श्रीलंका बाँबस्फोट: हल्ल्यात गेलेल्या निष्पाप बालकांची कहाणी

फोटो स्रोत, Getty Images
- Author, आयेशा परेरा
- Role, बीबीसी प्रतिनिधी, श्रीलंकेहून
एका आठवड्याआधी श्रीलंकेत झालेल्या साखळी हल्ल्यांमध्ये अनेक निष्पाप जीव गेले. त्यात अनेक लहान मुलंसुद्धा होती. एका महत्त्वाच्या सणासाठी ती छान तयार झाली होती. श्रीलंकेत हिंसाचाराचं पर्व संपल्यानंतर जन्माला आलेली ही पहिलीच पिढी होती.
स्नेहा सविंद्री फर्नांडो ईस्टर संडेच्या प्रार्थनेसाठी नेगोंबोमध्ये सेंट सेबॅस्टियन चर्चमध्ये गेली होती. तिच्या डोक्यात अनेक गोष्टी होत्या. आपल्या 13व्या वाढदिवसासाठी ती काही योजना आखत होती. आता तिला तो दिवस कधीच साजरा करायला मिळणार नाही.
"ती एका पक्ष्यासारखी होती. तिला नाचायला आवडायचं. अगदी कशावरही तिला नृत्य करायला आवडायचं. जर तुम्ही तिला कधीही डान्स करायला सांगितलं तर ती कायम एका पायावर तयार असायची," असं तिची आई निराशा फर्नांडो सांगत होत्या. स्नेहा, तिची आई, आमि शेजारी राहणारे एकत्रच ऑटोरिक्षात गेले.
नेगोंबोमध्ये झालेल्या हल्ल्यात अनेक बालकांचा मृत्यू झाला. स्नेहा त्यांच्यापैकी एक आहे. ज्यावेळी हा हल्ला झाला त्यावेळी चर्च आणि हॉटेलवरही हल्ला झाला होता.
चर्च आणि हॉटेलच का?
मी ज्या पीडितांशी बोलले त्या सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात लहान मुलांचे मृतदेह पाहिले. या हल्ल्यात किती जणांचा मृत्यू झाला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र या हल्ल्यात बालकांचा मोठ्या प्रमाणात मृत्यू झाला आहे, असं पोलिसांनी सांगितलं.
याचं कारण असं की चर्च आणि हॉटेलमध्ये हल्ला करणं सगळ्यात सोपं होतं, कारण सणावारांचे दिवस असल्यामुळे हॉटेल्स भरली होती आणि चर्चमध्ये मोठ्या प्रमाणावर लोक येणार हे निश्चित होतं.

फोटो स्रोत, Family Handout to BBC
स्नेहाची आई निराशा त्यांच्या मुलीच्या फोटोकडे उदास नजरेने पाहत होत्या. त्यांच्या ओठाच्या वरच्या भागातही बाँबचे तुकडे घुसले होतो. त्याचा त्यांना वारंवार त्रास होतो. तिथे एक कायमचा व्रण तयार झाला आहे आणि या भीषण हल्ल्याची आठवण म्हणून तो सातत्याने सोबत राहणार आहे.
आम्ही तिला घरी दुवानी असं म्हणायचो. ती माझी पहिली मुलगी होती. मी तिला झोका देऊन झोपवायचे, मी तिला माझ्या हातात धरायचे. मी तिला इतकं प्रेमाने वाढवलं आणि आता ती कायमची निघून गेली.
त्या दिवशी निराशा आणि इतर लोक चर्चच्या अगदी समोरच्या भागात उभे होते. जेव्हा स्फोट झाला तेव्हा स्नेहाच्या शरीराच्या अक्षरश: चिंधड्या उडाल्या. त्यामुळे तिच्या शरीराचे अवशेष एका पेटीत बांधून आणावे लागले.
मी तिचा चेहराही पाहू शकले नाही, निराशा सुन्नपणे सांगतात.

नेगोंबोमधील एका हॉलमध्ये एक विदारक दृश्य दिसलं. तिथे एका बाजूला एक अशा चार शवपेट्या ठेवल्या होत्या. रशिनी प्रवीशा (वय 14), शालोमी हिम्या (वय 9) आणि शालोम शथिस्का (वय 7), अशा तीन भावंडांचे मृतदेह तिथे होते.
त्यांचे नातेवाईक प्रचंड हादरले होते. डोळ्यांनी जे दिसत होतं त्यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता. तितक्यात एक ज्येष्ठ नातेवाईक तिथे आली आणि दु:खावेगाने कोसळली. "शालोम शालोम.." असा आक्रोश त्यांनी केला. त्या अगदी तिच्या शवपेटीवर कोसळल्याच.
"तू किती खोडकर होतीस. तू नेहमी आमच्या खोड्या काढायचीस, ऊठ गं बाळा, ऊठ..." अशा शब्दांत त्यांनी आपल्या दु:खाला वाट मोकळी करून दिली.

थोड्या वेळाने काही नातेवाईकांनी तिला तिथून उचलण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा आक्रोश काही केल्या थांबत नव्हता.
पहिली निष्पाप पिढी
मानसशास्त्रज्ञ निवेंद्र उदुमन यांच्यामते असं म्हणणं घाईचं ठरेल, कारण त्याचा सध्याच्या परिस्थितीत गैरवापर होऊ शकतो.
कारण काहीही असलं तरी या निष्पाप फोटोंनी जनतेचं लक्ष वेधून घेतलं. ही पिढी म्हणजे पहिली 'निष्पाप' पिढी आहे, असं म्हणता येईल. युद्ध, फाळणी, क्रूरता हा कधीच त्यांच्या दिनचर्येचा भाग नव्हता.
फुटीर तामिळ कट्टरवादी आणि सरकारमध्ये 30 वर्षं युद्ध सुरू होतं. ते संपूनही आता दहा वर्षं होतील. या गृहयुद्धामुळे देशभरात हिंसाचार झाला आणि दोन्ही बाजूंनी प्रचंड हिंसाचार झाला.

फोटो स्रोत, Reuters
युद्धपूर्व काळातील पिढीने दोन रक्तरंजित उठाव पाहिले. पहिला 1970च्या दशकाच्या शेवटी, दुसरा 1980 च्या दशकाच्या शेवटी आणि तिसरा नव्वदीच्या दशकाच्या सुरुवातीला पाहिला. त्यामुळे तिथलं जीवन अतिशय विस्कळीत झालं होतं. अनेक महिने तिथे शाळा बंद असायच्या. सरकारने हा उठाव हाणून पाडण्याचा निर्घृण प्रयत्न केला. त्यामुळे आणखीनच रक्तपात झाला.
त्यामुळे या हल्ल्यात मुलांचा झालेला मृत्यू आणखीच चटका लावून गेला. याचा अर्थ या काळात काहीच घडलं नाही, असा होत नाही. या काळात मुस्लिमांविरुद्ध दंगली झाल्या, चर्चवर हल्ले झाले. धार्मिक तणावही होता. मात्र त्याने इतकी वाईट पातळी गाठली नव्हती. त्याचा फटका तामिळ, सिंहली आणि मुस्लीम समुदायाला बसला.
लेडि रिजवे बालरुग्णालयाचे संचालक डॉ. अजिथ दंतनारायण यांच्यासाठी हल्ल्यानंतरची परिस्थिती एक कटू आठवण बनून राहणार आहे.
"ती सगळी लहान मुलं होती. तिथे जातपात धर्म काहीच नव्हतं. आम्ही 30 वर्षं युद्ध पाहिलं, त्सुनामीही पाहिली. आम्ही बऱ्याच वाईट परिस्थितीला तोंड दिलं. आम्ही रुग्णांवर योग्य उपचार केले. आम्ही तितकंच करू शकतो."
संपूर्ण रुग्णालयातही हीच भावना होती.
"कमीत कमी मला ही परिस्थिती माहिती होती. जी लोकं हिंसाचारात मारली गेली त्यांना आम्ही ओळखत तरी होतो. टीव्ही आणि पेपरमध्ये आम्हाला तेच दिसत होतं. पण हे मी माझ्या मुलाला कसं सांगू?" वसंता फर्नांडो मला विचारत होते.

त्यांचा सात वर्षांचा मुलगा अकलांका सेंट सॅबेस्टियन चर्चवर झालेल्या हल्ल्यात जखमी झाला. पायात एक लोखंडी बेरिंग घुसल्यामुळे त्याचा पाय फ्रॅक्चर झाला. मी जेव्हा गेले तेव्हा त्याला त्याच दिवशी सुटी मिळणार होती. मात्र आपण इथे का आलो आहे, हे त्याला कळलं नव्हतं.
"त्याने स्फोटाचा आवाज ऐकला आणि विचारलं की बाँब म्हणजे काय? मी त्याला सांगितलं की हा एक प्रकारचा फटाका असतो. त्याने जखमा होतात किंवा माणूस मरतो, याची त्याला कल्पना नाही. मात्र मला त्याला काहीतरी सांगायला हवं, कारण त्याचे अनेक मित्रमैत्रिणी या जगातच नाही," फर्नांडो सांगतात.
मुलांच्या मनात अफवांची धास्ती
या हल्ल्यांच्या जखमा पुरत्या भरल्याही नसताना श्रीलंकेतील अनेकांसमोर आपल्या मुलांच्या मनातील भीती कशी दूर करायची, हा प्रश्न निर्माण झाला आहे. हल्ल्याचा अनुभव घेतलेली लहान मुलं आधीच प्रचंड भेदरलेली आहेत.
बाट्टीकोला हॉस्पिटलसाठी मानसोपचारतज्ज्ञ म्हणून काम करणाऱ्या डॉ. गडामबंथन हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या अनेक मुलांना तातडीनं भेटले.
शारीरिक इजांसोबतच या मुलांना प्रचंड भीती, निद्रानाश, भयानक स्वप्नं अशा मानसिक समस्यांना तोंड द्यावं लागू शकतं, हे त्यांच्या लक्षात आलं होतं. जखमांमुळं निर्माण झालेलं व्यंग, हल्ल्यात मूल गमावल्यानंतरच्या दुःखामुळं पालकांचं दुसऱ्या मुलांकडे होणारं दुर्लक्ष तसंच आई-वडील किंवा भावंडाच्या मृत्यूनं बसलेला धक्का या घटनेतून वाचलेली मुलं सहन करू शकत नाहीत.
बाट्टीकोलामध्ये मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात काम करणाऱ्या एका कार्यकर्त्यानं नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितलं, की हल्ल्यामध्ये बळी पडलेल्या मुलांवर थेट परिणाम होत असतोच. पण हल्ल्यांचे व्हीडिओ पाहणं, मोठ्या माणसांच्या मनातली सततची असुरक्षितता अनुभवणं आणि अफवा यांमुळे इतर मुलांच्या मनातला ताणही वाढतो.
"मला अशा अनेक पालकांचे फोन आले आहेत, ज्यांची मुलं आपल्या घरावर किंवा शहरावर बाँब पडेल या विचारानं सतत घाबरून राहतात. त्यांना झोप लागत नाही. हे का झालं असा प्रश्न त्यांना पडलाय. काहीजण हल्लेखोरांच्याबद्दल राग व्यक्त करत आहेत."

फोटो स्रोत, Getty Images
'युनिसेफ'सारख्या संघटनांनीही या समस्येची गांभीर्यानं दखल घेतली आहे. पालकांनी मुलांना या घटनेबद्दल कसं समजावून सांगावं, यासंबंधी युनिसेफ आणि अन्य संघटनांनी सूचनाही दिल्या आहेत. सोशल मीडियावर या सूचना खूप व्हायरल होत आहेत.
पालक, हॉस्पिटलमधील कर्मचारी तसंच शिक्षकांनाही या मुलांना कसं हाताळावं याचं मार्गदर्शन केलं जात आहे. मुलांना शाळेत नियमितपणे पाठवायला सुरुवात करणं हा या समस्येवरचा एक तोडगा असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.
दयानी समारकून या कोलंबो स्कूलमध्ये सात ते बारा वर्षं वयाच्या मुलांना शिकवतात. या हल्ल्यानंतर शाळेत येणाऱ्या मुलांशी संवाद साधण्यासाठी त्या खास तयारी करत आहेत. मुलांच्या वयोगटानुसार त्यांच्याशी काय आणि कसं बोलायचं, हे दयानी ठरवत आहेत.
"जी मुलं अगदीच लहान आहेत, त्यांना कदाचित नेमकं काय झालंय, हे कळणारही नाही. त्यामुळं त्यांना काय माहिती आहे, हे मी आधी जाणून घेईन. त्यांना माहिती असलेल्या काही गोष्टींमध्येच तथ्य असेल. उरलेल्या गोष्टी केवळ ऐकीव माहिती असेल."
मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी समुपदेशनासारख्या सुविधा श्रीलंकेत किती उपलब्ध होतील, याबद्दल अनेक जण शंका व्यक्त करत आहेत. कारण श्रीलंकेत अजूनही मानसिक आजारांबद्दल उघडपणे बोललं जात नाही. अनेक मोठ्या माणसांनाही या हल्ल्यामुळं धक्का बसला आहे. मात्र ते स्वतःही समुपदेशन घेतील की नाही याबद्दल शंकाच आहे.
'आईसाठी एकानं तरी मागं रहायचं'
हल्ल्यातील मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश अजूनही थांबलेला नाही.
नेगोम्बोमध्ये एक स्त्री मोठमोठ्यानं रडत होती, दुःखानं आपली छाती आपटत होती. सेंट सेबॅस्टियन चर्चवर झालेल्या हल्ल्यात या महिलेचा नवरा आणि दोन्ही मुलं मृत्युमुखी पडली होती.
त्यांची मुलगी साचिनी 21 वर्षांची होती तर मुलगा विमुक्थी 14 वर्षांचा होता. दोन्ही लेकरं अतिशय हुशार होती, असं त्यांचे दीर ज्यूड प्रसाद यांनी सांगितलं.
साचिनी अकाउंटिंगचा कोर्स करत होती. विमुक्तीलाही कधी अभ्यासावरून रागवावं लागलं नाही, असंही त्यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, Family handout to BBC
"या मुलांनी थोडंतरी खेळावं म्हणून आम्ही खूप प्रयत्न केले. पण त्यांना पुस्तकांमध्येच जास्त रस होता," असं ज्यूड सांगत होते.
विमुक्तीला संगीतातही रस होता. "जेव्हा तो पाचवीची परीक्षा उत्तीर्ण झाला, तेव्हा त्यानं माझ्या भावाकडे हे मागितलं," ज्यूड यांनी कापऱ्या आवाजात कोपऱ्यातल्या ड्रम सेटकडे बोट दाखवून म्हटलं.
"मी आणि माझा भाऊ हे आणण्यासाठी पार वेन्नापुवा पर्यंत गेलो होतो. (हे शहर त्यांच्या गावापासून 21 किलोमीटर दूर होतं.) विमुक्तीला हे प्रचंड आवडलं होतं."
त्याचवेळी एक व्यक्ती आतमध्ये आली आणि जिथे मृतांचे फोटो लावले होते, त्या भिंतीकडेच गेली. तिनं तिथं लावलेल्या दोन लहान मुलांच्या फोटोवरून हळुवारपणे हात फिरवला. "तुमच्यापैकी एकजण तरी आपल्या आईसाठी मागे का नाही राहिला?" ती आता जोरजोरात रडत हेच म्हणत होती. "कोणी एकजण तरी का नाही थांबला?"
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








