अल-कायदा इराणच्या भीतीमुळे जवाहिरीच्या मृत्यूनंतरही नवा नेता जाहीर करत नाहीये का?

फोटो स्रोत, Reuters
- Author, मीना अल लामी
- Role, बीबीसी मॉनिटरिंग
अल कायदा या अतिरेकी संघटनेचा म्होरक्या अयमान अल जवाहिरीचा अमेरिकेने अफगाणिस्तानात खातमा केल्यानंतर अल कायदाची कमान कोणाच्या हाती येणार याबद्दलची चर्चा सुरू झाली आहे.
31 जुलै रोजी अमेरिकेने अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये ड्रोन हल्ला केला होता. या हल्ल्यात अल-जवाहिरीला ठार करण्यात आलं.
अमेरिकेच्या सीआयएने (सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सीने) दहशतवादाविरोधात जे ऑपरेशन सुरू केलं होतं त्यात अल-जवाहिरी मारला गेला.
त्याच्या मृत्यूची बातमी पक्की झाल्यानंतर चर्चा सुरू झाली ती आता अल-कायदामधील अल-जवाहिरीची जागा घेणार कोण?
मात्र अद्याप तरी याबाबत कोणतीही माहिती पुढे आलेली नाहीये. कारण अल-कायदा कधीही त्यांच्या संघटनेच्या प्रमुखाची जाहीर घोषणा करत नाही.
अल जवाहिरीच्या मागे तीन उत्तराधिकारी आहेत.
मात्र इजिप्तचा सय्यफ अल अदल याची उत्तराधिकार पदाची चर्चा मागच्या बऱ्याच वर्षांपासून सुरू आहे.
ऑक्टोबर 2017 मध्ये अल-कायदाचा वरिष्ठ नेता अबू अल कसम अल उर्दनी म्हणाला होता की, अल जवाहिरीचे तीन डेप्युटी होते. सर्वच्या सर्व इजिप्शियन होते. यातले दोन मारले गेले तर अबू अल कसम त्यावेळी सीरियात होता.
सैफ अल अद्ल सोबतच अबू अल खैर अल मसरी आणि अबू मुहम्मद अल मसरी हे दोघे अल जवाहिरीचे डेप्युटी म्हणून काम करत होते.
यापैकी अबू अल खैरचा 2017 मध्ये सीरियात मृत्यू झाला. त्याचवेळी अबू मोहम्मद इराणमध्ये मुक्कामाला असताना ऑगस्ट 2020 मध्ये त्याची हत्या करण्यात आली.
यानंतर सैफ अल अदल हा अल जवाहिरीचा डेप्युटी मानला जायचा. अल-कायदाच्या कोणत्याही सर्वोच्च नेत्याने किंवा समर्थकाने हे दावे नाकारलेले नाहीत.
जिहादी कार्यक्रम
काही जिहादी सांगतात त्याप्रमाणे, 2015 मध्ये इराणच्या तुरुंगात कैद्यांची अदला बदली करून अल कायदाच्या काही नेत्यांना सोडण्यात आलं होतं. यात अल अदल आणि अल मसरी सुद्धा होते.
त्यातील तिघे सीरियाला गेले. तिथं जिहादी कारवाया करता करता त्यांचा मृत्यू झाला. इतर दोन डेप्युटी इराणमध्ये होते. यापैकी फक्त अल अदल आता जिवंत आहे. त्यामुळे नजरकैदेत ठेवले जाण्याची किंवा त्याच्या प्रवासावर निर्बंध लादण्याची शक्यता आहे.

फोटो स्रोत, WWW.FBI.GOV
अल कायदाने सार्वजनिक पातळीवर अल अदलला आपला डेप्युटी नेता असल्याचं जाहीर केलेलं नाही. एवढंच नाही तर संघटना त्यांचं सध्याचं ठिकाण सुद्धा सांगत नाही.
अल अदल अल कायदाच्या प्रचारात क्वचितच दिसला असेल. अफगाणिस्तानच्या अभिलेखागारात त्याचे जुने फोटो आहेत. तो टोपणनावाने लेखही लिहितो. खरंतर त्यातून त्याची खरी ओळख उघड होत नाही.
जिहादी ज्याला आपला मोठा शत्रू मानतात त्याच शिया-बहुल इराणमध्ये आपल्या संघटनेचा नेता असल्याकारणाने कदाचित अल कायदा मीडिया आणि संदेशांमध्ये अल अदलचा नामोल्लेख टाळते.
इस्लामिक स्टेटचे समर्थक
अल कायदापासून फुटलेल्या जिहादींनी अलिकडच्या वर्षांत बऱ्याचदा म्हटलंय की, अल-कायदामध्ये अल जवाहिरीऐवजी अल अदल निर्णय घेतो. या जिहादींमध्ये इस्लामिक स्टेट या अतिरेकी संघटनेचे समर्थकही आहेत.
पण जर तो अजूनही इराणमध्येच असेल तर मात्र त्याला नेता म्हणून जाहीर करणं अल कायदासाठी आव्हान असेल. कारण त्याच्या अधिकारावर आणि आदेशांवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं.
मुख्य प्रवाहातील मीडिया आणि सुरक्षा तज्ज्ञांमध्ये चर्चेत असलेलं दुसरं नाव आहे मोरोक्कोचा अब्द अल रहमान अल मघरेबी. हा अल कायदाचा जुना सदस्य आहे.
पण सध्याच्या किंवा अलीकडच्या काळातही जिहादींमध्ये उत्तराधिकारी म्हणून त्याच्या नावाची चर्चा झाल्याचं दिसलेलं नाही.
मग अल अदल नाही तर मग कोण?
तर अलिकडच्या काही वर्षांत ड्रोन हल्ल्यांमध्ये अल-कायदाचे अनेक नेते मारले गेले आहेत. त्यामुळे अल कायदाकडे फारसे पर्याय उपलब्ध नाहीत. जर कोणते पर्याय शिल्लक राहिलेच नाहीत तर अल-कायदा त्याच्या प्रादेशिक शाखांकडे आपला मोर्चा वळवू शकते.
2013 मध्ये अल-कायदाच्या येमेन शाखेचा (एक्यूएपी) पहिला नेता नासेर अल वुहायशी याची अल जवाहिरीचा डेप्युटी म्हणून नियुक्ती झाल्याची बातमी होती. ही एक असामान्य गोष्ट होती.

फोटो स्रोत, AFP
मात्र अल कायदाने त्याच्याही उमेदवारीची जाहीर घोषणा केलेली नव्हती. पण नेतृत्वासाठी प्रादेशिक शाखेतला नेता निवडला जाऊ शकतो हे यातून समजतं.
पण 2015 मध्ये अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात अल वुहायशी मारला गेला.
अल कायदाच्या प्रमुख नेत्यांमध्ये एक नाव चर्चेत आहे ते हुर्रास अल दिन याचं. हा नेता संघटनेच्या बंद असलेल्या सीरियन शाखेचा प्रमुख होता. तो अफगाणिस्तानमधील 'जुन्या अल-कायदा'च्या काळातील नेता आहे. पण त्याचं प्रोफाइल लोकप्रिय नाहीये.
'नुसरा फ्रंट'
अबू हुम्मम अल सूरी (उर्फ फारूक अल सूरी) हा अल कायदाची पूर्वीची सीरियन शाखा असलेल्या 'नुसरा फ्रंट'चा वरिष्ठ लष्करी नेता होता.
1990 च्या दशकात अफगाणिस्तान, इराक आणि सीरियामध्ये लष्करी प्रशिक्षक म्हणून त्याची जिहादी कारकीर्द प्रभावी ठरली होती.
अल कायदाचा माजी नेता ओसामा बिन लादेनवर 2014 मध्ये जी बायोग्राफी बनली होती त्यानुसार, अबू हुम्ममचे बिन लादेनसह अल कायदाच्या अधिकाऱ्यांशी संबंध होते. हासुद्धा म्हणावा तेवढा लोकप्रिय नेता नाहीये.
अल सूरी हा उमेदवार असेलच असं नाही. पण जर का मोठी भूमिका देण्याच्या हेतूने कोणी लादेनच्या काळात अल कायदामधील दिग्गज नेत्यांची यादी बनवली तर मात्र याचं नाव पुढे येऊ शकतं.
आणखी एक दिग्गज नेता म्हणजे एक्यूएपी अधिकारी इब्राहिम अल कासी (उर्फ खुबेब अल सुदानी) ज्याने गेल्या वर्षी 500 पानांचं पुस्तक प्रकाशित केलं होतं.
अल कायदाचा इतिहास
या पुस्तकात अल कायदाच्या लोकांच्या दृष्टीकोनातून अल कायदा या संघटनेचा इतिहास मांडण्यात आलाय. अलीकडच्या काळात त्याने अल कायदाच्या वतीने हल्ले करण्याचं आवाहन केलं होतं.
त्यांच्याशिवाय एक्यूएपीचा खालिद बतारफी, अल-कायदाच्या उत्तर आफ्रिकन शाखेचा अबू उबैदाह अल अन्नाबी, सोमालियातील अल शबाब शाखेचा अहमद ओमर दिरीये आणि मालीतील अल कायदा शाखेचा इयाद घली यांचाही उमेदवारांच्या यादीत समावेश आहे.

फोटो स्रोत, Reuters
2020 मध्ये अल-कायदाने आपले बरेच प्रमुख नेते गमावले. यामुळे त्यांची संघटना कमकुवत झाली आहे.
त्याचवर्षी अल कायदाचा येमेनचा म्होरक्या कासिम अल रायमी हा जानेवारीमध्ये अमेरिकेच्या हल्ल्यात मारला गेला. उत्तर आफ्रिकेतील अल्जेरियन नेता हाबेल मलिक द्रोकदेल हा जूनमध्ये मालीत झालेल्या फ्रेंच लष्करी कारवाईत मारला गेला.
माजी नेता अबू अल कासिम अल उरदुनी जूनमध्ये अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात ठार झाल्याच्या बातम्या आल्या होत्या.
इस्लामिक स्टेटचा उत्तराधिकारी
डेप्युटी नेता अबू मुहम्मद अल मसरी याची इराणमध्ये ऑगस्टमध्ये हत्या करण्यात आली होती. तर सेंट्रल मिडिया हेड आणि विचारवंत हुसम अब्द अल रौफ ऑक्टोबरमध्ये अफगाण सैन्याच्या हातून मारला गेला.
या मोठ्या झटक्यांमुळे आता जेवढे काही नेते शिल्लक राहिलेत ते तरी वाचावेत म्हणून त्यांना अंडरग्राऊंड व्हावं लागतंय. यामुळे अल कायदाची त्यांच्या लढवय्यांशी संवाद साधण्याची क्षमता सुद्धा मर्यादित झालीय.
अल कायदा अडचणीत असताना सुद्धा उत्तराधिकारी म्हणून कोणताही अज्ञात चेहरा निवडू इच्छित नाही.
नाहीतर अल कायदाला तिची प्रतिस्पर्धी अतिरेकी संघटना इस्लामिक स्टेटकडून टीकेला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. जुलैमध्ये आपल्या शेवटच्या संदेशात अल जवाहिरीने इस्लामिक स्टेटच्या उत्तराधिकाऱ्याबद्दल सांगितलं होतं.
त्यात त्याने इस्लामिक स्टेटच्या नेतृत्वावर निशाणा साधला होता. आणि त्यांच्या नेत्यांना 'अबू अल-अन्नोन', 'अबू अल-मस्कद' आणि 'अबू अल-हाइडिंग' अशी संबोधन वापरली होती. याचा अर्थ म्हणजे ज्यांच्याबद्दल फारशी माहिती नाही असे नेते.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)









