करुणानिधी पिवळी शाल आणि काळा गॉगल का घालायचे?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, बीबीसी
- Role, तामिळ टीम
(तामिळनाडूच्या राजकारणातील एक महत्त्वपूर्ण व्यक्ती करुणानिधी यांचा आज (3 जून) जन्मदिन आहे. त्यांच्याविषयीचा हा लेख पुन्हा शेअर करत आहोत.)
ज्येष्ठ द्रमुक नेते आणि तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री करुणानिधी यांचं निधन झाल्यानंतर सर्च इंजिन आणि कोरा सारख्या सोशल मीडियावर त्यांच्याबद्दलच्या विविध प्रश्नांची उत्तर शोधली जात होती.
करुणानिधी काळा चष्मा का वापरत होते, त्यांच्या खांद्यावर नेहमी पिवळी शाल का असायची अशा प्रकारचे प्रश्न अनेकांच्या मनात येत आहेत. त्यातील काही प्रश्नांची ही उत्तर.
1. करुणानिधी नेहमी पिवळी शाल का घ्यायचे?
करुणानिधी यांच्या खांद्यावर नेहमी पांढरी शाल असायची. पण 1994पासून पांढऱ्या शालची जागा निळ्या शालीनं घेतील. 1994मध्ये त्यांना लाळग्रंथींचा आजार झाला होता. या ग्रंथींना सूज येत असे आणि ही सूज त्यांच्या गालांवर दिसायची. डॉक्टरांनी त्यांना गळा उबदार ठेवण्यासाठी नेहमी शाल घेण्याचा सल्ला दिला होता.
त्यानंतर त्यांनी पिवळी शाल गळ्याभोवती घ्यायला सुरुवात केली. त्यांचे मित्र, कुटुंबीय यांनी त्यांना ही शाल शोभून दिसते असं सांगितलं. त्यानंतर त्यांनी गळ्याभोवती पिवळी शाल कायम ठेवली.

फोटो स्रोत, Getty Images
पिवळी शाल ही करुणानिधी यांची अंधश्रद्धा आहे, अशी टीकाही त्यांच्यावर झाली होती. याला उत्तर देताना त्यांनी ओशोंच्या एका वाक्याचा संदर्भ देत म्हटलं होतं, "जे स्वतःवर राज्य करतात आणि जे प्रकाशासारखे सत्य असतात ते पिवळे वस्त्र परिधान करतात."
2. करुणानिधी यांच्या डाव्या डोळ्याला काय झालं होतं?
1953ला परामाकुडी इथून रामनाथपुरमला येत असताना करुणानिधी यांच्या गाडीला अपघात झाला होता. या अपघातात त्यांच्या डाव्या डोळ्याला इजा झाली होती. या डोळ्यावर 12 शस्त्रक्रिया झाल्या होत्या. 1967ला पुन्हा अपघात झाला आणि त्यात त्यांच्या याच डोळ्याला पुन्हा दुखापत झाली. डोळा सतत दुखत असल्याने त्यावर 19971ला अमेरिकेत शस्त्रक्रिया करावी लागली होती. त्यानंतर त्यांनी डोळे दिसणार नाहीत, असा काळा चष्मा वापरणं सुरू केलं. 2000पासून त्यांनी पारदर्शक काळा चष्मा वापरायला सुरुवात केली. या चष्म्यामुळे त्यांचे डोळे दिसू शकत होते.
3. हिंदू असूनही करुणानिधी यांचं दफन का?
करुणानिधी हिंदू घरात जन्माला आले होते, तरीही हिंदू पद्धतीप्रमाणे त्यांच्या पार्थिवाचं दहन न करता दफन का करण्यात आलं?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
तमिळ नेते, विचारवंत आणि द्रविड चळवळीचे प्रणेते पेरियार यांचा करुणानिधी यांच्यावर मोठा प्रभाव होता. हिंदू धर्मातल्या प्रथांचा ते प्रथमपासूनच विरोध करत असत. करुणानिधी टोकाचे नास्तिकही होते. म्हणूनच हिंदू धर्माच्या प्रथांवर त्यांचा विश्वास नव्हता. त्यामुळे अण्णा दुराई या त्यांच्या राजकीय गुरुंप्रमाणे करुणानिधी यांच्या पार्थिवाचंही चेन्नईच्या मरीना बीचवर दफन करण्यात आलं.
4. एम. जी. रामचंद्रन (MGR) यांच्या अंत्यविधीला ते गेले होते का?
एम. जी. रामचंद्रन यांचं ज्या दिवशी निधन झालं तेव्हा करुणानिधी इरोड इथून परत येत होते. त्यांना जेव्हा ही बातमी कळली तेव्हा ते तातडीने चेन्नई इथल्या रामवरम परिसरातील एम. जी. रामचंद्रन यांच्या घरी हार घेऊन गेले.

फोटो स्रोत, BBC Archives
माजी मंत्री माधवन यांनी त्यांना एम. जी. रामचंद्रन यांचं पार्थिव ज्या खोलीत ठेवलं होतं तिथं नेलं. त्यांनी एम. जी. रामचंद्रन यांना श्रद्धांजली वाहिली.
या संदर्भातील आठवण सांगताना ते म्हणतात, "एम. जी. रामचंद्रन यांच्या घरी जाण्याचा आणि त्यांना श्रद्धांजली वाहण्याचा निर्णय जर मी तत्काळ घेतला नसता तर नंतर ते कधीच शक्य नव्हतं. कारण दोन्ही पक्षांत त्यावेळी फारच कटूता होती."
एम. जी. रामचंद्रन यांच्या निधनानंतर उसळलेल्या दंगलीत अण्णा सालई येथील करुणानिधी यांचा पुतळा फोडण्यात आला होता.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








