ICC Women's T-20 World cup: जेमिमाचा एल्गार; भारतीय टीमचा पाकिस्तानवर 7 विकेट्स राखून विजय

जेमिमा रॉड्रिग्जच्या झुंजार अर्धशतकाच्या बळावर महिला T-20 विश्वचषकात भारताने पाकिस्तानला 7 विकेट्सने नमवत विजयी सलामी दिली.

पाकिस्तानने दिलेल्या 150 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघ काहीसा अडचणीत होता. पण जेमिमा रॉड्रिग्ज आणि ऋचा घोषने चौथ्या विकेटसाठी 33 चेंडूत नाबाद 58 धावांची भागीदारी करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

भारताची सलामीवीर स्मृती मन्धाना बोटाला झालेल्या दुखापतीमुळे या सामन्यात खेळू शकली नाही. तिच्या जागी खेळणाऱ्या यात्सिका भाटियाने 17 धावा केल्या. धडाकेबाज फलंदाजीसाठी प्रसिद्धी शफाली वर्माने 25 चेंडूत 33 धावांची खेळी केली. पण मोठा फटका खेळण्याचा तिचा प्रयत्न फसला. कर्णधार हरमनप्रीत कौर 16 धावा करुन तंबूत परतली. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या जेमिमाने ऋचाला साथीला घेत धावफलक हलता ठेवला. शेवटच्या षटकांमध्ये चौकारांची लयलूट करत जेमिमाने 38 चेंडूत 8 चौकारांसह नाबाद 53 धावांची खेळी केली.

पाकिस्तानने कर्णधार बिस्माह मारूफच्या अर्धशतकाच्या बळावर 149 धावांची मजल मारली.

मात्र बाकी फलंदाजांनी तिला साथ दिली नाही. भारतातर्फे राधा यादवने 2 तर दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

पण सामना सुरू होण्यापूर्वीच भारताला एक धक्का बसला होता. भारतीय टीमची स्टार फलंदाज आणि उप-कर्णधार स्मृती मंधाना ही या खेळात सहभागी होणार अनेकांची निराशा झाली होती पण भारताने सामना जिंकल्यानंतर उत्साहाचे वातावरण आहे.

स्मृती मंधानाला बोटाला जखम झाल्यामुळे तिला या सामन्यात खेळता आले नाही. टीमचे कोच हृषिकेश कानिटकरांनी सामन्यापूर्वी याबाबत माहिती दिली होती.

स्मृती मंधानाच्या हाडाला जखम झालेली नाही त्यामुळे 15 फेब्रुवारी रोजी वेस्ट इंडिजविरोधात होणाऱ्या सामन्यात स्मृती मंधाना खेळण्याची पूर्ण शक्यता असल्याचेही कानिटकरांनी सांगितले होते.

भारतीय टीम

हरमनप्रीत कौर ( कॅप्टन), शफाली वर्मा, यास्तिका भाटिया, जेमिमा रॉड्रिग्स, ऋचा घोष (विकेटकीपर), हरलीन देओल, दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड आणि रेणुका सिंह.

पाकिस्तान टीम

बिस्माह मारूफ (कॅप्टन), जावेरिया वदूद, मुनीबा अली (विकेटकीपर), निदा डार, आएशा नसीम, आलिया रियाज, फातिमा सना, सिदरा अमीन, ऐमन अनवर, नश्र सुंधू आणि सादिक इकबाल.

10 फेब्रुवारी 2023 ला 8 व्या ICC महिला टी-20 वर्ल्ड कपला सुरुवात झाली आहे. या वर्ल्ड कपचं यजमानपद दक्षिण आफ्रिकेला मिळालं आहे.

2009 साली महिला टी-20 वर्ल्ड कपला सुरुवात झाली होती. 2009 मध्ये इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात झाली होती. 2012 पर्यंत संघांची संख्या 8 असायची पण 2014 पासून या वर्ल्ड कपमध्ये एकूण 10 संघ खेळतात.

महिला टी-20 वर्ल्ड कपच्या आतापर्यंत सात सिजन झाले आहेत. 2009, 2010, 2012, 2014, 2016, 2018 आणि 2020 मध्ये हे वर्ल्ड कप झाले आहेत.

2022 मध्ये कोरोनामुळे वर्ल्ड कपचे आयोजन झालं नव्हतं.

यावर्षी आता आयर्लंड आणि बांगलादेश या दोन टीम सामील करण्यात आल्या आहेत.

या वर्ल्ड कपमध्ये दोन ग्रुप आहेत

ग्रुप 1 - ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि बांगलादेश

ग्रुप 2 - भारत, इंग्लंड, वेस्ट इंडिज, पाकिस्तान आणि आयर्लंड

टीम रॅकिंग -

टीम रॅंकिंगमध्ये ऑस्ट्रेलिया प्रथम, इंग्लंड द्वितीय, न्यूझीलंड तृतीय स्थानी आहे. चौथ्या क्रमांकावर भारत आहे, दक्षिण आफ्रिका पाचव्या स्थानी, वेस्ट इंडिज सहाव्या, पाकिस्तान सातव्या, श्रीलंका आठव्या स्थानी, बांगलादेश नवव्या स्थानी तर आयर्लंड 10 व्या स्थानी आहे.

भारताने आतापर्यंत एकही वेळा हा वर्ल्ड कप जिंकलेला नाही.

पहिली मॅच दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका अशी झाली.

दुसरी मॅच वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड अशी होणार आहे तर 11 फेब्रुवारी रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड मॅच झाली.

12 फेब्रुवारी रोजी भारत पाकिस्तान सामना होणार झाला. याच दिवशी बांगलादेश आणि श्रीलंकेत सामना झाला.

या स्पर्धेचा पहिला सेमीफाइनल 23 फेब्रुवारीला असेल आणि दुसरा सेमीफायनल 24 फेब्रुवारीला. अंतिम सामना 26 फेब्रुवारीला ठेवला आहे, तर 27 फेब्रुवारी ही तारिख राखीव ठेवण्यात आली आहे.

विश्वचषक विजेते कोण असू शकतात?

ऑस्ट्रेलिया

ऑस्ट्रेलियाचा महिला क्रिकेट संघ जानेवारी 2022पासून आतापर्यंत एकाच सामन्यात पराभूत झालाय. भारताने त्यांना या वर्षभरात एकदा पराभूत केलंय.

या सामन्याचा निर्णयसुद्धा सुपरओव्हरमध्ये झाला होता. म्हणजे दोन्ही संघात एकदम चुरशीचा सामना झाला होता.आतापर्यंत झालेल्या सात टी 20 विश्वचषकात ऑस्ट्रेलिया 5 वेळा विजयी झाला आहे.

इंग्लंड

2009 साली सुरू झालेला महिला टी20 विश्वचषक इंग्लंडने जिंकला होता. 2012,2014,2018 साली अंतिम सामन्यापर्यंत हा संघ पोहोचला पण ते जिंकू शकलेले नाहीत. 2022 साली झालेल्या 18 सामन्यांपैकी 13 सामने या संघाने जिंकले आहेत. ऑस्ट्रेलियापाठोपाठ हा संघ विश्वचषक जिंकण्याच्या स्पर्धेत आहेत. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडशिवाय वेस्ट इंडिजच्या संघाने विश्वचषक जिंकलेला आहे.

वेस्ट इंडिज

वेस्ट इंडिजच्या महिला संघाने 2016 मध्ये हा चषक जिंकला होता. परंतु मागच्या वर्षीची त्यांची कामगिरी पाहाता ते पुन्हा चॅम्पियन बनतील असं वाटत नाही.

सरासरीपेक्षाही वेस्ट इंडिजचा खेळ खराब झाला आहे. गेल्या वर्षी झालेल्या 18 सामन्यांपैकी या संघाने फक्त 5 सामने जिंकले आहेत.

न्यू झीलंड

विश्वचषकाच्या स्पर्धेत न्यूझीलंडचा संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. गेल्या वर्षी झालेल्या 18 पैकी 10 सामने या संघाने जिंकले आहेत. आतापर्यंत या संघाने विश्वचषक जिंकलेला नाही मात्र 2009 आणि 2010 साली ते अंतिम सामन्यापर्यंत पोहोचले आहेत.

भारत

भारताने गेल्या वर्षभरात 30 टी 20 सामने खेळले आहेत.

त्यापैकी 17 सामने जिंकले आहेत. आजवर भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला नसल्यामुळे आताचा चषक महत्त्वाचा आहे.

2020मध्ये भारताचा संघ अंतिम फेरीत पोहोचला होता.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)