श्रीलंकाः बौद्ध भिख्खूमुळे मुस्लीम मंत्र्यांनी दिले राजीनामे

अथुरालिये रतना

फोटो स्रोत, EPA

फोटो कॅप्शन, अथुरालिये रतना

श्रीलंकेतल्या एका बौद्ध भिख्खूने सरकारातल्या मुस्लीम मंत्र्यांनी तसंच राज्यपालांनी राजीनामा द्यावा म्हणून आमरण उपोषण सुरू केलं. त्यानंतर काही दिवसातच या मुस्लीम व्यक्तींनी राजीनामा दिला.

श्रीलंकेत एप्रिल महिन्यामध्ये ईस्टर संडेच्या दिवशी अनेक चर्च व हॉटेल यांना लक्ष्य करुन बाँब हल्ले झाले होते.

या हल्ल्यांनंतर श्रीलंकेतल्या काही मुस्लीम संघटनांच्या विरोधात चर्चा सुरु होती. शुक्रवारी बौद्ध भिख्खू अथुरालिये रतना यांनी मंत्री रिशाद बाथिउद्दीन आणि राज्यपाल ALAM हिज्बुल्लाह तसंच अजत सैली यांच्या राजीनाम्याची मागणी करत आमरण उपोषणाला सुरवात केली होती.

बौद्ध भिख्खू अथुरालिये रतना हे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांच्या UNP या पक्षाचे खासदार आहेत.

अथुरालिये रतना आणि काही कट्टरपंथी बौद्ध संघटनांनी या मुस्लीम नेत्यांवर ईस्टर संडेला झालेल्या हल्ल्यांमध्ये सहभागी असल्याचा आरोप केला होता आणि त्यांचा राजीनाम्याची मागणी केली होती. पण मुस्लीम मंत्र्यांनी हे मात्र हे आरोप फेटाळून लावले.

अथुरालिये रतना आणि काही बौद्ध संघटनांनी या मंत्र्यांची आणि राज्यपालांची स्वतंत्र चौकशी करावी अशी मागणी केली आहे. अथुरालिये रतना यांच्या आमरण उपोषणानंतर श्रीलंकेतल्या वेगवेगळ्या भागात मोठ्या प्रमाणात आंदोलनं झाली आहेत.

बौद्ध भिक्षु आणि त्यांच्या संघटना समर्थनासाठी एकत्र आल्या होत्या. कैंडीच्या दलादा मालिगवा या बौद्ध मंदिरात अथुरालिये रतना आमरण उपोषण करत होते.

यानंतर सोमवारी दुपारी दोन मुस्लिम राज्यपालांनी अजत सैली आणि हिज्बुल्लाह यांनी राजीनामा दिला. राष्ट्रपती मैत्रिपाला सिरीसेना यांनी राज्यपालांचा राजीनामा स्वीकारला.

राज्यपालांच्या राजीनाम्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी असलेल्या सर्वच मुस्लीम मंत्री, उपमंत्री, राज्यमंत्री, राज्यपालांनीसुद्धा राजीनामा दिला. अर्थात या मंत्र्यांच्या राजीनाम्यांमुळे सरकार अस्थिर होणार नाही कारण पदाचे राजीनामे दिले असले तरी हे लोकप्रतिनिधी सत्ताधारी पक्षांचे खासदार राहतीलच.

सरकारला निष्पक्षपणे तपास करता यावा म्हणून सगळ्या मुस्लीम मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत असं स्पष्टीकरण श्रीलंकेतल्या मुस्लीम काँग्रेसचे खासदार राऊफ हकीम यांनी दिलं आहे. "तपासात कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावी. पण निर्दोष लोकांना त्रास होऊ नये," असंही ते म्हणाले.

श्रीलंकेतल्या मुस्लीम मंत्र्यांनी दिले राजीनामे

फोटो स्रोत, EPA

फोटो कॅप्शन, श्रीलंकेतल्या मुस्लीम मंत्र्यांनी दिले राजीनामे

श्रीलंकेत चाललेली मुस्लीमविरोधी चळवळ आणि आमच्यावर केले जाणारे आरोप यांच्यातून आम्हाला मुक्त होण्याची गरज होती. म्हणूनच आम्ही राजीनामे देणं गरजेचं होतं, ते पुढे म्हणाले.

हिंदू खासदारांनी घेतली मुस्लीम मंत्र्यांची बाजू

मुस्लीम मंत्र्यांच्या राजीनाम्यावर हिंदू खासदारांनी आक्षेप नोंदविला आहे. द तामिळ नॅशनल अलायन्स(TNA) यांच्या म्हणण्यानुसार मुस्लीम मंत्र्यांना भेदभावाला सामोरे जावं लागत आहे. "आज मुस्लिमांना टारगेट केले जात आहे, उद्या आमच्यावरही अशी वेळ येऊ शकते. या कठीण प्रसंगी श्रीलंकेच्या नागरिकांनी एकत्र येण्याची गरज आहे. आम्ही सगळ्या मुस्लीम समाजासोबत आहोत, "असे मत TNA चे राष्ट्रीय प्रवक्ते आणि खासदार एम सुमनतिरन यांनी व्यक्त केले.

तामिळ प्रोग्रेसिव्ह अलायन्स आणि श्रीलंकेचे हिंदू नेता मनो गणेशण म्हणतात, "जर सरकार बौद्ध संन्यासी लोकांच्या हिशेबाने चालू लागलं तर गौतम बुद्ध पण देशाला वाचवू शकणार नाहीत. तसंच मुस्लीम लोकांवर कोणतेही आरोप सिद्ध झालेले नाहीत किंवा ते संशयास्पद हालचालींमध्ये सहभागी आहेत असं आढळून आलेलं नाही."

ते म्हणतात की मुस्लीम मंत्र्यांना जबरदस्तीने राजीनामा द्यायला लावणे हा गौतम बुद्धांचा अपमान आहे. तसं झालं तर श्रीलंकेला बौद्ध जगात बौद्ध देशाच्या रूपात स्वीकारले जाणार नाही.

अथुरालिये रतना यांच्या उपोषणाचं कोलंबो येथील आंदोलनकर्त्यांनी समर्थन केले आहे. मुस्लीम मंत्र्यांनी राजीनामा दिल्यानतंर रतना यांनी त्यांचे उपोषण सोडले आहे.

सोमवारी रोजा सोडण्याआधी नऊ मंत्र्यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले की, "ते अशांतता संपून शांतता प्रस्थापित व्हावी म्हणून राजीनामा देत आहेत."

भीतीच्या छायेत मुस्लीम जनता

शहर व जल विकास मंत्री राऊफ हकीम यांनी सांगितले, "या काही दिवसात देशातील मुस्लीम जनता भितीच्या छायेत जगत आहे."

एप्रिल महिन्यात झालेले बाँब हल्ले हे श्रीलंकेच्या इतिहासातला सगळ्यात मोठा हल्ला आहे या आधी खुप वर्षांपूर्वी श्रीलंकेत झालेल्या गृह युद्धात मोठया संख्येने लोक मारले गेले होते. हे युद्ध 2009 मध्ये LTTE प्रमुख प्रभाकरन यांच्या मृत्युनतंर संपलं होतं. एप्रिलमध्ये झालेल्या हल्ल्यांची जबाबदारी इस्लामिक स्टेटने घेतली आहे.

श्रीलंकेत मुस्लीम विरोधी निदर्शनं झाले

फोटो स्रोत, EPA

फोटो कॅप्शन, श्रीलंकेत मुस्लीम विरोधी निदर्शनं झाले

त्यानंतर जमावांनी मुस्लिमांच्या घरांवर आणि दुकानांवर हल्ले केले होते. यानतंर सरकारने आणिबाणी घोषित केली. 2014 साली सिरिसेना यांच्या विजयात मुस्लीम आणि तमिळ समाजाने महत्त्वाची भूमिका बजावली होती.

राजीनाम्यानंतरही अनेक मंत्री सरकार पडू नये यासाठी सरकारचे समर्थन करणार असून आहेत.

कट्टरपंथी बौद्ध भिख्खू झाले एकजूट

अथुरालिये रतना यांना अजून एका कट्टरपंथी बौद्ध भिख्खूने समर्थन दिलं आहे. गलागोडा अथे ज्ञानसारा असं त्यांचं नाव आहे.

ज्ञानसारांवर मुस्लिमांच्या विरोधात हिंसा भडकवण्याचे आरोप आहेत. ते 'बुद्धिस्ट पॉवर फोर्स' ही मोहीम चालवतात. ज्ञानसारा यांनी न्यायालयाच्या अवमान केल्या प्रकरणी सहा वर्षाचा तुरुंगवास भोगला आहे. नुकतीच त्यांना राष्ट्रपती अपमानाच्या आरोपातून माफी दिली गेली आहे.

रविवारी ज्ञानसारा यांनी सरकारला इशारा देताना म्हटलं की जर तीन मुस्लीम मंत्र्यांना सोमवार पर्यंत पदावरुन दूर केले नाही तर संपूर्ण श्रीलंकेत तमाशा होईल

श्रीलंकेतले मुस्लीम भीतीच्या छायेत जगत आहेत?

फोटो स्रोत, Reuters

तीन मुस्लीम मंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर पूर्ण श्रीलंकेत याची निंदा होत आहे. काही वरिष्ठ राजकारण्यांनी बौद्ध भिख्खूंच्या मागण्यांवर टीका केली आहे.

या सगळ्या घडामोडींनतंर श्रीलंकेतल्या राजकीय वातावरणात उलथापालथ होण्याची शक्यता आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)