रशियातून दरमहिन्याला हजारो गरोदर महिला अर्जेंटिनाला पर्यटनासाठी जातात आणि मग

गेल्या काही महिन्यांत रशियातील 5 हजारपेक्षाही जास्त गरोदर महिलांनी अर्जेंटिनामध्ये प्रवेश केल्याचा दावा स्थानिक मायग्रेशन अधिकाऱ्यांनी केला आहे.

8 फेब्रुवारी रोजी एकाच फ्लाईटमध्ये 33 गरोदर महिला रशियातून अर्जेंटिनात दाखल झाल्याचंही अधिकाऱ्यांनी सांगितलं.

अर्जेंटिनाच्या नॅशनल मायग्रेशन एजन्सीच्या माहितीनुसार, "यापैकी बहुतांश महिलांना गरोदरपणाचा शेवटचा टप्पा सुरू होता."

या महिलांना अर्जेंटिनाचं नागरिकत्व मिळवायचं असून त्यासाठी मुलांना जन्म घालण्याकरिताच त्या देशात दाखल झाल्या आहेत, असं म्हटलं जात आहे.

गेल्या वर्षी रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर दोन्ही देशांमधील परिस्थिती तणावपूर्ण आहे.

स्थानिक माध्यमांमधील बातम्यानुसार, रशियातून अर्जेंटिनात येणाऱ्या नागरिकांची संख्याही अलिकडच्याच काळात जास्त वाढली आहे.

गुरुवारी रशियातून अर्जेंटिनाची राजधानी ब्युनॉस एरिस शहरात एक विमान दाखल झालं. या विमानातून एक, दोन नव्हे तर तब्बल 33 गरोदर महिला प्रवास करत होत्या.

त्यांपैकी 3 महिलांच्या कागदपत्रांमध्ये काही त्रुटी आढळून आल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आलं.

त्याच्या आदल्याच दिवशी 3 महिलांना याच कारणास्तव ताब्यात घेण्यात आलं होतं, अशी माहिती बुनोस एरिस विमानतळावरील मायग्रेशनविषय कामे पाहणाऱ्या विभागाचे प्रमुख फ्लोरेन्शिया कॅरिग्नानो यांनी 'ला नासिओन' नामक प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितलं.

आपण पर्यटक म्हणूनच अर्जेंटिनात आलो आहोत, असा दावा या महिलांनी सुरुवातीला केला होता.

पण त्यांचा पर्यटनाचा कोणताही हेतू नव्हता, हे तपासात निष्पन्न झालं. तसंच त्या महिलांनी अखेर याची कबुली दिली आहे.

ताब्यात घेतलेल्या महिलांपैकी एक महिला म्हणाली, "अर्जेंटिनाचा पासपोर्ट रशियच्या पासपोर्टपेक्षा जास्तीचं स्वातंत्र्य देतो. त्यामुळेच आम्हाला आमच्या मुलांसाठी अर्जेंटिनाचा पासपोर्ट घ्यायचा आहे."

कॅरिग्नानो याविषयी म्हणाल्या, "त्या महिला अर्जेंटिनामध्ये येतात, त्यांच्या मुलांची नोंद अर्जेंटिनियन म्हणून करतात आणि निघून जातात. अर्जेंटिनाचा पासपोर्ट जगभरात अतिशय सुरक्षित मानला जातो. पासपोर्टधारकांना 171 देशांमध्ये व्हिसा-मुक्त प्रवेश करण्याची परवानगी त्यामुळे मिळते."

शिवाय, अर्जेंटिनात मूल जन्माला आलेलं असल्याने त्यांच्या पालकांसाठीही नागरिकत्व मिळवण्याची प्रक्रिया सोपी आणि वेगवान होते.

दुसरीकडे, रशियन पासपोर्टवर केवळ 87 देशांमध्ये व्हिसा-मुक्त प्रवास करण्याची परवानगी मिळते. त्यामुळे मूल जन्माला घालण्याच्या माध्यमातून महिला अर्जेंटिनाचं नागरिकत्व घेण्याचा प्रयत्न करतात.

अर्जेंटिनाच्या प्रशासनाने गुरुवारी ताब्यात घेतलेल्या 3 महिलांचं प्रकरण ख्रिस्टियन रुबिलर हे वकील पाहत आहेत.

त्यांनी म्हटलं, "या महिलांना 'खोटे पर्यटक' असल्याच्या संशयावरून तुरुंगात टाकण्यात आलं आहे. पण खरं तर 'खोटे पर्यटक' अशी कोणतीही संकल्पना अर्जेंटिनाच्या कायद्यात अस्तित्वात नाही."

"या महिलांनी कोणताही गुन्हा केलेला नाही. स्थलांतरासंदर्भातील कोणताही कायदा मोडला नाही. बेकायदेशीरपणे त्यांचं स्वातंत्र्य त्यांच्याकडून हिरावून घेतलं जात आहे," असं रुबिलर यांनी म्हटलं.

यानंतर काही वेळाने संबंधित महिलांची सुटका करण्यात आली.

रशियन नागरिकांचं अर्जेंटिनामध्ये होणारं आगमन वाढण्याचं मुख्य कारण हे युक्रेन युद्ध असल्याचं मत 'ला नोसिआन'मध्ये व्यक्त करण्यात आलं आहे.

"युद्ध आणि कोलमडलेली आरोग्य व्यवस्था या कारणांमुळे रशियातून पलायन वाढल्याचं यामध्ये म्हटलं आहे.

रशियन महिला या अर्जेंटिना संदर्भात इतर देशांचं व्हिसा-मुक्त धोरण, येथील आरोग्य व्यवस्था यांच्याकडे आकर्षिक होतात.

त्यामुळे अर्जेंटिनाचं नागरिकत्व मिळवण्याचा सोपा मार्ग म्हणून रशियन नागरिक 'बर्थ टूरिझ्म'कडे पाहतात, असंही यामध्ये सांगण्यात आलं आहे.

यासंदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी बीबीसीने प्रयत्न केला असता एक रशियन भाषेतील वेबसाईट निदर्शनास आली.

ही वेबसाईट अर्जेंटिनामध्ये जन्म देणाऱ्या गरोदर महिलांना विविध पॅकेजचं ऑफर देते.

अर्जेंटिनामध्ये मूल जन्माला घालण्यासाठी वैयक्तिक लक्ष, अर्जेंटिनाची राजधानी ब्युनॉस एरिसमधील सर्वोत्तम रुग्णालयात उपचार, विमातळावरून पिकअप-ड्रॉप, स्पॅनिश भाषेचे धडे तसंच राहण्याच्या खर्चावरील सवलती यांच्याबाबत वेबसाईटवर जाहिराती आहेत.

हे पॅकेजेस इकोनॉमी क्लासपासून ते फर्स्ट क्लास दर्जापर्यंत विभागलेले आहेत. त्यांची किंमत 5 हजार डॉलरपासून ते 15 हजार डॉलरपर्यंत आहे.

वेबसाईटवरील माहितीनुसार, कंपनीचे संस्थापक हे 2015 पासून पर्यटन आणि स्थलांतरविषयक सेवा देतात. तसंच ही कंपनी 100 टक्के अर्जेंटिनियन आहे, असंही त्यावर सांगण्यात आलं आहे.

ला नॅसिआनच्या एका बातमीनुसार, अर्जेंटिनाचे पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

संबंधित महिलांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना बनावट कागदपत्रे मिळवून देण्यास, तसंच त्यांना अर्जेंटिनात स्थायिक होण्याच्या दृष्टिकोनातून मदत करणाऱ्या लोकांचा शोध घेण्यात येत आहे.

अवैध व्यवसायाच्या पायावर उभ्या राहिलेल्या या 'मिलियन डॉलर बिझनेस'ची पाळेमुळे खणून काढण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे, असंही बातमीत म्हटलं आहे.

आतापर्यंत संबंधित टोळीने या सेवेच्या माध्यमातून तब्बल 35 हजार डॉलर कमावल्याचा पोलिसांना संशय आहे.

या प्रकरणात अद्याप कुणालाही अटक झाली नाही. परंतु, पोलिसांनी लॅपटॉप, टॅबलेट, स्थलांतरसंबंधित काही कागदपत्रे आणि मोठ्या प्रमाणात रोख रक्कम जप्त केल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)