अमेरिका कॅपिटॉल हिल हल्ला प्रकरण : डोनाल्ड ट्रंप यांच्यावर ‘देशाविरोधात बंड पुकारण्याचा’ ठपका

फोटो स्रोत, Getty Images
- Author, ज्युडी शेरीन
- Role, बीबीसी बॉशिंग्टन
गेल्या वर्षी 6 जानेवारीला अमेरिकेच्या कॅपिटॉल इमारतीवर हल्ला झाला होता आणि तिथे दंगल माजली होती. हा हल्ला अमेरिकन नागरिकांनीच केला होता आणि यात चार लोकांचा जीवही गेला होता.
हा हल्ला ट्रंप समर्थकांनी केला होता कारण त्यांना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीत समोर आलेले निकाल मान्य नव्हते. या निवडणुकीत डोनाल्ड ट्रंप यांचा जो बायडन यांनी पराभव केला होता.
वॉशिंग्टन डीसीमध्ये अमेरिकन काँग्रेसचे (संसदेचे) सदस्य बसतात. या ठिकाणी दोन सभागृहं आहेत, त्यांना प्रत्येकी हाऊस ऑफ रिप्रेझेन्टेटिव्ह आणि सीनेट असं म्हटलं जातं.
अमेरिकन काँग्रेसमधले लोकप्रतिनिधी आणि सरकारचे प्रशासकीय अधिकारी जिथे बसतात त्या इमारतीला कॅपिटॉल बिल्डींग असं म्हणतात. ही इमारत अमेरिकेची राजधानी असलेल्या वॉशिंग्टन डीसी या शहरात आहे.
जो बायडन यांच्या विजयावर अधिकृत शिक्कामोर्तब करण्याची प्रक्रिया सुरू असताना ट्रंप समर्थकांनी इथे हल्ला करून हिंसाचार माजवला होता.
आता प्रकरणी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्यावर 'देशात बंड पुकारण्याचा प्रयत्न' केल्याचा आरोप ठेवला आहे आणि याची अमेरिकन काँग्रेसमध्ये सुनावणी सुरू आहे.
ट्रंप ज्या पक्षाचे आहेत त्या रिपब्लिकन पक्षाच्याच लिझ चेनी चौकशी समितीच्या उपाध्यक्ष आहेत. त्यांनी म्हटलं, "हा हल्ला ट्रंप यांनीच पेटवला होता."
तर डेमोक्रॅटिक पक्षाचे बेनी थॉम्पसन यांनी म्हटलं की, "या हल्ल्यामुळे अमेरिकेची लोकशाही धोक्यात आली."
जवळपास वर्षभर या हल्ल्याचा तपास चालला आणि 9 जूनला संध्याकाळी (अमेरिकन प्रमाणवेळेनुसार) याची संसदीय समितीसमोर सुनावणी सुरू झाली.
सुरुवातीला यात ट्रंप यांच्या विश्वासू सहकाऱ्यांच्या मुलाखती दाखवण्यात आल्या.

फोटो स्रोत, Getty Images
अमेरिकेचे माजी महाधिवक्ता बिल बार यांच्या साक्षीचं फुटेज दाखवण्यात आलं ज्यात ते ट्रंप यांचे निवडणुकीत अपप्रकार झाल्याचे आरोप फेटाळून लावत आहेत.
"पराभूत उमेदवार निवडणुकीच्या सत्यतेवरच शंका घेत आहेत, तेही कोणताही ठोस पुरावा नसताना... अशा जगात आपण राहू शकत नाही," बार म्हणाले.
या सुनावणीत माजी राष्ट्राध्यक्षांची मुलगी इव्हांका ट्रंप यांच्याही साक्षीचा व्हीडिओ दाखवण्यात आला ज्यात त्यांनी म्हटलं की त्यांना बार म्हणतात ते 'मान्य' आहे.
दुसरीकडे ही सुनावणी म्हणजे 'राजकीय षडयंत्र' असल्याचं ट्रंप यांनी म्हटलं आहे.
ट्रंप यांनी आधीच 2024 साली निवडणुकीला उभं राहाणार असल्याचं सुतोवाच केलं आहे. ते सतत मागच्या निवडणुकीत अपप्रकार झाल्याचे बिनबुडाचे आरोप करत असतात.
मिसिसिपीचे लोकप्रतिनिधी असलेले बेनी थॉम्पसन या संसदीय समितीचे अध्यक्ष आहेत. त्यांनी समितीसमोर म्हटलं की, "6 जानेवारीला जे घडलं तो सरकार उलथवून टाकण्याचा प्रयत्न होता."
"त्यात जो हिंसाचार झाला तो अपघात नसून ट्रंप यांचा सत्ता मिळवण्याचा अखेरचा प्रयत्न होता."

फोटो स्रोत, Getty Images
या समितीच्या उपाध्यक्ष आणि वायोमिंगच्या लोकप्रतिनिधी असणाऱ्या लिझ चेनी यांनी म्हटलं की, "ज्यांनी कॅपिटॉल बिल्डींगवर हल्ला केला आणि आपल्याच सुरक्षा यंत्रणाशी कित्येक तास लढाई केली, त्यांच्या मनात ट्रंप यांनी म्हटलेली एकच गोष्ट ठाम होती, की या निवडणुकीत मतांची हेराफेरी झालेली आहे आणि ट्रंप हेच खऱ्या अर्थाने निवडून आलेले राष्ट्राध्यक्ष आहेत."
त्या पुढे म्हणाल्या, "ट्रंप यांनीच हा जमाव गोळा केला आणि हल्ला भडकवला."
बीबीसीचे उत्तर अमेरिका प्रतिनिधी अँथनी झर्चर म्हणतात की लिझ चेनी यांनी माजी राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांच्यावर जे आरोप केलेत त्यामुळे कदाचित त्यांचीच रिपब्लिकन पक्षातली कारकीर्द धोक्यात येऊ शकते."
कॅरोलिन एडवर्ड्स, या हल्ल्यात जखमी झालेल्या पहिल्या पोलीस कर्मचारी आपल्या साक्षीत म्हणाल्या की "मला 'कुत्री' आणि 'देशद्रोही' अशा नावांनी संबोधलं गेलं. हल्लेखोरांनी त्यांना शिव्या देत, धक्का मारून बेशुद्ध पाडलं. मला काही वेळाने पांढऱ्याफटक चेहऱ्याचे ब्रायन सिकनिक दिसले, तेही खाली पडले होते आणि त्यांच्यावरही हल्ला झाला होता. त्यांचा दुसऱ्या दिवशी मृत्यू झाला."
त्या पुढे म्हणतात, "लोकांच्या रक्तावरून चालताना माझा पाय घसरत होता. युद्धासारखी परिस्थिती होती आणि लोक मारामारी करत होते. एक पोलीस कर्मचारी म्हणून काम करताना मी युद्धात अडकेन अशी कल्पना मी स्वप्नातही केली नव्हती."
झर्चर म्हणतात की ब्रिटिश डॉक्युमेंटरी फिल्ममेकर निक क्वेस्टेड 'प्राऊड बॉईज' या अतिउजव्या गटाचा माग काढत होते आणि त्यांनीही हल्ल्याच्या दिवशी काय झालं याबद्दल पुरावे दिले.

फोटो स्रोत, Getty Images
झर्चर पुढे माहिती देताना म्हणतात की, "त्या दिवशीच्या हल्ल्यात चार लोकांचा जीव गेला होता. 100 हून जास्त पोलीस अधिकारी जखमी झाले तर चार पोलिसांनी नंतर आत्महत्या केली."
या सुनावणीचं लाईव्ह टेलिकास्ट अमेरिकन टीव्हीवर दाखवलं जातंय. यावर प्रतिक्रिया देताना रिपब्लिकन पक्षाने म्हटलंय की, 'अमेरिकेच्या मिडटर्म निवडणुका आता पाच महिन्यांवर आल्या असताना या सुनावणीव्दारे डेमोक्रॅटिक पक्ष लोकांचं लक्ष भरकटवण्याचा प्रयत्न करतोय.'
झर्चर यांच्या मते येत्या नोव्हेंबरमध्ये ज्या निवडणुका होणार आहेत त्यात डेमोक्रॅटिक पक्ष सिनेट आणि हाऊस ऑफ रिप्रझेंटेटिव्ह दोन्ही ठिकाणी आपलं बहुमत गमावण्याची शक्यता आहे.
सध्या अमेरिकेतले नागरिक वाढती महागाई, बाळांच्या खाण्याचा फॉर्म्युल्याची कमतरता, वाढत्या इंधनाच्या किंमती यांच्याशी झगडत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचीही लोकप्रियता कमी झालीये.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








