...तर डोनाल्ड ट्रंप यांना ट्विटरवर परत आणणार- इलॉन मस्क

फोटो स्रोत, Getty Images
ट्विटर विकत घेण्याचा व्यवहार यशस्वी झाला तर डोनाल्ड ट्रंप यांना ट्विटरवर परत आणण्याची घोषणा इलॉन मस्क यांनी केली आहे.
जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती असलेल्या मस्क यांनी गेल्या महिन्यात ट्विटर विकत घेण्याची घोषणा केली होती. आता हा व्यवहार पूर्ण झाला नसून पुढच्या दोन तीन महिन्यात हा व्यवहार पार पडेल.
डोनाल्ड ट्रंप यांच्यावर बंदी घालण्याचा निर्णय अतिशय मुर्खपणाचा होता असं मस्क यांनी फायनान्शिअल टाइम्स शी बोलताना सांगितलं.
जानेवारी 2021 मध्ये ट्विटरने ट्रंप यांचं अकाऊंट कायमचं बंद पाडलं होतं. पण मस्क म्हणाले, "मी त्यांच्यावर घातलेली बंदी उठवणार. पण अद्याप मी ट्विटरचा ताबा पूर्णपणे घेतलेला नाही. त्यामुळे ही बंदी कधी उठेल हे नेमकं सांगता येणार नाही"
ट्विटरने बंदी उठवली तरी परत येणार नाही अशी घोषणा खुद्द ट्रंप यांनी केल्याची आठवणही मस्क यांनी करून दिली. ट्विटर वर पोस्ट करण्याऐवजी ट्रूथ सोशल या त्यांच्या स्वत:च्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करतील असं ट्रंप यांनी सांगितलं होतं.
ट्विटरच्या वाढीसाठी प्रचंड संधी असल्याचं मस्क यांनी म्हटलं होतं. मजकुरावरील निर्बंध उठवणं तसंच फेक अकाऊंट्स मोडीत काढणं अशा अनेक गोष्टी करणार असल्याचं मस्क यांनी स्पष्ट केलं होतं.
फोर्ब्स मासिकाने तयार केलेल्या जगातील श्रीमंत व्यक्ती म्हणून नोंद होणाऱ्या मस्क यांच्या नावावर 273.6 बिलिअन डॉलर्स एवढी प्रचंड संपत्ती आहे. इलेक्ट्रिक कारची निर्मिती करणाऱ्या टेस्ला कंपनीचे ते प्रमुख आहेत. स्पेसएक्स कंपनीचेही ते प्रमुख आहेत.
इलॉन मस्क यांच्याशी निगडीत 5 रंजक गोष्टी
1. सायन्स फिक्शन आणि विजेबद्दल आकर्षण
इलॉन मस्कचा जन्म दक्षिण आफ्रिकेतल्या प्रिटोरियात झाला. लहानपणापासून त्यांना सायन्स फिक्शन आणि वीजेवर चालणाऱ्या गोष्टींचं अतोनात आकर्षण होतं. काहींच्या मते हे आकर्षणच पुढे जाऊन त्यांच्या स्पेसएक्स आणि टेस्ला या कंपन्यांमध्ये परावर्तित झालं.
वयाच्या सतराव्यावर्षी मस्क कॅनडात फिजिक्स आणि अर्थशास्त्र शिकायला गेले. 1992 मध्ये त्यांनी अमेरिकेतल्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला.

फोटो स्रोत, Getty Images
2. दोन दिवसात कॉलेज सोडलं
अमेरिकेत पीचडीसाठी प्रवेश घेतल्यानंतर त्यांनी मोजून दोन दिवसात कॉलेज सोडून दिलं आणि Zip2 हे ऑनलाईन वर्तमानपत्र काढलं. नंतर त्यांनी ती कंपनी विकून टाकली आणि पेपॅल ही कंपनी स्थापन केली.
2002 साली वयाच्या 31 व्या वर्षी त्यांनी पेपॅल ही कंपनी, दीड अब्ज डॉलर्सला इबे या कंपनीला विकून टाकली.
3. टेस्लाचे संस्थापक नाही
आज इलॉन मस्क आणि टेस्ला ही दोन नावं समानार्थी वापरली जात असली तरी मस्क यांनी टेस्लाची स्थापना केलेली नाही. ते आधी टेस्लाचे चेअरमॅन होते आणि 2008 साली ते या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी बनले.
पेपॅल विकल्यानंतर मस्क यांच्या हातात भरपूर पैसा आला होता. त्यांनी तो पैसा स्पेसएक्स आणि टेस्ला या कंपन्यांनीमध्ये ओतला. पण सुरुवातीला या दोन्ही कंपन्यांमध्ये त्यांना अपयश हाती आलं. स्पेसएक्सला तर एकापाठोपाठ तीन रॉकेट क्रॅश सहन करावे लागले.
4. एकाच महिलेशी दोनदा लग्न
इलॉन मस्क यांची तिनवेळा लग्न झाले आहे, पण त्यांनी एकाच महिलेशी दोनदा लग्न केलं.
मस्क यांचं पहिलं लग्न जस्टीन विल्सन यांच्याशी झालं होतं. त्या फँटसी लेखिका होत्या. त्यांचं लग्न 2000 साली झालं आणि घटस्फोट 2008 साली झाला.
त्यानंतर 2010 मध्ये मस्क यांनी टुलाह रायली यांच्याशी लग्न केलं. पण दोनच वर्षांत त्यांचा घटस्फोट झाला.
पण त्याच्या पुढच्याच वर्षी म्हणजे 2013 साली त्या दोघांनी पुन्हा लग्न केलं. पण हे लग्न-घटस्फोट-लग्न चक्र इथेच थांबलं नाही. 2014 साली मस्क यांनी पुन्हा घटस्फोटासाठी अर्ज केला आणि मागे घेतला.
2016 साली टुलाह रायली यांनी पुन्हा घटस्फोटासाठी अर्ज केला आणि ते वेगळे झाले.
असं म्हणतात की रॉबर्ट डाऊनी ज्युनियर या अभिनेत्याने आपल्या आयर्न मॅन या सिनेमातल्या पात्रासाठी इलॉन मस्क यांच्या लहरीपणावरून प्रेरणा घेतली आहे.
2018 साली कॅनडाची पॉप गायिका ग्राईम्स (खरं नाव क्लेअर बुचर) आणि मस्क एकत्र आले.
5. कोणालाही उच्चारता येणार नाही असं ठेवलं मुलाचं नाव
ग्राईम्स आणि मस्क गेल्या चार वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. त्यांना 2020 साली एक मुलगा झालं. त्याचं नाव काय म्हणाल तर X Æ A-12.
ज्यावेळी या दोघांनी बाळाच्या नावाची घोषणा केली तेव्हा ट्विटरवर प्रतिक्रियांचा पाऊस पडला. त्यात सगळे जण हाच प्रश्न विचारत होते की या नावाचा उच्चार नक्की करायचा कसा?
असे हे इलॉन मस्क. आता ते ट्रंप यांना परत आणणार म्हटल्यावर ट्विटरवर पुन्हा धुमाकूळ होणार हे नक्की.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








