ब्रिटनमध्ये वंशभेदाविरोधात लढा देत भारताच्या स्वातंत्र्यासाठी झगडणारे दोन तरुण

उजागर सिंग आणि व्ही. पी. हंसरानी

फोटो स्रोत, THE 1928 INSTITUTE

फोटो कॅप्शन, उजागर सिंग आणि व्ही. पी. हंसरानी
    • Author, वेनेस्सा पिअर्स
    • Role, बीबीसी न्यूज, वेस्ट मिडलँड्स

दुसऱ्या महायुद्धातल्या विध्वंसातून सावरताना ब्रिटननं पुनर्बांधणीकडे विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली. मात्र, पहिलीच अडचण समोर उभी ठाकली ती कामगारांच्या तुटवड्याची. त्यावेळी ब्रिटननं राष्ट्रकुल देशांकडे मोर्चा वळवला.

राष्ट्रकुल देशांमधून कामगार ब्रिटनच्या पुनर्बांधणीसाठी दाखल तर झाले, मात्र या स्थलांतरित कामगारांना दररोज वर्णद्वेष आणि भेदभावाचा सामना करावा लागत होता.

या काळात ब्रिटनचा चेहरामोहरा बदलण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली ती भारतातून युद्धापूर्वी आलेल्या दोन मित्रांनी. व्ही. पी. हंसरानी आणि उजागर सिंग अशी या दोन मित्रांची नावं. हे दोघेही भारतातील पंजाब राज्यातील रुरका कालन या छोट्याशा गावातील होते.

ब्रिटनमध्ये हे दोन मित्र दाखल झाले तेव्हा ते त्यांच्या वयाच्या विशी-पंचविशीत होते. ब्रिटनमध्ये आयुष्याची नवीन वाटचाल करता येईल, असा त्यांचा उद्देश होता.

मात्र, 'द 1928 इन्स्टिट्युट'च्या डॉ. निकिता वेद यांच्या माहितीनुसार, भारतीय स्वातंत्र्यांच्या चळवळीला प्रोत्साहन देणं, इतकंच नव्हे, तर तत्कालीन ब्रिटिश आशियाई लोकांसाठी रचनात्मक काम करणं, हेही त्यांचं योगदान आहे.

भारतीय स्वातंत्र्यापासून प्रेरित झालेल्या या जोडगोळीनं दुसरं महायुद्ध सुरू झाल्यानंतर ब्रिटनमधील कॉव्हेंट्री शहरात इंडियन वर्कर्स असोसिएशन (IWA) ची स्थापना केली.

माल्कम एक्स यांनी दिली होती भेट

या जोडगोळीचं काम देशोदेशींच्या सीमा पार करून अनेकांना प्रेरणा देईल. तसंच, स्थलांतरितांना भेडसावणाऱ्या सामाजिक आणि कल्याणकारी समस्यांना आव्हानं देणारं ठरेल.

माल्कम एक्स यांनी 1965 साली इंडियन वर्कर्स असोसिएशनला भेट दिली होती. या संस्थेला जगाच्या नकाशावर आणण्यास माल्कम एक्स यांच्या या भेटीनं बरीच मदत झाली.

मात्र, हंसरानी आणि सिंग यांना माहिती होतं की, चांगल्या आयुष्यासाठी कृती महत्त्वाची आहे आणि तीच या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी प्रत्यक्षात आणली होती.

उजागर सिंग आणि व्ही. पी. हंसरानी

फोटो स्रोत, THE 1928 INSTITUTE

लंडनमध्ये भारतीय कामगारांमध्ये राहिल्यानंतर 1939 साली हंसरानी आणि सिंग ही जोडगोळी वेस्ट मिडलँड्समध्ये गेली. या दोघांनाही बर्मिंगहॅममध्ये धातूच्या कारखान्यात नोकरी मिळाली.

व्ही. पी. हंसरानी त्यावेळच्या आठवणी सांगितल्या होत्या. त्यावेळी ते म्हणाले होते की, "तिथं काम करणं प्रचंड कठीण होतं. तिथली परिस्थिती कामासाठी अजिबात आकर्षक नव्हती. सहा दिवसांचा कामाचा आठवडा होता. आठवड्याला पगार 2.50 पाऊंड होता."

"उजागर सिंगनं मला सूचवलं की, आपण कॉव्हेंट्रीला जाऊन तिथं चांगल्या पगाराचं काम शोधून तिथं राहू."

कामाच्या शोधात असताना हंसरानींना पेडलर म्हणून काम करण्याचं प्रमाणपत्र मिळालं.

हंसरानींनी त्यांच्या आठवणपर पुस्तकात त्यांनी दोन पाऊंड्स आणि 10 शिलिंग्जमध्ये टाय, रुमाल, रेझर ब्लेड आणि इतर कपडे कसे खरेदी केले हे सांगितलंय.

दुसऱ्या महायुद्धावेळी त्यांनी आणि त्यांच्या मित्रानं शहरावर जर्मनीकडून पडणारे बॉम्ब कसे चुकवले होते आणि बॉम्बवर्षाव होत असलेली ती रात्र कॉव्हेंट्रीच्या बाहेरील भागात असलेल्या शेतात कशी काढली, हेही त्यांनी सांगितलंय.

त्याचवेळी इकडे भारतात ब्रिटिश सत्तेविरोधात स्वातंत्र्याची चळवळ जोर धरत होती.

ब्रिटिशांच्या सत्तेविरोधात महात्मा गांधी अहिंसेच्या मार्गानं लढत होते आणि त्यांच्या या अहिंसक आंदोलनाची दखल जगभरात घेतली जात होती.

1939 च्या ख्रिसमसमधील एका संध्याकाळी कॉव्हेंट्रीच्या उपनगरातल्या एका घराच्या टेरेसवर समविचारी काही मंडळी जमली. त्यात उजागर सिंग आणि हंसरानी हेसुद्धा होते. तिथे एक संघटना स्थापण्याचा विचार सुरू होता, ज्याद्वारे भारतीय स्वातंत्र्यलढ्यासाठी ब्रिटनमध्ये समर्थनाची भावना निर्माण करता येईल.

"ब्रिटनमधील कामगारांना शिक्षित करण्यासाठी केवळ या संघटनेची स्थापना करण्यात आली नव्हती, तर भारतात काय होतंय, याची माहिती देणं हासुद्धा हेतू होता. भारताला संपूर्ण स्वातंत्र्य मिळावा अशीही मागणी या संघटनेची होती," असं हंसरानी यांचे नातू अरुण वैद यांनी सांगितलं.

उजागर सिंग आणि व्ही. पी. हंसरानी

फोटो स्रोत, THE 1928 INSTITUTE

"हा गट काही हिंसक नव्हता. आंदोलनं करणं, लोकांना जोडणं आणि सहमती बनवण्यासाठी प्रयत्न करणं, हा उद्देश होता," असंही ते म्हणाले.

उजागर सिंग यांनी संघटनेच्या खजिनदाराची जबाबदारी स्वीकारली.

हंसरानींचं शिक्षण भारतात झालं होतं. त्यांनी संघटनेच्या मासिक वृत्तसेवेसाठी 'आझाद हिंद'च्या संपादनाची जबाबदारी घेतली.

वैद म्हणतात की, "हे मासिक माहिती देण्यासाठी किंवा शिक्षणासाठी होतेच, पण त्याचसोबत भारतात राज्य करणाऱ्या ब्रिटिशांचा दुटप्पीपणा दाखवून देण्याचाही उद्देश मासिक सुरू करण्यामागे होता."

वैद पुढे म्हणतात की, "एकीकडे ब्रिटन हे नाझी आणि जर्मन साम्राज्यवादाशी लढत होतं, तर दुसरीकडे ब्रिटनच भारत, आफ्रिकन आणि कॅरेबियन लोकांवर राज्य करत, तिथल्या नागरिकांना द्वितीय श्रेणीचं स्थान देत होतं.

"IWA आणि इंडियन लीगसारख्या गटांनी ब्रिटिशांचा हा दुटप्पीपणा ठळकपणे दाखवून दिला. याचा उपयोग इतर स्थलांतरित भारतीयांचं मत तयार करण्यासाठी झाला."

ब्रिटनमध्ये काम करणाऱ्या भारतीयांसंबंधी संशोधनासाठी स्थापन करण्यात आलेल्या 'द 1928 इन्स्टिट्युट'च्या थिंक टँकनं IWA चं काम सगळ्यांसमोर आणलं. पूर्वी इंडिया लीग म्हणून ही संस्था काम करत होती. मात्र, ऑक्स्फर्ड विद्यापीठासोबत संलग्न होऊन काम करू लागल्यानंतर संस्थेच्या नावात बदल करण्यात आला.

व्ही. पी. हंसरानी

फोटो स्रोत, THE 1928 INSTITUTE

फोटो कॅप्शन, व्ही. पी. हंसरानी

या काळात पंजाबमध्ये स्वातंत्र्यासाठी आंदोलनं मोठ्या जोमात सुरू होती. या आंदोलनांतून प्रेरित होत ब्रिटनमध्येही काही कट्टरतावादी गट तयार झाले होते. त्यात डावे होते. त्यांचा प्रभाव मोठा होता.

दुसऱ्या महायुद्धापूर्वी IWA सुद्धा या गटांमुळे प्रभावित झालं होतं, असं डॉ. पिप्पा विर्दी म्हणतात. ते 'कॉव्हेंट्री : स्टोरीज फ्रॉम द साऊथ एशियन पायोनिअर्स' पुस्तकाचे लेखक आहेत.

एका रक्तरंजित हत्येमुळे तर हा गट ब्रिटिश गुप्तचर सेवेच्या रडारवर आला. त्यामुळे या गटातील सदस्यांवर पाळत ठेवली गेली.

13 मार्च 1940 रोजी लंडनच्या कॅक्स्टन हॉलमध्ये उधम सिंग यांनी तत्कालीन पंजाब प्रांताचा लेफ्टनंट गव्हर्नर डायरला गोळ्या घालून ठार केलं. डायर 1919 साली झालेल्या जालियनवाला बाग हत्याकांडाला जबाबदार होता.

उधम सिंग यांनीही कॉव्हेंट्रीमध्ये IWA च्या बैठकांना उपस्थिती लावली होती. उधम सिंग यांना या हत्येप्रकरणी पुढे दोषी ठरवून फाशीची शिक्षा देण्यात आली.

व्ही पी हंसरानी

फोटो स्रोत, THE 1928 INSTITUTE

फोटो कॅप्शन, 1942 साली कॉव्हेंट्रीमध्ये मे डे परेडमध्ये व्ही पी हंसरानी आणि सहकारी सहभागी झाले होते...

इंडिया ऑफिस रेकॉर्ड्सनुसार, डायरच्या हत्येनंतर जो अहवाल लिहिला गेला, त्यात म्हटलंय की, IWA हा गट दहशतवाद्यांचा नसला, तरी तिथे विशिष्ट संख्येत असे सदस्य आहे, जे हिंसेच्या मार्गाला योग्य मानातात आणि इतरांनीही तोच मार्ग स्वीकारावा, यासाठी प्रयत्न करतात.

आझाद हिंदचं वर्णन 'आक्षेपार्ह उर्दू बुलेटिन' असं करण्यात आलं. शिवाय, असंही म्हटलं गेलं की, 'यातील लेखांमधील स्पष्टवक्तेपणामुळे हे मासिक भारतीयांमध्ये लोकप्रिय होऊ शकतं.'

ब्रिटिश लायब्ररीमधून आजोबा हंसरानी यांच्याशी संबंधित फाईल वैद यांनी शोधून काढली. ते म्हणतात की, "आजोबांना माहितही नसेल की त्यांच्यावर पाळत ठेवली जात होती. ते गुप्तचर यंत्रणांच्या निशाण्यावर असण्याची शक्यता होती."

धार्मिक हिंसा

1947 साली भारतानं ब्रिटिशांच्या सत्तेतून स्वातंत्र्य मिळवलं. मात्र, भारताची फाळणी होत भारत आणि पाकिस्तान असे दोन देश निर्माण झाले. लाखो लोकांना जबरदस्तीचं स्थलांतर करावं लागलं.

हजारो लोक धार्मिक हिंसेचे बळी पडले, तर जवळपास एक कोटी 20 लाख लोक विस्थापित झाले.

हा काळ आपण लक्षात घेतला पाहिजे. दुसरं महायुद्ध संपल्यानंतर दोन-तीन वर्षात भारताला स्वातंत्र्य मिळालंय. याच काळात ब्रिटन दुसऱ्या महायुद्धानंतरच्या विध्वंसाच्या झळा सोसत होता.

ब्रिटिश

फोटो स्रोत, THE 1928 INSTITUTE

फोटो कॅप्शन, ब्रिटिश गुप्तहेर यंत्रणांची हंसरानींवर पाळत होती...

ब्रिटन नव्यानं उभा राहू पाहत असताना, त्यांना कामगारांचा तुटवडा जाणवत होता. त्यामुळे ब्रिटननं युक्ती केली, ती अशी की, ब्रिटन नॅशनॅलिटी अॅक्ट 1948 ने राष्ट्रकुल देशांमधील नागरिकांना व्हिसाविना ब्रिटनमध्येच राहण्याचा आणि काम करण्याचा अधिकार दिला.

भारताला स्वातंत्र्य मिळालं होतं, त्यामुळे स्वातंत्र्याच्या दृष्टीने काही वेगळं काम करण्याची आवश्यकता IWA ला उरली नव्हती. त्यामुळे त्यांनी ब्रिटनमधील भारतीय नागिरकांसाठी काम करण्यास सुरुवात केली.

त्यानंतर लंडनमधील वॉल्व्हरहॅम्प्टन आणि साउथॉलसह स्थलांतरितांची लोकसंख्या असलेल्या भागात IWA च्या शाखा वाढत गेल्या.

पुढे भारताच्या राष्ट्रपतींच्या सल्ल्यानंतर स्थानिक संघटनांना एकत्र करून इंडियन वर्कर्स असोसिएशन ग्रेट ब्रिटनची स्थापना करण्यात आली. अवतार सिंग जौहल हे या संघटनेचे सध्याचे अध्यक्ष आहेत.

1958 मध्ये IWA ची बर्मिंगहॅम शाखा स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका त्यांनी बजावली. त्या काळात महत्त्वाच्या कार्यकर्त्यांपैकी एक होते.

त्या काळात टोकाचा वर्णद्वेष होता. कृष्णवर्णीय आणि आशियाई लोकांना अनेकदा पब, बार आणि रेस्टॉरंटमध्ये प्रवेशास मनाई केली जात असे. तसंच, घरमालक घरं देण्यासही नकार देत असत.

"वर्णद्वेषाविरोधात कुठलाच कायदा नव्हता. कुणीही उघडपणे वर्णाआधारे द्वेष करत असे," असं अवतार सिंग जौहल यांनी आपल्या आठवणीत म्हटलं. मग इंडियन वर्कर्स असोसिएशन्सनं (IWA) वर्णद्वेषाविरोधात अभियानं सुरू केली आणि सरकार दरबारीही आवाज बुलंद केला.

ब्रिटनमध्ये स्थलांतरित झालेल्या कामगारांना शिक्षित करण्यासह कामगार चळवळींना जोडण्याचं काम करत, भेदभावाविरोधात IWA लढू लागली.

1965 साली अमेरिकेतील मानवाधिकार कार्यकर्ते माल्कम एक्स हे ब्रिटनमधील वेस्ट मिडलँडमधील स्मेथविकमध्ये आले होते.

इंडियन वर्कर्स असोसिएशन्सनेच त्यांना निमंत्रित केलं होतं. अवतार सिंग जौहल यांनी म्हटलंय की, माल्कम एक्स आल्यानं आमची वर्णद्वेषाविरोधातली मोहीम जगाच्या नकाशावर पोहोचली.

काहीजणांच्या मते, हा भाग वर्णद्वेषाचं केंद्र होतं. मार्शल स्ट्रीटमधील तर काही घरमालकांना सांगण्यात आलं की, कृष्णवर्णीयांकडून घरं रिकामी करून श्वेतवर्णीयांना उपलब्ध करू द्यावीत.

माल्कम एक्स यांनी वृत्तपत्रांना म्हटलं होतं की, मी या भागाला भेट देण्यासाठी आलो, कारण वर्णद्वेषाच्या ज्या पद्धतीच्या बातम्या या भागातून येत होत्या, त्यामुळे मी अस्वस्थ झालो होतो.

अवतार सिंग जौहल सांगितलं होतं की, "त्यांना (माल्कम एक्स) पबमध्ये जाचं होतं. तर मी त्यांना पबमध्ये घेऊन गेलो, जिथं कृष्णवर्णीयांना प्रवेशास मनाई करण्यात येत होती."

"त्यांनी रस्त्यावर राहणाऱ्या कृष्णवर्णीयांशी संवाद साधला. काही खिडक्यांवर त्यांना पोस्टर्स दिसले, ज्यावर लिहिलं होतं की, 'केवळ श्वेतवर्णीयांनी अर्ज करावा'. या गोष्टीमुळे माल्कम एक्स यांना धक्का बसला. त्यावेळी त्यांची प्रतिक्रिया होती की, हे तर अमेरिकेपेक्षा भयंकर आहे," असं जौहल यांनी सांगितलं.

ब्रिटन

फोटो स्रोत, THE 1928 INSTITUTE

न्यू यॉर्कमधील सभेच्या नऊ दिवसांनंतर माल्कम एक्स यांच्यावर गोळीबार करण्यात आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

1970 च्या दशकात दक्षिण आशियातील बऱ्याच महिला पुरुषांपाठोपाठ नोकऱ्या करू लागल्या. त्यामुळे कामाच्या ठिकाणी चांगलं वातावरण असावं, या हेतूसाठी लढण्यासाठी त्याही IWA च्या सदस्या होऊ लागल्या.

लिसिस्टर इम्पेरियल टाईपरायटर्स फॅक्टरीमध्ये 1974 साली संप झाला. शेकडो आशियाई कामगारांनी जवळपास तीन महिने या संपात सहभाग नोंदवला. या संपाला IWA चा पाठिंबा होता. मात्र, स्थानिक परिवहन आणि सर्वसामान्य कामगारांनी पाठिंबा दिला नव्हता.

1964 साली मजूर सरकारच्या हॅरोल्ड विल्सन यांच्या निवडणुकीनंतर रेस रिलेशन्स अॅक्ट आणण्यात आला.

या सगळ्यांत IWA च्या अभियनांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचं जौहल यांनी सांगितलं.

ब्रिटन

फोटो स्रोत, STEVEN CARTWRIGHT GLASS DESIGNS

1960 च्या दशकापासून इंडियन वर्कर्स असोसिएशन्स वर्णद्वेषासह विविध मुद्द्यांवर काम करत आहे.

हँड्सवर्थच्या सोहो रोडवर 1978 साली उधम सिंग यांच्या स्मरणार्थ वेलफेअर सेंटर उभारण्यात आलं. अवतार सिंग जौहल हे या सेंटरच्या विश्वस्तांपैकी एक होते.

IWA वर पीएचडी थिसिस लिहिणारे लेखक डॉ. तलविंदर गिल यांच्या मते, "IWA ने आधुनिक ब्रिटनचा चेहरामोहरा बदलला. कॉव्हेंट्रीमध्ये स्थापन झालेल्या या संघटनेनं वर्णद्वेषविरोधी लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली."

शहरी उच्चभ्रू

दोन मित्र पंजाबमधून ब्रिटनमध्ये आले, कॉव्हेंट्रीमध्ये स्थापन झालेल्या IWA चे खंदे आधारस्तंभ बनले, पण नंतर ते इंडियन लीगचे नेते बनले.

इंडियन लीगनं IWA सोबत काम केलं. पण त्यांचे नेते आणि सदस्य हे शहरी उच्चभ्रू होते, असं डॉ. निकिता वैद म्हणतात.

ब्रिटन

फोटो स्रोत, UNIVERSITY OF LEICESTER

1928 साली कृष्ण मेनन यांनी इंडियन लीगची स्थापना केली होती. यात अधिकाधिक डावे आणि त्यातही उच्चभ्रू डावे होते. बर्ट्रांड रसेल, अन्युरिन बेव्हन आणि एच जी वेल्स यांसारखे लोकही त्यात होते.

डॉ. वैद म्हणतात की, हंसरानी आणि उजागर सिंग हे दोन तरुण पंजाबमधून इंग्लंडमध्ये पोहोचले. शिक्षणाची कमतरता असूनही साहित्यात महान समजणाऱ्या आणि इंग्रजीतल्या उच्चभ्रूंच्या खांद्याला खांदा लावून काम केलं.

उजागर सिंग यांची नात बॅरोनेस संदीप वर्मा पुढे हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये बसल्या आणि संयुक्त राष्ट्रात महिला गटाच्या अध्यक्षपदीही बसल्या.

हंसरानी आणि उजागर सिंग यांनी शेकडो भारतीयांना ब्रिटनमध्ये वास्तव्यास मदत केल्याचंही त्या सांगतात.

"आपल्या पिढीवर आपल्या पूर्वजांनी स्वातंत्र्य आणि मुलभूत हक्कांसाठी दिलेल्या बलिदानाचे उपकार आहेत - आपण ते कधीच विसरू नये."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)