अल जवाहिरी : इजिप्तमधला डॉक्टर ते ओसामा बिन लादेनचा राईट हँड, असा आहे प्रवास

फोटो स्रोत, Getty Images
अल कायदाचा म्होरक्या अयमान अल-जवाहिरीला अमेरिकेनं अफगाणिस्तानमध्ये एका ड्रोन हल्ल्यात मारल्याचं जाहीर केलं आहे. जवाहिरी हा अल कायदाच्या विचारधारेमागचा मुख्य सूत्रधार म्हणून ओळखला जायचा.
अल-जवाहिरी खरा पेशानं डोळ्याचा शल्यविशारद होता. त्यानं इजिप्शियन इस्लामिक जिहादी या कट्टरतावादी गटाच्या स्थापनेसाठी मदत केली होती. मे 2011 मध्ये अमेरिकेनं ओसामा बिन लादेनला मारल्यावर अल-जवाहिरीनंच अल कायदाचं नेतृत्त्व केलं होतं.
त्यापूर्वी जवाहिरी हा बिन लादेनचा उजवा हात म्हणून ओळखला जायचा. काही तज्ज्ञांच्या मते 11 सप्टेंबर 2001 रोजी अमेरिकेवर अल कायदानं केलेल्या हल्ल्यामागे अल जवाहिरीचंच डोकं होतं.
त्या हल्ल्यानंतर अमेरिकेच्या सरकारनं 22 'मोस्ट वाँटेड अतिरेक्यांची यादी' जाहीर केली होती, त्यात जवाहिरी ओसामा बिन लादेननंतर दुसऱ्या स्थानावर होता. जवाहिरीला पकडण्यासाठी 2.5 कोटी अमेरिकन डॉलर्सचं इनाम जाहीर केलं गेलं.
या हल्ल्यानंतरच्या काळात जवाहिरी अल कायदाचा मुख्य प्रवक्ता म्हणून पुढे आला. 2007 साली जवाहिरी सोळा व्हीडियो आणि ऑडियोटेप्समध्ये दिसला, म्हणजे ओसामापेक्षा चार पट जास्त. अल कायदानं त्या काळात जगभरातील मुस्लीमांमध्ये कट्टरतावाद पसरवण्याचा प्रयत्न केला होता.

फोटो स्रोत, Reuters
काबूलमध्ये गेल्या आठवड्यात केलेल्या हल्ल्यात जवाहिरी मारला गेला, पण हा जवाहिरीवर अमेरिकेनं केलेला पहिलाच हल्ला नव्हता.
जानेवारी 2006 मध्ये पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर अमेरिकेनं मिसाईल हल्ला केला होता, त्यात अल कायदाचे चार सदस्य मारले गेले. पण जवाहिरी वाचला. दोन दिवसांनी त्यानं एक व्हीडियो जारी केला आणि तत्कालीन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश यांना इशारा दिला की "जगातल्या सगळ्या शक्ती" मिळूनही जवाहिरीला मृत्यूच्या एक सेकंदही जवळ नेऊ शकत नाहीत.
प्रतिष्ठित कुटुंबात जन्म
अल-जवाहिरीचा जन्म इजिप्तची राजधानी कैरोमध्ये 19 जून 1951 रोजी एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. त्या परिवारात डॉक्टर्स आणि स्कॉलर्सही होते.
त्याचे आजोबा, राबिया अल-जवाहिरी, अल-अझार या कैरोमधील मशिदीचे ग्रँड इमाम होते. अल-अझार हे पश्चिम आशियातलं एक महत्त्वाचं सुन्नी-इस्लामिक अध्ययन केंद्र आहे. अयमान अल जवाहिरीचे एक काका अरब लीगचे पहिले महासचिवही होते.
जवाहिरी शाळेत असतानाच इस्लामिक राजकारणामध्ये शिरला. पंधरा वर्षांचा असताना त्याला बहिष्कृत मुस्लीम ब्रदरहूड या संघटनेचा सदस्य असल्याकारणानं अटक झाली होती. मुस्लीम ब्रदरहूड ही इजिप्तमधली सर्वात जुनी आणि मोठी इस्लामवादी संघटना आहे.
या राजकीय घडामोडींदरम्यान त्यानं कैरो विद्यापीठातून वैद्यकीय शिक्षण सुरू ठेवलं. 1974 साली ग्रॅज्युएशननंतर चार वर्ष सर्जरी (शल्यचिकित्सा) मध्ये मास्टर्स डिग्रीसाठी अभ्यास केला. त्याचे वडील मोहम्मद हे त्याच विद्यापीठात फार्माकोलॉजीचे प्राध्यापक होते आणि 1995 साली त्यांचा मृत्यू झाला.
कट्टर विचारसरणी
जवाहिरीनं सुरुवातीला घरच्या परंपरेचंच पालन केलं आणि कैरोच्या एका उपनगरात दवाखाना काढला. पण लवकरच तो अतिरेकी विचारसरणीच्या इस्लामिक संघटनांच्या प्रभावाखाली येऊ लागला. या संघटना इजिप्तमधलं सरकार उलथवून टाकण्याचा प्रयत्न करत होत्या.
1973 साली इजिप्शियन इस्लामिक जिहादची स्थापना झाली तेव्हा जवाहिरी त्यात सहभागी झाला. 1981 साली इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अन्वर सदात यांची एका मिलिट्री परेडदरम्यान हत्या झाली. तेव्हा या गटाच्या शेकडो संशयित समर्थकांना पकडण्यात आलं, त्यात जवाहिरीचा समावेश होता.
सदात यांनी इस्रायलसोबत शांतता करार केला होता तसंच आपल्या शेकडो टीकाकारांनाही कैद केलं होतं. त्यामुळे इस्लामी कट्टरतावादी त्यांच्यावर नाराज होते.
सदात यांच्या हत्येप्रकरणी खटला चालला, तेव्हा जवाहिरी आरोपींचा नेता म्हणून समोर आला. त्यानं कोर्टात म्हटलं "आम्ही ते मुस्लीम आहोत ज्यांचा आपल्या धर्मावर विश्वास आहे. आम्ही एक इस्लामिक राज्य आणि इस्लामिक समाजाची स्थापना करण्याचा प्रयत्न करतो आहोत."
सदात यांच्या हत्येच्या प्रकरणातून जवाहिरी निर्दोष सुटला, पण बेकायदा शस्त्रास्त्रं बाळगल्याप्रकरणी त्याला शिक्षा झाली आणि तीन वर्ष तुरुंगात काढावी लागली.
जेलनं बदललं जीवन
तुरुंगात त्याच्या सोबत असलेल्या साथीदारांच्या म्हणण्यानुसार इजिप्शियन जेल अधिकाऱ्यांनी जवाहिरीचा वारंवार छळ केला आणि त्याला मारझोडही व्हायची. असं सांगितलं जातं की या अनुभवामुळे जवाहिरी आणखी कट्टर आणि हिंसक अतिरेकी बनला.
1985 साली तुरुंगातून सुटका झाल्यावर जवाहिरी सौदी अरेबियाला गेला. तिथून तो पाकिस्तानात आणि मग शेजारच्या अफगाणिस्तानात गेला जिथए त्यानं इजिप्शियन इस्लामिक जिहादचा एक गट स्थापन केला. अफगाणिस्तानात सोव्हिएत रशियानं कब्जा मिळवला होता, तेव्हा जवाहिरी तिथे डॉक्टर म्हणून काम करत होता.

फोटो स्रोत, Reuters
1993 मध्ये इजिप्शियन इस्लामिक जिहादचं नेतृत्त्व जवाहिरीनं स्वीकारलं. इजिप्शियन पंतप्रधान आतिफ सिदकी यांच्यासह अनेकांवर झालेल्या हल्ल्यामागे जवाहिरीचा हात होता.
या गटानं नव्वदच्या दशकाच्या मध्यावर इजिप्तमध्ये सत्तापालट घडवून इस्लमी राज्य स्थापन करण्यासाठी कारवाया केल्या, त्यात 1,200 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला.
1997 साली इजिप्तच्या लुक्सॉर शहरात परदेशी पर्यटकांची हत्या झाली, त्यामागे असलेल्या गटाचा जवाहिरी म्होरक्या असल्याचं अमेरिकेच्या गृहखात्यानं म्हटलं. दोन वर्षांनी इजिप्शियन मिलिटरी कोर्टानं त्याला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली.
पाश्चिमात्य देशांवर हल्ला
1990च्या दशकात जवाहिरीनं निधी जमा करण्यासाठी आणि आसऱ्याच्या शोधात जगभर प्रवास केल्याचं सांगितलं जातं.
अफगाणिस्तानातून सोव्हिएतनं माघार घेतल्यावर जवाहिरी बल्गेरिया, डेन्मार्क आणि स्वित्झर्लंडमध्ये राहिल्याचं मानलं जातं. खोट्या पासपोर्टच्या आधारे त्यानं बाल्कन्स, ऑस्ट्रिया, येमेन, इराक, इराण आणि फिलिपिन्सचा दौरा केल्याचं सांगितलं जातं.
डिसेंबर 1996 मध्ये त्याला चेचेन्यात व्हिसाशिवाय पकडण्यात आल्याचं आणि रशियन कैदेत त्यानं सहा महिने घालवल्याचं सांगितलं जातं. जवाहिरीचं कथित म्हणणं होतं की त्याच्या संगणकावर सापडलेला अरबीतील मजकुर रशियन अधिकाऱ्यांना समजू शकला नाही आणि त्यामुळे त्याचं गुपित सुरक्षित राहिलं.
1997 साली जवाहिरी अफगाणिस्तानातलं शहर जलालाबादला गेला, जिथे ओसामा बिन लादेन राहात होता.
वर्षभरात इजिप्शियन इस्लामिक जिहाद या संघटनेनं बिन लादेनच्या अल कायदा या संघटनेसह अन्य पाच कट्टरवादी गटांशी हातमिळवणी केली आणि वर्ल्ड इस्लामिक फ्रंट फॉर जिहाद अगेन्स्ट ज्यूज अँड क्रुसेडर्स या संघटेनेची स्थापना केली.
त्यांनी एक फतवा काढला आणि अमेरिकन नागरिकांच्या हत्येला परवानगी दिली. सहा महिन्यांनंतर केनिया आणि टांझानियातील अमेरिकेच्या दूतावासांमध्ये एकाच वेळी दोन हल्ले झाले आणि त्यात 23 जणांचा मृत्यू झाला.
जवाहिरीनं त्यावेळी सॅटेलाईट फोनवरून साधलेल्या टेलिफोन संवादाचं रेकॉर्डिग हे या हल्ल्यांमध्ये बिन लादेन आणि अल कायदाचा हात असल्याचा पुरावा म्हणून वापरण्यात आलं
हल्ल्यानंतर दोन आठवड्यांनी अमेरिकेनं य गटाच्या ठिकाण्यांवर आणि ट्रेनिंग कॅम्पवर अमेरिकेनं बॉम्ब हल्ले केले. पुढच्या दिवशी जवाहिरीनं एका पाकिस्तानी पत्रकाराला फोन करून सांगितलं, "अमेरिकेला सांगा की त्यांचे बॉम्ब हल्ले, धमक्या आणि आक्रणाला आम्ही घाबरत नाही. ही युद्धाची फक्त सुरुवातच आहे."
जवाहिरीच्या मृत्यूनं काय होईल?
बिन लादेनच्या मृत्यूनंतर अमेरिकेनं जवाहिरीच्या हाताखाली काम करणाऱ्या अनेकांना हवाई हल्ल्यांत मारलं आणि जगभर पसरलेलं त्याचं जाळं कमकुवत केलं.
गेल्या काही वर्षांत जवाहिरी हा केवळ एक नामधारी म्होरक्या उरला होता, जो अधूनमधून संदेश जाहीर करायचा.
गेल्या वर्षी मोठ्या गोंधळाच्या स्थितीत अफगाणिस्तानातून अमेरिकेला बाहेर पडावं लागलं होतं. त्यानंतर अमेरिका जवाहिरीच्या मृत्यूकडे एक विजय म्हणून पाहील. पण जवाहिरीचा प्रभाव फारसा उरला नव्हताच कारण इस्लामिक स्टेटसारखे नवे गट आणखी प्रभावी होत आहेत.
अल कायदाचा नवा म्होरक्याही समोर येईलच पण त्याच्याकडे जवाहिरीइतकी ताकद असण्याची शक्यता मात्र कमीच आहे.
(संकलन - जान्हवी मुळे, बीबीसी मराठी)
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








