लिट्टेचा प्रभाकरन जिवंत? श्रीलंकेचं लष्कर म्हणतं...

प्रभाकरन

फोटो स्रोत, Getty Images

लिट्टे प्रमुख प्रभाकरन आणि त्याचे कुटुंबीय जिवंत असल्याचा दावा एका तामिळी नेत्यानं केला आहे. प्रभाकरन आणि त्याचं कुटुंब इतके दिवस अज्ञातवासात होतं, असा दावासुद्धा या नेत्यानं केला आहे. श्रीलंकेच्या लष्करानं मात्र हा दावा खोडून काढला आहे. त्याचं म्हणणं आहे हा दावा पूर्णपणे चुकीचा आहे.

कोणी केला होता हा दावा?

तामिळ राष्ट्रवादाचे नेते आणि राजकारणी तसंच लेखक पण्णा नेदुमारन यांनी दावा केला की प्रभाकरन आणि त्याचे कुटुंबीय जिवंत आहेत. ते श्रीलंकन गृहयुद्ध स्मरण कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांनी याबद्दल एक पत्रकही वाचून दाखवलं.

त्यात असं म्हटलं होतं की सध्याची आंतरराष्ट्रीय परिस्थिती आणि सिंहला लोकांनी राजपक्षेंच्या विरोधात केलेली आंदोलनं यामुळे प्रभाकरनला आता अज्ञातवासातून बाहेर येण्यासाठी अनुकूल वातावरण तयार झालं आहे.

"त्यामुळे आम्हाला हे सांगण्यास अत्यंत आनंद होतोय की लिट्टेचे प्रमुख आणि नेते प्रभाकरन जिवंत आहेत आणि सुरक्षित आहेत. यामुळे त्यांच्याबद्दल असलेल्या सर्व शंका दूर होण्यास मदत होईल," नेदुमारन यांनी वाचून दाखवलं.

श्रीलंका

फोटो स्रोत, Getty Images

"प्रभाकरन तामिळ लोकांची मुक्तता करण्यासाठी लवकरच त्यांचा प्लॅन घोषित करतील. आमचं म्हणणं आहे की श्रीलंकेतल्या आणि जगभरातल्या तामिळ लोकांना एकत्र येत त्यांना पूर्ण पाठिंबा द्यावा," ते म्हणाले.

लिट्टे जेव्हा भरात होती जेव्हा प्रभाकरन यांनी कधीही भारतविरोधी असणाऱ्या देशांना श्रीलंकेत हस्तक्षेप करू दिला नाही, असं त्यांनी सांगितलं.

"भारतविरोधी असणाऱ्या देशांकडून प्रभाकर यांनी कधीही मदत घेतली नाही. आता आम्हाला दिसतंय की चीन श्रीलंकेत आपली पाळमुळं रोवतोय, त्याला भारत विरोधी करतोय. असं झालं तर हिंदी महासागरावर चीनचं साम्राज्य प्रस्थापित होईल. हे होऊ नये म्हणून भारताने पावलं उचलली पाहिजेत," असंही ते पुढे म्हणाले.

या महत्त्वाच्या काळात तामिळनाडू सरकार आणि तामिळनाडूतल्या सर्व राजकीय पक्षांनी प्रभाकरन यांना पाठिंबा द्यावा अशी मागणी नेदुमारन यांनी केली.

त्यांनी उपस्थितांच्या प्रश्नांना उत्तरंही दिली. ते म्हणाले, "मी प्रभाकरन यांच्या कुटुंबाच्या संपर्कात आहे. त्यांच्या परवानगीने मी ही त्यांच्याकडून मिळालेली माहिती तुमच्यापुढे ठेवतोय. प्रत्येकाला उत्सुकता आहे की ते कुठे आहेत आणि कधी समोर येतील. ते लवकरच समोर येतील. त्यांची पत्नी आणि मुलगी सुरक्षित आहेत."

श्रीलंका

फोटो स्रोत, Sri Lanka Army

आताच ही माहिती पुढे का आणलीत असं विचारल्यावर त्यांनी उत्तर दिलं की - आता परिस्थिती तशी आहे म्हणून. "ज्या लोकांनी राजपक्षेला सत्तेत आणलं त्यांनी सत्तेतून बाहेरही केलं. सिंहला लोकांना आता सत्य परिस्थिती कळली आहे. यापेक्षा चांगली वेळ असू शक नाही."

श्रीलंकेच्या लष्करानं दावा खोडून काढला

लिबरेशन टायगर्स ऑफ तामिळ इलम (लिट्टे)चा प्रमुख वेणुपिल्लई प्रभाकरन जिवंत असल्याचा दावा श्रीलंकन सैन्याने खोडून काढला आहे.

बीबीसी तामिळशी बोलताना श्रीलंकेच्या सैन्याचे प्रवक्ते ब्रिगेडियर रवी हेराथ यांनी म्हटलं की 2009 साली झालेल्या गृहयुद्धाच्या अखेर काळात प्रभाकरन मारला गेला होता आणि त्याबद्दल कोणताही संशय नाही.

"प्रभाकरन गृहयुद्धाच्या शेवटच्या दिवशी, 18 मे 2009 रोजी मारला गेला. त्याची डीएनए टेस्ट केली गेली ज्यातून हे सिद्ध झालं की मृत झालेली व्यक्ती प्रभाकरनच आहे. याबाबत कोणताही संशय नाही. प्रभाकरन जिवंत आहे या दाव्याने आम्हाला धक्का बसलेला नाही कारण तो दावा पूर्णपणे चुकीचा आहे," असं त्यांनी म्हटलं.

कोण होता प्रभाकरन?

करिकलन किंवा काळ्या पायाचा माणूस म्हणून ओळखला जाणारा वेलापुल्लई प्रभाकरन काही लोकांसाठी स्वातंत्र्यसैनिक होता तर अनेकांसाठी तो क्रूर दहशतवादी होता. त्याचं दहशतीचं साम्राज्य तामिळनाडू आणि श्रीलंकेत पसरलेलं होतं.

एक राष्ट्राध्यक्ष आणि भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या, श्रीलंकेच्या आणखी एका राष्ट्राध्यक्षांच्या खुनाचा प्रयत्न, शेकडो राजनैतिक खून, अनेक आत्मघाती हल्ले, हजारो निरपराध लोक आणि सैनिकांच्या मृत्यूंचा कलंक त्याच्या नावासमोर लागलाय. त्याचं नाव इतिहासात काळ्या अक्षरांनी लिहिलं गेलंय.

आपल्या आयुष्याच्या शेवटच्या लढाईत प्रभाकरन चारी बाजूंनी श्रीलंकन सैनिकांनी घेरला गेला होता. त्यांच्या एका गोळीने त्याच्या कपाळाचा वेध घेतला आणि त्याच्या मेंदूच्या चिंधड्या झाल्या. बाकी त्याच्या शरीरावर एकही जखम नव्हती. त्याचा मृतदेह नंतर कितीतरी तास तिथेच पडून होता.

आसपास घाणीचं साम्राज्य असतानाही त्याचा गणवेश एकदम स्वच्छ होता. त्याच्या कमरेच्या पट्ट्यात एक होलस्टर्ड पिस्तूल लटकत होती आणि सोबत जिवंत काडतुसंही होती. त्याच्या छातीवर धातूचं एक कार्ड होतं. त्यावर 001 असा नंबर लिहिलेला होता. त्याच्याजवळच्या एका छोट्या बॅगेत द्राक्षाच्या सुगंधाचं एक बॉडी लोशन होतं. ते सिंगापूरवरून आलेलं दिसत होतं. शिवाय डायबेटिसच्या गोळ्यासुद्धा पडलेल्या होत्या.

श्रीलंका

फोटो स्रोत, Sri Lanka army

प्रभाकरनच्या आयुष्यावर पुस्तक लिहिणारे लेखक मेजर जनरल राज मेहता सांगतात, "प्रभाकरनला त्याच्या शेवटच्या लढाईत मोलाएतुवू क्षेत्रात तिन्ही बाजूंनी वेढा घातला गेला होता. त्याच्या चौथ्या बाजूला समुद्र होता आणि तिथेही श्रीलंकन सैन्याने सापळा रचला होता. तो वाचण्याची काहीच शक्यता नव्हती. श्रीलंकन सैन्य त्यांची चर्चा रेडिओवर ऐकत होतं. त्यांना प्रभाकरनचं लोकेशन नीट माहीत होतं. त्याला चिरडून टाकायची तयारी त्यांनी केली होती."

"इथून पुढच्या काळात श्रीलंकेत कुणीही अल्पसंख्याक नसेल. आता इथे फक्त दोन प्रकारचे लोक असतील. एक म्हणजे जे राष्ट्राभिमानी असतील आणि दुसरे आपल्या मातृभूमीवर जराही प्रेम न करणारे राष्ट्रद्रोही" ही घोषणा प्रभाकरनच्या मृत्यूनंतर श्रीलंकन राष्ट्राध्यक्ष राजपक्षे यांनी संसदेत केली होती.

बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर
फोटो कॅप्शन, बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)