत, Getty Images
नोव्हेंबर 2016 मध्ये ट्रंप यांची राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली. डॅनिअल National Enquirer या वृत्तपत्राकडे त्यांची कहाणी विकण्यासाठी गेल्या होत्या असाही दावा करण्यात आला होता.
मात्र आमच्यात या प्रकरणाविषयी कोणतीही वाच्यता न करण्याबद्दल करार झाला आहे, असं त्यांनी या वर्तमानपत्राला सांगितलं.
हे बेकायदेशीर आहे का?
वकीलाला असे पैसे देणं बेकायदेशीर नाही. मात्र जेव्हा ट्रंप यांनी कोहेन यांना पैसे दिले तेव्हा ते कायदेशीर फी म्हणून दिले. सरकारी वकिलांचा आरोप आहे की ट्रंप यांनी त्यांच्या रेकॉर्ड्समध्ये अफरातफर केली आहे. हा अमेरिकेत गुन्हा आहे.
ट्रंप यांची तेव्हाची निवडणूक कायद्याच्या विरोधात आहे, असंही सरकारी वकिलांचं मत आहे. कारण मतदारांना या अफेअरबद्दल काही कळायला नको म्हणून हा पैसा डॅनियल यांना देण्यात आला होता.
एखादा गुन्हा लपवणं मूळ गुन्ह्यापेक्षा मोठा गुन्हा मानला जातो.
ट्रंप यांच्यावर खटला चालवला जाऊ शकतो का?
आरोप दाखल करायचे की नाही हा निर्णय न्यूयॉर्कचे सरकारी वकील घेतील. त्यांनी एक न्यायमंडळ तयार केलं आहे.
ट्रंप यांच्याविरोधात खटला दाखल करण्यासाठी पुरेसे पुरावे आहेत का हे ठरवण्यासाठी किंवा आरोपपत्र तयार होईल का ही शक्यता पडताळून पाहण्यासाठी या न्यायमंडळाची स्थापना करण्यात आली आहे.

फोटो स्रोत, DONALD TRUMP
ट्रंप यांच्या वकिलांचं असं मत आहे की 13 मार्चपासून सुरू झालेल्या आठवड्यात त्यांना कोर्टासमोर हजर होण्याची संधी मिळाली होती. याचाच अर्थ असा आहे की या प्रकरणाची चौकशी पूर्ण होत आली आहे.
ट्रंप यांच्यावर आरोपपत्र दाखल होईल या शक्यतेचाही त्यांनी इन्कार केला आहे. ते मंगळवारी कोर्टात हजर होणार ही अफवा प्रसारमाध्यमांमधील बातम्यांवर आधारित होती.
मायकेल कोहेन यांना 2018 मध्ये तुरुंगात पाठवण्यात आलं आहे. डॅनिअल आणि आणखी एका बाईला पैसे देण्याचा आणि पैशांचे गैरव्यवहार केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
कोहेन यांचे आरोप खोडण्यासाठी रॉबर्ट कोस्लो नावाचे एक वकील ट्रंप यांच्यावतीने उभे राहणार आहेत.
डॅनियल्स यांनीही या प्रकरणातील तपास अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे.
हे सगळं इतकं महत्त्वाचं का आहे?
ट्रंप यांच्या समर्थकांनी त्यांच्या वागणुकीकडे कायमच दुर्लक्ष केलं आहे.
मात्र आता पुन्हा एकदा राष्ट्राध्यक्षपदी बसण्याची मनीषा व्यक्त केल्यानंतर त्यांना या केसमध्ये कोर्टाला साक्ष देण्यासाठी यावं लागणं महत्त्वाचं ठरतं.
बीबीसी उत्तर अमेरिकेचे प्रतिनिधी अँथनी झर्कर म्हणाले की आरोपपत्र दाखल झालं किंवा अगदी शिक्षाही झाली तरी त्यांना ही निवडणूक लढण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. राष्ट्राध्यपदाची निवडणूक लढण्याची किंवा प्रचाराची मुभा तुरुंगातून सुद्धा असते.
मात्र ट्रंप यांना अटक झाली तर त्यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या स्वप्नाला खीळ बसू शकते.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








