Sri Lanka Blasts: श्रीलंका मध्ये आणखी एक स्फोट, 'आंतरराष्ट्रीय नेटवर्क'चा हात असल्याचा संशय

फोटो स्रोत, Getty Images
श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये आणखी एक स्फोट झाला आहे. शहरातल्या कोची कडाई भागात सेंट अॅन्थोनी चर्चबाहेर हा स्फोट झाला.
कोलंबोमध्ये गेलेल्या बीबीसी तमिळच्या प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार बॉम्ब निष्क्रिय करताना हा स्फोट झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
रविवारी झालेल्या या साखळी बॉम्बस्फोटात 290 हून जास्त जणांचा बळी गेला तर जवळपास 500 जण जखमी झाले.
'आंतरराष्ट्रीय नेटवर्क'च्या मदतीने हे साखळी बॉम्बस्फोट घडवल्याचं सरकारी अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. नॅशनल तोविड जमात या स्थानिक जिहादी गटाने हे स्फोट घडवले आणि त्यासाठी परदेशी दहशतवादी संघटनांची मदत घेण्यात आली, असा दावा श्रीलंकेच्या सरकारने केला आहे.
स्फोटांनंतर पोलिसांनी घातलेल्या धाडीमध्ये 24 जणांना अटक करण्यात आली आहे.

फोटो स्रोत, Reuters
सोमवारी मध्यरात्रीपासून श्रीलंकेत देशभर आणीबाणी लागू करणार असल्याची माहिती श्रीलंकेच्या राष्ट्रपती कार्यालयाने दिली आहे.
कॅबिनेट प्रवक्ते रजीता सेनारत्ने यांनी सांगितलं, "या देशात राहणाऱ्या लोकांनी हे स्फोट घडवले असावे, असं आम्हाला वाटत नाही. आंतरराष्ट्रीय नेटवर्कचा हात असल्याशिवाय हे स्फोट घडवणं शक्यच नाही."
यानंतर जारी करण्यात आलेल्या पत्रकात म्हटलं आहे की या साखळी बॉम्बस्फोटामागे असलेल्या आंतरराष्ट्रीय नेटवर्कचा पर्दाफाश करण्यासाठी राष्ट्रपती मैत्रिपाला सिरीसेना आंतरराष्ट्रीय समुदायाला मदतीचं आवाहनही करणार आहेत.
राष्ट्रपती कार्यालयाचे अधिकारी म्हणाले, "गुप्तचर खात्याच्या अहवालानुसार स्थानिक अतिरेकी गटांमागे परकीय दहशतवादी संघटना सक्रीय असण्याची शक्यता आहे. त्यामुळेच राष्ट्रपती इतर राष्ट्रांना सहकार्याचं आवाहन करणार आहेत."

फोटो स्रोत, Reuters
श्रीलंकेचे पंतप्रधान रनील विक्रमसिंघे रविवारी म्हणाले होते, "असा काहीतरी घातपात होऊ शकतो, याची माहिती सुरक्षा संस्थांना होती. मात्र त्या माहितीवर कुठलीच कारवाई करण्यात आली नाही."
सोमवारी रात्री आठ ते मंगळवारी पहाटे चार वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात येणार आहे. बाँबस्फोटात बळी गेलेल्यांसाठी मंगळवारी राष्ट्रीय शोक व्यक्त करण्यात येणार आहे.
श्रीलंकेच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने म्हटलं आहे की सोमवारी मध्यरात्रीपासून लागू करण्यात येणाऱ्या आणीबाणीचा उद्देश अतिरेक्यांना लक्ष्य करणं हा आहे. या आणीबाणीमुळे लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येणार नाही.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








