बीबीसीचं कामकाज कसं चालतं, संस्थेला पैसा कुठून मिळतो?

बीबीसी, माध्यमसंस्था, युके
फोटो कॅप्शन, बीबीसी

बीबीसीची स्थापना 18 ऑक्टोबर 1922 रोजी झाली होती. त्यावेळी त्याची स्थापना मार्कोनीसह प्रमुख वायरलेस उत्पादकांनी केली होती. स्थापनेच्या वेळी नाव होतं ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कंपनी. बीबीसीद्वारे नियमित प्रसारण 14 नोव्हेंबर 1922 रोजी मार्कोनीच्या लंडन स्टुडिओमधून सुरू झालं.

33 वर्षीय स्कॉटिश इंजिनियर जॉन रीथ बीबीसीचे जनरल मॅनेजर होते.

आजच्या बीबीसीची म्हणजे ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनची स्थापना 1927 मध्ये रॉयल चार्टरअंतर्गत झाली होती. सरकारद्वारे त्याची स्थापना झाली नाही. शाही फर्मानासह बीबीसीची सुरुवात झाली आणि आजही तीच परंपरा कायम आहे.

बीबीसी ब्रिटनच्या संसदेला बांधील असते. पण बीबीसीवर कोणत्याही पद्धतीने सरकारचं नियंत्रण नाही. बीबीसी पूर्णपणे स्वायत्त आहे आणि स्वायत्तता निश्चित करण्यासाठी अनेक कठोर नियम आणि मानकं आहेत. सर जॉन रीथ यांची बीबीसीचे पहिले महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली.

चार्टरमध्ये बीबीसीचा उद्देश, अधिकारी आणि कर्तव्यं यांचं वर्णन करण्यात आलं आहे.

बीबीसीच्या धोरणांबद्दल चार्टरमध्ये सविस्तरपणे लिहिलं आहे. महासंचालक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही धोरणं राबवणं हे त्यांचं काम आहे.

लोकप्रिय आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यम

बीबीसी जगातली सगळ्यांत लोकप्रिय आणि सार्वजनिक आंतरराष्ट्रीय माध्यमसंस्था आहे. ब्रिटनसह जगभरात स्वतंत्र आणि निष्पक्ष पद्धतीने वृत्तांकन, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कार्यक्रमांची निर्मिती करणे आणि लोकांना बातम्या देणं हे बीबीसीचं काम आहे.

लोकांना बातम्यांच्या माध्यमातून शिक्षण देणं आणि मनोरंजन करणं हेही बीबीसीचं ध्येय आहे.

बीबीसी, माध्यमसंस्था, युके
फोटो कॅप्शन, बीबीसी

जगभरात बीबीसी टीव्ही, रेडिओ आणि डिजिटल अशा सर्व प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. ब्रिटनमध्ये सर्वाधिक पाहिली जाणारी बीबीसी वन ही वाहिनी राष्ट्रीय प्रसारकही आहे.

बीबीसी इंग्लंडव्यतिरिक्त उत्तर आयर्लंड, स्कॉटलंड आणि वेल्स इथेही बीबीसीच्या वाहिन्या कार्यरत आहेत.

याशिवाय ब्रिटनमध्ये बीबीसी रेडिओचं काम चालतं.

लहान मुलांसाठी बीबीसी सीबीबीज, त्याहून अधिक वयाच्या मुलांसाठी सीबीबीसी आणि किशोरवयीन मुलांसाठी चॅनेल-3 वाहिनी चालवली जाते.

ब्रिटनच्या बाहेर बीबीसीला जाहिरांतीच्या प्रसारणातून काही प्रमाणात उत्पन्न मिळतं. या मिळकतीचा वापर गुंतवणुकीसाठी केला जातो. कारण आंतरराष्ट्रीय स्तरावर निरपेक्ष आणि स्वतंत्र पत्रकारिता केली जाऊ शकेल.

सर्व जाहिराती मार्गदर्शक तत्त्वांनुसारच स्वीकारल्या जातात. जाहिरातींचा संपादकीय मूल्यांशी आणि कामकाजावर कुठलाही संबंध नसतो. जाहिराती आणि संपादकीय कामकाज या दोन्ही गोष्टी स्वतंत्र ठेवल्या जातात त्यात एकमेकांचा हस्तक्षेप नसतो.

ब्रिटनमध्ये बीबीसीचं प्रसारण (रेडिओ, टीव्ही आणि डिजिटल) जाहिरातमुक्त आहे. कारण ब्रिटनचे नागरिक बीबीसीला लायसन्स फीच्या रूपात शुल्क देतात.

बीबीसी वर्ल्ड सर्व्हिससुद्धा टेलिव्हिजन, रेडिओ आणि डिजिटल अशा विविध प्लॅटफॉर्म्सवर 40हून अधिक भाषांमध्ये उपलब्ध आहे.

बीबीसी, माध्यमसंस्था, युके
फोटो कॅप्शन, रॉयल चार्टर

रॉयल चार्टरअंतर्गत तरतुदींनुसार लायसन्स फीच्या माध्यमातून बीबीसीला पैसा मिळतो. या निधीतून बीबीसी आपले कार्यक्रम तयार करतं. रॉयल चार्टरनुसार बीबीसीला दरवर्षी आर्थिक अहवाल जाहीर करणं अनिवार्य आहे. बीबीसीच्या कामकाजावर ब्रिटनच्या नागरिकांचं बारीक लक्ष असतं. कारण लायसन्स फी प्रत्येक नागरिक देतो.

ज्या घरांमध्ये टीव्ही आहे त्या सगळ्यांना लायसन्स फी द्यावी लागते. लायसन्स फी न देणं हा एक गुन्हा आहे. हे बदलण्याची मागणी होते आहे.

बीबीसीच्या बाकी सेवांप्रमाणे बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस सुद्धा बीबीसी ट्रस्टप्रति बांधील आहे.

बीबीसी, माध्यमसंस्था, युके
फोटो कॅप्शन, बीबीसी

बीबीसी ट्रस्टची स्थापना रॉयल चार्टरच्या कलमांनुसार होते. ट्रस्टच्या सदस्यांनी जनहितासाठी काम करावं आणि बीबीसीच्या कामकाजाकडे लक्ष द्यावं अशी अपेक्षा असते.

बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसचं एक बोर्डही असतं. सर्व आऊटपूट आणि सेवांची जबाबदारी या बोर्डावर असते.

बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस

बीबीसीने एंपायर सर्व्हिस 19 डिसेंबर 1932 मध्ये सुरू केली. वर्ल्ड सर्व्हिसचं तेव्हाचं नाव एम्पायर सर्व्हिस असं होतं.

नव्या शॉर्टवेव्ह तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रसारण सुरू झालं. यामुळे प्रसारण दूरच्या भागापर्यंत प्रसारित करणं शक्य झालं.

दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान एम्पायर सर्व्हिसचा मोठ्या प्रमाणावर प्रसार झाला. त्यावेळी त्याचं नाव ओव्हरसीज सर्व्हिस असं होतं.

दुसरं महायुद्ध संपेपर्यंत बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस 40 भाषांमध्ये सुरू झाली होती.

बीबीसी, माध्यमसंस्था, युके
फोटो कॅप्शन, बीबीसी बोधचिन्ह

1965 मध्ये या सेवेचं नामांतर होऊन ते बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस असं नाव झालं.

अमेरिका आणि रशिया यांच्यातल्या शीतयुद्धाचा काळ बीबीसीसाठी आव्हानात्मक होता. अनेक देशांमध्ये बीबीसीच्या सेवेला रोखण्यात आलं. अनेक देशांमध्ये बीबीसीच्या पत्रकारांना वैयक्तिक लक्ष्य करण्यात आलं.

सर्वाधिक चर्चा बीबीसीच्या बुल्गारियाचे प्रतिनिधी जॉर्जी मार्कोव यांची झाली होती. 1978 मध्ये लंडन शहरात त्यांची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली.

शीतयुद्ध संपल्यानंतर राजकीय परिस्थिती बदलल्यानंतर अनेक युरोपीय भाषांमध्ये बीबीसीची सेवा बंद करण्यात आली. बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसने प्राथमिकता बदलली.

याच कालावधीत 2008 मध्ये अरबी भाषेत बीबीसीचं प्रसारण सुरू झालं. 2009 मध्ये बीबीसी फारसी सेवा सुरू झाली.

1991 मध्ये बीबीसीने आपली वृत्तवाहिनी सुरू केली. याची सुरुवात युरोपातून झाली. यानंतर वृत्तवाहिनीचा विस्तार आशिया आणि मध्यपूर्वेत झाला.

बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस टेलिव्हिजन न्यूजचं नाव बीबीसी वर्ल्ड असं होतं. 1998 मध्ये याचं नाव बीबीसी वर्ल्ड न्यूज करण्यात आलं.

सध्याच्या घडीला बीबीसी वर्ल्ड न्यूज 200हून अधिक देशांमध्ये उपलब्ध आहे. दर आठवड्याला प्रेक्षकांची संख्या 7.6 कोटी एवढी आहे.

1941 मध्ये लंडनचं बुश हाऊस हे बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसचं मुख्यालय होतं. 2012 मध्ये बीबीसीने बुश हाऊस सोडलं. सगळा चमू ब्रॉडकास्टिंग हाऊस इथे स्थलांतरित झाला. बीबीसीचे अन्य पत्रकारही तिथूनच काम करतात.

बीबीसी

बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस ही आंतरराष्ट्रीय मल्टीमीडिया माध्यमसंस्था आहे. रेडिओ, टीव्ही आणि डिजिटल अशा तिन्ही प्रकारात बीबीसीची सेवा उपलब्ध आहे.

जगभरात बीबीसीचे प्रेक्षक आणि श्रोते आहेत. बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसची दर आठवड्याला जी प्रेक्षकसंख्या आहे त्यापैकी एक तृतीयांश 15 ते 24 वयोगटातले आहेत.

वर्ल्ड सर्व्हिसचा एक भाग बीबीसी लर्निंग इंग्लिश हाही आहे. आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांना इंग्रजी शिकवणं हे लर्निंग इंग्लिश विभागाचं काम आहे.

इंग्रजी शिकवण्यासाठी बीबीसी लर्निंगकडे मोफत ऑडियो, व्हीडिओ आणि टेक्स्ट मटेरिअल उपलब्ध आहे.

  • 1940 नंतर बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस मोठ्या प्रमाणावर विस्तार झाला आहे.
  • बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस 40हून अधिक भाषांमध्ये कार्यरत आहे. काहिरा, सोल यांच्यासह बेलग्रेड आणि बँकॉक इथे बीबीसीची सेवा उपलब्ध आहे.
  • ब्रिटनबाहेर बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसचं सगळ्यात मुख्य केंद्र दिल्ली आणि नैरोबी हे आहे.
  • बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस डिजिटलचे वाचक - 14.8 कोटी (दर आठवड्याला)
  • बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस टेलिव्हिजनचे प्रेक्षक - 13 कोटी (दर आठवड्याला)
  • बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस रेडिओचे श्रोते - 15.9 कोटी (दर आठवड्याला)

पतपुरवठा

बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसला निधीपुरवठा ब्रिटनच्या लायसन्स फी फंडातून होतो. याबरोबरीने काही पैसा विदेश, कॉमनवेल्थ आणि डेव्हलपमेंट ऑफिसातून मिळतो.

ब्रिटनमध्ये टीव्ही पाहणाऱ्या प्रत्येकाला लायसन्स फी अदा करावी लागते. सध्याच्या घडीला लायसन्स फी वर्षाला 159 पौंड अर्थात 15हजार रुपये इतकी आहे.

बीबीसी, माध्यमसंस्था, युके
फोटो कॅप्शन, लायसन्स फी हा बीबीसीचा प्रमुख उत्पन्नाच स्रोत आहे.

सुरुवातीला ब्रिटन सरकार संसदेच्या माध्यमातून बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसला अनुदान देत असे.

संसदेकडून मिळणारी मदत फॉरेन अँड कॉमनवेल्थ ऑफिस म्हणजेच एफसीओ देत असे. 2010 मध्ये ठरल्याप्रमाणे 2014-15 पासून बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसला लायसन्स फी अंतर्गत निधीपुरवठा करण्यात येईल.

गेल्या वर्षी ब्रिटन सरकारने दोन वर्षांसाठी लायसन्स फी स्थगित केली आहे. याचा अर्थ लायसन्स फी वाढवण्यावर बंदी घालण्यात आली.

गेल्या वर्षी परीक्षणानंतर ब्रिटन सरकारने तीन वर्षांसाठी बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसला 28.3 कोटी पौंड देण्याची घोषणा केली होती. दरवर्षी ही रक्कम 9.44 कोटी पौंड इतकी होते.

लायसन्स फीव्यतिरिक्त बीबीसीला तीन व्यावसायिक कंपन्यांच्या माध्यमातून उत्पन्न मिळतं.

यामध्ये बीबीसी स्टुडिओ आणि बीबीसी स्टुडिओवर्क्सचा समावेश आहे.

व्यावसायिक कंपन्यांमधून होणाऱ्या नफ्यातून बीबीसी नव्या कार्यक्रमांसाठी गुंतवणूक करतं.

बीबीसी, माध्यमसंस्था, युके
फोटो कॅप्शन, उत्पन्नाचा स्रोत

बीबीसी वर्ल्ड न्यूज बीबीसीचं व्यावसायिक न्यूज आणि इन्फॉर्मेशन चॅनल आहे. हे चॅनेल जगातल्या अनेक देशात 24 तास प्रसारण सेवा देतं.

दैनंदिन बातम्यांच्या बरोबरीने व्यापार, क्रीडा, ताज्या घडामोडी आणि जीवनशैली यासंदर्भातील माहितीपटही प्रसारित करतं.

BBC.com ही बीबीसीची कमर्शियल न्यूज वेबसाईट आहे. आंतरराष्ट्रीय प्रेक्षकवर्गासाठी न्यूज आणि फीचर देण्याचं काम ही वेबसाईट करते.

बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर
फोटो कॅप्शन, बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)