श्रीलंकेत उत्खननात सापडले 90 सांगाडे, गृहयुद्धाशी संबंध असल्याचा संशय

- Author, अनबरासन एथीराजन
- Role, बीबीसी प्रतिनिधी, मन्नार
उत्तर श्रीलंकेतल्या मन्नारमध्ये मोठ्या संख्येनं मानवी सांगाड्यांचे अवशेष आढळून आले आहेत. कोणे एकेकाळी युद्ध झालेल्या या भागात आढळलेल्या या अवशेषांचं तज्ज्ञांकडून परीक्षण सध्या सुरू आहे.
मन्नारमधल्या एका बस स्थानकाजवळ एका इमारतीसाठी काही कामगार खोदकाम करत असताना 90 सांगाडे आढळून आले. यानंतर स्थानिक न्यायालयानं या जागेचं पूर्ण उत्खनन करण्याचे आदेश दिले आहेत.
2009 मध्ये श्रीलंकेतलं गृहयुद्ध संपल्यापासून उत्तर श्रीलंकेत सापडलेलं हे दुसरं मोठं कब्रस्तान आहे. श्रीलंकेत 26 वर्षं सैन्य आणि तामिळ फुटीरतावाद्यांमध्ये गृहयुद्ध चाललं. या युद्धात तब्बल एक लाख लोकांचा मृत्यू झाला तर अनेक जण बेपत्ता झाले.
लहान मुलांचेही सांगाडे
कोलंबो जवळच्या केलानिया विद्यापीठातील फोरेंसिक आर्केओलॉजिस्ट प्रा. राज सोमदेवा या उत्खनन कार्यात आपल्या सहकाऱ्यांसह संशोधन करत आहेत. त्यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, "हा संपूर्ण परिसर दोन भागात विभागता येतील. यातल्या एका भागात दफनभूमी आढळली आहे. तर दुसऱ्या भागात मानवी सांगाड्याचे अवशेष विखुरलेल्या स्थितीत आढळले आहेत."
अजून खूप मोठ्या जागेत उत्खनन करणं बाकी असून यापेक्षा जास्त मानवी सांगाड्यांचे अवशेष सापडण्याची शक्यता असल्याचं त्यांनी सांगितलं. या अवशेषांमध्ये सहा लहान मुलांचे सांगाडेही होते.

या लोकांना नेमकं कुणी मारलं? एवढ्या मोठ्या संख्येनं मरण पावलेले नेमके कोण लोक आहेत? तसंच या लोकांना कधी मारण्यात आलं? हे अजून तरी अस्पष्ट आहे.
स्थानिक पोलिसांनी या जागेला संरक्षण पुरवलं आहे, जेणेकरून इथे कुणालाच छेडछाड किंवा हस्तक्षेप करता येणार नाही आणि तज्ज्ञांना सांगाड्यांची हाडं, समोर दिसणाऱ्या कवट्या मातीतून अलगद वेगळ्या काढता येतील. छोटे ब्रश आणि अवजारांच्या सहाय्यानं या सांगाड्यांना बारकाईनं वेगळं काढण्याची प्रक्रिया सध्या वेगानं सुरू आहे.
या सांगाड्यांसोबत कपडे आणि इतर कोणतेही पुरावे आढळलेले नाहीत. त्यामुळे मृतांची ओळख पटवणं अवघड झालं आहे.
मन्नार शहरात वांशिक अल्पसंख्याक गटात तामिळभाषिकांची संख्या सर्वाधिक आहे. गृहयुद्धाच्या काळात मन्नार शहर लष्कराच्या अधिपत्याखाली होतं. प्रभाकरन यांच्या Liberation Tigers of Tamil Eelam (LTTE) चं या भागात आणि भोवतालच्या जिल्ह्यांत वर्चस्व होतं. अत्यंत क्रूरपणे लढल्यानंतर लष्करानं 10 वर्षांपूर्वी हा संपूर्ण जिल्हा ताब्यात घेतला होता.
तज्ज्ञांपुढे प्रश्नचिन्ह
या दफनभूमीत ज्या पद्धतीनं मृतदेह ठेवण्यात आले आहेत, त्या रचनेवरून उत्खनन करणाऱ्या तज्ज्ञांपुढेही प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. सोमदेवा याबद्दल सांगतात, "आम्ही या मृतदेहांच्या रचनेमुळे चिंतेत आहेत. कारण हे मृतदेह एकमेकांवर टाकल्यासारखे वाटत आहेत. एकाखाली दुसरा मृतदेहही आढळतो आहे."
ज्यांचे सांगाडे आढळले आहेत, त्यांचा मृत्यू नेमका कसा झाला याबाबतचं संशोधनही प्रा. सोमदेवा आणि त्यांचे सहकारी करणार आहेत. तूर्तास तरी कुणालाही त्यांच्या मृत्यूसाठी जबाबदार धरण्यात आलेलं नाही.
सोमदेवा यांचं पथक हे मानवी अवशेष गोळा करून ते मन्नारच्या कोर्टाच्या ताब्यात दिले आहेत. इथलं सगळं उत्खनन पूर्ण झाल्यानंतर या सांगाड्यांचं काय करायचं, हे न्यायालय ठरवणार आहे.

युद्ध संपल्यानंतर श्रीलंकेत यापूर्वी युद्ध झालेल्या ठिकाणी अनेक दफनभूमी आढळल्या आहेत. मात्र मन्नारमधल्याच थिरुथीस्वरम इथे सापडलेली दफनभूमी आजवरची सगळ्यांत मोठी दफनभूमी आहे. 2014 मध्ये इथल्या दफनभूमीत 96 सांगाडे आढळले होते. पण आज चार वर्षांनंतरही इथे कुणी कुणाला मारलं आहे, याबद्दलची स्पष्टता नाही.
मानवतावादी गटांनुसार लष्कर आणि LTTE, हे दोन्ही गट मानवी मृत्यूंना जबाबदार आहेत. या संपूर्ण वादाच्या काळात जवळपास 20,000 नागरिक बेपत्ता झाले आहेत.
पण नागरिकांची बेपत्ता होण्याची आणि त्यांचे मृत्यू होण्याच्या कोणत्याही घटनांना लष्कर जबाबदार नसल्याचं सरकारचं म्हणणं आहे. गेल्या अनेक वर्षांच्या आंतरराष्ट्रीय दबावानंतर सरकारने 'Office of the missing persons' (OMP) म्हणजेच हरवलेल्या माणसांच्या शोधार्थ एक वेगळी समिती स्थापन केली आहे. या समितीनं मन्नारच्या उत्खननासाठी निधी पुरवला आहे.
या समितीचे अध्यक्ष सॅलिया पिअरिस यांनी मन्नारच्या उत्खननातून सखोल माहिती गोळा करणं आवश्यक असल्याचं म्हटलं आहे. ते सांगतात, "हरवलेल्यांची माहिती गोळा करणं आणि त्यांच्या नातेवाईकांना कळवणं हे प्राथमिक काम या समितीमार्फत करण्यात येतं. जर एखाद्या भागात मोठी दफनभूमी आढळली आणि तिथले काही नागरिकही गायब असतील तर जे हरवले आहेत ते या दफनभूमीत आहेत का, हे शोधणं महत्त्वाचं ठरेल."
पण यापूर्वी आढळलेल्या दफनभूमी नेमक्या कुणाच्या आहेत, याचा तपास करण्यात अजूनही सरकारला यश आलेलं नाही. त्यामुळे या नव्या शोधांमुळे नेमकं काय साध्य होईल, याबद्दल तामिळी नागरिकांनी साशंकता व्यक्त केली आहे.

फोटो स्रोत, AFP
कॅथलिक डायोसिजचे विकार जनरल (ख्रिश्चन धर्मीयांची प्रशासकीय बाजू सांभाळणारे अधिकारी) विक्टर सोसाई हे याविषयी माहिती देताना सांगतात, "मन्नार जिल्ह्यांतले शेकडो जण या युद्धादरम्यान गायब झाले आहेत. यावेळी अनेकांनी या अशांत भागातून शांत भागांमध्ये स्थलांतरण करणं पसंत केलं. या युद्धावेळी बोटींमध्ये बसून भारताचा किनारा गाठण्याचा प्रयत्न करणाऱ्या अनेक तामिळींनाही अडवण्यात आलं होतं. त्यांच्या अस्तित्वाबद्दलही ठोस माहिती उपलब्ध नाही."
सोसाई यांनी मन्नार जिल्ह्याचे बिशप इम्यॅन्युएल फर्नांडो यांच्यासोबत नुकत्याच आढळलेल्या या दफनभूमीला भेट दिली होती. सोसाई पुढे सांगतात, "आम्हाला असं कळलं की, त्यांना इथे लहान मुलं आणि ज्येष्ठांचे सांगाडे सापडले आहेत. त्यामुळे हे लोक नेमके कोण आहेत? ते कशामुळे मेले आणि त्यांना मारण्यामागे नेमकं कोण जबाबदार होतं? हे पुढे येणं गरजेचं आहे."
तामिळी कट्टरतावाद्यांना विरोध करणाऱ्यांना LTTEनी क्रूरपणे संपवलं. तसंच पकडण्यात आलेल्या श्रीलंकेच्या सैनिकांना मारल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे.
हे युद्ध संपुष्टात आल्यानंतर या तामिळ टाईगर्सनी पळून जाणाच्या प्रयत्नात असलेल्या नागरिकांवर गोळीबार केल्याचा आरोप काही तामिळींनी केला आहे.
ईशान्येकडील मुल्लईतिवू जिल्ह्यातील किनाऱ्यांवर युद्धाच्या अखेरच्या दिवसांत या घटना घडल्या होत्या. तसंच लष्करानंही अनेकांवर अत्याचार केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

फोटो स्रोत, HUMAN RIGHTS WATCH
पण मन्नारमध्ये आढळलेल्या सांगांड्यांशी लष्कराच्या सैनिकांचा कोणताही संबंध नसल्याचं लष्करानं स्पष्ट केलं आहे.
लष्कराचे प्रवक्ते ब्रिगेडियर सुमित अटापट्टू याबाबत बोलताना सांगतात, "या दफनभूमीचा आणि लष्कराचा कोणताही संबंध नाही. तसंच लष्करावर कुणी आरोपही केलेला नाही."
जर श्रीलंकेच्या सरकारला त्यांच्या भूतकाळावर मात करायची असेल तर त्यांनी तत्काळ या दफनभूमीतील मृतांचा शोध घेऊन त्याबाबत चौकशी करावी, असं इथल्या अल्पसंख्य तामिळ नागरिकांचं म्हणणं आहे. तरच बाधित झालेल्या कुटुंबांना त्यांच्या समस्येचं समाधान झाल्यासारखं वाटेल, असंही त्यांनी नमूद केलं आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








