डोनाल्ड ट्रंप यांच्या घरावर FBIने या 5 कारणांमुळे छापे मारले

फोटो स्रोत, Getty Images
- Author, ऋजुता लुकतुके
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
डोनाल्ड ट्रंप यांची अमेरिकेतली सत्ता जाऊन दीड वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला. पण, ते व्हाईट हाऊस आणि पेंटागॉनमध्ये असतानाच्या काळातली काही कायदेशीर प्रकरणं त्यांचा आजही पिच्छा सोडत नाहीत.
याच आठवड्यात फेडरल ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन अर्थात एफबीआय या अमेरिकन मध्यवर्ती गुप्तचर विभागाने त्यांच्या फ्लोरिडामधल्या घरावर छापा टाकला.
ट्रंप यांना 2024मध्ये पुन्हा अध्यक्षीय निवडणूक लढायचीय. त्यामुळे एफबीआयचे छापे हे त्यांच्याविरोधातलं राजकीय षडयंत्र आहे अशी टीका त्यांनी केलीय.
त्यांचे समर्थक रस्त्यावर उतरलेत. तर विरोधक आणखी कारवाईची मागणी करतायत. राजकारण काहीही असलं तरी अमेरिकेत पहिल्यांदाच माजी राष्ट्राध्यक्षाच्या घरावर छापा पडलाय हेही खरं आहे. अमेरिकेत नेमकं काय चाललंय समजून घेऊया.
ट्रंप यांनी गोपनीय सरकारी कागद चोरले?
फ्लोरिडामधलं मेअर ए लेगो इथलं घर हे डोनाल्ड ट्रंप यांचं वैभव. आणि ते मिरवायला उद्योजक म्हणून ट्रंप यांना नेहमीच आवडतं. या घरावर जेव्हा एफबीआयचा छापा पडला तेव्हा अमेरिकन सरकार आणि एफबीआय चिडीचूप होतं. पण, ट्रंप यांनीच ही बातमी उघड केली.
'माझं सुंदर घर… त्याला वेढा पडलाय. एफबीआयच्या लोकांनी धाड टाकलीय. घरात खूप मोठ्या संख्येनं एफबीआयचे एजंट घुसलेत.' त्यांनी आपल्या अधिकृत प्रसिद्धी पत्रकात म्हटलं.

फोटो स्रोत, donaldtrump.com
तो दिवस संपेपर्यंत ट्रंप यांनी एक भलंमोठं प्रसिद्धीपत्रकही काढलं. आणि त्यात आपली भूमिका सविस्तर मांडली.
'अमेरिकन राष्ट्राध्यक्षाच्या बाबतीत असं पूर्वी घडलेलं नाही. सगळ्या सरकारी यंत्रणांबरोबर मी वेळोवेळी सहकार्य केलेलं असताना अशी धाड न सांगता घरावर पडते. या धाडीची गरजही नव्हती. आणि ती योग्यही नाही. चुकीच्या पद्धतीने ही कारवाई केली गेली. आणि यातून न्याय व्यवस्थेचं गुन्हेगारीकरण होतंय. डाव्या डेमोक्रॅट्स लोकांचा हा निकराचा प्रयत्न सुरू आहे मी 2024ची निवडणूक लढवू नये यासाठी.'
ट्रंप यांनी यात बरेच आरोप केलेत. राष्ट्राध्यक्षपद भूषवलेल्या व्यक्तीच्या घरी छापा टाकणं, तपास यंत्रणेचा गैरवापर आणि डेमोक्रॅट्सकडून सत्तेचा गैरवापर असे एकामागून एक आरोप ट्रंप यांनी या प्रसिद्धी पत्रकात केलेत.
'अमेरिका आता इतर तिसऱ्या जगतातल्या देशांसारखी व्हायला लागलीय,' असंही म्हणायला ते विसरले नाहीत.
पण, इथं महत्त्वाचा प्रश्न हा आहे की, खरंच ट्रंप यांच्यावर ही कारवाई का होतेय?

फोटो स्रोत, Getty Images
ट्रंप यांच्या घरावर एफबीआयचे छापे का पडले?
डोनाल्ड ट्रंप यांचा अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यकाळ अनेक अर्थांनी वादळी ठरला हे नाकारता येणार नाही. 2020च्या निवडणुकीचा प्रचार आणि निकालाचा काळ तर भांडणं, कारवाया आणि कोर्ट खटल्यांचा होता.
या काळात त्यांच्याविरोधात दोन गुन्हेगारी स्वरुपाचे खटले सुरू झाले. यातला एक होता निवडणुकीचा प्रचार आणि निकाल यात हस्तक्षेप केल्याचा. आणि दुसरा, आर्थिक गैरव्यवहारांचा…
शिवाय इतरही काही प्रकरणांमध्ये त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी का यासाठी अमेरिकन संसदेचा विचार आणि चौकशी अजून सुरू आहे.
अशावेळी एफबीआयने नेमकी धाड कशासाठी टाकली हे त्यांनी स्पष्ट केलेलं नाही. पण, हे प्रकरण नॅशनल अर्कार्व्हज संदर्भातलं असण्याची शक्यता आहे. असं बीबीसीची अमेरिकेतील सहयोगी वृत्तसंस्था सीबीएस न्यूजनं म्हटलं आहे.
ट्रंप राष्ट्राध्यक्ष असताना ट्रंप यांनी सरकारी दस्ताऐवज ज्यापद्धतीने हाताळले, त्याच्या तपासणीसंदर्भात हे छापे मारल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
1. काय आहे नॅशनल अर्कार्व्हज प्रकरण
ट्रंप व्हाईट हाऊस सोडून गेले तेव्हा त्यांनी बरोबर घेतलेल्या सामानात काही बॉक्सेस होते. तेव्हा तसा एक फोटोही प्रसिद्ध झाला होता. त्यामध्ये व्हाईट हाऊसमधली गोपनीय कागदपत्रं होती असा आरोपही तेव्हा झाला होता.
प्रेसिडेन्शिअल रेकॉर्ड्स अँक्ट अंतर्गत अशी सरकारी कागदपत्रं कुणालाही हलवता येत नाहीत. फेब्रुवारीमध्ये नॅशनल आर्काईव्ह्जने ट्रंप यांच्या घरातून असे पंधरा खोके आधीच नेलेले आहेत.
आता एफबीआयने फ्लोरिडातल्या घरातून काही कागद नेले असं ट्रंप म्हणतायत. एफबीआयने काहीच स्पष्टता दिलेली नाही. पण, असे कागद नेले असतील तर ट्रंप यांच्यावर प्रेसिडेन्शिअल रेकॉर्ड्स अॅक्ट अंतर्गत कारवाई करता येईल का, हे आताच सांगता येणार नाही.
अर्थात ट्रंप यांच्याविरोधातली इतरही काही कायदेशीर प्रकरणं आहेत. ज्यांचा संबंध या एफबीआयच्या छाप्याशी असू शकतो.

फोटो स्रोत, Getty Images
2. कॅपिटॉल इमारतीबाहेर निदर्शनं - 6 जानेवारी 2021 ला कॅपिटॉल इमारतीबाहेर झालेली निदर्शनं ट्रंप यांनी घडवून आणली. त्यासाठी लोकांना उकसवलं आणि कट रचला असाही आरोप त्यांच्यावर आहे. आणि त्याची चौकशीही सुरू आहे.
3. निवडणूक हस्तक्षेप - ट्रंप यांच्यावर जॉर्जिया राज्यात मतमोजणीमध्ये हस्तक्षेप केल्याचा आरोप झाला आहे. त्यांनी एका निवडणूक अधिकाऱ्याला 'मला फक्त 11,780 मतं जिंकण्यासाठी हवी आहेत,' असा धमकीवजा फोन केल्याचा हा खटला आहे. जॉर्जियामध्ये याची चौकशी सुरू आहे.
4. आर्थिक गुन्हे - ट्रंप हे मूळात उद्योजक आहेत. न्यूयॉर्कमध्ये रिअल इस्टेट क्षेत्रात कार्यरत असताना त्यांच्यावर करबुडवेगिरी आणि बँकेत घोटाळे केल्याचेही आरोप आहेत. कर्ज मिळवण्यासाठी आपल्या मालमत्तेचं मूल्य फुगवल्याचे काही आरोप त्यांच्यावर आहेत.
5. लैंगिक गैरवर्तणूक - एका पत्रकाराशी तुम्ही असभ्य वागलात का, असा प्रश्नवजा आरोप त्यांच्यावर करण्यात आला तेव्हा ट्रंप यांचं उत्तर होतं, 'शी इज नॉट माय टाईप म्हणजेच ती माझ्या लायकीची नाही.' हे त्यांचं विधानही तेव्हा गाजलं होतं. आणि ट्रंप यांच्याविरोधात खटलाही दाखल झाला आहे.
ट्रंप गटाचा आक्षेप आहे तो माजी राष्ट्राध्यक्षाच्या घरी धाड टाकण्यावर. किंवा त्यांच्याकडे असलेली कागदपत्रं प्रेसिडेन्शिअल अॅक्ट अंतर्गत येतील की नाही याबद्दल. हा मुद्दा समजून घेऊया आंतरराष्ट्रीय विषयांचे विश्लेषक शैलेंद्र देवळाणकर यांच्याकडून.
"छापा काल पडला असला तरी कारवाई आधीच सुरू झाली आहे. फेब्रुवारीतच नॅशनल आर्काईव्ह्जनी त्यांच्याकडची काही कागदपत्रं जप्त केली. पण, आता एफबीआयचा छापा पडणं ही नक्कीच मोठी गोष्ट आहे. आणि अमेरिकन राजकारणच यातून प्रभावित होणार आहे,"देवळाणकरांनी सांगितलं.
पण, यातून कायदेशीर कारवाईची शक्यता किती आणि प्रेसिडेन्शिअर अॅक्ट लागू होऊ शकेल का? याचं उत्तर देताना देवळाणकर म्हणतात, "हा मुद्दाही वादग्रस्त ठरेल. राष्ट्राध्यक्षपद भूषवलेल्या व्यक्तीवर अशी कारवाई आतापर्यंत झाली नसली तरी ती करूच नये असा कायदाही नाही. त्यामुळे अमेरिकन सिनेट आणि काँग्रेस यांच्या हातात आहे की काय करायचं. पुढे जाऊन जो निर्णय होईल त्यावर दोन्ही बाजूंनी वादविवादही होतीलच."
ट्रंप यांना 2024 ची निवडणूक लढायची आहे, त्यातून हे राजकारण रंगवलं जातंय यावर त्याचंही दुमत नाही.
जर एफबीआयची धाड पडली असेल तर ती कायदेशीर कारवाईचीच नांदी असू शकते हे उघड आहे. आणि त्यातून हे स्पष्ट दिसतंय येणाऱ्या दिवसांत त्यावरून अमेरिकन राजकारण पेटू शकतं.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








