You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
ICC Women's T-20 World cup: भारताचा पहिला सामना पाकिस्तानविरोधात
10 फेब्रुवारी 2023 ला 8 व्या ICC महिला टी-20 वर्ल्ड कपला सुरुवात होती आहे. या वर्ल्ड कपचं यजमानपद दक्षिण आफ्रिकेला मिळालं आहे.
2009 साली महिला टी-20 वर्ल्ड कपला सुरुवात झाली होती. 2009 मध्ये इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात झाली होती. 2012 पर्यंत संघांची संख्या 8 असायची पण 2014 पासून या वर्ल्ड कपमध्ये एकूण 10 संघ खेळतात.
महिला टी-20 वर्ल्ड कपच्या आतापर्यंत सात सिजन झाले आहेत. 2009, 2010, 2012, 2014, 2016, 2018 आणि 2020 मध्ये हे वर्ल्ड कप झाले आहेत.
2022 मध्ये कोरोनामुळे वर्ल्ड कपचे आयोजन झालं नव्हतं.
यावर्षी आता आयर्लंड आणि बांगलादेश या दोन टीम सामील करण्यात आल्या आहेत.
महिला टी-20 वर्ल्ड कपमध्ये कोण कोणत्या ग्रुपमध्ये आहे?
या वर्ल्ड कपमध्ये दोन ग्रुप आहेत
ग्रुप 1 - ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि बांगलादेश
ग्रुप 2 - भारत, इंग्लंड, वेस्ट इंडिज, पाकिस्तान आणि आयर्लंड
टीम रॅकिंग -
टीम रॅंकिंगमध्ये ऑस्ट्रेलिया प्रथम, इंग्लंड द्वितीय, न्यूझीलंड तृतीय स्थानी आहे. चौथ्या क्रमांकावर भारत आहे, दक्षिण आफ्रिका पाचव्या स्थानी, वेस्ट इंडिज सहाव्या, पाकिस्तान सातव्या, श्रीलंका आठव्या स्थानी, बांगलादेश नवव्या स्थानी तर आयर्लंड 10 व्या स्थानी आहे.
भारताने आतापर्यंत एकही वेळा हा वर्ल्ड कप जिंकलेला नाही.
पहिली मॅच दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका अशी होणार आहे. ही मॅच केपटाउन येथे होईल.
दुसरी मॅच वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड अशी होणार आहे तर 11 फेब्रुवारी रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड मॅच होईल.
12 फेब्रुवारी रोजी भारत पाकिस्तान सामना होणार आहे. हा सामना केपटाऊनमध्ये होईल.
याच दिवशी बांगलादेश आणि श्रीलंकेत सामना होईल.
या स्पर्धेचा पहिला सेमीफाइनल 23 फेब्रुवारीला असेल आणि दुसरा सेमीफायनल 24 फेब्रुवारीला. अंतिम सामना 26 फेब्रुवारीला ठेवला आहे, तर 27 फेब्रुवारी ही तारिख राखीव ठेवण्यात आली आहे.
भारतीय महिला टीम
हरमनप्रीत कौर (कॅप्टन), स्मृती मंधाना, शेफाली वर्मा, यस्तिका भाटिया, ऋचा घोष, जेमिमा रोड्रिग्स, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, देविका वैद्य, राधा यादव, रेणुका ठाकुर, अंजली सरवानी, पूजा वस्त्राकर, राजेश्वरी गायकवाड आणि शिखा पांडे.
राखीव खेळाडू - स्नेह राणा और मेघना सिंह.
खेळाडूंची रॅंकिंग
25 जानेवारी 2023 ला ICC ने रेणुका सिंहला इमर्जिंग वूमन प्लेअर ऑफ द इअर निवडलं आहे.
भारतीय टीमची गोलंदाज रेणुका सिंह, ऑस्ट्रेलियाची डार्सी ब्राउन, इंग्लंडची एलिस कॅपसे आणि भारताच्याच याशिका भाटियाला मागे टाकत रेणुकाला प्लेअर ऑफ द इअर निवडलं आहे.
वैयक्तिक रॅंकिंगबद्दल जर आपण चर्चा केली तर असं लक्षात येईल की रेणुका सिंहचं गोलंदाजांमधील रॅंकिंग सातवं आहे.
महिला गोलंदाजांमध्ये पहिल्या क्रमांकावर इंग्लंडची सोफी एक्लेस्टोन आहे, तर दुसऱ्या स्थानी इंग्लंडचीच सारा ग्लेन आहे. तिसऱ्या स्थानी दीप्ती शर्मा आहे. तर नव्या स्थानी स्नेह राणा आहे.
फलंदाजांमध्ये ऑस्ट्रेलियाची ताहिला मॅग्रा प्रथम क्रमांकावर आहे. स्मृती मंधाना तृतीय आणि शेफाली वर्मा आठव्या स्थानी आहे.
हरमनप्रीत कौर आणि स्मृती मंधाना यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
तज्ज्ञांच्या मते 26 वर्षीय स्मृती भविष्यात टीमचे नेतृत्व करू शकते.
ऑल राउंडर रॅंकिंगमध्ये ऑस्ट्रेलियाची अॅश गार्डनर पहिल्या क्रमांकावर आहे तर दीप्ती शर्मा तिसऱ्या स्थानी आहे.
भारताने आतापर्यंत हा कप आतापर्यत जिकंला नाही, त्यामुळे भारत हा कप देशात आणतो का हे पाहणे औत्सुक्याचे राहील.
2020 भारत फायनलमध्ये पोहोचला होता, पण ऑस्ट्रेलियाच्या टीमकडून भारताला हार पत्करावी लागली होती. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत पाच वेळा महिला टी-20 वर्ल्ड कप जिंकला होता.
भारतात यावर्षी महिला आयपीएल स्पर्धा देखील होणार आहेत. महिला क्रीडा क्षेत्राच्या दृष्टीने हे एक मोठे पाऊल आहे, असं बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी म्हटलं होतं.
विश्वचषक विजेते कोण असू शकतात?
ऑस्ट्रेलिया
ऑस्ट्रेलियाचा महिला क्रिकेट संघ जानेवारी 2022पासून आतापर्यंत एकाच सामन्यात पराभूत झालाय. भारताने त्यांना या वर्षभरात एकदा पराभूत केलंय. या सामन्याचा निर्णयसुद्धा सुपरओव्हरमध्ये झाला होता. म्हणजे दोन्ही संघात एकदम चुरशीचा सामना झाला होता.आतापर्यंत झालेल्या सात टी 20 विश्वचषकात ऑस्ट्रेलिया 5 वेळा विजयी झाला आहे.
इंग्लंड
2009 साली सुरू झालेला महिला टी20 विश्वचषक इंग्लंडने जिंकला होता. 2012,2014,2018 साली अंतिम सामन्यापर्यंत हा संघ पोहोचला पण ते जिंकू शकलेले नाहीत. 2022 साली झालेल्या 18 सामन्यांपैकी 13 सामने या संघाने जिंकले आहेत. ऑस्ट्रेलियापाठोपाठ हा संघ विश्वचषक जिंकण्याच्या स्पर्धेत आहेत. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडशिवाय वेस्ट इंडिजच्या संघाने विश्वचषक जिंकलेला आहे.
वेस्ट इंडिज
वेस्ट इंडिजच्या महिला संघाने 2016 मध्ये हा चषक जिंकला होता. परंतु मागच्या वर्षीची त्यांची कामगिरी पाहाता ते पुन्हा चॅम्पियन बनतील असं वाटत नाही.
सरासरीपेक्षाही वेस्ट इंडिजचा खेळ खराब झाला आहे. गेल्या वर्षी झालेल्या 18 सामन्यांपैकी या संघाने फक्त 5 सामने जिंकले आहेत.
न्यू झीलंड
विश्वचषकाच्या स्पर्धेत न्यूझीलंडचा संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. गेल्या वर्षी झालेल्या 18 पैकी 10 सामने या संघाने जिंकले आहेत. आतापर्यंत या संघाने विश्वचषक जिंकलेला नाही मात्र 2009 आणि 2010 साली ते अंतिम सामन्यापर्यंत पोहोचले आहेत.
भारत
भारताने गेल्या वर्षभरात 30 टी 20 सामने खेळले आहेत.
त्यापैकी 17 सामने जिंकले आहेत. आजवर भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला नसल्यामुळे आताचा चषक महत्त्वाचा आहे.
2020मध्ये भारताचा संघ अंतिम फेरीत पोहोचला होता.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)