You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मोलार प्रेगनन्सी : 'माझ्या बायकोला दिवस गेलेत, मग सोनोग्राफीमध्ये गर्भ का दिसत नाहीये?'
- Author, डॉ. शैलेजा चंदू
- Role, बीबीसीसाठी
"हे काय आहे डॉक्टर? तुम्ही म्हणाला होतात की माझ्या बायकोला दिवस गेलेत आणि आता तुम्ही स्कॅनमध्ये बाळ दिसत नाही, असं म्हणताय?" तिच्या नवऱ्याने जरा ओरडूनच विचारलं.
डॉक्टर त्यांना बसण्याची खूण करत म्हणाल्या, "हो, असं होतं कधीकधी. ही स्पेशल कंडिशन आहे."
मात्र, डॉक्टरांच्या विरोधाभासी उत्तराने तो अधिकच उद्विग्न झाला. त्याने चिडूनच विचारलं, "हिचं पोट खूप वाढलं. त्यामुळे आम्हाला वाटलं जुळं असेल. तिला सतत उलट्याही होतात. प्रेगनंसी हार्मोनही खूप जास्त आहे - काही लाखांत. हार्मोनची पातळी इतकी जास्त असेल तर स्कॅनमध्ये भ्रृण दिसायला हवं. पण, तुम्ही म्हणताय भ्रृण नाहीच."
तिला गर्भधारणा होऊन तीन महिने झाले होते.
डॉक्टर म्हणाल्या, "याला मोलार प्रेगनंसी म्हणतात. तिला गर्भधारणा झाली असली तरी पोटातला गर्भ वाढत नाही."
मोलार प्रेगनन्सी म्हणजे काय?
सामान्यपणे सुदृढ गर्भ तयार होण्यासाठी आणि त्याच्या उत्तम वाढीसाठी शुक्राणू बीजांडाला चिकटतो त्यावेळी वडिलांच्या क्रोमोझोम्सची (गुणसूत्र) एक जोडी आणि आईच्या क्रोमोझोम्सची एक जोडी गर्भाला मिळत असते.
मात्र, मोलार प्रेगनन्सी 'अॅबनॉर्मल प्रेगनन्सी' असते. वडिलांचा सुदृढ शुक्राणू आईच्या रिकाम्या बीजांडाला चिकटतो. या बिजांडामध्ये क्रोमोझोम्स नसतात किंवा दोन शुक्राणू रिकाम्या बीजांडाला चिकटतात. अशावेळी तयार होणाऱ्या गर्भामध्ये केवळ वडिलांचे क्रोमोझोम्स असतात. आईचे नसतात. याला Complete Molar Pregnancy म्हणतात.
मोलार प्रेगनंसीमध्ये गर्भाची सामान्य वाढ होत नाही. एखाद्या मोत्यासारख्या बुडबुड्यासारखा गर्भ तयार होतो.
पार्शिअल मोलर प्रेगनन्सी म्हणजे काय?
जेव्हा दोन शुक्राणू एका सुदृढ बीजांडाला चिकटतात अशावेळी क्रोमोझोम्सच्या तीन जोड्या तयार होतात. अशा गर्भधारणेत कधी-कधी गर्भ वाढत असल्याची लक्षणं दिसतात. मात्र, ही गर्भधारणाही अॅबनॉर्मल असल्याने वाढीची लक्षणं दिसली तरी गर्भाची प्रत्यक्ष वाढ होत नाही.
मोलार प्रेगनन्सीची लक्षणं कोणती?
यात पोटाचा आकार खूप जास्त वाढतो. खूप उलट्या होतात. ब्लिडिंगही जास्त होतं. ही मोलार प्रेगनंसीची प्रमुक लक्षणं आहेत. प्रेगनन्सी हार्मोन्सचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर वाढतं आणि त्यामुळेच उलट्याही जास्त होतात.
प्रेगनन्सी हार्मोन म्हणजे काय?
Beta-HCG हे एक विशेष हार्मोन असतं. स्त्रीला गर्भधारणा झाली की तिच्या शरीरात हे हार्मोन स्रवतं. सामान्य गर्भधारणेच्या तुलनेत मोलार प्रेगनंसीमध्ये या हार्मोनचं प्रमाण खूप जास्त असतं.
गर्भधारणेच्या पहिल्या तीन महिन्यात स्कॅनिंग करतात. यात गर्भाची वाढ व्यवस्थित होत आहे का? मोलार प्रेगनन्सीची लक्षणं आहेत का? या सगळ्या गोष्टी तपासल्या जातात. मात्र, बायोप्सी केल्यानंतरच या आजाराची खातरजमा करता येते.
मोलार प्रेगन्सीवर उपचार कोणते?
मोलार प्रेगन्सीमुळे गर्भ वाढत नाही आणि कुठल्याही उपचाराने तो वाढवताही येत नाही. त्यामुळे अशी गर्भधारणा काढून टाकणे, हा एकमेव उपाय असतो. मात्र, त्यासाठी कुठलीही सर्जरीची गरज नसते. म्हणजेच टाके वगैरे पडत नाहीत.
गुंगीचं औषध दिल्यानंतर गर्भाशयाच्या मुखाजवळून सक्शन ट्युब टाकून मोत्यासारखा तो बुडबुडा काढून टाकतात.
नको असलेली गर्भधारणा काढण्यासाठी अनेक औषधंही उपलब्ध आहेत. त्याचा उपयोग करता येतो का?
मोलार प्रेगनन्सी काढण्यासाठी अशाप्रकारची कुठलीही औषधं घेता येत नाही. कारण मोलार प्रेगनन्सीमध्ये गर्भपाताचं औषध घेतल्यास गर्भाशय आकुंचन आणि प्रसरण पाऊन मोलार प्रेगनन्सीची पेशी रक्तवाहिन्यात जाऊन इतरही अवयवांपर्यंत जाऊ शकतात.
मोलार प्रेगनन्सी पुन्हा राहू नये, यासाठी काय खबरदारी घेतली पाहिजे?
पोटात वाढणारं बाळ मुलगी असावं की मुलगा, हे जसं आपल्या हातात नाही. त्याचप्रमाणे मोलार प्रेगनन्सीदेखील आपल्या हातात नाही.
गर्भाशयातून मोलार प्रेगनन्सी काढली म्हणजे उपचार पूर्ण झाले असं समजावं का?
नाही. जोवर प्रेगनन्सी हार्मोनची पातळी सामान्य होत नाही तोवर स्त्रीला डॉक्टरांच्या देखरेखीखालीच ठेवावं लागतं. दर दोन आठवड्यांनी रक्ताची चाचणी करून हार्मोनची पातळी मोजतात.
हार्मोन पातळी किती दिवसात कमी होते?
गर्भाशय स्वच्छ केल्यानंतर प्रेगनन्सी हार्मोनची पातळी पुढच्या 56 दिवसात म्हणजेच 8 आठवड्यांमध्ये खाली येते. मात्र, दर दोन आठवड्यात एकदा तरी हार्मोनची पातळी तपासावी लागते.
जर ही पातळी खाली येत नसेल तर पुढचे सहा महिने डॉक्टरांकडे जाऊन नियमित तपासणी करतात.
हार्मोनची पातळी कमी होत नसेल तर काय करतात?
15% प्रकरणांमध्ये मोलार प्रेगनन्सीच्या पेशींची असामान्य वाढ होते. त्या गर्भाशयाच्या आत जातात. इतकंच नाही तर या पेशी मेंदू, फुफ्फुस आणि यकृतातही जाण्याची शक्यता असते.
प्रेगनन्सी हार्मोनची पातळी कमी झाली नाही तर स्कॅन करून इतरही अवयव तपासतात. अशा रुग्णाचं वय, ज्या अवयवापर्यंत या पेशी गेल्या आहेत तो अवयव, हॉर्मोनची पातळी आणि इतरही काही बाबी तपासून त्यानुसार किमोथेरपी देतात.
मोलार प्रेगनन्सीसाठी उपचार घेतल्यानंतर पुढची गर्भधारणा कधी करावी?
उपचारानंतर प्रेगनन्सी हार्मोनची पातळी सामान्य होत नाही तोवर गर्भधारणा होऊ नये, याची खबरदारी घ्यायला हवी. ज्यांना किमोथेरपीची गरज पडते त्यांनी तर किमोथेरपीनंतर पुढील वर्षभर ही खबरदाारी घ्यावी लागते.
मोलार प्रेगनंसी काढल्यानंतर कुठल्या प्रकारची गर्भनिरोधक साधनं वापरता येतात?
डॉक्टरांशी सल्लामसलत करून कुठल्याही प्रकारची गर्भनिरोधक साधनं वापरता येतात. मात्र, मोलार प्रेगनन्सीमुळे गर्भाशयाच्या भिंती अत्यंत कमकुवत होतात. त्यामुळे गर्भाशयात बसवण्यात येणारी कॉपर-टी वापरू नये.
अशावेळी कॉपर-टी बसवल्याने गर्भाशयात छिद्र पडण्याचा धोका असतो.
दुसऱ्यांदा होणारी गर्भधारणा पुन्हा मोलार प्रेगनन्सी ठरण्याची शक्यता किती असते?
खूप कमी. ज्या स्त्रियांना मोलार प्रेगनन्सी असेल अशा 100 पैकी 99 स्त्रियांची दुसरी गर्भधारणा अगदी सामान्य असते. दुसऱ्यांदा होणारी गर्भधारणा मोलार प्रेगनंसी ठरण्याची शक्यता 100 पैकी फक्त एका स्त्रीमध्ये असते.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)